You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सरकारी रुग्णालयांना पुरवली बनावट अँटीबायोटीक औषधं, राज्यभरात कसे चालते रॅकेट?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला 6 लाख 92 हजार बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रिक्लॅव्ह 625 ही अँटीबायोटीक औषधं रुग्णालयाला पुरवली आणि रुग्णालयानं ही औषध रुग्णांना वाटप सुद्धा केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी चार कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट 2023 ला अन्न व औषध प्रशासनानं 21 ऑगस्ट 2023 ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध भांडारातून औषधांचे काही नमुने तपासणीसाठी गोळा केले होते.
हे नेमकं प्रकरण काय आहे? आरोपी हे रॅकेट कसं चालवत होते? हेच या बातमीत पाहुयात.
हे नमुने मुंबईतल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्या औषधांचा अहवाल 31 जुलै 2024 ला अन्न व औषध प्रशासनाच्या प्रादेशिक कार्यालयाला प्राप्त झाला असून हे औषधं बनावट असल्याचं समोर आलं आहे.
त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक नितीन भांडारकर यांनी अजनी पोलिसांत 2 ऑक्टोबरला तक्रार दिली. त्यानंतर चार कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये कोल्हापुरातील विशाल एन्टरप्रायजेसचे सुरेश पाटील, सुरतची फार्मासिक्स बायटच्या प्रीती त्रिवेदी, भिवंडीतील अक्व्हाटीक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मिहिर त्रिवेदी आणि मीरा रोडवरील काबिज जेनरिकचे संचालक विजय शैलेंद्र चौधरी या आरोपींचा समावेश असून यापैकी विजय चौधरी आणि मिहिर त्रिवेदी आधीच एका प्रकरणात तुरुंगात आहे.
इतर आरोपींना चौकशीसाठी बोलावलं असून पुढील कारवाई करत असल्याचं अजनी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.
राज्यभरातच बनावट औषधांचा पुरवठा?
पण, हे रॅकेट फक्त नागपुरातच नाहीतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात सक्रीय असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या चौकशीत समोर आलं आहे. याआधी कळमेश्वर इथं सुद्धा याप्रकरणातल्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल आहे.
आता शासकीय महाविद्यालयात बनावट औषध प्रकरणातील आरोपी विजय चौधरी आणि मिहीर त्रिवेदी हे दोघे कळमेश्वर बनावट औषध प्रकरणात आधीच तुरुंगात आहेत.
तसेच या दोघांवर ठाण्यात तीन, नांदेड, वर्ध्यातही गुन्हे दाखल आहेत. आता नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बनावटा औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
Reclave 625 या औषधामध्ये अमॉक्सीसीलन (AMOXICILLIN) किंवा क्लॅव्हूलॅनिक (CLAVULANIC ACID) हे मुख्य घटक गायब होते. औषधांवर उत्पादक कंपन्यांचं नाव वेगवेगळं होतं.
या कंपन्याही अस्तित्वात नाहीत. तसेच दोन्ही प्रकरणातले पुरवठादार सारखेच आहेत अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक नितीन भांडारकर यांनी दिली.
औषध म्हणून टाल्कम पावडरचा पुरवठा
अन्न व औषध प्रशासनानं कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयातून रेसिप्ट 500 नावाच्या टॅब्लेटचे फेब्रुवारी 2023 मध्ये नुमने गोळा केले होते. त्यांनी हे नमुने मुंबईतल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. ही औषधं बनावट असून यामधला मुख्य घटक गायब असल्याचं समोर आलं होतं.
प्रयोगशाळेच्या अहवालानंतर अन्न व औषध प्रशासनानं कळमेश्वर पोलिसांमध्ये फेब्रुवारी 2024 ला तक्रार दाखल केली होती.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपासणी केली असता कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयानं नागपूर जिल्हा शल्यचिकित्सकाकडून हे औषधं घेतलं होतं.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून औषधांचं टेंडरींग झालं होतं. त्यानंतर ते जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालयं आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरवण्यात आलं होतं. नागपूर जिल्हा शल्यचिकित्सकांनी लातूरच्या जय एंटरप्रायजेस या कंपनीला टेंडर दिलं होतं.
त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर बनावट औषधांचं रॅकेट समोर आलं, अशी माहिती सावनेरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी दिली.
पण, रॅकेट नेमकं कसं काम करायचं? याबद्दलही त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सविस्तर माहिती दिली. ज्या कंपनीला शासकीय टेंडर मिळालं होतं ती लातूरची कंपनी भिवंडीच्या अक्व्हॅटीस कंपनीच्या मिहीर त्रिवेदीकडून औषधं खरेदी करायची.
मिहीर त्रिवेदीला काबिज जेनेरिकच्या विजय चौधरीकडून या औषधाचा पुरवठा व्हायचा. पण हे फक्त पुरवठादार होते. उत्पादक कंपनी ही उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये होती. तिथं हिमांशू उर्फ रॉबीन तनेजा या बनावट औषधांचं उत्पादन घ्यायचा. ते औषध सहारनपूर इथं रमण तनेजाकडे यायचं आणि त्याच्याकडून विजय चौधरीला पुरवठा व्हायचा.
विजय चौधरी ते मिहीर त्रिवेदीला द्यायचा आणि त्याच्याकडून इतर टेंडरिंग करणाऱ्यांना या औषधांचा पुरवठा व्हायचा. या चारही आरोपींनी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये भेटून बनावट औषधं तयार करण्याचा प्लॅन आखला होता. त्यानुसार यांचं बनावट औषधांचं रॅकेट चालत होतं.
कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाला पुरविण्यात आलेल्या रेसिप्ट 500 नावाच्या अँटीबायोटीक टॅब्लेटमधून अव्हीटव्ह फार्मास्युटीकल इंग्रीडीएंट (API) गायब होता. कुठल्याही औषधांमध्ये 80 टक्के हा घटक असतो. पण, या औषधामध्ये हा घटकच नव्हता.
तसेच हे औषध टाल्कम पावडर, स्टार्च आणि कॅल्शिअमपासून बनवल्याचं चौकशीत समोर आलं होतं. एवढंच नाही,तर औषधं विकण्यासाठी जे प्रमाणपत्र लागतं ते देखील बनावट तयार केलं होतं, असंही अनिल म्हस्के यांनी सांगितलं.
हे चारही आरोपी सध्या तुरुंगात असून यामधीलच दोन आरोपी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बनावट औषध प्रकरणात देखील असल्याचं समोर आलं आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाते राज गजभिये यांची बाजू मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला; मात्र ती मिळू शकली नाही. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यावर त्यांची बाजू या बातमीत अपडेट केली जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)