You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चॉकलेटमुळे चेहऱ्यावर मुरमं येतात का? नवं संशोधन काय सांगतं? वाचा
- Author, जेसिका ब्रॅडली
- Role, बीबीसी फ्युचर
त्वचेवरील मुरुम, पुरळ, डाग, चट्टे या समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरतात. किंबहुना अलीकडच्या काळात याचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात.
मुरुम, डाग कशामुळे होतात? त्यामागचं कारण काय? या गोष्टींची अनेकदा चर्चा होते, त्यावर वेगवेगळे उपाय देखील सुचवले जातात. चॉकलेट आणि मुरुमांचा एकमेकांशी संबंध जोडला जातो. मात्र खरोखरंच तसं असतं का? याची उकल करणारा हा लेख...
अनेक वर्षांपासून त्वचेवर किंवा चेहऱ्यावर येणाऱ्या पुरळ किंवा मुरुमांमागचं संभाव्य कारण म्हणून चॉकलेट आणि इतर गोड पदार्थांकडे पाहिलं जातं. मात्र, चॉकलेट हे त्यामागचं कारण नसू शकतं, अशी माहिती विविध वैज्ञानिक संशोधनांमधून समोर येत आहे.
चॉकलेटमुळे चेहऱ्यावर त्वचेवर चट्टे किंवा डाग पडतात असं पूर्वीपासून म्हटलं जातं. खरंच तसं होतं का? की मुलांनी जास्त प्रमाणात चॉकलेट्स किंवा गोड पदार्थ खाऊ नयेत म्हणून पालक मुलांना तसं सांगतात?
1960 च्या दशकात अनेक अभ्यासांद्वारे चॉकलेट आणि मुरुम यांच्यातील संबंधांचं विश्लेषण करण्यात आलं. यातील सर्वात मोठ्या अभ्यासात आढळलं की चॉकलेट आणि मुरुमांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. हा अभ्यास फक्त 65 जणांवर करण्यात आला होता.
मात्र तेव्हापासून या अभ्यासाच्या आराखड्यात असंख्य त्रुटी असल्याची टीका होते आहे.
मुरुमांना कारणीभूत असणारे विविध घटक
त्वचेवरील पुरळ, मुरुमांसाठी बहुधा चॉकलेट कारणीभूत नसतात, असं समोर येत असताना अलीकडे झालेल्या काही अभ्यासांमधून असं आढळून आलं आहे की तुमचा आहार आणि मुरुम यांचा घनिष्ठ संबंध असू शकतो.
विशेषत: पाश्चिमात्य आहाराशी याचा संबंध असू शकतो. कारण पाश्चिमात्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चरबी, साखर आणि दुग्ध उत्पादनांचा समावेश असतो.
मुरुम ही एक त्वचेशी निगडीत समस्या किंवा स्थिती असते. यात तेल आणि मृत त्वचा पेशींमुळे त्वचेवरील केसांची मूळं, रंध्रे किंवा छिद्रं बुजली जातात. त्यामुळे त्वचेवर मुरुम होतात.
पौंगडावस्थेत आणि प्रौढावस्थेत तीव्र स्वरुपात किंवा सातत्यानं होणारे पुरळ, मुरुम हे प्रामुख्यानं अनुवंशिकतेतून होतात, असं डर्मेटोलॉजिस्ट (त्वचा रोग तज्ज्ञ) असणाऱ्या बैबे ड्यू-हार्पर म्हणतात. त्या लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये व्याख्यात्या आहेत.
पुरळ किंवा मुरुमाचा संबंध अनुवांशिकतेची असण्यामागचं कारण म्हणजे, आपल्या त्वचेत तेल निर्मिती करणाऱ्या सेबेसिअस ग्लँड्स म्हणजे तैलग्रंथींचा आकार हा आपल्या जनुकांवर अवलबूंन असतो.
मागील काही वर्षांमध्ये वयस्कांमध्ये पुरळ, मुरुम यांचं प्रमाण वाढलं आहे. विशेषकरून महिलांमध्ये हे प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे. अर्थात यासाठी कोणतंही विशिष्टं असं एकच कारण नाही, असं ड्यू-हार्पर म्हणतात.
मात्र त्याचबरोबर त्या पुढे सांगतात की आपल्या दैनंदिन आयुष्यात संबंध येणाऱ्या पर्यावरणीय किंवा वातावरणातील काही घटकांची यात महत्त्वाची भूमिका असू शकते.
"सर्वसाधारणपणे सध्याची आपली जीवनशैली मानवी शरीरासाठी अयोग्य आहे. किंबहुना त्वचेवर मुरुम, पुरळ येणं हे सध्याच्या जीवनशैलींद्वारे होत असलेल्या अपायाचं दृश्य स्वरुप आहे," असं त्या म्हणतात.
आधुनिक जीवनशैलीमुळे त्वचेवरील पुरळ किंवा मुरुमांचं प्रमाण वाढलं आहे. यात उच्च प्रमाणात चरबी आणि साखर असलेल्या पाश्चिमात्य खाद्यपदार्थ देखील कारणीभूत असल्याचं संशोधकांनी एका अभ्यासातून मांडलं आहे.
त्याचबरोबर या अभ्यासात असंही म्हटलं आहे की आरोग्य, रोगप्रतिकार क्षमता, आहार, इन्फ्लमेशन, तणाव आणि पर्यावरणाशी येणारा संबंध या गोष्टींच्या परस्पर संबंधांवर अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे.
इतर घटकांमध्ये तणाव, संसर्गाशी लढणं किंवा पीएमएस या गोष्टींचा समावेश असू शकतो, असं झैनाब लाफ्ताह म्हणतात. त्या लंडनमधील गायज अँड सेंट थॉमसेस हॉस्पिटल मध्ये डर्मेटोलॉजिस्ट आहेत आणि ब्रिटिश स्किन फाऊंडेशनच्या प्रवक्त्या आहेत.
चॉकलेटमुळे मुरुमं होऊ शकतात का?
चॉकलेटमुळे मुरुम होतात, असं साठ वर्षांपूर्वी पहिल्यांदा म्हटलं गेलं होतं. त्यानंतर आजही अनेकांना असं वाटतं की चॉकलेटमुळे मुरुम होण्याची शक्यता असते.
लाफ्ताह त्यांच्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या जवळपास 10 पैकी 9 रुग्ण त्यांना विचारतात की मुरुमांची समस्या दूर होण्यासाठी ते आहारात कोणते बदल करू शकतात किंवा कोणते पदार्थ टाळू शकतात. त्यांच्याकडून उल्लेख करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये चॉकलेट हा त्यातील प्रमुख पदार्थ असतो.
"यामध्ये काही गैरसमज आणि थोडंसं सत्य देखील आहे," असं त्या म्हणतात.
मुरुम आणि आहार यांच्यातील दुव्यामागचं एक सामान्य कारण अन्नपदार्थांच्या ग्लायसेमिक इंडेक्स (glycemic index)हे असू शकतं.
ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तात निर्माण होणाऱ्या साखरेच्या प्रमाणाशी निगडीत असतो. ग्लायसेमिक इंडेक्स जितका जास्त, तितक्या लवकर रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं.
यात मुख्य घटक अनुवांशिक प्रवृत्ती किंवा गुणधर्म हा आहे. मात्र एखाद्याच्या आहारातील काही घटकांमुळे इन्फ्लेमेशन वाढू शकतं, असं लाफ्ताह म्हणतात.
काही लोकांचं शरीर, डेअरी पदार्थांसारख्या काही विशिष्ट खाद्यपदार्थांना तीव्र प्रतिसाद देऊ शकतं. मात्र हे दुर्मिळ आहे. याचा संबंध सहनशीलतेशी, शरीराच्या रचनेशी असू शकतो, असं त्या पुढे म्हणतात.
मुरुमांशी चॉकलेट मधील एखाद्या विशिष्ट घटकांचा संबंध असतो का हे पाहण्यासाठी काही संशोधकांनी चॉकलेटमधील स्वतंत्र घटकांच्या परिणामांचा देखील अभ्यास केला. मात्र त्यातून फारसा काही निष्कर्ष निघू शकला नाही आणि जी काही माहिती हाती आली ती फारच थोडी आहे.
2011 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात 100 टक्के डार्क चॉकलेटचा मुरुमावर होणारा परिणाम तपासण्यात आला. याचा अर्थ त्यात साखरेविना असलेल्या चॉकलेटचा मुरुमावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला.
संशोधकांना आढळून आलं की चॉकलेटच्या सेवनाचा संबंध अद्याप मुरुमांच्या वाढीशी जोडलेला होता. मात्र या अभ्यासात फक्त 10 जणांचा समावेश होता. शिवाय त्यात कोणताही प्लासिबो नियंत्रण गट (placebo control group) नव्हता.
मुरुमांचा आणि आहाराचा संबंध
मुरुम आणि आहार यांचा एकमेकांशी संबंध असण्यामागचं एक कारण सामान्यत: अन्नपदार्थांच्या ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये असू शकतं. ग्लायसेमिक इंडेक्समधून हे लक्षात येतं की एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थामुळे रक्तातील साखरेची पातळी किती वेगानं वाढू शकते.
असंख्य अभ्यासांमधून आढळून आलं आहे की फळं, ब्रेड आणि पास्ता सारख्या ज्या अन्नपदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यांचा आणि मुरुमांच्या लक्षणांचा संबंध असतो.
लाफ्ताह म्हणतात, जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असणारे अन्नपदार्थ मुरुमांचं प्रमाण वाढवू शकतात. कारण या पदार्थांमुळे शरीरातील इन्सुलिनच्या पातळीत वाढ होते, इन्फ्लेमेशन वाढते, त्वचेतील सीबमचे उत्पादन वाढतं.
यामुळे त्वचेवरील छिद्रं बंद होऊ शकतात. मात्र चॉकलेटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी ते मध्यम स्वरुपाचा आहे.
संशोकांच्या आणखी एका गटानं मुरुम आणि पाश्चिमात्य पद्धतीचा आहार यांच्या व्यापक संबंधांचा अभ्यास केला. (पाश्चिमात्य आहारात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असणारे अन्न पदार्थ असतात.)
खूप लोकांवर केलेल्या अभ्यासातून दिसून येतं की मुरुमाचा आणि उच्च चरबीयुक्त, अती प्रमाणात साखर असलेल्या अन्नपदार्थांचा संबंध असतो.
यासंदर्भातील सर्वात मोठं संशोधन 2020 मध्ये प्रकाशित करण्यात आलं. या अभ्यासानुसार 24,000 पेक्षा अधिक लोकांच्या मुरुमांबद्दलच्या स्वयं मूल्यांकनाची आणि आहाराच्या सवयींची तुलना करण्यात आली.
त्यातून संशोधकांच्या लक्षात आलं की पाश्चिमात्य आहाराची बहुधा मुरुम होण्यात महत्त्वाची भूमिका असते.
एका अभ्यासात असं आढळलं की, पापुआ न्यू गिनीच्या किटावन बेटांवरील लोकांमध्ये मुरुम आढळल्याची कोणतीही उदाहरणं नाहीत.
यावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, त्या लोकांच्या आहारात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ असल्यामुळे असं होत असावं.
"मुरुम आणि मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या इतर पाश्चिमात्य आजारांमध्ये बरेच संबंध आहेत" - बोडो मेलनिक
मात्र त्याचबरोबर संशोधकांनी एकूणच असणारं कॅलरीचं सेवन म्हणजे कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन यासारखे काही गोंधळात टाकणारे घटक देखील लक्षात घेतले, ज्यामुळे आहार आणि मुरुमांतील संबंध लक्षात घेणं अधिक कठीण होऊ शकतं.
थेट कारण-परिणाम यांचा ठोस प्रभाव सिद्ध करण्याच्या बाबतीत विविध लोकांवर केलेल्या अभ्यासांना सामान्यत: मर्यादा असतात.
मात्र वैज्ञानिकांनी यासंदर्भात अधिक अभ्यास करताना यासंबंधामागील काही विशिष्ट मार्गांचा किंवा घटकांचा देखील शोध घेतला आहे.
"मुरुम हे त्वचेचा चयापयाचा परिपाक किंवा लक्षण आहे," असं बोडो मेलनिक म्हणतात.
ते जर्मनीतील ओस्नाब्रुक विद्यापीठात डर्मेटोलॉजीचे प्राध्यापक आणि वरिष्ठ व्याख्याते आहेत.
ते म्हणतात, "मुरुम आणि मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या इतर पाश्चिमात्य आजारांमध्ये बरेच संबंध आहेत."
2015 च्या एका शोधनिबंधात त्यांनी असा युक्तिवाद केला होता की रिफाईंड कार्बोहायड्रेट्स (ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो), दूध, आरोग्यासाठी अयोग्य असलेली चरबी, यामुळे मुरुम होण्यास चालना मिळते.
त्याचं म्हणणं आहे की जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या अन्नपदार्थांमुळे सेबेसियस फॉलिकल्सला 'धोक्याचा प्रतिसाद' मिळतो. यामुळे त्वचेतील सेबमचे उत्पादन वाढते आणि त्याची रचना देखील बदलते.
मग चॉकलेटमुळे मुरुमं होत नाहीत?
चॉकलेटमध्ये जास्त प्रमाणात आरोग्यासाठी अपायकारक अशी चरबी असते आणि जास्त प्रमाणात साखर असते. हे जरी खरं असलं तरी त्याचे कोणतेही संभाव्य परिणाम हे फक्त आपल्या एकूणच आहारावर अवलंबून असतात असं नाही तर ते तुम्ही कोणत्या प्रकारचं चॉकलेट खात आहात यावर देखील अवलंबून असू असतं.
कारण डार्क चॉकलेटचं प्रमाण जितकं अधिक, तितकंच त्यामध्ये असणारं साखरेचं प्रमाण कमी असतं.
त्याचबरोबर काही विशिष्ट डार्क चॉकलेट खाण्याचे त्वचेच्या संदर्भात काही फायदे देखील असू शकतात.
काही अभ्यासातून असं आढळून आलं की डार्क चॉकलेटमुळे त्वचेतील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होतो. या तणावामुळे इन्फ्लेमेशन वाढतं.
अर्थात मुरुम होण्याची तीव्रता किंवा धोका कमी करण्यापेक्षा त्वचेच्या झीज किंवा एजिंगसंदर्भातील दृश्य परिणामांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.
लाफ्ताह म्हणतात, "डार्क चॉकलेटमध्ये असणाऱ्या फ्लेवोनॉईडमुळे (आरोग्यासाठी लाभदायी संयुगं) ते खाल्ल्यामुळे त्वचेला काही फायदे होऊ शकतात. खासकरून फ्लेवेनॉल्सचा फायदा होऊ शकतो.
कारण त्यामध्ये शक्तीशाली अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात.
"त्वचेचा ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यात त्याची खूप महत्त्वाची भूमिका असते. या तणावाचा त्वचेच्या एजिंगशी म्हणजे त्वचा वृद्ध जाण्याशी संबंध असतो."
महत्त्वाची बाब म्हणजे ज्यात कॅलरींचं प्रमाण जास्त असतं आणि पोषकद्रव्यांचं प्रमाण कमी असतं, असे आहाराचे काही विशिष्ट प्रकार शरीरात इन्फ्लेमेशन होण्यास कारणीभूत असतात. अनुवांशिकदृष्ट्या काही जणांमध्ये यामुळे मुरुमांची समस्या उद्भवू शकते, असं ड्यू-हार्पर म्हणतात.
सर्वसाधारणपणे एकंदरित आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या आहारात फळे, भाजीपाला आणि इतर अँटिऑक्सिडंट गुणधर्म अधिक असलेल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. असा आहार आपल्या त्वचेसाठी चांगला असतो, असं त्या म्हणतात.
"आपलं शरीर आणि शरीरातील सर्व अवयव समन्वयानं काम करतात. जेणेकरून ह्रदय, पोट किंवा आतडे आणि मेंदू या अवयवांसाठी चांगल्या असणाऱ्या गोष्टी आपल्या त्वचेसाठी देखील चांगल्या असतात," असं ड्यू-हार्पर म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.