एअर इंडियाचं विमान मुंबईत जेव्हा उड्डाणानंतर दोन मिनिटांत कोसळलं, कोळ्यांनी शोधले होते अवशेष

एंपरर अशोका, अपघातापूर्वीच्या काळातील एक फोटो.

फोटो स्रोत, Debashish Chakraverty

फोटो कॅप्शन, एंपरर अशोका, अपघातापूर्वीच्या काळातील एक फोटो.
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अहमदाबादमध्ये AI 171 या एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला झालेला अपघात भारताच्या भूमीवर झालेल्या सर्वात भीषण अपघातांपैकी एक ठरला आहे.

मृत्यूची आकडेवारी पाहता भारतात सिंगल एअरक्राफ्ट म्हणजे एका विमानाला झालेला हा सर्वात मोठा अपघात ठरला आहे.

या अपघातानं 47 वर्षांपूर्वी मुंबईत एअर इंडियाच्याच विमानाला झालेल्या अपघाताच्या आठवणी जाग्या केल्या.

1 जानेवारी 1978 रोजी, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी, एअर इंडियाचं AI 855 हे एंपरर अशोका नावानं ओळखलं जाणारं विमान कोसळलं होतं.

मुंबईच्या सहार विमानतळावरून म्हणजे आताचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यावर किनाऱ्याजवळच अरबी समुद्रात ते कोसळलं होतं.

रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात घडला होता.

हे विमानही ड्रीमलायनरप्रमाणे बोईंग कंपनीचं 747 प्रकारचं वाईड-बॉडी म्हणजे मोठ्या आकाराचं विमान होतं. त्या अपघातात सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते.

त्या अपघाताची ही गोष्ट आहे.

काय होतं 'एंपरर अशोका'?

सध्या जसं ड्रीमलायनर हे सर्वात मजबूत विमानांपैकी एक मानलं जातं, तसं 747 प्रकारातली विमानं त्या काळातली भक्कम विमानं म्हणून ओळखली जायची.

1971 साली एअर इंडियाच्या ताफ्यात 747 प्रकारची 'जंबो जेट' विमानं सहभागी करून घेतली गेली आणि त्यांना भारतीय इतिहासातल्या महाराजांची नावं देण्यात आली होती.

एंपरर अशोका, एंपरर विक्रमादित्य, एंपरर शाहजहान, एंपरर अकबर, एंपरर राजेंद्र चोला अशा नावानं ही विमानं ओळखली जायची.

'एंपरर अशोका'चा एअर इंडियात समावेश झाला, त्या दिवशीचा फोटो. देबाशीष चक्रवर्ती यांच्या वडिलांच्या संग्रहातून

फोटो स्रोत, Debashish Chakraverty

फोटो कॅप्शन, 'एंपरर अशोका'चा एअर इंडियात समावेश झाला, त्या दिवशीचा फोटो. देबाशीष चक्रवर्ती यांच्या वडिलांच्या संग्रहातून

22 मार्च 1971 रोजी एंपरर अशोका विमानाचा एअर इंडियाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. या प्रकारचं एअर इंडियातलं ते पहिलंच विमान होतं.

मुंबईत राहणाऱ्या देबाशीष चक्रवर्ती यांचे या विमानाशी खास ऋणानुबंध होते. त्यांचे वडील दिनेंद्र मोहन चक्रवर्ती आधी भारतीय हवाई दलात आणि मग एअर इंडियात पायलट होते आणि एंपरर अशोकासह 747 विमानंही चालवायचे.

या विमानाचे अपघाताआधीचे काही फोटो आणि आठवणी त्यांनी बीबीसी मराठीसोबत शेअर केल्या आहेत. त्या काळातली ती सर्वोत्तम विमानं होती, असं ते सांगतात.

देबाशीष यांच्या वडिलांनी, कॅप्टन दिनेंद्र चक्रवर्ती यांनीही एंपरर अशोकाचं सारथ्य केलं होतं

फोटो स्रोत, Debashish Chakraverty

फोटो कॅप्शन, देबाशीष यांच्या वडिलांनी, कॅप्टन दिनेंद्र चक्रवर्ती यांनीही एंपरर अशोकाचं सारथ्य केलं होतं

अवकाशातला राजमहाल असं त्या विमानांचं वर्णन त्या काळातल्या माध्यमांनी केलेलं दिसतं. विमानतली आतली सजावट, विशेषतः फर्स्ट क्लास लाऊंजची सजावट, एखाद्या महालापेक्षा कमी नव्हती.

भारतीय वेषात एअर होस्टेस या विमानातील प्रवाशांचं स्वागत करायच्या.

विमान प्रवासाचा राजेशाही अनुभव घेता यावा, म्हणून भारतात ये-जा करणारे आणि मोठ्या पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालेले लोक या विमानांना लोक प्राधान्य द्यायचे.

'एंपर शाहजहान'च्या कर्मचाऱ्यांसोबत जेआरडी टाटा

फोटो स्रोत, Air India

फोटो कॅप्शन, 'एंपरर शाहजहान'च्या कर्मचाऱ्यांसोबत जेआरडी टाटा. राजेशाही प्रवासासाठी ही विमानं ओळखली जायची. एअर इंडियाच्या संग्रहातला फोटो.

मुंबईतली ती दुर्दैवी रात्र

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1 जानेवारी 1978 रोजी एंपरर अशोका - AI 855 हे विमान मुंबईहून दुबईला जाणार होतं. विमानात एकूण 190 प्रवासी आणि 23 कर्मचारी असे एकूण 213 जण प्रवास करत होते.

पायलट होते मदन लाल कुकर ज्यांना 18,000 तास उड्डाणाचा अनुभव होता. तर दुसरे पायलट होते इंदू विरमाणी.

रात्री साडेआठ वाजता नियोजित वेळेनुसार विमानानं उड्डाण केलं, तेव्हा सुरुवातीला सगळं काही सुरळीत वाटत होतं.

उड्डाणानंतर विमान 8000 फूटांवर जाईल तेव्हा कळवा असं मुंबईच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरनं पायलटला सांगितल. त्यावर होकार देत पायलट कुकर यांनी कंट्रोल टॉवरला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर 22 सेकंदांनी, म्हणजे हवेत झेपावल्यावर दोन मिनिटांत आणि विमानतळापासून अवघ्या 3 किलोमीटरवर अरबी समुद्रात हे विमान कोसळलं.

किनाऱ्यापासून हा अपघात इतक्या जवळ झाला होता की वांद्रे परिसरातल्या काही रहिवाशांनी ते कोसळताना पाहिलं.

काहींनी मोठा आवाज ऐकू आल्याचं सांगितलं. रात्रीच्या अंधारात तो अपघात झाल्यानं नेमकं काय घडलं, हे काहींना कळलं नाही.

देबाशीष त्या वेळी विमानतळाजवळ राहाचे. अपघाताची माहिती मिळताच त्यांची आई घाईनं वांद्रे इथे गेली होती, याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.

देबाशीष यांचे वडील त्या विमानात नव्हते, पण त्यांचे मित्र इंदू विरमाणी यांचा मृत्यू झाल्याचं लगेच स्पष्ट झालं होतं. एअर इंडियाच्या परिवारातील सर्वांसाठीच तो दुःखद दिवस होता, असं ते सांगतात.

विमान कोसळल्यानंतर त्याचं नेमकं लोकेशन सापडत नव्हतं, तेव्हा जे आर डी टाटांनी काही कॅनेडियन पायलट्सची मदत घेतली होती. देबाशीष यांनी पुढे त्या पायलट्सशी संपर्क साधला होता.

पुंडलिक कारभारी यांची माहिती देणाऱ्या बातमीचं कात्रण. देबाशीष यांच्या संग्रहातून.

फोटो स्रोत, Debashish Chakravery

फोटो कॅप्शन, पुंडलिक कारभारी यांची माहिती देणाऱ्या बातमीचं कात्रण. देबाशीष यांच्या संग्रहातून.

रात्रीच्या अंधारात आणि नंतरही विमानाचा शोध लावणं किती कठीण होतं, हे त्यातून समजून येतं. नेमकं अपघातस्थळ शोधण्यासाठीही काही काळ जावा लागला.

पुंडलिक शांताराम कारभारी नावाच्या एका स्थानिक मच्छीमारानं ते अवशेष शोधण्यात मदत केली. शांताराम यांच्या जाळ्यात 5 जानेवारीला विमानाच्या शेपटाकडचा एक तुकडा अडकला होता.

त्यानंतर विमानाचे अवशेष आणि ब्लॅक बॉक्सेस काढण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात आली. पण प्रत्यक्षात मृतदेह बाहेर काढण्यासाठी काही दिवस जावे लागले.

वांद्रे परिसरात त्या काळात राहणाऱ्या एका व्यक्तीनं बीबीसी मराठीला ते दिवस आठवताना सांगितलं की, "मी लहान होतो पण आम्ही सायकलवकरून तिथे गेलो होतो. आमची शाळेची बस त्या बाजूनं जायची.

"अपघातानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी नौदलाची टीम आली होती. ते डाईव्ह करायचे आणि एक एक मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांना वेळ लागायचा. कारण उड्डाणानंतर लगेचच अपघात झाला होता, त्यामुळे सर्वांनी सीटबेल्ट लावलेले होते."

अपघात कशानं झाला?

अपघातानंतर हे विमान नेमकं का कोसळं, याची चर्चा सुरु झाली. बाँबपासून ते अपघातापर्यंत वेगवेगळे कयास लावले गेले. भारताच्या संसदेतही या अपघाताची चर्चा झाली.

पुढे तपासानंतर आल्टिट्यूड इंडिकेटरमधल्या बिघाडानं अपघाताला सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं. बिघाड झाल्यानं हे उपकरण विमान उजवीकडे झुकत असल्याचं दाखवत होतं, पण प्रत्यक्षात विमान सरळच जात होतं.

विमान उजवीकडे जातंय असं वाटल्यानं पायलटनं डावीकडे वळवताना शार्प टर्न घेतला आणि तोल जाऊन विमान 35 अंशांच्या कोनात समुद्रात कोसळलं.

थोडक्यात बिघाडामुळे पायलटला spatial disorientation झालं म्हणजे विमानाच्या नेमक्या स्थितीचा अंदाज लावता आला नाही. त्यात रात्रीची वेळ आणि समुद्रातला अंधार यांमुळेही असा अंदाज लावणं कठीण झालं.

त्यावेळेस हा भारतातला एकाच विमानाला झालेला सर्वात भीषण अपघात होता.

देबाशीष सांगतात, "एंपरर अशोका कोसळणं ही त्या काळातल्या सर्वात मोठ्या विमान दुर्घटनांपैकी एक होती. पण आपण त्याच्या आठवणी जपण्यासाठी काही केलेलं नाही. त्या दिवशी एकाच वेळी मुंबईत अगदी किनाऱ्याजवळ 213 जणांचा जीव गेला होता. "

वांद्रे इथे बँडस्टँड जवळ विमानाचे अवशेष वाहात आले होते. त्या परिसरात या अपघाताची आठण सांगणारा एक स्मृतीफलकही नाही, असं ते नमूद करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)