RCB चेंगराचेंगरी : मुंबईला जमलं, ते बंगळुरूला का शक्य झालं नाही? कसा आहे विजययात्रांचा इतिहास?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बंगळुरूमध्ये काल (4 जून रोजी) विजयोत्सवाचं रूपांतर अखेर शोकांतिकेत झालं. तिथे चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर खेळांच्या जगतातलं असं सेलीब्रेशन, चेंगराचेंगरीच्या घटना आणि त्यामागची कारणं, यांची चर्चा होते आहे.

जेवढा अंदाज होता, त्यापेक्षाही बरेच जास्त लोक जमा झाल्यानं हे घडलं, असं अधिकारी आणि सरकार सांगत आहे.

एका पोलीस अधिकाऱ्यानं बीबीसी हिंदीला दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे एक लाख लोक येतील असा अंदाज होता, पण प्रत्यक्षात दोन ते तीन लाख लोक जमा झाले असावेत.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनीही गर्दी अचानक इतकी वाढेल याचा अंदाज कुणालाही नव्हता, असं म्हटलं आहे.

"हे कुठल्याही राज्यात होऊ शकतं, यावरून राजकारण करून नये. गर्दी खूपच जास्त होती, मी आरसीबी फ्रँचायझीशी बोललो आहे. त्यांनाही एवढी गर्दी जमा होईल असं वाटलं नव्हतं आणि सगळं अचानकच घडलं," असं शुक्ला म्हणाले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं पंजाब किंग्सला हरवून 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचं विजेतेपद मिळवल्यावर ल्यावर फक्त बंगळुरूच नाही तर अगदी मुंबई, पुणे, दिल्लीतही फटाके फुटले. कारण या टीमचं फॅन फॉलोईंग जबरदस्त मोठं आहे.

अशा परिस्थितीत बंगळुरूमध्ये संघाच्या स्वागताला चाहते गर्दी करणार हे स्वाभाविक होतं.

सुरक्षेचा विचार करूनच ट्रॅफिक पोलिसांनी विधानसौधा ते चिन्नास्वामी स्टेडियम अशा खुल्या बसमधून परेडला परवानगी नाकारली होती.

चिन्नास्वामी स्टेडियम हे बंगळुरूच्या मध्यवर्ती भागात आहे, तिथलं ट्रॅफिक, पार्किंगच्या मर्यादित सुविधा आणि अपेक्षित गर्दीचा विचार करता दुर्घटना होण्याची शक्यता असल्यानं तो निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं. ती शंका दुर्दैवानं खरी ठरली.

खरंतर भारतात एखाद्या टीमची व्हिक्ट्री परेड किंवा विजय यात्रा निघण्याची ही पहिली वेळ नव्हती. मग आधीच्या घटना काय सांगतात?

विजययात्रा आणि दुर्घटना

जगभरात सामान्यपणे एखाद्या युद्धातील विजयानंतर सैनिकांची, निवडणुकीनंतर विजेत्यांची यात्रा काढली जाते. खेळांतही स्पर्धा जिंकल्यावर खेळाडुंची विजय यात्रा काढली जाते.

चाहत्यांना आणि खेळाडूंना एकमेकांच्या साथीनं विजयाचा आनंद साजरा करता यावा, हा त्यामागचा उद्देश.

अनेकदा लोक आपणाहूनच रस्त्यावर उतरून आनंद साजरा करतात. पण प्रसंगी अशा आनंदाला गालबोट लागू शकतं.

फुटबॉलमध्ये अशा चेंगराचेंगरीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये तेच पाहायला मिळालं.

पॅरिस सेंट जर्मेन या फुटबॉल क्लबनं मानाची चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा जिंकल्यावर तिथे चाहत्यांनी रस्त्यावर गर्दी केली.

तेव्हा काहींनी हुल्लडबाजी सुरू केली, उन्मादात फटाके फोडले, बसेसचं नुकसान केलं, गाड्या पेटवून दिल्या, काहींनी गर्दीचा फायदा घेत दुकानांत घुसण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात तीनशेहून अधिक जणांना ताब्यात घेतलं.

ऑक्टोबर 2022 मध्ये इंडोनेशियात एका फुटबॉल सामन्यादरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आणि त्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 125 जणांचा मृत्यू झाला.

तर 2001 साली घानाची राजधानी आक्रा इथे स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 126 जणांचा जीव गेला होता. आणि 1989 मध्ये ब्रिटनच्या शेफील्डमध्ये हिल्सबरो स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीत लिव्हरपूल फुटबॉल क्लबच्या 97 चाहत्यांचा जीव गेला होता.

भारतातील क्रिकेटच्या विजययात्रा

भारतीय क्रिकेट संघाची पहिली मोठी विजययात्रा 1971 साली निघाली होती. त्यावेळी अजित वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघानं बलाढ्य वेस्ट इंडीजला पहिल्यांदाच कसोटी मालिकेत लोळवलं होतं.

त्यानंतर टीम मुंबईत परतेल तेव्हा थकलेली असेल असा विचार करून आधी संघाचं छोटेखानी स्वागतच केलं जाणार होतं.

पण, प्रत्यक्षात सांताक्रुझ विमानतळाबाहेरच 15,000 लोक जमा झाले होते. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार त्यावेळी पहाटे चार वाजता प्रचंड उकडत असतानाही लोक तिथे जमा झाले होते.

नंतर मग मुंबईच्या रस्त्यांवरून खुल्या गाडीतून टीमची विजययात्रा निघाली. रस्त्यावर हजारो लोक जमा झाले होते, शिवाजी पार्क आणि गिरगाव परिसरात खेळाडूंवर पुष्पवृष्चटी करण्यात आली होती अशी आठवण वाडेकर यांनी एकदा सांगितली होती.

बारा वर्षांनी, 1983 साली कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली भारतानं वन डे विश्वचषक जिंकला, तेव्हाही मुंबईत टीमची विजययात्रा निघाली होती.

2007 साली महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं टी20 विश्वचषक जिंकला, तेव्हा विमानतळावरून बीसीसीआयचं मुख्यालय असलेल्या वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचण्यासाठी विजययात्रेला सहा तास लागले होते.

2011 साली तर टीम इंडियानं धोनीच्या नेतृत्त्वात मुंबईतच विश्वचषक जिंकला, तेव्हा वानखेडे स्टेडियमपासून हॉटेलपर्यंत संघांची उत्स्फुर्त विजययात्रा निघाली होती. रात्रभर शहरात उत्सव साजरा झाला.

मग 2024 मध्ये रोहित शर्माची टीम इंडियानं टी20 विश्वचषक जिंकून परतल्यावर मुंबईत पुन्हा विजययात्रा निघाली. त्यावेळी मरीन ड्राईव्हवर एरवी आठ दहा मिनिटांत कापलं जाणारं अंतर पार करण्यासाठी टीमच्या बसला तब्बल चार तास लागले होते.

मुंबईत 2024 च्या विजययात्रेसाठी तीन ते चार लाख लोक जमा झाल्याचं सांगितलं जातं. पण त्यात मोठा अपघात घडला नाही. चौदा जणांना मामुली दुखापत आणि श्वसनाचा त्रास जाणवला, पण त्यांच्यावर उपचार करून लगेच घरीही पाठवण्यात आलं.

गर्दीनं खच्चून भरलेल्या रस्त्यावर एका अँब्युलन्सला वाट काढून दिली जातानाचा एक व्हिडियोही तेव्हा समोर आला होता.

मुंबईला इतकी वर्ष जे करता आलं, ते बंगळुरूला का जमलं नाही, असा प्रश्नही विचारला जातो आहे.

तर मुंबईत 2024 सालच्या विजययात्रेदरम्यान 300 पोलीस अधिकाऱ्यांसह साधारण 5000 सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी तेव्हा दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी आधीच मुंबई क्रिकेट असोसिएशन तसंच बीसीसीआयसोबत चर्चा करून वानखेडे स्टेडियमवर बंदोबस्त आखला होता.

दुपारपासूनच विजय यात्रेचा मार्ग बंद करण्यात आला होता. मग गर्दीचा आकार वाढत गेला, तसं आणखी रस्ते बंद केले गेले.

थोडक्यात मुंबई पोलीसांकडे गर्दीच्या नियंत्रणाचा अनुभव आहे, जो इथे कामी आला. पण या अनुभवांतून आणि बंगळुरूतल्या घटनेतून शिकण्यासारखं बरंच आहे.

भारतात अलीकडच्या काळात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटना

  • 3 मे 2025 : गोव्यातील श्री लैराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू आणि 100 हून अधिक जखमी
  • 15 फेब्रुवारी 2025 : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वर चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू आणि 15 जखमी. यातले बहुतांश प्रवासी प्रयागराज इथे कुंभमेळ्याला जात होते.
  • 29 जानेवारी 2025 : कुंभमेळ्यादरम्यान प्रयागराजच्या संगम परिसरात लाखो यात्रेकरूंची गर्दी, चेंगराचेंगरीत किमान 30 मृत्यूमुखी, 60 हून अधिक जखमी

गर्दीचं व्यवस्थापन

भारतात एरवीही मोठी लोकसंख्या पाहता सार्वजनिक सोहळ्यांना मोठी गर्दी जमते. विशेषतः क्रिकेटसाठी एकत्र येणाऱ्या चाहत्यांची संख्या आधीच मोठी आहे.

खेळांच्या दुनियेत भावना नेहमीच उंचबळून येत असतात आणि प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या खेळाडूंना एकदा तरी डोळे भरून पाहायचं असतं, त्यांच्या विजयाचं साक्षीदार व्हायचं असतं. त्यामुळे विजययात्रेदरम्यान गर्दीची परवा न करता लोक मोठ्या संख्येनं जमा होतात.

त्यासाठीच आधीपासून नियोजन महत्त्वाचं ठरतं, असं महाराष्ट्राच्या राज्य गुप्तचर विभागाचे माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिरीष इनामदार सांगतात.

"टीम अंतिम फेरीत पोहोचल्यापासूनच किंवा ती अंतिम फेरी गाठण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यावरच हे नियोजन व्हायला हवं.

पोलिस, इतर अधिकारी, क्रिकेट बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटनं एकमेकांशी समन्वय साधून हे करायला हवं. विजययात्रा कुठल्या दिवशी, किती वाजता निघेल, ती कुठून कुठे आणि कुठल्या मार्गानं जाईल हे सगळं आधी ठरवायला हवं."

तारीख आणि वेळ ठरवताना एरवीच्या दिवशी त्या भागात वाहतुकीची स्थिती कशी असते हे लक्षात घेतलं पाहिजे, असंही इनामदार सांगतात.

"ऑफिस सुटल्यावर घरी जाणारे लोक, रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक इसम हे जाणते अजाणतेपणी गर्दीचा भाग बनतात. परिणामी गोंधळात आणखी भर पडू शकतो.

त्यामुळे विजययात्रा काढताना त्या मार्गावरची वाहतुक दुसरीकडे वळवणं, रस्ते मोकळे ठेवणं आणि आधी लोकांना त्याची माहिती देणं गरजेचं असतं."

हे सगळं लक्षात घेऊन विजययात्रा काढायची की एखाद्या बंदिस्त व्हेन्यूमध्ये समारंभाचं आयोजन करायचं हे ठरवलं जातं.

मुंबईतल्या वाहतूक पोलीस विभागात काम करणारे एक अधिकारीही हाच मुद्दा अधोरेखित करतात.

त्यांच्या मते, गर्दी जमण्याची शक्यता असेल तर आसपासच्या परिसरातील ऑफिसेस बंद ठेवणं किंवा शाळा-कॉलेजेसना सुट्टी देणं असे पर्याय असतात.

तसंच कुणाला कुठून प्रवेश दिला जाईल हे आधीच ठरवणं गरजेचं असल्याचं ते सांगतात.

बंगळुरूत स्टेडियममध्ये मर्यादित संख्येत फ्री पासेस ऑनलाईन वाटले गेले. पण मोफत प्रवेश आहे, असं वाटल्यानं मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली आणि स्टेडियममध्ये जाण्याचा प्रयत्न केला, याकडे ते लक्ष वेधतात.

भविष्याच्या दृष्टीने चर्चा सुरू

आरसीबीनं काल रात्री सामना जिंकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी विजयोत्सव ठेवला, त्यामुळे नियोजनासाठी वेळच मिळाला नसल्याचं दिसतं, असं अनेकांनी नमूद केलं आहे.

बोर्डाचे सेक्रेटरी देवाजित सैकिया यांनीही असंच मत मांडलं आहे. "हे डोळ्यात अंजन घालणारं हे आणि अशा परिस्थितीत आम्ही काय करायला हवं हे ठरवायला हवं.

याक्षणी तरी एखाद्या फ्रँचायझीच्या खासगी सोहळ्यावर बोर्डाचं नियंत्रण नाही," असं ते इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत.

बीसीसीआय आता भविष्यातल्या अशा विजय यात्रांविषयी विचार करत असल्याचं त्यांनी सांगितल आहे.

शिरीष इनामदार सांगतात, "आयपीएलचं आयोजन दरवर्षी होतं. दरवर्षी कोणी ना कोणी जिंकतं आणि त्यांच्या शहरातील लोकांना आनंद साजरा करावासा वाटतो. मग त्यासाठी आधीच वेळ घेऊन नियोजन करायला हवं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)