You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बंगळुरू चेंगराचेंगरी: स्टेडियमबाहेरची गर्दी नियंत्रणाबाहेर कशी गेली? परिस्थितीची भीषणता दाखवणारी छायाचित्रं
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत 11 लोकांचा मृत्यू झाला, तर 33 लोक जखमी झाल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.
18 वर्षांनंतर आयपीएल विजेतेपद मिळवलेल्या संघाचं स्वागत करण्यासाठी लाखो लोक बंगळुरूच्या रस्त्यावर जमले होते.
चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर, लोकांनी मेट्रो स्टेशनकडे गर्दी करण्यास सुरुवात केली. प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी जमल्याने मेट्रो अधिकाऱ्यांनी स्टेडियमभोवतीची स्टेशन्स बंद केली.
चेंगराचेंगरी होण्याची आणि गर्दी नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती असल्याने विजय परेडला परवानगी देण्यात आली नाही, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या आयपीएल फायनलमध्ये बंगळुरूने पंजाब किंग्सचा पराभव करून पहिल्या आयपीएल विजेतेपदाचा गवसणी घातली होती.
हाच विजय साजरा करण्यासाठी आज बंगळुरूमध्ये खुल्या बसमधून एक मिरवणूक निघणार होती, पण पोलिसांनी रहदारीमुळे याला परवानगी नाकारली.
त्यानंतर बंगळुरूच्या संघाचे लाल झेंडे घेऊन हजारोंची गर्दी चिन्नास्वामी मैदानाकडे येत असल्याचं दिसलं आणि त्यातच ही चेंगराचेंगरीची घटना घडली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका आरसीबी फॅनने एएनआयशी बोलताना सांगितलं, "स्टेडियमच्या आतील सर्व खुर्च्या भरल्या होत्या. त्यामुळे आम्हाला आत जाण्याची परवानगी मिळत नाहीये. आम्हाला परत जायचे आहे, परंतु परतही जाण्याची परवानगी नाही. बाहेर गेटवर प्रचंड गर्दी आहे, अशावेळेस जर गेट उघडलं तर मोठ्या प्रमाणात लोकं आत येतील आणि आधीच बरेच लोक जखमी झाले आहेत..."
कर्नाटक भाजपने काँग्रेसवर आरोप करताना म्हटलं, "7 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेला काँग्रेस सरकार दोषी आहे, त्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही परिस्थिती ओढावली. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत."
बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांच्या मते, गर्दी अचानक इतकी वाढेल याचा अंदाज कुणालाही नव्हता.
शहराच्या विविध भागातून लोक मिळेल ते वाहन पकडून स्टेडियमकडे निघाले होते. यापैकी अनेकांनी 18 नंबरची जर्सी घातलेली होती. स्टेडियमकडे जाणाऱ्या मेट्रो ट्रेन्स भरल्यामुळे बीबीसीच्या प्रतिनिधींना देखील त्या मेट्रोमध्ये बसता आलं नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडिया एक्सवर आपल्या भावना व्यक्त करताना लिहिलंय, "आरसीबीच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी जमलेल्या ठिकाणी चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली आहे. या घटनेतील मृतांप्रती माझ्या सहवेदना आहेत.जल्लोष महत्वाचा आहेच पण तो जीवापेक्षा महत्वाचा नाही, कृपया सर्वांनी काळजी घ्या"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)