रणवीर-दीपिकाने 3 वर्षं साखरपुडा केल्याचं सर्वांपासून लपवलेलं, दीपिकाच्या घरचे होते नाराज?

रणवीर सिंग-दीपिका पदुकोण

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुप्रिया सोगले
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

गुरुवारी (26 ऑक्टोबर) कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनची सुरुवात झाली. या सीझनच्या पहिल्या एपिसोडसाठी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग पाहुणे म्हणून आले होते.

मसालेदार प्रश्नांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या रिलेशनशिप आणि लग्नाशी संबंधित अनेक किस्से सांगितले.

या कार्यक्रमानंतर या दोघांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली.

एरव्ही रंगीबेरंगी कपड्यांमध्ये वावरणारा रणवीर सिंग यावेळी दीपिकासोबत काळ्या पोशाखात आला होता.

प्रेमाची सुरुवात कशी झाली?

बऱ्याच बॉलीवूड स्टार्सची प्रेमप्रकरणं चित्रपटांच्या सेटवर सुरू होतात. तसंच या जोडीचं प्रेमही चित्रपटादरम्यानच जुळलं.

संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला राम लीला' या चित्रपटातून दोघांमधील केमिस्ट्रीची सुरुवात झाली.

हा किस्सा 2012 चा आहे. तेव्हा या चित्रपटातील मुख्य भूमिका करीना कपूर करणार होती.

रणवीरने सांगितलं की, शूटिंगच्या एक आठवडा आधी करीना कपूरने काही कारणांमुळे चित्रपट सोडला.

त्याने सांगितलं, "मग त्या भूमिकेसाठी कोणाला कास्ट करायचं असा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला होता. त्याचवेळी ‘कॉकटेल’ हा चित्रपट आला होता. तो चित्रपट पाहिल्यानंतर मी दीपिकाला घ्यावं या मताचा होतो. त्याप्रमाणे दीपिकाला ती भूमिका मिळाली."

रणवीरने पुढे सांगितलं की, "तेव्हा आम्ही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यासाठी भन्साळींच्या घरी गेलो होतो. दीपिका पांढऱ्या कुर्त्यामध्ये आली होती. जशी एखाद्या वाऱ्याची झुळूक यावी तशी ती माझ्या आयुष्यात आली होती."

"यानंतर सर्वांनी एकत्र जेवण केलं आणि त्यादरम्यान दीपिकाच्या दातांमध्ये काहीतरी अडकल्याचं दिसल्यावर त्याने तिला तसं सांगितलं."

रणवीर म्हणाला, "ती माझ्या शेजारीच बसली होती. मी तिच्या दाताकडे बोट दाखवून तिला सांगू लागलो तर ती म्हणाली तूच काढून दे. मी माझ्या हाताने तिच्या दातात अडकलेला कण काढला तेव्हा मला जो करंट बसला तो आजही जाणवतो."

त्यानंतर दोघांची छान मैत्री जमली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकत्र वेळ घालवला आणि त्यांच्यात जवळीक वाढली ज्याचं रुपांतर प्रेमात झालं.

रणवीरबद्दल दीपिका काय म्हणाली?

अनेकदा चित्रपटाचं शूटिंग संपताच प्रेमप्रकरणं पण संपतात. दीपिका पदुकोणनेही सांगितलं की, ती या नात्याबाबत गंभीर नव्हती.

दीपिकाने सांगितलं की, तेव्हा ती सिंगल होती आणि रणवीरही आधीच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडला होता.

दीपिका म्हणाली, "त्यानंतर रणवीर माझ्या आयुष्यात आला पण सुरुवातीला त्याच्याबद्दल कोणतीही कमिटमेंट नव्हती. त्यावेळी आम्ही टेक्निकली दुसऱ्यासोबत डेटवर जाऊ शकत होतो, पण आम्ही एकमेकांजवळ परत यायचो."

रणवीर सिंग-दीपिका पदुकोण

फोटो स्रोत, Getty Images

दीपिका सांगते, "ती त्यावेळी काही लोकांना भेटली होती, पण तिला त्यांच्यात रस नव्हता, ना ती त्यांच्याबद्दल उत्साहित होती. खरं तर ती मानसिकदृष्ट्या रणवीरसोबत वचनबद्ध होती."

2012 मध्ये सुरू झालेलं हे प्रकरण लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचलं.

साखरपुड्यामुळे दीपिकाच्या घरचे नाराज होते

रणवीरने सांगितलं की, त्याने 2015 मध्ये दीपिकाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघांनीही शांतपणे साखरपुडा उरकून घेतला आणि तीन वर्ष सर्वांपासून लपवून ठेवला.

रणवीरने सांगितलं की, त्याने दीपिकाला मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रपोज केलं होतं आणि दीपिकाही त्याला ‘हो’ म्हणाली होती.

तोपर्यंत रणवीर दीपिकाच्या कुटुंबीयांना भेटला नव्हता.

त्यानंतर रणवीर दीपिकाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बेंगळुरूला गेला. जेव्हा संपूर्ण कुटुंब जेवणासाठी एकत्र जमलं तेव्हा दीपिकाने सर्वांना रणवीरने प्रपोज केल्याचं सांगितलं.

हे ऐकून दीपिकाचे कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. नंतर रणवीरला जाणवलं की, दीपिकाची आई शांत राहून यावर आपली नाराजी व्यक्त करत आहे.

घरच्यांना न कळवता साखरपुडा झाल्यामुळे त्यांना थोडा राग आला होता.

दीपिका पदुकोण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दीपिका पदुकोण

सिंधी कुटुंबातील रणवीर सिंगला दीपिका पदुकोणच्या कुटुंबाशी जुळवून घ्यायला वेळ लागला.

शेवटी 14 नोव्हेंबर 2018 रोजी दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. रणवीरच्या मते, एंगेजमेंट करण्याआधी त्याने दीपिकाच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी होती.

आमचं कुटुंब बोअरिंग, रणवीरने त्यात उत्साह आणला

कार्यक्रमात नात्याबद्दल सांगितल्यानंतर दीपिका आणि रणवीरच्या लग्नातील फोटो शेअर करण्यात आले. यात प्रकाश पदुकोण यांचं रणवीरबद्दलचं मत, रणवीर सिंगच्या वडिलांचं मत, दीपिकाचं लग्नाबद्दलचं मत आणि लग्नातील सुंदर प्रसंग दाखविण्यात आले.

दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण म्हणाले की, त्यांचं कुटुंब खूप शांत आणि बोअरिंग आहे. रणवीरने त्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणले. रणवीरने आमच्यात उत्साह निर्माण केला.

दीपिका पदुकोण म्हणते, "मला रणवीर एक अशी व्यक्ती म्हणून आवडतो ज्याला जग ओळखत नाही. तो शांत, हुशार आणि संवेदनशील आहे. रणवीर रडतो देखील आणि आता या लग्नामुळे त्याला पूर्णत्व आलंय."

रणवीर सिंगचे कपडे घालण्याची पद्धत

रणवीर सिंगने अनेक चित्रपटांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलंय. पण त्याच्या पेहरावामुळे प्रेक्षकांमध्ये त्याच्या नावाची चर्चा असते. काही प्रेक्षक त्याच्या कपड्यांना युथ आयकॉन मानतात, तर काही जण त्याला विचित्र म्हणत त्याची खिल्ली उडवतात.

हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर अभिनेत्यांच्या तुलनेत बघायचं तर रणवीर सिंग वेगवेगळ्या पेहरावांमध्ये दिसला आहे. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल करण्यात आलंय.

त्याच्या पोशाखावरील ट्रोलचा संदर्भ देत करण जोहरने रणवीरला त्याच्या बदललेल्या पेहरावाबद्दल प्रश्न केला.

यावर रणवीरने सांगितलं की, तो सर्वांचं मत घेतो पण मनाप्रमाणे वागतो.

रणवीर-दीपिका

फोटो स्रोत, TWITTER/RANVEER SINGH

पण दीपिकाच्या एका वाक्याने त्याला विचार करायला भाग पाडलं कारण लोक त्याच्या कामापेक्षा जास्त त्याच्या कपड्यांवर चर्चा करू लागले होते.

दीपिकाने त्याला विचारलं होतं की, "तू रंगीबेरंगी कपडे घालून लोकांचं लक्ष का वेधून घेतोयस?"

यावर संजय लीला भन्साळी यांनीही चर्चा केली आणि त्यानंतर रणवीरने आपला लूक बदलला.

नैराश्याशी लढा

2014 मध्ये दीपिका पदुकोणने तिच्या नैराश्याचा उल्लेख केला आणि जगाला सांगितलं होतं की, याच्याशी लढण्यासाठी ती मानसोपचार तज्ञांची मदत घेत आहे.

दीपिकाला या विषयावर चर्चा करणं महत्त्वाचं वाटलं कारण लोकांना नैराश्याने गाठलंय हे अनेकदा समजत नाही.

दीपिकाने सांगितलं की, "जवळपास आठ-नऊ महिने ती एकटीच नैराश्याशी झुंज देत होती. एकदा रणवीरसोबत नाश्ता करत असताना अचानक तिला रडू आलं."

रणवीर सिंग-दीपिका पदुकोण

फोटो स्रोत, AFP

त्यानंतर रणवीरने दीपिकाच्या कुटुंबीयांना मुंबईला बोलावलं. त्यानंतर ती बरी होऊ लागली, पण तिचे कुटुंबीय परत जाण्याच्या बेतात असतानाच दीपिकाचं वागणं बदलू लागलं, हे तिच्या आईला समजलं. त्यानंतर ती दीपिकाला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेली.

दीपिका जवळजवळ 10 वर्षांपासून याबद्दल उघडपणे बोलत आहे आणि नैराश्याशी लढण्यासाठी औषध घेत आहे.

तिला वाटतं की, नैराश्यावर चर्चा व्हायला हवी आणि रुग्णांना मदत मिळायला हवी.

दीपिका सांगते, रणवीरला गेल्या काही वर्षांत नैराश्यग्रस्त लोकांचा अंदाज येऊ लागला असून त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे त्याला समजलं आहे.

दीपिकाने रणवीरचं कौतुक करत म्हटलं की, आयुष्याचा साथीदार म्हणून त्याने असं वातावरण तयार केलं आहे की या नात्यात तिला सुरक्षित वाटतं.

रॅपिड फायर

गंभीर चर्चेनंतर, रॅपिड फायर राऊंडने कार्यक्रमाचं वातावरणच बदलून टाकलं. यात रणवीर सिंगने डॉन-3 साठी प्रेक्षकांकडे संधी मागितली.

रणवीर सिंग लवकरच फरहान अख्तरच्या डॉन-3 मध्ये दिसणार आहे. पहिल्या लूकनंतर त्याला खूप ट्रोल करण्यात आलं.

रणवीरला विचारण्यात आलं की, त्याला कोणत्या पुरुष अभिनेत्यासोबत प्रेम त्रिकाण असलेल्या चित्रपटामध्ये काम करायला हरकत नसेल.

यावर त्याने रणबीर कपूरचं नाव घेतलं.

या प्रश्नावर रणवीरने करण जोहरला विचारलं की, तू आम्हा तिघांसोबत संगम बनवणार होतास ना.

यावर करण जोहर म्हणाला, "मी बनवणार आहे. मी अजूनही 'संगम' बनवू शकतो. राज कपूरचा 'संगम' हा प्रेम त्रिकोणावर आधारित चित्रपट आहे."

यादरम्यान जेव्हा रणवीरला दीपिका ऑन-स्क्रीन कोणासोबत छान दिसते असा प्रश्न विचारल्यावर रणवीरने शाहरुख खानचं नाव घेतलं.

या प्रश्नावर दीपिकाने शाहरुख खानसह रणबीर कपूर, इरफान, हृतिक यांचीही नावं घेतली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)