You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लिओनेल मेस्सी: 36 वर्षांनंतर अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून देणारा 'चॅम्पियन'
अर्जेंटिनासाठी विश्वविजेतेपद मिळवून देण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारत लिओनेल मेस्सीने इतिहास घडवला.
स्वप्नवत अशा वर्ल्डकप फायनल लढतीत निर्धारित वेळेत सामना 2-2 बरोबरीत सुटला. जादा वेळेत 3-3 बरोबरी झाली. मेस्सीने दोन गोल करत आपलं सामर्थ्य सिद्ध केलं होतं. पेनल्टी शूटआऊटमध्येही मेस्सीने गोल केला. मेस्सीला पुरेपूर साथ देत अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-1 अशी बाजी मारली.
हिरव्यागार मैदानाचा गालिचा पसरलेला. पांढऱ्या-निळ्या रंगाची 10 क्रमांकाची जर्सी. डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच तो बॉलवर ताबा मिळवतो. प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू त्याच्याकडून बॉल काढून घेण्यासाठी झटू लागतात. त्याचे पाय जणू हरणाचे होतात. बॉलला घेऊन तो सुसाट निघतो. वाटेत जो येतो त्याला चकवतो. मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गोलपोस्टच्या दिशेने बॉलला नेण्यासाठी त्याचं शरीर सळसळू लागतं. त्याच्या ऊर्जेने प्रतिस्पर्धी भारून जातात.
त्याचं काम, वेगाचं सूत्र समोरच्यांना नामोहरम करतं. बॉलसह दौडत तो गोलकीपरकडे जातो. गोलकीपरच्या मनात काय चाललंय हे त्याला कसं कळतं माहिती नाही पण तो कुठल्या दिशेने झेपावणार याचा त्याचा अंदाज चुकत नाही. गोलकीपर ज्या दिशेने झेपावलाय, त्याच दिशेने बॉल तटवूनही गोल होतोच.
फुटबॉल हा धसमुसळा आणि हिंसक वाटावा असा खेळ पण त्याला खेळताना पाहणं पोएट्री इन मोशन वाटतं.
गोलमोहीम फत्ते केली की एखादं बाळ निरागस हसावं तसं हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटतं. तोवर संघातले सहकारी त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याला कवटाळतात. मैदानातले त्याच्या देशाच्या चाहत्यांसमोर गोलचा सामूहिक आनंद साजरा केला जातो.
काही सेकंदांनंतर तो पुन्हा बॉलला घेऊन दौडू लागतो. त्याची गोलभूक जराही कमी होत नाही. फुटबॉलमध्ये गोल करणं हेच अंतिम उद्दिष्ट असतं.
गोल दागणारा तो पहिला आणि एकमेव नाही, पण तो जेव्हा गोल करतो तेव्हा आपण विस्मयचकित होतो. पुन्हापुन्हा आवडण्यासाठी तो पुन्हापुन्हा निमित्त ठरतो. त्या गोलियाचं नाव आहे लिओनेल मेस्सी.
आपल्या देशाला फुटबॉल वर्ल्डकप जिंकून देण्यापासून तो एक विजय दूर आहे. गेल्या महिन्याभरात कतार इथे सुरू असलेल्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यात मेस्सीने आपल्या जादुई कौशल्याची झलक वारंवार सादर केली आहे.
गोल करणं असो किंवा गोलसाठी सहाय्य असो मेस्सीने आपली ताकद दाखवली आहे. विक्रमी सहावा वर्ल्डकप खेळणाऱ्या मेस्सीला आता प्रतीक्षा आहे विश्वविजेतेपदाची
अर्जेंटिनातील रोसारिओ हे बंदराचं गाव. जोर्ग आणि सेलिआ कुट्टिनी या जोडप्याला चार मुलं. त्यापैकी तिसरा लिओनेल. जोर्ग शहरातल्या स्टील फॅक्टरीत व्यवस्थापक म्हणून काम करायचे तर सेलिआ मॅग्नेट तयार करणाऱ्या वर्कशॉपमध्ये काम करायच्या.
आईवडिलांचं मूळ इटली आणि स्पेनमधलं होतं. लिओनेलचे भाऊही फुटबॉल खेळायचे. लिओनेलही फुटबॉल खेळू लागला.
रोसारिओमधल्या ग्रँडोली क्लबसाठी तो वयाच्या चौथ्या वर्षापासूनच खेळू लागला. तिथे त्याचे बाबाच प्रशिक्षण द्यायचे.
पण लिओनेलला सरावाला आणि खेळायला त्याची आजी घेऊन जायची. लिओनेलला फुटबॉलची गोडी लागण्यात आजीचा मोठा वाटा आहे. क्लबसाठी खेळताना दणादण गोल करण्यासाठी मेस्सीचं नाव लोकप्रिय होऊ लागलं.
दोन वर्षांनंतर मेस्सीने नेवेल्स ओल्ड बॉईज क्लबसाठी खेळायला सुरुवात केली. क्लबच्या युवा संघासाठी खेळताना मेस्सीच्या नावावर 500 गोल होते. आजही हा विक्रम अबाधित आहे.
त्या संघाला ‘द मशीन ऑफ 87’ असं म्हटलं जात असे कारण 1987 मध्ये जन्मलेले खेळाडू प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत असत.
फुटबॉलच्या करिअरला कायमस्वरुपी ग्रहण लागेल अशी समस्या मेस्सी दहा वर्षांचा असताना उदभवली.
मेस्सीला ‘ग्रोथ हार्मोन डेफिशिएन्सी’ असल्याचं स्पष्ट झालं. याचा मुख्य परिणाम म्हणजे उंची मर्यादित राहते.
लिओनेलच्या वडिलांच्या आरोग्य विम्याअंतर्गत ग्रोथ हार्मोनसाठी दोन वर्षांचेच उपचार होणार होते. दर महिन्याला 1000 डॉलर्स इतका या उपचारांचा खर्च होता. नेवेल्स ओल्ड बॉईज क्लबने हा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली, पण नंतर त्यांनी असमर्थतता व्यक्त केली.
हार्मोनवरचा उपचारांचा भाग म्हणून मेस्सीला त्या वयात दररोज पायावर इंजेक्शन घ्यावे लागत असे. लहान वयातल्या लिओनेलसाठी हे वेदनादायी उपचार होते. पण त्याला पर्याय नव्हते.
स्पेनमधल्या बार्सिलोनात वडिलांची नोकरी मिळाल्याने त्यांनी छोट्या लिओनेलसाठी ट्रायलची व्यवस्था केली. लिओनेलचा खेळ बार्सिलोनाचे संचालक चार्ली रेअक्स यांना आवडला.
पण अर्जेंटिनातल्या एका लहान मुलाला करारबद्ध करण्यास क्लब राजी नव्हतं. रेअक्स यांनी क्लबच्या वरिष्ठांना गळ घातली. पोरगेल्या लिओनेलला बार्सिलोनाने करारबद्ध केलं आणि पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.
नॅपकिन पेपरवर हा करार झाला होता. दंतकथा वाटेल असा हा किस्सा खरा आहे. बार्सिलोनाने जोर्ग मेस्सी यांना वार्षिक 40,000 युरो देण्याचं मंजूर केलं.
13व्या वर्षी बार्सिलोनाचा भाग झालेला लिओनेल सुरुवातीला तांत्रिक नियमामुळे तो ए संघासाठी खेळू शकला नाही. नंतर मात्र मेस्सीचा खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.
अर्जेंटिनाच्या या मुलाला स्पेनमधल्या या प्रतिष्ठित क्लबसाठी खेळणं इतकं सोपं गेलं नाही. त्याला कॅटलन भाषा येत नव्हती. संघातले बाकी खेळाडू हट्टकट्टे होते, त्या तुलनेत लिओनेल लहान चणीचा होता.
अनेकदा लिओनेल एकटा पडत असे. त्याच्याकडे बॉल पास केला जात नसे आणि छोट्या चुकीसाठीही त्याला सुनावलं जात असे. हळूहळू चित्र बदलू लागलं.
मेस्सीचा खेळ ज्यांनी पाहिला त्यांचं मत बदलू लागलं. वर्षभरात हार्मोनचे उपचार पूर्ण झाले. बार्सिलोनाच्या युथ टीमचा तो अविभाज्य भाग झाला. तेव्हापासून सलग 18 वर्ष मेस्सी बार्सिलोनाकडेच होता.
बार्सिलोना हे त्याचं कुटुंब झालं. फुटबॉलविश्वात लीग स्पर्धांचं प्रचंड महत्त्व आहे. खेळाडूंची अदलाबदल होते. पण मेस्सीने बार्सिलोनाला आणि बार्सिलोनाने मेस्सीला कधीच सोडलं नाही. मेस्सी आणि बार्सिलोना समानार्थी शब्द झाले.
पोरसवदा लिओनेलचा द लिओनेल मेस्सी होण्यात बार्सिलोनाची भूमिका मोलाची होती. हा ऋणानुबंध टिकला याचं कारण मेस्सीचा खेळ.
युवा संघ, ए संघ, मुख्य संघ या स्थित्यंतरानंतर लिओनेल बार्सिलोनाच्या मुख्य संघाचा आधारस्तंभ झाला. गोल करण्याची हातोटी हे मेस्सीचं गुणवैशिष्ट्य होतंच पण गोलसाठी सहाय्य करण्यातही तो वाकबगार होता.
प्रतिस्पर्ध्यांना बेजार करत वादळी आक्रमण करणं ही मेस्सीची ओळख झाली. सामन्यादरम्यान बॉलवर जास्तीत जास्त वेळ नियंत्रण राखणं, प्रतिस्पर्ध्यांच्या ताब्यात गेलेल्या बॉलला आपल्याकडे आणणं, बॉलला आपल्याच सहकाऱ्यांमध्ये खेळतं ठेवणं, ड्रिबलिंग आणि अर्थातच गोल करणं या सगळ्या आघाड्या मेस्सीने समर्थपणे सांभाळल्या.
पेनल्टी किकवर गोलकीपरला मामा बनवत गोल दागण्यात मेस्सीचं प्राविण्य विलक्षण असं आहे.
स्पेन आणि अर्जेंटिना दोन्ही देशांचं नागरिकत्व असल्याने स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने लिओनेलला स्पेनकडून खेळण्याची विनंती केली. पण मेस्सीने स्पेनऐवजी जन्मभूमी अर्जेंटिनासाठीच खेळण्याचा निर्णय घेतला.
पांढरा टीशर्ट, निळे पट्टे, 10 क्रमांकाची जर्सी ही ओळख अर्जेंटिनाने मेस्सीला मिळवून दिली. मेस्सीनेच अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेचं जेतेपद मिळवून देण्यात मुख्य वाटा उचलला.
फुटबॉल हजारो जण खेळतात पण खेळाला नवा आयाम देण्याचं काम फारच कमी खेळाडू करतात. मेस्सीने फुटबॉलला नजाकत मिळवून दिली. आक्रमक अशा या खेळाला देखणी किनारही असते हे मेस्सीने दाखवलं.
बॉलला लाथाडून गोल करणं हे काहीसं हिंसक वाटू शकतं पण मेस्सीचं पदलालित्य आपल्याला अचंबित करतं. इतक्या वेगवान खेळात शैली जपणं खरंच अवघड आहे पण मेस्सीने तेही जपलं.
मेस्सीने खेळाला समृद्ध केलं आणि कलेकलेने तो श्रीमंत होत गेला. जगातल्या श्रीमंत खेळाडूंमध्ये मेस्सीची गणना होते. बार्सिलोना क्लब आणि अर्जेंटिनाचा राष्ट्रीय संघ ही मेस्सीची कर्मभूमी झाली.
अव्याहतपणे मेस्सी या कर्मभूमीत राबतो आहे. ज्या खेळाला मेस्सीने सर्वस्व दिलं त्या खेळाने मेस्सीच्या आयुष्यात पैसा, प्रसिद्धी आणि पुरस्कारांची पखरण केली.
फुटबॉलविश्वातला बलून डी ओर हा मानाचा पुरस्कार मेस्सीने तब्बल सातवेळा पटकावला आहे.
युरोपियन गोल्डन शूज पुरस्कारावर त्याने सहाव्यांदा नाव कमावलं आहे. बलून डी ओर ड्रीम टीममध्येही त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला.
मेस्सीचा समावेश असलेल्या बार्सिलोना संघाने तब्बल 35 स्पर्धांचं जेतेपद पटकावलं. यामध्ये ला लिगाची स्पर्धेची 10, कोपा डेल रे स्पर्धेची 7 आणि युइएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या 4 जेतेपदांचा समावेश आहे. ला लिगा स्पर्धेत सर्वाधिक गोलांचा (434) विक्रम मेस्सीच्या नावावर आहे.
बार्सिलोना क्लबसाठी खेळताना मेस्सीच्या नावावर 672 गोल आहेत. बार्सिलोना आणि अर्जेंटिना यांच्यासाठी खेळताना मेस्सीने 750 गोल केले आहेत.
अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने तसंच सर्वाधिक गोलांचा विक्रम मेस्सीच्याच नावावर आहे.
अर्जेंटिनाचा कर्णधार या नात्याने मेस्सीने संघाला तीनदा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये स्थान मिळवून दिलं. दोन वर्षांपूर्वी लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.
खेळाच्या माध्यमातून 1 बिलिअन डॉलर एवढी घसघशीत कमाई करण्याचा मानही मेस्सीने मिळवला.
एकाच कालखंडात दोन महान खेळाडू खेळताना पाहण्याची संधी दुर्मीळ असते. गेल्या दोन दशकात मेस्सीच्या बरोबरीने फुटबॉलच्या क्षितिजावर ख्रिस्तियानो रोनाल्डो असाच मोठा होत गेला.
पोर्तुगाल, मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद, युवेन्ट्स या संघाचा रोनाल्डो आधारस्तंभ झाला.
मेस्सी की रोनाल्डो हे आधुनिक फुटबॉलचे दोन अढळतारे झाले.
फुटबॉल चाहत्यांची मेस्सीप्रेमी की रोनाल्डो अशी विभागणी होऊ लागली. एखाद्या मोठ्या ब्रँडने मेस्सीला करारबद्ध केलं तर त्यांचा प्रतिस्पर्धी ब्रँड रोनाल्डोला आपल्याकडे वळवू लागला. हे दोघे मैदानावरचे प्रतिस्पर्धी आहेत, पण या दोघांमुळे व्यावसायिक युद्धाला तोंड फुटलं.
मैदानावरच्या अद्भुत वावरासाठी त्याला the flea हे टोपणनाव देण्यात आलं आहे. उपेक्षित, वंचित वर्गातल्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी मेस्सीने फाऊंडेशनची स्थापना केली आहे.