चांगला पुरुष असणे म्हणजे नेमके काय? सकारात्मक पुरुष महिलांबरोबर कसं वर्तन करतात?

जोडपं

फोटो स्रोत, Getty Images

एक चांगला पुरुष कसा असायला हवा. त्यानं काय करावं? काय करू नये? या सर्वाबाबत एक ठरावीक विचारसरणी ही कदाचित जगाच्या निर्मितीपासूनच ठरलेली आहे.

जगातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माच्या आधारे काही फरक असू शकतो, परंतु व्यक्तीची प्रतिमा बऱ्याच अंशी सारखीच राहिली आहे.

आपण सर्वांनीच अनेक पिढ्यांपासून घरांमध्ये आसपाच्या लोकांशी बोलताना अगदी माध्यमं आणि मीडिया किंवा चित्रपटांमध्येही काही खास प्रकारच्या गोष्टी ऐकल्या आहेत.

त्यात 'मर्द को दर्द नही होता', 'बायकांसारखे काय रडता', 'बांगड्या भरा, असा कसा मर्द?' अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

पण खरं म्हणजे अशा प्रकारची विचारसरणी ही कट्टर पितृसत्ताक समाजाचा आरसा आहे.

पैसा कमावणं आणि घर चालवणं पुरुषांची जबाबदारी आहे. सर्व मेहनत पुरुषच करू शकतात, घरात अंतिम निर्णय हा नेहमी पुरुषच घेत असतात. हा आपल्या सामाजिक विचारसरणीचा एक भाग आहे.

पंजाब विद्यापीठात महिला अध्ययन केंद्राच्या प्राध्यापक डॉ. अमीर सुल्ताना यांच्या मते हे 'सोशल कंस्ट्रक्ट' म्हणजे समाजानेच तयार केलेलं आहे.

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, "पुरुषांबाबत अशाप्रकारची विचारसरणी समाजाद्वारे तयार करण्यात आली आहे. त्याचा निसर्गाशी काहीही संबंध नाही."

"तसंच, वेगवेगळ्या समाजांमध्ये पुरुषत्वाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते. पण त्या सर्वांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे पुरुष अधिक शक्तिशाली असल्याने तेच अंतिम निर्णय घेऊ शकतात, हेही आपल्याला पाहायला मिळतं."

पुरुषांबाबतचे शब्द

2018 मध्ये जेव्हा जगभरात #Metoo मोहीम सुरू झाली तेव्हा पुरुषांबाबतच्या अशा प्रकारच्या मानसिकतेसाठी एक खास शब्द वापरला जाऊ लागला होता.

हा शब्द होता 'विषाक्त पौरुषत्व ' (टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी)

तुम्ही एक पुरुष असाल आणि तुम्हाला एका ठराविक पद्धतीनं काही विचार मांडायचे असतील, तर तुम्ही हा शब्द समजू शकता.

पुरुष शक्तिशाली असतात आणि महिला कमकुवत यावर तुम्हाला विश्वास तर ठेवायलाच लागतो, पण त्याचबरोबर ते कृतीतूनही दाखवावं लागतं.

जोडपं

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पण त्याचबरोबर तुम्ही जर असा विचार करत असाल तर प्रत्यक्षात ते पौरुषत्व नसून 'विषाक्त पुरुषत्व' आहे.

नंतर असा प्रश्न उपस्थित झाला की, जर पुरुषांबाबत अनेक दशकांपासून चालत आलेली विचारसरणी पुरुषत्व नसून विषाक्त पौरुषत्व आहे तर मग वास्तविक पुरुषत्व काय आहे?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात एक नवा शब्द चलनात आला, तो म्हणजे हेल्दी मॅस्क्युलिनिटी किंवा पॉझिटिव्ह मॅस्क्युलिनिटी.

गॅरी बार्कर इक्विमुंडो सेंटर फॉर मॅस्क्युलिनिटी अँड सोशल जस्टिस चे सीईओ आणि सह-संस्थापक आहेत. ते 'मॅनकेअर' आणि 'मेनेंगेज' चे सहसंस्थापकही आहेत.

मॅनकेअर 50 पेक्षा जास्त देशात चालवली जाणारी एक जागतिक मोहीम आहे. तिचा उद्देश पुरुषांना 'देखभालकर्ता' ही भूमिका निभावण्यासाठी प्रोत्साहीत करणं हा आहे.

मॅनेजिंगएंगेज जगभरातील 700 पेक्षा अधिक बिगर सरकारी संघटनांची एक जागतिक संघटना आहे.

गॅरी बार्कर आंतरराष्ट्रीय पुरुष आणि लिंग समानता सर्वेक्षण (IMAGES)चे सहसंस्थापक आहेत.

याला पुरुषांचे स्वभाव, पितृत्व, हिंसाचार आणि लैंगिक समानतेच्या आधारे त्यांच्या विचारांचं जगातील सर्वात मोठं सर्वेक्षण म्हटलं जातं.

गॅरी बार्कर यांनी बीबीसी रिलबरोबर बोलताना त्यांची मतं मांडली.

चांगला मुलगा असणे म्हणजे काय?

बीबीसी रीलबरोबर एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, अनेक तरुण आणि पुरुष चांगला मुलगा किंवा पुरुष असणं म्हणजे नेमकं काय? याबाबत संभ्रमात आहेत.

बार्कर यांच्या मते, त्यांना सर्वेक्षणात लक्षात आलं की, जेव्हा कुटुंबातील पुरुष एकमेकांची काळजी घेतात, तेव्हा संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होत असतो.

त्यांच्या मते, हेल्दी मॅस्क्युलिनिटी महिला विरोधी विषाक्त विचारसरणीवरील तोडगा आहे.

ते म्हणाले की, सर्वात सोपी पद्धत म्हणजे पुरुषांना याची जाणीन करून द्यायला हवी की, जेव्हा ते लैंगिक शोषणाबाबत ऐकतील किंवा महिलांविरोधी जोक ऐकतील तेव्हा लगेचच त्यांनी याविरोधात भूमिका घ्यायला हवी.

ते पुढं म्हणाले की, जेव्हा एखाद्या पुरुषाला त्याच्या ऑफिसमधील कोणी, मित्र, किंवा नातेवाईकांपैकी कोणी महिलांवर लैंगिक अत्याचार करत आहे, हे समजतं तेव्हा त्यांनी त्याविरोधात आवाज उठवायला हवा.

गॅरी बार्कर
फोटो कॅप्शन, गॅरी बार्कर हे इक्विमंडो सेंटर फॉर मॅस्क्युलिनिटी अँड सोशल जस्टिसचे सीईओ आणि सह-संस्थापक आहेत.

पंजाब विद्यापीठातील डॉ. अमीर सुल्ताना यांचं असंही म्हणणं आहे की, जर समाजात महिला आणि मुलींबरोबर काहीतरी चुकीचं घडत असेल, तर पुरुषांनी याच्या विरोधात आवाज उठवायला हवा.

डॉ. सुल्ताना यांच्या मते हे सकारात्मक पौरुषत्व किंवा पॉझिटिव्ह मॅस्क्युलिनिटी आहे.

उदाहरण देताना ते म्हणाले की, "पुरुष म्हणून जर तुम्हाला घरात निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर हुंडा न घेता लग्न करण्याचा निर्णय हे पॉझिटिव्ह मॅस्क्युलिनिटीचं उदाहरण ठरेल."

टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी

बार्कर यांच्या मते, महिला सबलीकरण आणि पूर्ण लैंगिक समानतेच्या प्रवासात पुरुषांची भूमिका महत्त्वाची आहे.

मुंबईस्थित हरीश अय्यर अनेक वर्षांपासून भारतात समलैंगिक अधिकारांसाठी लढत आहेत. त्यांच्या मते, हेल्दी मॅस्क्युलिनिटीचा अर्थ एक अशी विचारसरणी ज्यात सर्व लिंगांसाठी समान संधीसाठी प्रयत्न केले जातात आणि त्याचे स्वागत केले जाते.

बीबीसी हिंदीसाठी फातिमा फरहीन यांच्याशी बोलताना हरीश अय्यर म्हणाले की, हेल्दी मॅस्क्युलिनिटीची विचारसरणी ही स्त्रीवादातच सामावलेली आहे.

स्त्रीवादामध्ये असं मानलं जातं की, समाज पुरुषांच्या दृष्टीकोनाला प्राथमिकता देत असतो आणि पितृसत्तात्मक समाजात महिलांबरोबर भेदभाव केला जातो. तसंच त्यांच्याबरोबर चुकीचं वर्तनही केलं जातं.

हरीश अय्यर यांच्या मते, हेल्दी मॅस्क्युलिनिटी हादेखील एक विचारच आहे, फक्त त्यात फरक एवढा आहे की, यात केवल महिलांसाठीच नव्हे तर सर्व लिंगांसाठी समान संधींबाबत चर्चा केली जाते.

जोडपं

पॉझिटिव्ह मॅस्क्युलिनिटी यावर सध्या जास्त चर्चा का होऊ लागली आहे, यावर उत्तर देताना ते म्हणाले की, जेव्हा समाजात विषाक्त पौरुषत्वाची चर्चा होत असेल तर त्याच्या विरुद्ध अशा प्रकारच्या प्रगतीशील विचारसरणीची चर्चा होणं हेही स्वाभाविकच आहे.

हरीश अय्यर यांनी आणखी एक महत्त्वाची बाब सांगितली. ती म्हणजे विषाक्त पौरुषत्व केवळ पुरुषांशी संबंधित नाही तर काही महिलाही याला प्रोत्साहन देतात.

बांगडी म्हणजे प्रतिक

डॉ. अमीर सुल्ताना यांचंही असंच मत आहे. "महिलादेखील अशाच समाजाचा भागआहेत, ज्याठिकाणी आपण पौरुषत्वाला महत्त्व देतो. महिला अनेकदा राजकीय आंदोलनात सहभागी होतात आणि अधिकारी किंवा नेते यांना त्यांच्या बांगड्या देतात. या बांगड्या विरोधाचं प्रतीक होतात." असं ते म्हणाले.

पण पुरुषांचंही खूप काही पणाला लागलं आहे, याची जाणीव त्यांना करून द्यायला हवी. जर जग लैंगिक समानतेच्या दिशेनं पुढं जात असेल तर हे पुरुषांसाठीही फायद्याचं ठरू शकतं.

पुरुष लैंगिक समानतेच्या या लढ्यात महिलांचे सहकारी म्हणून त्यांच्याबरोबर उभे राहिले तर, ते संपूर्ण प्रक्रियेत एक चांगले व्यक्तीदेखील बनतील.

स्त्रीवादी समूह नाझरिया यांचे ज्येष्ठ कार्यक्रम समन्वयक झयान म्हणाले की, हेल्दी मॅस्क्युलिनिटी म्हणजे जी समाजानं तयार केलेले नियम आणि विचारांना आव्हान देऊ शकेल.

बीबीसीसाठी फातिमा फरहीन यांच्याबरोबरच्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, "कौटुंबिक हिंसाचारात जशी वाढ होऊ लागली आणि समाजात त्यावर चर्चा होऊ लागली, तसं लोकांना वाटलं की या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुरुषांबरोबर पुरुषत्वाबाबत थेट चर्चा करणं हीच सर्वात महत्त्वाची बाब आहे."

त्यांच्या मते, पुरुषांना त्यांची प्रतिमा चांगली नाही असं सांगितलं जात होतं.

मानसिकता बदलण्याची गरज

झायन यांच्या मते, ज्याप्रकारे आज राष्ट्रीयत्वाबाबत चर्चा केली जात आहे, ती कुठं ना कुठं पारंपरिक पौरुषत्व विचारधारेबरोबर काम करत आहे.

ते म्हणाले की, "भारतात हेल्दी मॅस्क्युलिनिटीबाबत चर्चा होत आहे. पण त्याची व्याप्ती आणखी वाढवण्याची गरज आहे. आपण मुलांचं पालन-पोषण कसं करायला हवं हे संघटना लोकांना सांगत आहेत."

तसंच लोकांची विचारसरणी आणि आई-वडील यात काय भूमिका निभावू शकतात.

याबाबत डॉ. सुल्ताना म्हणाल्या की, "अशा प्रकारची विचारसरणी तेव्हाच बदलली जाऊ शकते, जेव्हा आपण मुलांना सुरुवातीपासूनच हे शिकवू की मुले आणि मुली समान आहेत. चांगली व्यक्तीच चांगला पुरुष बनू शकते."

तरुण

डॉ. सुल्ताना यांच्या मते, आता तर फक्त पुरुष आणि महिलाच नव्हे तर LGBTQI बद्दलही चर्चा केली जात आहे.

त्यांच्या मते, जेव्हा संपूर्ण समाज बदलत असतो, तेव्हाच तो समाज प्रगती करत असतो.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)