You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्लॅटफॉर्म अचानक बदलल्याने झाली चेंगरा-चेंगरी? 'या' पाच प्रश्नांमध्ये दडली आहेत दुर्घटनेची कारणं
15 फेब्रुवारीला रात्री 10 च्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत.
ही चेंगराचेंगरी का आणि कशी झाली? याचा तपास करण्यासाठी रेल्वेनं दोन सदस्यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीची स्थापना केली आहे.
या चेंगराचेंगरीमुळे गर्दीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत आणि अपघाताच्या कारणांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्लॅटफॉर्म बदलल्याचे कारण?
रेल्वे स्थानकावरील या चेंगराचेंगरीच्या कारणांची सध्या चर्चा सुरू आहे. त्यातलं सर्वाधिक चर्चा असलेलं कारण म्हणजे शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलणं.
स्टेशनवर ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रचंड गर्दीला ट्रेनचा प्लॅटफॉर्म शेवटच्या क्षणी अचानक बदलल्याचं समजल्यामुळं लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. हेच या अपघातामागचं मुख्य कारण असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
दुर्घटनेत दिल्लीतील संगम विहार परिसरातील रहिवासी पिंकी शर्मा यांचाही मृत्यू झाला.
त्यांचे नातेवाईक पिंटू शर्मा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, "कुटुंबातील सुमारे 15 सदस्य कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात होते. त्यावेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर ही चेंगराचेंगरी झाली."
शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलण्यात आलं. त्यामुळंच चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप पिंटू शर्मा यांनी केला आहे.
मात्र, रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती देणाऱ्या रेल्वेच्या एनटीईएस (NTES) या अधिकृत संकेतस्थळानुसार, प्रयागराज एक्सप्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून निघते.
त्यामुळं प्रवाशांनी केलेल्या आरोपांवरून असं दिसून येतं की, ट्रेनबद्दलची माहिती ऐकण्यात त्यांच्याकडून चूक झाली किंवा गोंधळ झाला असावा.
दरम्यान, या घटनेत नातेवाईक गमावलेल्या पूनम देवी म्हणाल्या की, "रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर येत असल्याची घोषणा अचानक करण्यात आली. त्यानंतर लोक धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली."
मात्र, उत्तर रेल्वेनं प्लॅटफॉर्म बदलल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
उत्तर रेल्वेचे प्रवक्ते हिमांशू शेखर उपाध्याय म्हणाले की, "कोणतीही रेल्वे रद्द करण्यात आली नाही किंवा प्लॅटफॉर्म बदलण्यात आले नाहीत."
स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर 15 फेब्रुवारीला त्याबाबत पत्रकारांनी रेल्वे पोलीस उपायुक्त केपीएस मल्होत्रा यांच्याकडं विचारणा केली.
प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरून प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर जाण्यास सांगितलं होतं का? त्यामुळं चेंगराचेंगरी झाली का? असं त्यांना विचारण्यात आलं.
त्यावर "नाही, असं काहीही नव्हतं. रेल्वेकडून एक विशेष ट्रेन चालवली जाणार होती. त्याची घोषणाही झाली होती. पण ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलण्याबद्दल मला काहीही कल्पना नाही," असं ते म्हणाले.
ट्रेन उशिरानं आल्याने दुर्घटना घडली?
बिहारकडं जाणारी स्वातंत्र्य सेनानी एक्सप्रेस नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरून रात्री 12:15 वाजता निघाली.
या ट्रेनची नियोजित वेळ रात्री 9.15 वाजता होती. पण ती तीन तास उशिरानं धावली. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वर मोठ्या संख्येनं प्रवासी रेल्वेची वाट पाहत होते.
भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस सुटण्याची नेहमीची वेळ संध्याकाळी 5 वाजता आहे. पण, सुमारे 10 तास उशिर झालेली ती रेल्वेही प्लॅटफॉर्म क्रमांक 11 वरून निघाली.
अशाप्रकारे गाड्यांना उशीर झाल्यामुळे घटनास्थळाभोवती असलेल्या प्लॅटफॉर्मवर लोकांची मोठी गर्दी जमली होती. या अपघाताचं एक कारण गाड्यांना होणारा विलंबही ठरलं.
जीआरपी डीसीपी केपीएस मल्होत्रा यांच्या मते, "आम्हाला गर्दीचा अंदाज आला होता. परंतु दोन गाड्या उशिरा आल्यानं आणि तिथे जास्त लोक जमल्यामुळं अशी परिस्थिती उद्भवली. रेल्वे याबबात चौकशी करेल."
"ज्या 10 मिनिटांत ही घटना घडली त्यावेळी दोन गाड्यांना उशीर होणं आणि जास्त लोकांचं रेल्वे स्थानकावर येणं यामुळं घटना घडली. मात्र, घटनेमागील उर्वरित तथ्ये रेल्वेकडून तपासली जातील," असंही ते म्हणाले.
प्रत्यक्षदर्शींनीही याला दुजोरा दिला. घटनेच्या वेळी नवी दिल्ली स्टेशनवर उपस्थित असलेले रवी यांच्या मते, "चेंगराचेंगरी रात्री 9.30 च्या सुमारास झाली. काही गाड्या उशिरानं धावत होत्या. त्यावेळी खूप गर्दी होती. प्लॅटफॉर्म क्रमांक 13 वरही खूप गर्दी होती."
गर्दीच्या तुलनेत पुरसे सुरक्षारक्षक होते का ?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी रेल्वेनं दोन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
घटनेच्या वेळी स्टेशनवर किती सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते? असा सवाल समितीचे सदस्य आणि आरपीएफ अधिकारी असलेल्या पंकज गंगवार यांना वारंवार विचारण्यात येत आहे.
मात्र त्यांनी या प्रश्नाचं कोणतंही उत्तर दिलेलं नाही. तपास पूर्ण होईपर्यंत वाट पाहा, असं ते म्हणालेत.
या घटनेत दिल्लीतील किराडी भागातील रहिवासी उमेश गिरी यांच्या 45 वर्षीय पत्नी शीलम देवी यांचंही निधन झालं आहे.
बीबीसीबरोबर बोलताना त्यांनी म्हटलं की, "मला कोणतीही मदत मिळाली नाही. नंतर खूप उशीर झाला होता. मी अनेक पोलीस आणि आरपीएफ जवानांकडं गेलो पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं."
दरम्यान, घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या काही इतर प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की, पोलीस त्यांचे प्रयत्न करत होते. परंतु मोठ्या गर्दीमुळे कोणी थांबत नव्हतं, कोणी कोणाचं ऐकत नव्हतं.
घटनेच्या वेळी नवी दिल्ली स्टेशनवर उपस्थित असलेले रवी सांगतात , "ट्रेन पाहताच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील लोक इकडच्या प्लॅटफॉर्मवर आले आणि चेंगराचेंगरी झाली.
वरच्या बाजूसही बरेच लोक उभे होते. गर्दी खूप होती. पोलीस सर्व काही पाहत होते पण तरीही गर्दीला नियंत्रित करू शकले नाही."
दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, "ही घटना रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा बराच प्रयत्न केला. पण लोकांची संख्या खूप जास्त होती."
घटनेच्या वेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर भारतीय हवाई दलाचे अधिकारी अजित उपस्थित होते. ते म्हणाले की, "जिथं 5-10 हजार लोक जमतात, तिथं प्रशासन किती काम करणार.
इतक्या लोकांना हाताळण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि त्यांनी ती केलीही. मी ते पाहत होतो."
फूट ओव्हर ब्रिज ठरला का कारण?
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होण्याचं हेही एक कारण असल्याची चर्चा आहे.
पूर्व भारताकडं जाणाऱ्या अनेक गाड्या काही मिनिटांच्या अंतरानं सुटत होत्या. भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 11 वरून, प्रयागराजसाठी कुंभ स्पेशल प्लॅटफॉर्म 12 वरून, स्वतंत्र सेनानी प्लॅटफॉर्म 13 वरून आणि प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 14 वरून निघणार होती.
या सर्व प्रवाशांमुळं प्लॅटफॉर्मवर तसेच फूट ओव्हर ब्रिज (एफओबी)वर म्हणजे पादचारी पुलावर आणि पायऱ्यांवर प्रचंड ताण आला होता.
एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं की, रेल्वे प्लॅटफॉर्म व्यवस्थापन शिकवतं पण पुलामुळं नेहमी काहीतरी चुकतं.
रेल्वे स्थानकावर झालेल्या सर्व मोठ्या अपघातांमध्ये पूल हे एक प्रमुख कारण म्हणून समोर येत राहतं.
लोक सर्वात आधी येणारी ट्रेन पकडण्याच्या इच्छेनं पुलावर उभे असतात. काही लोक तर पुलावरच बसतात.
अशा परिस्थितीत मोठी गर्दी जमते तेव्हा, त्यातील एक व्यक्तीही खाली पडली तरी अशाप्रकारचे अपघात होतात.
मग तो 2013 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान अलाहाबादमध्ये झालेला अपघात असो किंवा 2017 मध्ये प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील अपघात. किंवा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघात. या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे एफओबी किंवा पादचारी पूल.
स्पेशल ट्रेनच्या घोषणेनं गोंधळ उडालाका?
चेंगराचेंगरी का झाली? या प्रश्नावर उत्तर देताना रेल्वे डीसीपी केपीएस मल्होत्रा म्हणाले की, "जेव्हा एकाच ठिकाणी जास्त लोक जमतात आणि ट्रेनची वाट पाहत असतात तेव्हा जर कोणतीही चुकीची माहिती पसरली तर चेंगराचेंगरी होऊ शकते."
हे का घडलं? ते रेल्वेच्या चौकशीत उघडकीस येईल, असंही ते म्हणाले.
दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांच्या मते, "चेंगरा चेंगरीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुरुवातीला प्रयागराजच्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दी वाढली आणि दोन्ही प्लॅटफॉर्मवर गोंधळ पसरला."
प्रत्यक्षदर्शी हिरालाल महातो यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं की, "प्लॅटफॉर्म 16 वरून 12 वर लोक येत होते.
त्यावेळी त्यांनी ही घोषणा ऐकली आणि ते परत प्लॅटफॉर्म 12 वरून 16 वर जाऊ लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. लोक मध्येच एकमेकांवर आदळले आणि त्यामुळे जमिनीवर पडले."
हिरालाल महातो यांच्या मते, दुर्घटना घडली तेव्हा जवळपास प्रशासनातील कोणी नव्हतं. ती जागा झाडून स्वच्छ करण्यात आली आहे.
आता इथं काहीही नाही. पुलावर लोक जखमी झाले होते. त्यांना तिथून रुग्णालयात नेण्यात आलं. प्रशासन एक तासानंतर तिथं पोहोचलं होतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.