You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपुरात सुनेने असा रचला सासूच्या हत्येचा कट, चुलत भावांनाच दिली दोन लाखांची 'सुपारी'
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
संपत्तीसाठी सुनेने सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिल्याची घटना काही दिवसांपूर्वी नागपुरात घडली. अशाच प्रकारची आणखी एक घटना नागपुरात घडली आहे. एका 32 वर्षीय सुनेनं सासूची हत्या करण्यासाठी स्वतःच्याच चुलत भावांना 2 लाख रुपयांची सुपारी दिली.
पण सुनेने सासूच्या हत्येची सुपारी का दिली? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? पाहुयात.
वैशाली राऊत असं आरोपी सूनेचं नाव आहे, तर सुनिता राऊत असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे. नागपुरातील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मित्र नगरमध्ये 52 वर्षीय सुनिता राऊत राहत होत्या. त्यांच्यासोबत त्यांची 32 वर्षीय सून वैशाली राऊत आणि आणखी एक व्यक्ती राहत होती.
आरोपी वैशालीचे पती अखिलेश राऊत यांचा गेल्यावर्षी दारूच्या व्यसनामुळं मृत्यू झाला. तर त्यांचे सासरे ओमकार राऊत यांचाही 2016 मध्ये मृत्यू झाला. त्यामुळं आरोपी वैशाली, सासू सुनिता राऊत यांच्यासोबत राहत होत्या.
वारसाहक्काने मिळालेली संपत्ती आणि घरातील भाडेकरूंच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.
दरम्यान 28 ऑगस्टला सासू सुनिता यांची हत्या झाली. पण त्यांचा मृत्यू हृद्यविकाराच्या झटक्यामुळं झाल्याचा बनाव त्यांच्या सुनेने रचला. त्यामुलं ही घटना उघडकीस यायला दहा दिवस लागले.
हा हृदयविकाराच्या धक्क्याने झालेला मृत्यू नसून हत्या असल्याचं रविवारी 8 सप्टेंबरला उजेडात आलं. त्यानंतर अजनी पोलिसांनी सून वैशाली राऊतसह तिच्या दोन चुलत भावांना अटक केली आहे.
हत्येमागचे कारण काय?
अजनी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना या घटनेची सविस्तर माहिती दिली.
त्यांनी सांगितलं की, सासू सुनिता आणि सून वैशाली यांच्यात अधूनमधून भांडण होत होती. सुनिता सुनेच्या चारित्र्यावर संशय घ्यायच्या.
वैशालीचं बाळ लग्नाआधीचं असल्याचा आरोप करत सासू नेहमी चारित्र्यावरून त्यांना बोलायची. तसंच मुलीला आम्ही सांभाळू तू घरातून निघून जा असंही सतत तिला म्हणायच्या.
सासूच्या अशा बोलण्याला कंटाळूनच सून वैशालीनं त्यांना संपवायचं असं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेशाील पांढुर्णा इथं राहणारा त्यांचा चुलत भाऊ श्रीकांत हिवसेची मदत घेतली.
असा रचला कट
सुरुवातीला श्रीकांत हत्येसाठी तयार नव्हता. पण, वैशालीनं त्याला 2 लाख रुपये देते असं सांगितलं. हळूहळू तिनं भावाला ऑनलाईन पैसे पाठवायला सुरुवातही केली.
एवढंच नाही तर, तू माझ्या सासूच्या हत्येची सुपारी घेतली नाही तर, मी तुझ्या नावाने पत्र लिहून आत्महत्या करेन, अशी धमकीही तिनं भावाला दिली होती.
त्यामुळं श्रीकांतनं एका साथीदाराला सोबत घेऊन सुनिता यांच्या हत्येचा कट रचला.
हत्येचा कट महिनाभरापासून रचला जात होता. फोनवरून त्यांनी सगळंकाही ठरवलं. त्यानुसार श्रीकांत आणि त्याचा साथीदार दोघं 27 ऑगस्टला घरी येऊन पाहणी करून गेले.
ठरल्याप्रमाणे वैशालीनं 28 ऑगस्टला रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवला. त्यानंतर श्रीकांत आणि त्याच्या साथीदारानं घरात येऊन रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुनिता यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दोघेही निघून गेले.
वैशालीनं दुसऱ्या दिवशी सासूचा रक्तदाब वाढल्यामुळं हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा बनाव रचला. नातेवाईकांनाही त्यावेळी त्यावर विश्वास बसला.
पण, मृत सुनिता यांच्या चेहऱ्यावर मारल्याचे लाल डाग दिसत होते. त्यामुळं काही नातेवाईकांना संशय आला.
त्यांनी मृत सुनिता यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचे फोटो काढून ठेवले. तसंच वैशालीवरही त्यांनी नजर ठेवणं सुरू केलं.
शेजारी आणि लहान मुलीमुळे सत्य आले समोर
सुनिता यांची हत्या झाली त्यावेळी सून वैशाली घरात होत्या. त्यामुळं मृत सुनिता राऊत यांच्या भावाला संशय आला.
सुनेवर संशय बळावल्यानं त्यांनी लहान मुलीला विचारपूस केली. त्यावेळी दोन मामा रात्री आले होते असं तिनं सांगितलं.
शेजाऱ्यांनीही सासू-सुनेची कडाक्याची भांडणं व्हायची अशी माहिती सुनिता यांच्या नातेवाईकांना दिली. त्यामुळं नातेवाईकांचा संशय आणखी बळावला.
नातेवाईकांनी वैशालीच्या नकळत तिचा फोन तपासला. त्यात घटनेच्या आदल्या दिवशी तिनं तिच्या चुलत भावांना सतत फोन केल्याचं दिसलं.
त्यामुळं तिच्यावर पाळत ठेवली. तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर नातेवाईकांनी रविवारी 8 सप्टेंबरला सकाळी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी वैशालीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. पण, तिनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 28 ऑगस्टला माझे भाऊ नाही, तर एका एजन्सीचे कर्मचारी कोलते घरी आले होते, त्याने सासूला मारलं, असा बनाव करत तिनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
पण, पोलिसांनी तिचा फोन तपासला असता, ती सतत तिचा भाऊ श्रीकांत हिवसेसोबत बोलली असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं घटनेची कबुली दिली.
त्यानंतर मुख्य आरोपी वैशाली, तिचा भाऊ श्रीकांत आणि दुसरा चुलत भाऊ रितेश हिवसेला अटक केल्याचं अजनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी सांगितलं.
मे महिन्यातील घटनेसारखीच घटना
मे महिन्यामध्येच सुनेनं संपत्तीसाठी सासऱ्याची हत्या केल्याची घटना समोर आली होती. सरकारी अधिकारी असलेली सून अर्चना पार्लेवार पुट्टेवार हिने सरकारी अधिकारी असलेल्या भावासोबत मिळून सासऱ्याच्या हत्येचा कट रचला होता.
त्यासाठी अर्चनानं 17 लाख रुपयांची सुपारी आरोपींना दिली होती. सुरुवातीला अर्चनानंही सासऱ्याच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला. पोलिसांनी आधी हिट अँड रनचं प्रकरण समजून गुन्हा दाखल केला. पण, नंतर ही हत्या असल्याचं समोर आलं होतं. ही घटनाही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मानेवाडा परिसरात घडली होती.
ही दुसरी घटना याच घटनेची पुनरावृत्ती असल्यासारखं दिसत आहे. या प्रकरणातही भावाच्या मदतीनं 2 लाख रुपयांची सुपारी देऊन सासूची हत्या करण्यात आली. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं सासूचा मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला.
हत्येचं कारण वगळता सगळी घटना मे महिन्यात घडलेल्या घटनेसारखीच दिसतेय. पण मे महिन्यात घडलेल्या घटनेत पोलिसांना मृत्यूची माहिती होती आणि या घटनेत पोलिसांना कशाचीही भनक नव्हती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.