नाशिक ते प्रयागराज, 'या' 6 कुंभमेळ्यातील चेंगरा-चेंगरीच्या घटनांमध्ये यापूर्वीही शेकडो जणांचा मृत्यू

महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच जखमींवर उपचार सुरू आहेत, असं महाकुंभचे पोलीस उपमहानिरीक्षक वैभव कृष्ण यांनी माध्यमांना सांगितलं.

कुंभमेळा हिंदुंच्या श्रद्धेचं महत्त्वाचं प्रतीक मानलं जातं. ठरावीक कालावधीनंतर हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि महाराष्ट्रात नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं.

अनेक दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्यात काही दिवस मात्र शुभ आणि विशेष मानले जातात. या दिवसांत भावीक कोट्यवधींच्या संख्येने मेळ्याला हजेरी लावतात.

संपूर्ण देशातून, परदेशातूनही भावीक कुंभमेळ्याला भेट देतात.

या वर्षी प्रयागराज इथं झालेल्या कुंभमेळ्याला 40 कोटीवर लोक येणार असल्याचा अंदाज आहे.

प्रयागराजला कुंभमेळा होत असेल तर त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्याची भाविकांची इच्छा असते.

या संगमावर गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचा संगम होतो असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात इथं सध्या गंगा आणि यमुना या दोनच नद्या दिसतात. तिसऱ्या सरस्वती नदीचा उल्लेख फक्त पुराणातच दिसतो.

पवित्र स्नान केल्यानं सगळी पापं धुतली जातात आणि मोक्ष मिळतो असं मानलं जातं.

पण अनेकदा भावीक इतक्या संख्येनं आले की, गर्दी हाताळणं अवघड होऊन जातं. अशावेळी छोटी चूकही मोठ्या दुर्घटनेमागचं कारण ठरते.

कुंभमेळ्यात याआधीही अशा दुर्घटना घडल्या आहेत.

अलाहाबाद (आताचे प्रयागराज) कुंभमेळा - 1954

आताचं प्रयागराज आधी अलाहाबाद म्हणून ओळखलं जात होतं. 1954 मध्ये झालेला स्वातंत्र्यानंतरचा पहिलाच कुंभमेळा होता. त्यावर्षी 3 फेब्रुवारीला मौनी अमावस्येच्या दिवशीच भाविक मोठ्या संख्येनं संगमावर आले होते.

तेव्हा एक हत्तीमुळे चेंगराचेंगरी सुरू झाली, असं म्हटलं जातं.

या दुर्घटनेत जवळपास 800 लोकांचे मृत्यू झाले आणि शेकडो जखमी झाले होते.

या घटनेनंतर तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजकीय नेते आणि काही इतर काही प्रसिद्ध लोकांना कुंभमेळ्यात न जाण्याचा सल्ला दिला होता. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी असा सल्ला दिला होता.

हरिद्वार कुंभमेळा - 1986

हरिद्वार मध्ये झालेल्या या कुंभमेळ्यात 14 एप्रिल 1986 ला तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काही नेत्यांना घेऊन गेले होते.

त्यामुळे सामान्य नागरिकांना नदी किनाऱ्यावर जाण्यापासून थांबवलं गेलं. पण गर्दी वाढली आणि शेवटी नियंत्रणाबाहेर गेली.

या घटनेत जवळपास 50 लोकांचे मृत्यू झाले. त्याआधी हरिद्वारमधल्या कुंभमेळ्यात 1927 आणि 1950 मध्येही चेंगराचेंगरी झाली होती.

उज्जैन सिंहस्थ मेळा 1992

मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभ मेळा भरतो. या दरम्यान झालेल्या गर्दीत जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाला होता.

नाशिक कुंभमेळा 2003

2003 मधला कुंभमेळा नाशिकमध्ये भरला होता. दैनिक जागरण वृत्तपत्राने दिलेल्या एका बातमीनुसार तिथे साधू चांदीची नाणी वाटू लागले.

ते गोळा करण्यासाठी झटापट सुरू झाली. त्याला चेंगराचेंगरीचं स्वरूप आलं. त्यात कमीतकमी 30 लोकांचा जीव गेल्याची नोंद आहे. शिवाय, शंभरहून जास्त लोक जखमी झाले.

हरिद्वार कुंभमेळा 2010

2010 च्या हरिद्वारच्या कुंभमेळ्यात पुन्हा एक दुर्घटना घडली. पवित्र स्नानाच्या दिवशी साधू आणि भाविकांत काही वादावादी सुरू झाली.

त्यातून चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यात पाच लोकांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा केली होती.

अलाहाबाद (आत्ताचं प्रयागराज) कुंभ 2013

प्रयागराजमध्ये (तेव्हाचं अलाहाबाद) याआधी 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये कुंभमेळा भरला गेला होता. तेव्हा रेल्वे स्टेशनवरच भाविकांची गर्दी लोटली होती.

रॉयरर्स या आतंरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तिथं 36 लोकांचे मृत्यू झाले. त्यात 29 महिलांचा समावेश होता.

चेंगराचेंगरी नेमकी कशामुळे झाली ते स्पष्टपणे कळलं नाही. पोलीस गर्दी नियंत्रित करायचा प्रयत्न करत होते, त्यामुळे दुर्घटना घडली असं काही जण सांगत होते.

तर रेल्वे स्टेशनवरच्या पुलावर गर्दी झाल्यानं लोकांमध्ये चेंगराचेंगरी सुरू झाली असं काहींनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.