You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हाक्कीपिक्की तेल हा काय प्रकार आहे? हे तेल कुठं मिळतं?
- Author, तुलसी प्रसाद रेड्डी नंगा
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
एक मुलगा आणि एक मुलगी उभे आहेत. त्या दोघांचं डोकं एका बाजूला कललेलं आहे. त्यांचे केस अगदी कमरेखाली आलेले आहेत. त्यांच्या हातात एक बाटली आहे. त्यात काळपट रंगाचं तेल आहे.
अशा प्रकारचे अनेक फोटो तुम्हाला सोशल मीडियावर आणि ई कॉमर्स साईटवर गेल्या काही काळापासून कदाचित दिसत असतील.
जेव्हा तुम्ही ई कॉमर्स साईटवर जाल आणि आयुर्वेदिक हेअर ऑइल असं टाईप केल्यावर तुम्हाला अनेक बाटल्यांवर हा फोटो छापलेला दिसेल. सोशल मीडियावर या तेलाबद्दल अनेक लोकांनी परीक्षणं लिहिली आहेत. त्यात अगदी बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स सगळ्यांचा समावेश आहे. या तेलाभोवती एकप्रकारचं ग्लॅमर तयार झालं आहे. हे हाक्कीपिक्की नावाचं केसांना लावायचं तेल म्हणजे केशतेल आहे.
या लेखाच्या माध्यमातून मूळ हाक्कीपिक्की तेल, त्याचा इतिहास यासंबंधी माहिती घेऊ या.
हाक्कीपिक्की कोण आहेत?
हाक्कीपिक्की ही एक आदिवासी जमात आहे. ती कर्नाटकातील शिवमोगा, हसन, मंड्या, आणि म्हैसूर जिल्ह्यात सापडते. 2011 च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या 12000 आहे.
कन्नड भाषेत हाक्कीपिक्की शब्दाचा अर्थ पक्ष्यांचे शिकारी असा होतो.
“हाक्कीपिक्की लोकांचं मूळ स्थान गुजरातमध्ये आहे. ते राणा प्रताप सिंह यांच्या काळात राहायचे अशी इतिहासात नोंद केली आहे आणि दुष्काळामुळे ते इतर भागात गेले. ते आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतही स्थलांतरित झाले,” असं कर्नाटक आदिवासी रक्षा परिषदेचे प्रदेशाध्यक्ष एम.कृष्णय्या यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
या जमातीतील पुढची पिढी आता शिकत आहे.
“ते वागरी नावाची भाषा बोलतात. या भाषेचं मूळ गुजरातमध्ये सापडतं,” असं डॉ, डी.सी. नामजुमडा म्हणाले. ते म्हैसूर विद्यापीठात मानववंशशास्त्रज्ञ आहेत.
या केशतेलाचा इतिहास काय आहे?
पक्ष्यांची शिकार हा हाक्कीपिक्की लोकांचा मुख्य उद्योग होता. या शिकारीवर बंदी आणल्यानंतर पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या केशतेलाच्या उद्योगाकडे उत्पन्नाचं साधन म्हणून वळल्याचं या जमातीतले लोक सांगतात.
सुदीश कारके हे हाक्कीपिक्की समाजातले सदस्य आहे. ते पक्षीराजपुरा येथे राहतात. या तेलाचा व्यवसाय पिढ्यानुपिढ्या सुरू असल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
“आमचे पूर्वज सांगतात की म्हैसूरच्या महाराजांच्या काळापासून वनस्पतीपासून आम्ही हे तेल तयार करत आहोत. आम्ही आमच्या आजोबांकडून हे तेल तयार करायला शिकलो,” असं ते पुढे सांगतात.
60 ते 70 च्या दशकापासून हे तेल विकायला सुरुवात केल्याची माहिती सुदीश कारके देतात.
“सुरुवातीच्या काळात अगदी कमी प्रमाणात हे तेल त्यांनी तयार केलं आणि आसपासच्या गावात विकलं. जर तुम्ही हे केशतेल वापरलं तर तुमचे केस गळणार नाही आणि ते आणखी लांब होतील असं लोक म्हणतात. ते तेल द्यायचे आणि त्याबदल्यात जे खायला असेल ते मागायचे. कारके सांगतात की हे तेल विकून फारसा पैसा मिळायचा नाही,”
पुढे जाऊन अगदी परदेशातही हे तेल विकायला सुरुवात केली. “त्यांनी पुढे सुदान, सिंगापूर, मलेशियातही आपली उत्पादनं विकायला सुरुवात केली,” डॉ. नामजुमडा म्हणाले.
हे तेल कसं तयार करतात?
सुदीश कारके म्हणाले की हे तेल जवळजवळ 100 पेक्षा अधिक औषधी वनस्पतींपासून तयार केलं जातं. मात्र या सर्व वनस्पतींची नावं आणि तेल तयार करण्याच्या पद्धतीची संपूर्ण माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
“मी फक्त 10 नावं सांगणार, तुम्हाला सगळी नावं कळली तरी ती सगळ्यांना सांगू नका कारण सगळी नावं कळली तर इतर लोकही हे ते तयार करतील. शिकाया, रीठा, आवळा, अलोवेरा, त्रिमुखी, तुलसी, ब्राह्मी, नीम, केशर, भृंगराज. जास्वंदाचं फूल, तरवडाचं फूल अशी बरीच आहेत,” कारके सांगतात.
“आम्ही दोन प्रकारची तेलं नारळाच्या तेलात मिसळतो. त्यात वाळवलेल्या औषधी वनस्पती टाकतो आणि 24 तास उकळतो. फक्त आच मंद असायला हवी. जर जास्त आचेवर ठेवलं तर औषधी वनस्पतींचा परिणाम कमी होतो,” असं अभिलाषा जयकुमार यांनी बीबीसीला सांगितलं. त्यासुद्धा या तेलाच्या उत्पादक आहेत.
अभिलाषा जयकुमार म्हणाल्या की या तेलामुळे टक्कल पडत असलेल्या लोकांचे केस गळणं बंद होतं आणि ज्यांना केस आहे ते आणखी दाट होतात. या तेलाचे कोणतेही दुष्परिणाम नाही असा त्या दावा करतात.”
मात्र डॉ.जितेंद्र यांनी बीबीसीला सांगितलं की या तेलाचा काय परिणाम होतो याबद्दल त्यांच्याकडे कोणतीही शास्त्रशुद्ध माहिती नाही.
“तुम्ही किती औषधी वनस्पती मिसळता यावर परिणाम अवलंबून आहे. परिणाम काहीही होऊ शकतो पण ते सिद्ध करण्यासाठी आकडेवारी हवी. ते अशी कोणतीच माहिती देत नाहीत. एखादं उत्पादन वापरताना त्याचे फायदे तोटे माहिती असायला हवेत,” असं डॉ.जितेंद्र म्हणाले.
गेल्या काही काळापासून विक्रीत वाढ
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या केशतेलाचे उत्पादन हा हजारो कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. हे तेल बऱ्याच काळापासून विकत असले तरी गेल्या काही वर्षांत विक्रीत वाढ झाली आहे. कोव्हिड काळात ऑनलाइन ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत असं ते म्हणाले.
2023 मध्ये जवळजवळ 100 हाक्कीपिक्की आदिवासी सुदानच्या नागरी युद्धात अडकले होते. नंतर त्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हा संपूर्ण देशाला या समुदायाबद्दल माहिती कळली.
या बातम्याही वाचा:
जेव्हा पंतप्रधान आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी आम्हाला सुदानला जायचं कारण विचारलं असं शिवमोग्गा येथील राजेश्वरी यांनी बीबीसीला सांगितलं. आम्ही तिथे तेल विकायला गेलो असं सांगितल्यावर त्यांना आमचं कौतुक वाटलं असं त्या सांगतात. पंतप्रधानांनी भेट घेतलेल्या लोकांमध्ये राजेश्वरी यांचा समावेश होता.
त्यानंतर हाक्कीपिक्की जमात सेलिब्रिटी, युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स लोकांमध्ये आणखी लोकप्रिय झाली. अर्धा लीटर तेल 1500 रुपयांना विकले जाऊ लागले.
म्हैसूर जिल्ह्यात हुन्सूर भागातील आदिवासींचा हाच मुख्य व्यवसाय आहे. हुन्सूर ते गुरुपुरा या मार्गावरील पक्षीराजपुरा-1 आणि पक्षीराजपुरा-2 या भागात अशी अनेक कुटुंबं आहेत जी हे केशतेल तयार करतात. शिवमोग्गा जिल्ह्यातही अनेक गावात हे तेल तयार केलं जातं.
इन्फ्लुएन्सर्स बरोबर जाहिराती
हक्कीपिक्की लोक आता त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करू लागले आहेत.
काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सला या उत्पादनाच्या जाहिरातीचे पैसे दिले जातात. ते म्हणतात की अनेक कुटुंबं आता हे तेल विकतात. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. म्हणून अशी जाहिरात करायची वेळ आली आहे.
“काही लोकांना पैसे दिले जातात. काही लोक ते फुकटात करतात,” असं एम. कृष्णय्या म्हणाले.
सोनू सूद आणि फराह खान यांच्यामुळे सुद्घा या तेलाला लोकप्रियता मिळत आहे. जेव्हा सेलिब्रिटी येतात तेव्हा ते फोटो घेतात आणि जाहिरातीसाठी त्याचा वापर करतात.
“सोनू सूद आणि खली सारखे लोक आमच्याकडे आले होते. ते आमच्याकडे आले तरच आम्ही जाहिरात करतो. त्यामुळे आम्ही सेलिब्रिटींवर जास्त खर्च करत नाही,” असं सुदीश कारके म्हणाले.
या जाहिरातींमुळे त्यांना देशाच्या इतर भागातूनही ऑर्डर्स मिळत आहेत. रणजित हे बिहार मधून कर्नाटकात हे तेल घेण्यासाठी आले होते. त्यांनी बीबीसीशी संवाद साधला.
“मी ऑनलाइन ऑर्डर केलं होतं पण मला खोटं तेल मिळालं. त्यामुळे मी ओरिजिनल घ्यायला इथवर आलो आहे. सोनू सूद इथे आल्याचा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पाहिला. अनेक सेलिब्रिटी इथे आल्याचं कळलं. म्हणून चांगल्या दर्जाचं तेल विकत घ्यायला मी इथे आलो आहे,” असं रणजित म्हणाले.
महागड्या कार, दुमजली घरं
हक्कीपिक्की समुदायाचे नेते मोहन म्हणतात की सध्या व्यापार चांगला सुरू आहे. सध्या महिन्याचा टर्नओव्हर 2 ते 3 कोटी आहे असं ते म्हणाले.
हक्कीपिक्की समुदायाचे लोक फारसे शिकलेले नाहीत त्यामुळे कॉम्प्युटर चालवायला किंवा टेलिकॉलर म्हणून इतरांना कामावर ठेवलं आहे.
“माझं काम फक्त फोन करणं आहे. मला महिन्याचे दहा हजार मिळतात,” असं गौरी बिदनूर यांनी बीबीसीला सांगितलं.
हाक्कीपिक्की समुदायाची नवीन पिढी सुद्धा या व्यवसायात उतरत आहे. शांतीकुमार हा त्यांच्यापैकी एक आहे. तो इंजिनिअर आहे.
त्याने बंगळुरूमध्ये तीन वर्षं नोकरी केली. मात्र पगार पुरेसा नसल्यामुळे त्याने नोकरी सोडली आणि आता तो कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो आहे.
जेव्हा मी हक्कीपिक्की लोक जिथे राहतात त्या भागाला भेट दिली तेव्हा मला आर्थिक विकास झाल्याचं पहायला मिळालं. इथल्या बहुतांश आदिवासी लोकांनी दुमजली घरं बांधली आहेत.
केशतेल विकल्यामुळे त्यांचं जीवनमान बदलत आहे. ते आता महागड्या कारमध्ये फिरतात. लग्नकार्यातही भरपूर खर्च करतात.
‘आमचा काही संबंध नाही’
जे लोक हे तेल तयार करतात ते औषधी वनस्पती जंगलातून घेत असल्याचा दावा करतात. मात्र कर्नाटक वन विभागाचे लोक हा दावा फेटाळतात.
“ते जंगलातून कोणतीही औषधी वनस्पती घेत नाहीत. त्यांना असं करण्याची परवानगी आमच्याकडून दिली गेलेली नाही. गेल्या काही काळात अशी अनेक दुकानं उघडली आहेत. आम्हाला या तेलाबद्दल काहीही माहिती नाही,” असं म्हैसूरच्या उपवनसंरक्षक अधिकारी सीमा यांनी बीबीसीला सांगितलं.
कर्नाटकातील आदिवासी विभागाकडे चौकशी केल्यावर त्यांनीही असंच काहीसं उत्तर दिलं.
“आम्ही या हाक्कीपिक्की लोकांना कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं नाही. ते कोणतं तेल तयार करतात याची आम्हाला माहिती नाही,” असं गंगाधर नावाचे एक अधिकारी म्हणाले.
सरकारने यासंबंधी जागृती करावी आणि ओळखपत्र तयार करावीत अशी मागणी हक्कीपक्की समुदायाचे नेते मोहन यांनी केली आहे.
“औषधी वनस्पतींसाठी सरकारने काही निधी द्यायला हवा. योग्य परवाना द्यायला हवा. सरकारच्या आयुष विभागाने प्रमाणपत्र द्यायला हवं,” अशी मागणीही मोहन यांनी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)