You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लालूप्रसाद यादव : पुरुषांच्या तुलनेत महिला अवयवदानासाठी सहज तयार का होतात?
- Author, मॉली कँड्रिक,
- Role, बीबीसी फ्यूचर
लालूप्रसाद यादव यांच्या एका मुलीने त्यांना किडनी दान केल्यानंतर या घटनेची मोठी चर्चा माध्यमांमध्ये आहे.
पण, पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त प्रमाणात अवयवदान करतात, हे तुम्हाला माहीत आहे का?
याच विषयावर बीबीसी हिंदीने ऑगस्ट 2018 मध्ये एक लेख लिहिला होता.
वाचा, अवयवदानासाठी महिला पुरुषांच्या तुलनेत पुढे का आहेत?
2016 येता-येता माझ्या आईच्या मूत्राशयाने काम करणं बंद केलं होतं. तिचं पहिलं किडनी ट्रान्सप्लांट एका मृत शरीरातून करण्यात आलं होतं. त्यासाठीसुद्धा आईला बराच काळ प्रतीक्षा करावी लागली होती.
मात्र, यंदाच्या वेळी माझ्या आईचा त्रास पुन्हा वाढला, त्यावेळी तिची सगळ्यात लहान बहीण म्हणजेच माझी लहान मावशी तिला किडनी देण्यासाठी तयार झाली.
महिला आपल्या प्रियजनांसाठी आपल्या अवयवांचं दान करण्यास सहज तयार होतात, हे आजवरच्या वैद्यकीय इतिहासात पाहण्यात आलं आहे. किडनी ट्रान्सप्लांटसंदर्भात तर ही आजच्या काळात सामान्य बाब मानली जात आहे.
अमेरिकेचा विचार केल्यास इथे किडनी दान करणाऱ्यांपैकी 60 टक्के महिलाच असतात. इतर देशांमध्येही किडनी दानासंदर्भात महिला आणि पुरुषांची टक्केवारी अशाच प्रकारे पाहायला मिळते.
जगभरात अवयवदान करणाऱ्या पुरुषांची संख्या आणखी कमी होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणजेच सध्याच्या काळात महिला या पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात अवयवदान करत आहेत.
यामध्ये रंजक बाब म्हणजे, महिलांकडून अवयव घेणारे 59 टक्के रुग्ण हे पुरुषच असतात, हे विशेष.
आज पुरुषांनाच सर्वात जास्त किडनींची गरज आहे. तर त्यांना हा अवयव देणाऱ्या महिला मोठ्या संख्येने आहेत. मात्र यामुळे महिलांवर अवयवदानाचा बोजा पडत आहे, शिवाय, पुरुषांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे एक मोठं आव्हान आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांचे अवयव लहान
साधारणपणे, पुरुषांचं शरीर महिलांच्या किडनीचा स्वीकार सहजासहजी करत नाही. अमेरिकेत 1998 ते 2012 दरम्यान झालेल्या 2 लाख 30 हजारपेक्षाही जास्त प्रकरणांमध्ये महिलांची किडनी पुरुषांना बसवण्यात आल्यानंतर ती निकामी होण्याची शक्यता जास्त होती, असं पाहण्यात आलं.
हीच परिस्थिती हृदयाच्या प्रत्यारोपणामध्येही होती. महिलांचं हृदय पुरुषांमध्ये ट्रान्सप्लांट केल्यानंतर पुढील पाच वर्षांत मृत्युमुखी पडण्याची शक्यता 15 टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं.
अवयवदानात अशा प्रकारे लिंगभेद असण्याचं प्रमुख कारण म्हणजे महिला आणि पुरुषांच्या अवयवांच्या आकारातील फरक होय. साधारणपणे महिलांचे अवयव हे पुरुषांच्या अवयवांपेक्षा लहान असतात.
अमेरिकेतील ट्रान्सप्लांट तज्ज्ञ रॉल्फ बार्थ हे मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या वैद्यकीय केंद्रात कार्यरत आहेत.
ते म्हणतात, “मजबूत शरीरयष्टीच्या पुरुषाला एका तुलनेने कमी उंची-वजनाच्या महिलेची किडनी बसवल्यास ती शरीराचं वजन पेलू शकत नाही. किडनी ट्रान्सप्लांट संदर्भातील 1 लाख 15 हजार रुग्णांचा एक सर्व्हे करण्यात आला होता. अवयवदाता आणि अवयव स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या वजनामध्ये 30 किलोंचा फरक असल्यास हे प्रत्यारोपण अयशस्वी ठरण्याची शक्यता वाढते, हे या सर्व्हेमधून समोर आलं आहे.
शिवाय, महिला आणि पुरुषांचं वजन समान असलं तरीही पुरुषांच्या तुलनेत महिलांचे अवयव हे नैसर्गिकरित्या लहान असतात.
जाणकार सांगतात, “साधारणपणे अवयवदान शस्त्रक्रियेत दाता आणि स्वीकारणारा या दोन्ही व्यक्तींच्या केवळ वजनाची तपासणीच केली जाते. मात्र केवळ हाच निकष पुरेसा नाही. अवयवदाता महिला असेल, तिचा अवयव पुरुषाला बसवण्यात येणार असेल आणि दोघांच्या वजनातील फरक 10 ते 30 किलोपर्यंतचा फरक असला तरीसुद्धा हे प्रत्यारोपण अयशस्वी ठरण्याचा धोका असतो.
शरीरातील फरक
हृदयाच्या ट्रान्सप्लांटमध्ये इतर पद्धती वापरून डॉक्टर हा धोका करण्याचा प्रयत्न करतात.
अवयवांच्या आकाराव्यतिरिक्त पुरुष आणि महिला यांच्या शरीरात आजारांशी लढणारे अँटीजनसुद्धा वेगळे असतात.
विज्ञानातील आधुनिक तंत्रांचा वापर करून वैद्यकीय समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
आज ट्रान्सप्लांटदरम्यान शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीचा ताबा घेणारी अनेक औषधे आली आहेत. अवयव प्रत्यारोपित केल्यानंतर शरीराने त्याचा स्वीकार करावा, यासाठी त्या औषधांचा उपयोग होतो.
अर्थात, अवयवदान आणि लिंग यांच्याशी संबंधित इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.
अमेरिकेत कृष्णवर्णीय महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून समोर आलं की पुरुषांच्या तुलनेत त्यांची अवयवांची गरज ही दुय्यम मानली जाते.
याशिवाय, वजन जास्त असणाऱ्या महिलांना अत्यंत कमी अवयव उपलब्ध होऊ शकतात, असंही या संशोधनातून समोर आलं.
महिला जास्त भावनिक
पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त अवयवदान का करतात, याची अनेक कारणे आहेत.
पहिलं म्हणजे, महिला या पुरुषांच्या तुलनेत जास्त भावनिक असतात. त्यांना आपल्या आप्तस्वकियांबाबत जास्त प्रेम असतं.
दुसरीकडे पुरषांमध्ये किडनी फेल होण्याचं प्रमाणही जास्त आहे.
स्वीत्झर्लंडमध्ये 631 किडनी ट्रान्सप्लांट प्रकरणांपैकी एकूण 22 टक्के महिलांनी आपल्या पुरुष जोडीदारांना अवयवदान केल्याची नोंद आहे.
केवळ जीवनसाथीच नव्हे तर महिला आपली मुले, भाऊ-बहीण किंवा इतर नातेवाईकांनाही अवयवदान करतात.
याचं एक मोठं कारण आर्थिकही आहे. अमेरिका असो किंवा इतर कोणताही देश, घर चालवण्याची जबाबदारी ही सहसा पुरुषांवरचच जास्त असते.
कारण, अवयवदान केल्यानंतर दात्याला तसंच रुग्णाला किमान दोन महिने तरी घरी बसावं लागतं. याचे दोन बाजूंनी आर्थिक नुकसान असतात.
त्यामुळे महिलांना असं वाटतं की अवयवदान करून त्या घरचं आर्थिक नुकसान कमी करू शकतात.
स्वित्झर्लंडमध्ये अवयवदान करणाऱ्या व्यक्तीला होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई सरकार पैशांमार्फत देतं. तिथंही अवयवदान करण्याचा बोजा जास्त प्रमाणात महिलांवरच आहे.
मात्र, महिलांनी अवयव देण्याचं आर्थिक नुकसान हे एकमेव कारण नाही, असंही लोकांना वाटतं.
मेरीलँड मेडीकल सेंटरच्या कॅथी क्लीन-ग्लोव्हर म्हणतात, “महिला साधारपणे इतरांची काळजी घेता. मुलांचं संगोपन असो किंवा घराची देखभाल, महिला हे काम वर्षानुवर्षे करत आल्या आहेत.”
घरावर आलेली संकटे दूर करण्यासाठी लोक महिलांकडेच आशेने पाहत असतात. त्यामुळे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला अवयवाची गरज असल्यास महिला त्यासाठी पुढे येतात.
त्यागाची भावना
साधारणपणे, महिला इतरांची काळजी घेतात. सामाजिक दबावामुळे घराची देखभाल करण्याची जबाबदारी महिलांची, असा पायंडा पडला आहे.
म्हणूनच जगभरातील प्रत्येक देशांमध्ये आवश्यकता भासल्यास महिलांकडूनच अवयवदानाची अपेक्षा केली जाते.
विशेषतः मुलांना गरज असल्यास ज्या आईने त्यांना जन्माला घालून जगात आणलं, तिनेच आपला अवयव देऊन मुलांना नवं आयुष्य द्यावं, असं म्हटलं जातं.
महिला या प्रसूती काळात मोठ्या स्थित्यंतरातून गेलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी अवयवदानाचा निर्णय घेणं, मानसिकरित्या सोपं असल्याचं मानलं जातं.
क्लीन ग्लोव्हर म्हणतात, “अवयवदान करण्यासाठी महिला तयार असली तरी ते अवयव ज्या शरीरात प्रत्यारोपित होणार आहे, ते शरीर त्या अवयवाचा स्वीकार करणं सर्वाधिक महत्त्वाचं असतं.”
“आईने मुलांना जन्म दिला असला तरीही मुलांचं शरीर ते अवयव नाकारण्याची शक्यता जास्त असते. मात्र, भविष्यात वैद्यकीय संशोधनात यावर उपाय शोधला जाण्याची अपेक्षा आहे.”
“कदाचित, त्यावेळी महिलांप्रति लोकांचा विचार बदलू शकेल, पुरुष स्वतःचे अवयव देण्याची जबाबदारी समजू लागतील, अशी अपेक्षा बाळगूया, असं त्या म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)