इन्स्टा स्टार होती एअर होस्टेस रोशनी, लवकरच होणार होते लग्न, कुटुंबीयांना मोठा धक्का

फोटो स्रोत, UGC
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'स्काय लव्ह्ज हर...'
रोशनी सोनघरेच्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाईलचं हे नाव. पण दुर्देवाने अहमदाबाद विमान दुर्घटनेत रोशनीचा मृत्यू झाला. त्या एअर होस्टेस होत्या.
या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. या विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचारी होते.
या विमानाची जबाबदारी कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे होती. या क्रू मेंबरपैकीच एक रोशनी होत्या.
रोशनी डोंबिवलीमध्ये कुटुंबासह राहत होत्या. आई, वडील आणि लहान भाऊ असं त्यांचं कुटुंब आहे.
'आईला अजूनही लेक परतण्याची आशा'
सोनघरे कुटुंबाला या दुर्घटनेनं मोठा धक्का बसला आहे. रोशनी यांच्या आईला अजूनही (13 जून दु. 12 वाजेपर्यंत) रोशनीच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आलेली नाही. ती परत येईल, अशी आशा त्यांना आहे.
27 वर्षीय रोशनी सोनघरे यांचं लहान पणापासून एअर होस्टेस बनायचं स्वप्न होतं, असं त्यांचे काका दत्ता सोनघरे यांनी सांगितलं.
साधारण पाच वर्षांपूर्वी रोशनीनं हे स्वप्न पूर्ण केलं. एका डोमेस्टिक एअरलाईनसाठी त्या एअर होस्टेस म्हणून काम करू लागल्या.
पण त्यांना आंतरराष्ट्रीय एअरलाईनसाठी काम करायची इच्छा होती. त्यासाठी साधारण दोन वर्षांपूर्वीच त्या एअर इंडियामध्ये रुजू झाल्या होत्या, असं दत्ता सोनघरे यांनी सांगितलं.
10 बाय 10 च्या खोलीत राहाण्यापासून ते इंटरनॅशनल एअरलाईन्सवर एअर होस्टेस बनण्यापर्यंतचा रोशनीचा प्रवास असल्याचं त्यांचे मामा प्रवीण म्हणाले.

फोटो स्रोत, UGC
रोशनीचे काका दत्ता सोनघरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "आम्हाला माहिती मिळाल्यापासून आम्ही संपर्कात होतो. पण ठोस माहिती आम्हाला मिळत नव्हती.
रोशनीचे वडील, भाऊ आणि काही कुटुंबीय 12 जूनला 7 वाजेदरम्यान अहमदाबादला रवाना झाले. तरीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही."
"तिची आई खूप धक्क्यात आहे. आईला अजून सगळी माहिती दिलेली नाही. त्यांच्यासाठी खूप धक्कादायक ठरेल. सध्या शोध सुरू आहे, एवढंच सांगितलं आहे," असंही ते म्हणाले.
"रोशनीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनीही खूप मेहनत घेतली होती. आई घरकाम करायची. तर वडिलांनीही खूप काम केलं.
रोशनीनेही मेहनतीने स्वप्न पूर्ण केलं. आधी ती स्पाईस जेट कंपनीमध्ये होती. दोन वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये रुजू झाली होती," असं रोशनीचे मामा प्रवीण यांनी सांगितलं.
'लग्नाची बोलणी झाली होती'
27 वर्षीय रोशनीचं नुकतंच लग्न ठरलं होतं, अशी माहिती तिचे काका दत्ता सोनघरे यांनी दिली.
'लव्ह कम अरेंज' असं तिचं लग्न जुळून आलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
दत्ता सोनघरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "मुलगा छान होता. आम्ही नुकतंच त्यांना भेटलो होतो. दोन्ही कुटुंबीय भेटले होते.
तो बाहेर असल्याने दिवाळीनंतर येणार होता. नोव्हेंबर-डिसेंबरला साखरपुडा आणि फेब्रुवारी- मार्चमध्ये लग्न असं साधारण नियोजन होतं."

फोटो स्रोत, UGC
"आम्ही सगळे लग्नाची बोलणी करायला आलो होतो. त्याचे आई वडील सुद्धा आले होते. आम्ही हाॅल्स वगैरे सुद्धा पाहत होतो," असंही रोशनीच्या कुटुंबीयांनी सांगितलं.
'स्काय लव्ह्ज हर'
रोशनी यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार, ती एक ब्लाॅगर होती. 'स्काय लव्ह्ज हर' हे त्यांच्या प्रोफाईलचं नाव आहे.
"तिचं पॅशन तिच्या इन्स्टाग्रामवर प्रोफाईलच्या नावावरूनही दिसतं. एअर होस्टेस आणि माॅडेलींग या दोन क्षेत्रात तिला रुची होती. ती इन्स्टा इनफ्लूएन्सरही होती, " असं तिचे मामा प्रवीण यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, UGC
रोशनी इन्स्टाग्राम प्रोफाईलवर सक्रिय असल्याचं दिसतं. इन्स्टाग्रामवर रोशनीचे सुमारे 57 हजार फाॅलोअर्स आहेत.
'दुर्घटनेची सखोल चौकशी करावी'
दत्ता सोनघरे यांनी सांगितलं की, "तिकडे काही प्रक्रिया सुरू आहे. डीएनए नमुने घेतलेले आहेत. रिपोर्ट येण्यासाठी 72 तास लागतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे,"
"बाॅडी ओळखणं खूप कठीण जात आहे. हे सगळं सहज होईल असं वाटत नाहीय. डीएनएच्या माध्यमातूनच होईल."
तसंच या दुर्घटनेची चौकशी व्हावी अशीही मागणी सोनघरे कुटुंबाने केली आहे.
दत्ता सोनघरे म्हणाले,"जी दुर्घटना झाली त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दुर्घटना का झाली याचं कारण समोर यायला हवं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











