You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिवाळीत तूप वापरण्यापूर्वी त्याची शुद्धता कशी तपासायची? घरच्या घरी असं ओळखा
- Author, लक्कोज श्रीनिवास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दिवाळी आल्यानं फराळाचे पदार्थ बनवण्याची घाई घराघरांत सुरू असते. या काळात विविध पदार्थ बनवण्यासाठी तुपाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
मागणी वाढल्यानंतर भेसळयुक्त तूपही अनेकदा बाजारात येत असतं. अशावेळी शुद्ध तूप ओळखता येणं गरजेचं ठरतं.
वर्षभरापूर्वी तिरुपती देवस्थानचे प्रसादाचे लाडू तयार करण्यासाठी कमी दर्जाचं तूप वापरण्यावरून वाद झाला होता.
तेव्हा S व्हॅल्यू वेगवेगळी असल्याने तिरुमाला लाडू प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती.
ही S व्हॅल्यू काय असते हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) च्या उपसंचालक पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (त्यांनी नावं जाहीर न करण्याची विनंती केली.) FSSAI ही संस्था आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारित येते.
S व्हॅल्यू म्हणजे काय?
तुपामध्ये मेद किंवा चरबी किती आहे, हे ठरवण्यासाठी केल्या जाणाऱ्या रासायनिक चाचणीमधून S व्हॅल्यू मिळते. यातील S म्हणजे स्टँडर्ड.
ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही संस्था वस्तू आणि सेवांचा जागतिक दर्जा कायम ठेवण्यासाठी निकष ठरवते.
ISO च्या निकषांनुसार, म्हशीच्या दुधापासून तयार करण्यात आलेलं तूप आणि गायीच्या दुधापासून तायर करण्यात आलेलं तूप याची S व्हॅल्यू वेगळी असते.
Gas Liquid Chromatography (GLC) इन्स्ट्रुमेंटचा वापर करून गायी आणि म्हशीच्या तुपाची शुद्धता - दर्जा ठरवला जाऊ शकतो. वनस्पती तेलं, प्राणीजन्य चरबी आणि मिनरल ऑईल्स यांच्यातली भेसळ शोधण्यासाठीची ही सर्वात अचूक पद्धत आहे.
शुद्ध तुपातील फॅट्सचं प्रमाण जर 98.05 ते 104.32 दरम्यान असेल तर त्याचा अर्थ S व्हॅल्यू योग्य आहे.
पण या प्रमाणामध्ये तफावत असेल तर त्याचा अर्थ तुपात भेसळ करण्यात आलीय. म्हणूनच तुपामधील मेदाचं प्रमाण मोजण्यासाठी S व्हॅल्यू ठरवण्यात आली आहे.
S व्हॅल्यूची विभागणी 5 प्रकारांत केली जाते आणि प्रत्येक प्रकार वेगवेगळ्या प्रकारची भेसळ दर्शवतो. ISO 17678:2010 नुसार यासाठीच्या चाचण्या केल्या जातात.
- S Value 98.05-104.32 - टोटल S Value
- S2 Value 98.05 – 101.95 - याचा अर्थ या तुपात सोयाबीन, सूर्यफूल, हरभार बियाणं, गव्हाचं पीठ, कॉर्नफ्लार, कपाशीचं तेल वा फिश ऑईलने भेसळ करण्यात आलेली आहे.
- S3 Value 99.42 – 100.58 - नारळ किंवा पाम पासूनचे फॅट्स मिसळण्यात आलेले आहेत.
- S4 Value 95.90 – 104.10 - तुपात पाम तेल आहे.
- S5 Value 97.96 - 102.04 - यात Lard म्हणजे डुकरापासून तयार करण्यात आलेली चरबी आहे.
तुपामध्ये भेसळ आहे वा नाही याची खातरजमा करण्यासाठी इतरही काही चाचण्या करता येतात. पण या सगळ्या चाचण्या प्रयोगशाळेत कराव्या लागतात. तुपाची शुद्धता ठरवण्यासाठी किंवा त्यामध्ये काही भेसळ आहे का ठरवण्यासाठी एकूण 50 ते 55 चाचण्या करता येतात.
दुग्धविकास महामंडळाच्या (NDDB) अहवालात उल्लेख करण्यात आलेल्या तुपाच्या दर्जाबाबतच्या काही चाचण्या जाणून घेऊ.
Baudouin Test : तुपामध्ये तिळाचं तेल मिसळण्यात आलंय का हे तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते.
Reichert-Meissel Value (RM Value) : याद्वारे व्होलाटाईल फॅटी अॅसिडचं प्रमाण ठरवलं जातं. म्हणजे अॅसिटिक अॅसिड, प्रोपिऑनिक अॅसिड, ब्युटेरिक अॅसिड, वॅलेरिक अॅसिड आणि कॅप्रोईक अॅसिड
Milk Fat : दुधात फॅट्सचं प्रमाण किती ते ठरवण्यासाठी
Lodine Test : वितळलेल्या तुपात आयोडिनचे काही थेंब मिसळल्यानंतर जर ते निळं किंवा जांभळं झालं तर याचा अर्थ त्यात भेसळ आहे. याचा अर्थ त्यामध्ये स्टार्च - पिष्टमय पदार्थ मिसळण्यात आलेला आहे. शुद्ध तुपावर आयोडिनची प्रक्रिया होत नाही.
Saponification Value : तुपामध्ये साबणासारखा घट्टपणा आहे वा नाही, हे ठरवण्यासाठी ही चाचणी केली जाते.
शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तुपात काय फरक असतो?
शुद्ध तूप हे म्हशीच्या किंवा गायीच्या दुधापासून तयार करण्यात येतं. दुधामधून लोणी वेगळं काढून हे तूप तयार करण्यात येतं.
भेसळयुक्त तूप सोयाबीन, पाम, सूर्यफूल या प्रकारांतलं वनस्पतीजन्य तेलांपासून तयार करण्यात येतं. किंवा यामध्ये अॅनिमल फॅट्स, सिंथेटिक रंग वा फ्लेवरिंग घालण्यात येतं.
शुद्ध तूप हे सोनेरी पिवळ्या किंवा हलक्या ब्राऊन रंगाचं असतं.
भेसळयुक्त तूप हे फिकट रंगाचं किंवा अगदी गडद रंगाचं असू शकतं.
शुद्ध तूप रवाळ असतं. त्याला हलकासा गंध असतो आणि ते मऊ असतं.
भेसळयुक्त तुपाला वेगळा वास येतो आणि ते हाताला तेलकट लागतं.
शुद्ध तूप साधारण 6 महिने टिकतं.
भेसळयुक्त तूप 3 महिनेच टिकू शकतं.
शुद्ध तुपात A, D, E, K ही जीवनसत्वं असतात.
भेसळयुक्त तुपातल्या घटकांमुळे आरोग्यास धोका होऊ शकतो.
तुपाची शुद्धता घरी कशी ओळखायची?
भारतात स्वयंपाकात तुपाचा वापर पूर्वापार केला जातोय. मग हे तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त हे घरी तपासता येतं का? तर यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील.
- तापवल्यानंतर जर तूप पिवळं पडलं, तर याचा अर्थ त्यात भेसळ आहे.
- हाताच्या तळव्यावर थोडं तूप घ्या. जर ते वितळलं, किंवा त्याला कोणताच गंध येत नसेल तर त्यात भेसळ आहे.
- ग्लासभर गरम पाण्यात गरम तूप घातल्यास शुद्ध तूप विरघळतं. जे हे तूप तरंगलं किंवा गोळा झालं तर याचा अर्थ, ते भेसळयुक्त आहे.
- एका पांढऱ्या कागदाला तूप लावून ठेवा. जर तुपात भेसळ असेल तर साधारण दोन तासांनी तुम्हाला पांढऱ्या कागदावर काही अंश दिसतील.
- भेसळयुक्त तूप फ्रीजमध्ये ठेवलं, तर गोठत नाही.
भेसळयुक्त तूप सेवनाचे आरोग्यावर अनेक परिणाम होऊ शकतात. पचनसंस्थेचे विकार, हृदयरोग, कॅन्सरची शक्यता असते. अनेकदा भेसळयुक्त तुपामुळे अॅलर्जीचा त्रास होतो. तुम्ही विकतचं तूप घेत असाल तर पॅकेजिंग आणि लेबलिंग तपासून घ्या, म्हणजे अॅगमार्क किंवा ISO प्रमाणपत्र आहे का हेदेखील तुम्हाला कळेल.