You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रोनाल्डो आता नव्या क्लबसाठी खेळणार, मानधन सुमारे 1775 कोटी रुपये
पोर्तुगाल आणि मँचेस्टर युनायटेड क्लब यांचा चेहरा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबसाठी खेळणार आहे. या क्लबसाठी खेळण्याकरता रोनाल्डोला 17 अब्ज रुपयांपेक्षा जास्त मानधन मिळणार आहे. 2025 पर्यंत रोनाल्डो या क्लबसाठी खेळणार आहे. दोन वर्षांसाठी मिळून रोनाल्डोला 1700 कोटी रुपये मिळतील. एखाद्या फुटबॉलपटूला मिळणारं हे सर्वाधिक मानधन असणार आहे.
रोनाल्डो या क्लबसाठी खेळणार यासंदर्भात चर्चा आधीच सुरू होती. शनिवारी क्लबने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. अल नासर क्लबने केलेल्या ट्वीटमध्ये रोनाल्डो क्लबच्या जर्सीसह दिसत आहे.
रोनाल्डोसह केलेला करार आमचा क्लब, देश, नवीन पिढी, यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. आमचा क्लब रोनाल्डोचं नवं घर असेल.
रोनाल्डोला या क्लबसाठी खेळण्यासाठी 200 दशलक्ष युरो मिळणार आहेत. अल नासरबरोबर रोनाल्डोचा हा करार अडीच वर्षांसाठी असणार आहे. सार्वकालीन महान खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या लिओनेल मेस्सी याला पॅरिस सेंट जर्मेन क्लबकडून 350 कोटी रुपये मिळतात. रोनाल्डोला मिळणारं मानधन हे मेस्सीच्या तुलनेत पाचपट जास्त असणार आहे.
रोनाल्डोने युव्हेंट्स क्लब सोडल्यानंतर मँचेस्टर युनायटेड क्लबसाठी खेळू लागला. स्पेनमधल्या रिअल माद्रिद क्लबचा तो अनेक वर्ष चेहरा होता. 37वर्षीय रोनाल्डोने करारासंदर्भात बोलताना सांगितलं की, नव्या देशात खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. युरोपियन फुटबॉलविश्वात मी अनेक वर्ष खेळलो. आता मी आशिया खंडात खेळेन. अल नासर क्लबने सौदी अरेबिया प्रो लीगचे विजेतेपद 9 वेळा पटकावलं आहे.
फुटबॉल वर्ल्डकपदरम्यान रोनाल्डोची एक मुलाखत वादग्रस्त ठरली होती. यामध्ये रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड क्लबवर जोरदार टीका केली होती.
यंदाच्या वर्षीच रोनाल्डोने सौदी अरेबियातील अल हिलाल क्लबसाठी खेळण्यास नकार दिला होता. अल हिलाल क्लबने रोनाल्डोला 305 मिलिअन युरो इतकं मानधन देण्याची तयारी केली होती पण मँचेस्टर युनायटेडसाठी खेळण्यात समाधानी आहे असं सांगत रोनाल्डोने या कराराला नकार दिला होता.
रोनाल्डोने 346 मॅचमध्ये मँचेस्टर युनायटेडचं प्रतिनिधित्व करताना 145 गोल केले आहेत.
मँचेस्टर युनायटेड आणि रोनाल्डो यांच्यातील कराराचे सात महिने बाकी आहेत. पण रोनाल्डोने तात्काळ मँचेस्टर युनायटेडला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मँचेस्टर युनायटेड आणि रोनाल्डो यांनी सामंजस्य करारानुसार हा निर्णय घेतला.
रोनाल्डोने क्लब सोडल्यानंतर एव्हर्टन संघाच्या चाहत्याच्या हातातील फोन हिसकावल्याप्रकरणी रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.
रोनाल्डो डोमेस्टिक पातळीवर दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करेल. काही दिवसांपूर्वीच कतार इथे झालेल्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत रोनाल्डो सहभागी झाला होता. पाच फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल करण्याचा विक्रम रोनाल्डो स्पर्धेदरम्यान केला.
रोनाल्डोची क्लबची वाटचाल -
- 12 ऑगस्ट 2003- मँचेस्टर युनायटेड- 12.24 मिलिअन युरो
- 6 जुलै 2009- रिअल माद्रिद- 80 मिलिअन युरो
- 10 जुलै 2018- युवेन्ट्स- 99.2मिलिअन युरो
- 31 ऑगस्ट 2021- मँचेस्टर युनायटेड- 12.8 मिलिअन युरो