You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खडे मीठ आणि साधं मीठ यात काय फरक असतो? आरोग्यासाठी कोणतं मीठ चांगलं?
- Author, विष्णू स्वरूप
- Role, बीबीसी तमीळ
मीठ हा आपल्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मिठाची महती एवढी मोठी आहे की फक्त चिमूटभर मीठ तुमच्या जेवणाचा स्वाद आणि आरोग्य या दोन्हींची दिशा आणि दशा बदलू शकतं.
आपण जेव्हा आरोग्याविषयी आणि योग्य आहाराविषयी बोलतो, तेव्हा सर्रास विचारले जाणारे प्रश्न म्हणजे, जेवणात मिठाचं प्रमाण किती असावं? तुम्ही किती मीठ खाता? तंदुरुस्त राहण्यासाठी रोजच्या आहारात किती मीठ असावं?
अलीकडच्या काळात जीवनशैलीतील बदलांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेक विकार घरोघरी ठाण मांडून बसले आहेत. जीवनशैलीशी निगडीत या आजारांचा सर्वसाधारणपणे मिठाशी देखील थेट संबंध आहे.
मोठ्या प्रमाणात दिसून येणाऱ्या उच्च रक्तदाब, हदयविकार सारख्या आजारांचा आहारातील मिठाशी संबंध असतो.
ज्या प्रमाणे मिठाचं रोजच्या आहारात प्रमाण किती असावं? या मुद्द्याची चर्चा होते, त्याचप्रमाणे नेमकं कोणतं मीठ आरोग्यासाठी चांगलं असतं? याचीदेखील चर्चा होते.
तसे मिठाचे विविध प्रकार आहेत. मात्र अनेकदा, खडे मीठ (Rock Salt) आणि साधं मीठ (Powdered Salt) या मिठाच्या दोन प्रकारांबद्दल विविध मतं आढळून येतात. या दोन्ही प्रकारांपैकी कोणतं मीठ आरोग्यादायी असतं यावर अनेकदा चर्चा होत असते, वेगवेगळी मतं मांडली जातात.
अलीकडे मिठाचे अनेक नवीन प्रकार बाजारात उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं.
उदाहरणार्थ, खडे मीठ (Rock Salt), सोडियम कमी प्रमाणात असणारं मीठ (Low Sodium Salt Or Light Salt), सैंधव मीठ (Himalayan Salt).
मिठाच्या या सर्व प्रकारांमध्ये काय फरक असतो? आहारात त्यांचा समावेश केल्यास ते आरोग्यासाठी चांगलं असतं का?
वरवर सोप्या वाटणाऱ्या मात्र तितक्याच महत्त्वाच्या अशा या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बीबीसीनं डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांशी चर्चा केली.
तसंच, खडे मीठ (Rock salt) (Stone salt) आणि साधं मीठ (Powdered salt) मधील फरक जाणून घेण्यासाठी बीबीसीनं मीठ उत्पादकांशी देखील चर्चा केली.
त्यांनी दिलेली माहिती या लेखात समाविष्ट करण्यात आली आहे.
खडे मीठ आणि साधं मीठ या दोन्हींमध्ये काय फरक आहे?
या संदर्भात आम्ही थुथुकुडीमधील धनपाडू सॉल्ट एक्सपोर्टर्स अॅंड ट्रेडर्स असोसिएशनचे (Thoothukudi-based Dhanpadu Salt Exporters and Traders Association) लेखापरीक्षक एस. राघवन यांच्याशी बोललो.
खडे मीठ आणि साधं मीठ या दोन्ही प्रकारच्या मिठांचं उत्पादन कसं केलं जातं, त्याची प्रक्रिया काय असते, हे आम्ही जाणून घेतलं.
एस. राघवन यांनी सांगितलं की, आधी खडे मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून तयार केलं जायचं. मात्र आता तुतिकोरिनसारख्या मिठागरांमध्ये बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून हे मीठ तयार केलं जातं.
त्यांनी पुढे सांगितलं की, खडे मिठाच्या उत्पादनाचा विचार करता, समुद्राचं खारपट पाणी मिठागरांमध्ये सोडलं जातं आणि पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर हे मीठ खाली शिल्लक राहतं.
"बाजारात पाठवल्या जाणाऱ्या खड्या मिठात आम्ही आयोडीन टाकतो," असं ते सांगतात.
त्यांनी पुढे सांगितलं की, खडे मिठाच्या उत्पादनाचा विचार करता, समुद्राचं खारपट पाणी मिठागरांमध्ये सोडलं जातं आणि पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर हे मीठ खाली शिल्लक राहतं.
"बाजारात पाठवल्या जाणाऱ्या खड्या मिठात आम्ही आयोडीन टाकतो," असं ते सांगतात.
मिठामध्ये आयोडीन दोन प्रकारे टाकलं जातं. मनुष्यबळाचा वापर करून मिठागरांमध्ये स्प्रिंकलर्सच्या साहाय्याने शिंपडलं जातं. मात्र या पद्धतीनं आयोडीन मिठामध्ये योग्यरित्या किंवा समान प्रमाणात मिसळत नाही, असं राघवन सांगतात.
दुसरी पद्धत म्हणजे, यंत्राचा वापर करून खडे मिठात आयोडीनचं मिश्रण केलं जातं. या पद्धतीत मिठामध्ये आयोडीन समान प्रमाणात, योग्यरितीनं मिसळलं जातं, असं ते सांगतात.
नेहमीच्या वापरातील मीठ किंवा साधं मीठाच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल बोलताना राघवन यांनी सांगितलं की, यात पहिली पायरी म्हणजे पाण्यामध्ये खारं पाणी टाकून त्यातून खडं मीठ बनवलं जातं. मग ते गिरण्यांमध्ये नेलं जातं.
तिथे ते पुन्हा एकदा खाऱ्या पाण्यानं धुतलं जातं. त्यावरील धूळ स्वच्छ केली जाते.
मग हे मीठ वाळवलं जातं आणि क्रशर्समध्ये बारीक केलं जातं. त्यानंतर या मिठात यंत्रांच्या साहाय्यानं आयोडीन मिसळलं जातं.
"रोजच्या वापरातील मीठ अधिक दाणेदार बनवण्यासाठी त्यात थोडसं सिलिकेट टाकलं जातं," असं ते सांगतात.
खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिठात आयोडिन असलं पाहिजे हा सरकारी नियम आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी मिठाच्या कारखान्यात मिठात आयोडीन आहे की नाही या गोष्टीची तपासणी करून खातरजमा करतात, असं राघवन सांगतात.
आरोग्यासाठी कोणतं मीठ चांगलं?
आम्ही आहारतज्ज्ञांना आणि मूत्ररोगतज्ज्ञांना याबद्दल विचारलं की, खडे मीठ आणि साधं मीठ या दोन्ही प्रकारच्या मिठांपैकी कोणतं मीठ आरोग्यासाठी चांगलं असतं.
या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, मिठाच्या दोन्ही प्रकारात आयोडिनचं प्रमाण वेगवेगळं असतं. मात्र त्यात असणाऱ्या सोडियमच्या प्रमाणात फारसा फरक नसतो.
"सर्वसाधारणपणे मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड...मग ते कोणत्या स्वरुपात असो. त्यातील सोडियमचं प्रमाण सारखंच असतं," असं डॉ. राजन रविचंद्रन म्हणतात.
ते चेन्नईतील मायात हॉस्पिटलमध्ये नेफ्रोलॉजी (मूत्रपिंडविकाराचे तज्ज्ञ) विभागाचे प्रमुख आहेत.
डॉ. डॅफ्नी लवस्ली चेन्नईतील अपोलो हॉस्पिटल्समध्ये मुख्य आहारतज्ज्ञ आहेत. त्यासुद्धा काहीसं असंच मत व्यक्त करतात.
त्या म्हणतात, "मिठाच्या या दोन्ही प्रकारात आयोडिनचं प्रमाण वेगवेगळं असल्यामुळे त्यांच्या चवीमध्ये थोडा फरक असू शकतो. मात्र या दोन्ही प्रकारात सोडियमचं प्रमाण सारखंच असतं."
म्हणूनच डॉ. राजन रविचंद्रन आणि डॉ. डॅफ्नी लवस्ली दोघेही सांगतात की, खडे मीठ आणि साधं मीठ या दोन्ही प्रकारच्या मिठांचं आपण जितकं कमी सेवन करू तितकं ते शरीरासाठी चांगलं असतं.
मिठामुळे आपल्या शरीरात काय होतं?
या मुद्दयाबाबत डॉ. राजन रविचंद्रन म्हणतात की आपल्या शरीराला मिठाची आवश्यकता असली तरी नियमितपणे जास्त प्रमाणात मिठाचं सेवन करणं शरीरासाठी चांगलं नसतं.
याबद्दल ते पुढे सांगतात, की सोडियममध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे शरीरातील रक्तदाब वाढतो आणि त्याचा विपरित परिणाम ह्रदयावर, मेंदूवर आणि मूत्रपिंडावर होतो.
"सातत्यानं जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांची हानी होते. त्यातून ह्रदयविकाराचा झटका येतो. मेंदूच्या रक्तवाहिन्यांची हानी होते. परिणामी ब्रेन स्ट्रोक होतो, तर मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांची हानी होते आणि त्यामुळे मूत्रपिंडाचे विकार उद्भवतात," असं ते म्हणतात.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास मूत्रपिंडावर काय परिणाम होतो?
डॉ. राजन रविचंद्रन मीठ आणि मूत्रपिंड यातील संबंध स्पष्ट करून सांगतात.
ते म्हणतात की, सर्वसाधारणपणे मूत्रपिंडात दररोज आपल्या शरीरातील 180 लीटर रक्त स्वच्छ केलं जातं.
"त्यातील फक्त 1.5 लीटर लघवीच्या रुपात बाहेर पडतं. सामान्यपणे लघवीमधून प्रथिनं बाहेर टाकली जात नाहीत. मात्र जर मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांची हानी झाली असेल तर अशावेळी लघवीबरोबरच प्रथिनं देखील शरीराबाहेर टाकली जातात," असं त्यांनी म्हटलं.
मिठाचे नवीन प्रकार
अलीकडे सोडियम कमी प्रमाणात असणारं मीठ (light salt) आणि खडे मीठ (Rock Salt) यांची बाजारात विक्री होते. मिठाचे हे प्रकार शरीरासाठी चांगले असतात का, याबद्दल आम्ही डॉक्टर्सना विचारलं.
डॉ. राजन रविचंद्रन यांनी याबाबत सांगितलं की, सर्वसामान्यपणे मीठ जसं समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून बनवलं जातं त्याऐवजी खडे मीठ हे खनिजांपासून बनवलं जातं.
"खडे मिठात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक देखील असतात," असं त्यांनी म्हटलं.
त्याचप्रमाणे मिठाचा एक नवीन प्रकार म्हणजे सोडियम कमी प्रमाणात असणारं लाईट सॉल्ट (light salt) किंवा लो सोडियम सॉल्ट (low sodium salt).
सोडियममुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी या प्रकारचं मीठ बाजारात उपलब्ध झालं आहे. मिठाच्या या प्रकारात सोडियमचं प्रमाण कमी केलेलं असतं आणि त्याऐवजी 15-20 टक्के पोटॅशियम त्यात मिसळलेलं असतं.
"सुपर लाईट सॉल्ट (Super light salt)मध्ये तर अगदी 30 टक्क्यांपर्यत पोटॅशियम टाकण्यात आलेलं असतं," असं डॉ. रविचंद्रन सांगतात.
मात्र डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय पोटॅशियमयुक्त मिठाचं सेवन करू नये, असं डॉक्टर्स सांगतात.
"लाईट सॉल्टचं सेवन फक्त डॉक्टरच्या मार्गदर्शन घेतल्यानंतरच केलं पाहिजे," असं आहारतज्ज्ञ डॉ. डॅफ्नी लवस्ली म्हणतात.
"ज्या लोकांना ह्रदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशांना लाईट सॉल्टचा फायदा होऊ शकतो. मात्र ज्या लोकांना मूत्रपिंडाची समस्या किंवा विकार आहे अशांनी लाईट सॉल्टचं सेवन करू नये. कारण त्यामुळे शरीरातील पोटॅशियमचं प्रमाण अस्थिर किंवा विस्कळीत होऊ शकतं," असं त्या म्हणतात.
शरीरासाठी मिठाचं किती प्रमाण चांगलं असतं?
या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. डॅफ्नी लवस्ली म्हणतात, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) शिफारशीनुसार दररोज फक्त 5 ग्रॅम मीठ खाल्लं पाहिजे.
"मात्र आपण भारतीय आपल्या आहारात दररोज 7 ते 8 ग्रॅम मीठाचं सेवन करतो. कारण आपल्या जेवणात लोणची, पापड अशा गोष्टींचा समावेश असतो," असं त्या सांगतात.
त्याशिवाय, "अनेक कारणांमुळे उच्च रक्तदाब आणि तणावाची समस्या निर्माण होते. यातील एक कारण म्हणजे मीठ. जरी आपण इतर बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवू शकत नसलो तरी आपण किती प्रमाणात मीठ खातो यावर नक्कीच नियंत्रण ठेवू शकतो."
"त्यामुळेच आपण किती प्रमाणात मीठ खात आहोत यावर आपण नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे," असं त्यांनी सांगितलं.
"लहान मुलांना सुरुवातीपासूनच कमी प्रमाणात मीठ दिलं पाहिजे. यामुळे त्यांची मिठाच्या चवीसंदर्भातील किंवा मीठ खायची सवय त्यानुसारच विकसित होईल. असं झाल्यास ते चवीसाठी अधिक मिठाचं सेवन करणार नाहीत," असं डॉ. डॅफ्नी लवस्ली सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.