You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवा : शिरगावच्या लैराई देवीच्या जत्रा उत्सवात चेंगराचेंगरी, सात जणांचा मृत्यू तर 70 हून अधिक जखमी
गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवीच्या यात्रेत झालेल्या चेंगरा चेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 70 भाविक जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमींना उपचारासाठी डिचोली आरोग्य केंद्र, म्हापसा जिल्हा रुग्णालय आणि गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेऊन चौकशी केली. तसंच त्यांनी घटनास्थळाचीही पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन करुन माहिती घेतली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे.
गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक या देवीच्या उत्सवासाठी मंदिरात जमले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.
अशी घडली घटना
उत्तर गोव्यातील शिरगाव येथे दरवर्षी लैराई देवीची जत्रा आयोजित केली जाते. यात रात्री पारंपरिक मिरवणूक काढली जाते. यावर्षीही 2 मे रोजी रात्री ही मिरवणूक काढण्यात आली.
या उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. यावर्षी अंदाजे 40 ते 50 हजार लोक सहभागी झाले होते.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, मिरवणुकीदरम्यान एका ठिकाणी उतार असल्याने, गर्दी एकत्रितपणे वेगाने चालायला लागली. त्यामुळं एकच गोंधळ उडाला होता.
या गोंधळानं काही लोक पडले आणि त्यानंतर एकमेकांवर पडू लागल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेक जण चिरडले गेले.
या चेंगराचेंगरीत 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 70 जण जखमी झाले. जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे.
स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत बोलताना गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी म्हटलंय की, "साधारण पावणेचारच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. कदाचित अफवा पसरल्यामुळे ही घटना घडली. या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे, याचा तपास केला जात आहे."
"या घटनेदरम्यान जवळपास 150 जण खाली कोसळले. या घटनेनंतर तातडीने पोलीस आणि नागरिकांनी बचाव कार्य सुरु केलं आणि जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सुरुवात केली. आम्ही ही घटना एका छोट्या जागेपुरती मर्यादीत ठेवली, अन्यथा जास्त जीवितहानी झाली असती. काल इथे सुमारे 1 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते."
मुख्यमंत्र्यांनी घेतली जखमींची भेट
दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत घटनेबाबत माहिती दिली आहे.
"आज सकाळी शिरगाव येथील लैराई जत्रेत झालेल्या दुःखद चेंगराचेंगरीमुळं मी खूप दुःखी आहे," असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.
प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेत पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही दिली.
"आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत याची खात्री करण्यासाठी मी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्याशी बोलून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि या कठीण काळात पूर्ण पाठिंबा दिला," असंही प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.
"दरवर्षी या उत्सवात 50,000 हून अधिक लोक सहभागी होत असतात. एसपी नॉर्थ आणि जिल्हाधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. आम्ही पुढील 3 दिवसांसाठी राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करत आहोत" असंही मुख्यमंत्री म्हणाले.
नरेंद्र मोदी, राहुल गांधींनीही व्यक्त केला शोक
"गोव्यातील शिरगाव येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवित हानीबद्दल दुःख झाले आहे. कुटुंबीय गमावले त्यांच्या संवेदना. जखमी भाविक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना. स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करत आहे", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
तर राहुल गांधींनीही दुःख व्यक्त केलं.
"गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवी मंदिरात वार्षिक यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबांना मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच, सर्व जखमींच्या लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो", या शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
शिरगाव लैराई देवीच्या जत्रेदरम्यान घडलेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे गोवा प्रदेश काँग्रेस समितीनं संवेदना व्यक्त केल्या आहेत.
या दुर्घटनेनं अतिशय दुःखी असून पीडित कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचं अमरनाथ पणजीकर यांनी म्हटलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.