सोशल फोबिया : तुम्हाला गर्दीमध्ये, कार्यक्रमात जाण्याची, लोकांमध्ये मिसळायची भीती वाटते का?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी

आज वयाच्या पंचविशीत असलेला प्रितम त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगली नोकरी मिळवू शकला खरा... पण आजही त्याला त्याच्या नव्या नोकरीचा आनंद मनपासून साजरा करता आळेला नाही. सतत आपल्याला लोकांसमोर बोलावं लागेल, मीटिंगमध्ये बोलावं लागेल, बोलावं लागल्यावर घशाला कोरड पडेल मग काहीच आठवणार नाही अशी भीती त्याला सतत वाटते.

आपण काही बोललोच तर आपली चूक होईल, लोक आपल्या चुका काढतील, नंतर त्या चुकांवर बोलत राहातील त्यापेक्षा न बोललेलंच चांगलं असं त्याला वाटतं.

प्रेझेटेंशन आणि मीटिंगमध्ये त्याला थोडं बाजूलाच बसायला आवडतं. मीटिंग संपली की त्याला हायसं वाटतं. प्रत्येक रविवारी संध्याकाळीच त्याच्या मनात उद्याच्या त्रासाचे विचार येतात. सोमवार उजाडला की त्याला बरं नाहीसं वाटतं, प्रत्येक सोमवारी आज ऑफिसलाच जाऊ नये असं त्याला वाटतं.

इथं प्रितम ही काल्पनिक व्यक्ती असली तरी, अशाप्रकारचा त्रास होणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला दिसतात.

बहुतांशवेळा अशाप्रकारची भीती त्या व्यक्तीच्या लहानपणापासून तयार झालेली असते. पौगंडावस्थेत मनामध्ये घर करुन राहिलेली भीती पुढे दीर्घकाळ मनात राहाते आणि त्या व्यक्तीला आयुष्यभर त्या भीतीचा सामना करावा लागतो.

सामाजिक भयगंड किंवा सोशल अँक्झायटी म्हणजे काय?

फोबिया या शब्दाचा अर्थ तीव्र स्वरुपाची भीती असा होतो. एखाद्या वस्तू, परिस्थिती, कार्यक्रम, भावना किंवा प्राण्याबद्दल वाटणारी तीव्र भीती म्हणजे फोबिया.

फोबियाला भीतीचा पुढचा तीव्र टप्पा म्हटलं जातं. एखादी परिस्थिती, किंवा वस्तूबद्दल या लोकांच्या मनामध्ये अवास्तव भीती तयार होते.

त्याचा रोजच्या जीवनावर परिणाम होऊ लागतो आणि भीतीचे प्रसंग टाळण्यासाठी ती व्यक्ती सतत प्रयत्न करू लागते, अशी व्यक्ती भीतीचा सामना टाळण्यासाठी ती परिस्थिती, घटना, वस्तू यांना जीवनातून बाजूला करण्याचा प्रयत्न करते.

अशी टाळाटाळ केल्यामुळे त्या व्यक्तीला पात्रता असूनही आपल्या कामाचं फळ मिळत नाही. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला प्रेझेंटेशनची भीती, साहेबांची भीती वाटत असेल आणि त्या भीतीपासून सुटका करण्यासाठी प्रेझेंटेशनच टाळत असेल तर तिला कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करता येणार नाही. कदाचित त्या व्यक्तीला पात्रता असूनही पदोन्नती, नव्या संधी, पगारवाढीत डावललं जाईल.

सामाजिक भयगंड किंवा लोकांमध्ये-समाजामध्ये मिसळायची वाटणारी भीती ही मानसिक स्थिती मोठ्याप्रमाणावर दिसून येते. सामाजिक परिस्थितीमध्ये, कार्यक्रमांमध्ये जाण्याची वाटणारी भीती पौगंडावस्थेत तयार होते.

ती संपूर्ण आयुष्यभर परिणाम करू शकते. काही लोक वयानुसार त्यावर मात करतात, पण अनेक लोकांना त्यासाठी उपचार घेतल्याशिवाय यावर मात करता येत नाही.

सोशल फोबियाप्रमाणे 'अगोराफोबिया' नावाची एक भीती काही लोकांना सतावत असते. अगोराफोबिया म्हणजे एखाद्या गर्दीच्या ठिकाणातून आपली सूटका होणं कठीण आहे असं लक्षात येणं तसेच एखादी वाईट घटना तिथं घडल्यास बाहेर पडणं अशक्य आहे, असं वाटल्यास त्या व्यक्तीला भीती वाटू लागते.

त्यामुळे हे लोक गर्दीची ठिकाणं, बाजार, सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणं टाळतात. अनेक लोकांना आपल्या घरातून बाहेर पडल्यास असुरक्षित वाटू लागतं.

अशा गर्दीच्या ठिकाणी ते सापडले की त्यांना त्रास वाटू लागतो, घुसमटल्यासारखं वाटतं, श्वास जोरात सुरू होतो, घाम फुटतो, हृद्याचे ठोके वेगाने सुरू होतात.

त्यामुळे हे लोक बाजारात जाणं टाळतात, गर्दीच्या वाहनांतून प्रवास टाळतात. शक्यतो मित्र, कुटुंबीय किंवा विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तीबरोबरच घर सोडतात. काही वस्तू हवी असल्या ते या वस्तू बाजारातून आणण्याऐवजी घरीच मागवतात.

याचप्रमाणे काही लोकांना टेलिफोनवर बोलणं, फोन करणं याची भीती वाटत असते. त्याला टेलिफोनफोबिया किंवा टेलीफोबिया, फोन फोबिया असं म्हटलं जातं. या लोकांना फोनची रिंग वाजली तरी आता काय बोलायचं, आता बोलावं लागणार अशी भीती वाटू लागते.

लहानपणी एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर लाजाळू असा शिक्का मारला जातो. कालांतराने त्याचे रुपांतर सोशल अँक्झायटी किंवा सोशल फोबियात होऊ शकते.

या फोबियाबद्दल सांगताना 'चिंता स्वरुप आणि उपाय' या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर लिहितात, "अनोळखी माणसांमध्ये वावरणे, सार्वजनिक वाहनांतून फिरणे, चारचौघात पुढे येऊन बोलणे, फोनवर बोलणे, ओळखीच्या माणसांमध्येही समारंभात वा विशिष्ट सोशल फंक्शनच्यावेळी बोलणे वा खाणे-पिणे त्यांना खूप अवघड वाटते. हळूहळू असे प्रसंग ही माणसे टाळू लागतात. कधीकधी अवघट वाटणे वेगळे पण सोशल फोबियाच्या रुग्णाला सतत असे वाटू लागते. आपण ग्रुपमध्ये, सगळ्यांच्या समोर बोललो तर बावळट ठरू. काहीतरी चमत्कारिक वागणे आपल्याकडून घडेल, आयत्यावेळी मनात ठरवलेले एकदम विसरून जाऊ आणि आपली फजिती होईल असे त्यांना वाटत राहाते."

डॉ. पाटकर यांनी वर सांगितलेल्या माहितीवरुन आपणल्याला या अशा व्यक्तींच्या मनस्थितीची कल्पना येऊ शकते.

किंवा आपण स्वतः, मित्र-मैत्रिणी, घरातील एखादी व्यक्ती यांना हा त्रास झाल्याचं किंवा आताही होत असल्याचं तुमच्या लक्षात येईल. सोशल फोबियाची काही ढोबळ लक्षणे आपण इथं पाहू-

सोशल फोबियाची लक्षणं

  • लोकांच्या नजरेत येऊ नये यासाठी प्रयत्न करत राहाणं, आपल्यावर टीका होईल अशी भीती वाटत राहाणं, आत्मविश्वास कमी झाल्यासारखं वाटणं. सर्वत्र लाजल्यासारखं वाटणं.
  • सामाजिक कार्यक्रम, चर्चा टाळाव्याश्या वाटणं. कार्यक्रमांमध्ये किंवा ऑफिसमध्ये, पार्टीमध्ये एकत्र खाणं नकोसं वाटणं.
  • असा त्रास होणाऱ्या व्यक्तींना रोजच्या कामाचीही काळजी वाटू लागते. अनोळखी लोकांना भेटावं लागेल, फोनवर बोलावं लागेल अशी भीती त्यांना वाटते.
  • आपण एखादं काम करण्यासाठी अपात्र आहोत असं लोकांसमोर दिसेल, घाम फुटेल आणि तशी अस्वस्थता आल्याचं लोकांसमोर दिसेल अशी भीती या लोकांना वाटत राहाते.
  • लोकांमध्ये गेल्यावर घशाला कोरड पडते, श्वास जोरात सुरू होतो. पॅनिक अॅटॅकसारखा त्रास होऊ लागतो. घाम येतो, आजारी असल्यासारखं वाटतं.

सोशल अँक्झायटी किंवा सामाजिक भयगंड म्हणजे फक्त लाजाळूपणा नाही. युनायटेड किंग्डमची राष्ट्रीय आरोग्य सेवा एनएचएसच्या माहितीनुसार, सामाजिक भयगंड म्हणजे अशी भीती की जी मनातून जातच नाही. तिचा रोजच्या कामावर, आत्मविश्वासावर, नातेसंबंधांवर परिणाम होतो.

काही लोकांना अशा सामाजिक बंधांमध्ये मिसळण्याची कधीकधी भीती वाटू शकते पण सोशल फोबिया असणाऱ्या व्यक्तीला त्या सामाजिक घटनेआधी, ती घटना (कार्यक्रम) सुरू असताना आणि नंतरही भीती वाटत राहाते.

रोजच्या कामाबद्दल सतत काळजी वाटणे, अनोळखी लोकांना भेटणे, संभाषणाला सुरुवात करणे, फोनवर बोलणे, काम करणे, खरेदी करणे यात तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्हाला सोशल अँक्झायटी असू शकते.

या भीतीवर मात कशी करायची?

समाजाच्या भयगंडामुळे तुमच्या कामावर, रोजच्या जगण्यावर परिणाम होत असेल तर तुम्ही नक्कीच मदत घेतली पाहिजे.

सोशल अँक्झायटी किंवा इतर कोणत्याही मानसिक अवस्थेची लक्षणं दिसत असल्यास मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकारतज्ज्ञ, समुपदेशक, फॅमिली डॉक्टर यांची मदत घेतली पाहिजे.

आपल्याला नक्की काय झालंय, त्यासाठी कोणाची मदत घ्यायची, तुम्हाला फक्त समुपदेशनाची गरज आहे की औषधाची याबद्दल त्यांच्याशी सखोल चर्चा झाल्यावरच ते सांगू शकतात.

त्यामुळे कोणत्याही आजाराची गुगलवर औषधे शोधू नयेत तसेच परस्पर औषधे घेण्याचा धोका पत्करू नये.

भीतीवर मात न केल्यास अशाप्रकारचे आजार वाढू शकतात. बहुतांश लोक एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास त्या बाजूला जाणं टाळतात. त्यामुळे भीतीपासून तात्पुरती सुटका होत असली तरी ती कमी होत नाही.

भीतीमुळे न बोलणं, कार्यक्रम टाळणं, प्रवास टाळणं, सार्वजनिक कार्यक्रम टाळणं, कार्यक्रम प्रसंगातलं जेवणं टाळणं असं केल्यामुळे तात्पुरते बरं वाटतं पण भीती पाठ सोडत नाही. चांगले गुण, हुशारी असूनही या व्यक्ती मागे पडतात.

याबदद्ल अधिक सांगताना डॉ. प्रदीप पाटकर 'चिंता स्वरुप आणि उपाय' या पुस्तकात लिहितात, "फोबिया वाटतो ती वस्तू वा परिस्थिती टाळली की रुग्णाला हलके वाटते. पण प्रश्न टाळल्यामुळे सुटत नसतो. भीतीला भिडल्याने, प्रश्नाला सामोरे जाण्यानेच फोबिया कमी होऊ शकतो हे उपचाराचे सूत्र आहे.

फोबिया होण्यामध्ये मेंदूतील जैवरासायनिक प्रक्रिया जशा कारणीभूत होतात तसेच मनावर केले गेलेले भीतीचे संस्कार व भीती कमी करणाऱ्या प्रयत्नांची टाळाटाळ हेही जबाबदार घटक आहेत. चिंताशामक औषधं, सल्लामसलत, कौन्सिलिंग, सायकोथेरपी व वर्तन उपचार पद्धतीद्वारे फोबियाची तीव्रता कमी करता येते व फोबियापासून सुटका मिळवता येते. मात्र त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याविषयीचा फोबिया बाजूल सारला पाहिजे."

सोशल फोबियावरील उपचारांबद्दल विरार येथील मनोविकारतज्ज्ञ डॉ. कीर्ती तांडेल यांनी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.

ते म्हणाले, "सोशल फोबियाग्रस्त रुग्णाने आपल्याला वाटणाऱ्या भीतीचा दैनंदिन कामावर, जीवनावर किती परिणाम होत आहे याचा विचार करुन डॉक्टरांकडे मदत मागितली पाहिजे. प्रत्येक रुग्णाला डॉक्टर औषधे देतातच असे नाही. तुम्हाला किती तीव्रतेचा आजार आहे हे पाहून डॉक्टर उपचार ठरवत असतात.

सौम्य प्रकारची लक्षणं असतील तर डॉक्टर वर्तन उपचारपद्धतींचा (बिहेवियर थेरपी) वापर करू शकतात. जर तीव्र स्वरुपाची लक्षणं असतील तर औषधं देण्याचा विचार डॉक्टर करतात. तुम्ही डॉक्टरांकडे गेलात की लगेच ते गोळ्या लिहून देतील हा समज काढून टाकला पाहिजे. आपल्यामध्ये दिसणारी सोशल फोबियाची लक्षणं तसेच त्याचा रोजच्या कामावर होणारा परिणाम याचं निरीक्षण करावं आणि डॉक्टरांकडे जावं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)