'एवढ्या भीषण अपघातातून मी 'असा' बाहेर पडलो', जीव वाचलेले विश्वास कुमार काय म्हणाले?

विश्वास

फोटो स्रोत, Hindustan Times

गुजरातमध्ये विमान कोसळल्याची घटना घडली आहे. हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानीनगर या रहिवाशी भागात कोसळलं आहे.

या घटनेत 204 लोकांचे प्राण गेले आहेत. तर एका ब्रिटिश नागरिकाचे प्राण वाचले आहेत. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी 41 जखमींवर उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे. दुर्घटनाग्रस्त विमान बोईंग कंपनीचं ड्रीमलायनर प्रकारातलं 787-8 हे विमान होतं.

या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचंही निधन झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

या विमानात 242 प्रवासी होते अशी माहिती एअर इंडियाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते.

या विमानाची धुरा कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.

अहमदाबाद विमान अपघातात प्राण वाचलेले एकमेव प्रवासी कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images

या अपघातातून ब्रिटिश नागरिक असलेले प्रवासी वाचले आहेत. विश्वास कुमार रमेश असं त्यांचं नाव आहे.

ते विमानातील 11A क्रमांकाच्या सीटवर होते अशी माहिती अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोताना दिली.

"विमानानं उड्डाण घेताच 30 सेकंदातच मोठा आवाज झाला आणि विमान कोसळलं. हे एवढ्या कमी वेळात घडलं की, काही समजलं नाही," असं विश्वास माध्यमांशी बोलताना म्हटल्याचं समोर आलं आहे.

विश्वास कुमार रमेश यांचे लेस्टर शहरातील नातलग अजय वालगी यांच्याशी आम्ही संपर्क केला.

ते म्हणाले, "विश्वास यांनी कुटुंबीयांना फोन करुन आपण सुखरुप असल्याचं सांगितलं. प्रवाशांमध्येच असणारे त्यांचे बंधू अजय यांच्याबद्दल काही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यांचे नातेवाईक जमायला सुरुवात झाली. आम्ही त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत. विश्वास यांना पत्नी आणि एक मूल आहे."

विश्वास यांचा भारतात जन्म झाला आणि गेली अनेक वर्षं ते इंग्लंडमध्ये राहात आहेत अशी माहिती बीबीसीला मिळाली आहे.

अहमदाबादहून दुपारी 1.38 वाजता निघालेल्या या बोईंग 787-8 विमानात 242 प्रवासी आणि क्रू सदस्य होते.

यापैकी 169 जण भारतीय नागरिक आहेत, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक विमानात होते.

'मी असा वाचलो'

विश्वास कुमार यांनी आपण कसे वाचलो याबद्दल दूरदर्शनशी बोलताना माहिती दिली.

ते म्हणाले, "पंतप्रधानांनी माझी चौकशी केली. मी त्यांना काल घडलेला सर्व प्रसंग सांगितला. सगळं माझ्यासमोर झालं. मी कसा वाचलो यावर माझा विश्वासच नाही. मी सुद्धा यात मरणार असं वाटलं होतं. पण डोळे उघडले तेव्हा मला बेल्ट काढता आला आणि मी बाहेर पडलो. विमानाने उड्डाण केल्यावर लगेचच विमान कोसळलं. सगळं माझ्या डोळ्यासमोर झालं. मी ज्या बाजूला होतो तिथं हॉस्टेलची खालची बाजू होती, तिथं थोडी जागा होती, जागा दिसतेय म्हटल्यावर मी प्रयत्न केला आणि बाहेर पडलो. मी चालत बाहेर आलो. आगीमुळे माझा डावा हात भाजला आहे. नंतर रुग्णवाहिकेतून मी रुग्णालयात आलो. चांगल्या पद्धतीचे उपचार केले जात आहे."

'केवळ एकच व्यक्ती वाचणं दुर्मिळ'

ब्रिटनचे विश्वास कुमार रमेश हे अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातातून बचावलेले एकमेव व्यक्ती आहे.

"केवळ एकच व्यक्ती वाचणं फारच दुर्मिळ आहे."

क्रॅनफिल्ड विद्यापीठातील 'एव्हिएशन अ‍ॅन्ड द एन्व्हायर्नमेंट' विभागातील सहयोगी प्राध्यापक गाय ग्रॅटन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

त्यांनी म्हटलं, की आधुनिक प्रवासी विमाने अशी बनवलेली असतात की अपघात झाला तरी शक्य तितक्या अधिक लोकांचे प्राण वाचावेत.

"बहुतेक वेळा अशा अपघातांत खूप लोक वाचतात किंवा कोणीच वाचत नाही. पण फक्त एकच माणूस वाचणे फारच आश्चर्यकारक आहे."

११ ए सीट

ग्रॅटन यांनी विश्वास कसे बचावले असावेत याचा अंदाज व्यक्त करताना म्हटलं की, रमेश यांची 11A सीट अपघातात विमानातून दूर फेकली गेली असावी आणि ते त्या सीटवर बसलेले असावेत."

"ते खूप नशीबवान होते."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)