You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Cristiano Ronaldo याने कोका कोला बाजूला सारलं अन् कंपनीने गमावले 29 हजार कोटी रुपये
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोला या कोल्ड्रिंकच्या बाटल्या बाजूला केल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.
युरो कप 2022 स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेसाठी रोनाल्डो दाखल झाला. रोनाल्डो जिथे बसून बोलणार होता तिथे कोका-कोलाच्या दोन बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या.
कोका कोला युरो चषक स्पर्धेचं प्रायोजक असल्याने मंचावर कंपनीचं उत्पादन ठेवण्यात आलं होतं. रोनाल्डोने बोलता बोलता कोका कोलाच्या दोन्ही बाटल्या बाजूला केल्या. तिथे असलेली पाण्याची बाटली उचलून पाणी असं म्हटलं. एकप्रकारे कोल्ड्रिंक पिण्याऐवजी रोनाल्डाने पाणी पिण्यासाठी चाहत्यांना नकळतपणे प्रोत्साहन दिलं.
यूरो कप 2020 स्पर्धेत 'ग्रुप ऑफ डेथ' अशी ओळख असलेल्या 'एफ' गटात हंगेरीविरोधात होणाऱ्या सामन्याआधी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. रोनाल्डोच्या या कृतीनंतर कोका कोला कंपनीचे शेअर्स 1.6 टक्क्यांनी खाली घसरले आहेत. कोका कोला कंपनीला 4 बिलिअन डॉलर्सचं ( अंदाजे 29,990 कोटी रुपये) नुकसान सहन करावं लागलं आहे, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.
रोनाल्डोच्या या कृतीनंतर ट्विटरवर कोका कोला, कोका कोला रोनाल्डो हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. अनेकांनी रोनाल्डोच्या या बिनधास्त कृतीचं कौतुक केलं. पैशाच्या दबावाखाली न येता निर्भयपणे कोल्ड्रिंकला बाजूला सारण्याचे धाडस दाखवल्याबद्दल अनेकांनी रोनाल्डोची पाठ थोपटली. मात्र त्याचवेळी काहींनी रोनाल्डोच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
कोका कोला कंपनी ही युरो चषक स्पर्धेची प्रायोजक कंपनी आहे. कोणत्याही खेळासाठी, खेळाडूंसाठी, स्पर्धेसाठी प्रायोजक महत्त्वाचे असतात. प्रायोजकांमुळेच स्पर्धा होऊ शकते. अशा वेळी प्रायोजक कंपनीच्या उत्पादनाला बाजूला सारणं कितपत योग्य आहे असा सवाल काहींनी केला आहे.
सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये रोनाल्डोची गणना होते. स्वत:च्या फिटनेसबाबत अतिशय जागरुक असणारा रोनाल्डो कोल्ड्रिंकपासून कटाक्षाने दूर असतो.
रोनाल्डोच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर पोतुर्गालने हंगेरीवर 3-0 असा विजय मिळवला. रोनाल्डोने दोन गोल करत या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)