लिओनेल मेस्सीः पेले आणि मॅराडोनासारखाच अजरामर होणार?

    • Author, वात्सल्य़ राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत यायला वेगवेगळ्या देशांचे संघ अक्षरशः जीवाचं रान करतात.

या फायनल मॅचमध्ये एकूण 32 पैकी फक्त 2 देशच पोहोचू शकतात. या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिनाने स्थान मिळवलंय. आतापर्यंत 6 वेळा ही संधी या देशाला मिळालेली आहे.

यापूर्वी 2014 साली अर्जेंटिनाला फायनलमध्ये स्थान मिळालं होतं.

लिओनेल मेस्सीला 13 डिसेंबरला झालेल्या सेमीफायनलमध्ये ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ने गौरवण्यात आले. 2026 साली अर्जेंटिनात होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये तो खेळेल की नाही यावर कतार वर्ल्ड कपआधीच चर्चा सुरू झाल्या होत्या.

1986 साली अर्जेंटिनाने शेवटचा वर्ल्ड कप जिंकला होता आणि मेस्सीचा जन्म 1987 सालचा आहे.

त्यामुळे अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघात तो असेल की नाही याबद्दल कोणीच काहीही सांगू शकत नाही.

मेस्सी नावाचं क्रीडाप्रेमींच्या मनावरलं गारुड

मेस्सीचा जगभरातल्या क्रीडाप्रेमींवर प्रभाव आहे. त्याची तुलना ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले आणि अर्जेंटिनाचे खेळाडू दिएगो मॅराडोना यांच्याशी केली जाते.

मेस्सीच्या वाट्याला फुटबॉल वर्ल्डकप जिंकणं अध्याप आलेलं नाही. तरीही सगळं जग त्याच्या खेळाच्या प्रेमात आहे.

फुटबॉलमधले माजी खेळाडू आणि पत्रकारांचाही त्यात समावेश आहे. इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू अॅलन शियरर तर मेस्सीमुळेच अर्जेंटिना फायनलमध्ये आहे असं सांगतात.

मेस्सी, मेस्सीच्या घोषणा देणारे आणि अर्जेंटिनाच्या विजयानंतर जगभरात आनंद व्यक्त करणाऱ्या चाहत्यांनाही तसंच वाटतं. 

अर्जेंटिना जिंकल्यावर अॅलन शियरर सांगतात, "आता पूर्वीचा मेस्सी नसला तरी त्याची जादू अजूनही कायम आहे. वेगानं पळणं, ड्रिबलिंग, बॉलबरोबर पळणं आणि डिफेंडर्सना सहज चकवण्याची त्याची खुबी तशीच आहे. "

ते म्हणाले, “अत्यंत चांगले खेळाडूही त्याच्यासमोर सामान्य वाटायला लागतात आणि विशेष म्हणजे त्यांचे संघ तितके वाईट नसतातही.”

विरोधकांनीही मानलं

ब्राझीलला पराभूत करुन सेमीफायनलमध्ये पोहोचणारी क्रोएशिया इतक्या सहजपणे गुडघे टेकेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मात्र या मॅचमध्ये 34 व्या मिनिटाला पेनल्टी घ्यायला आळेल्या मेस्सीने क्रोएशियाचा गोलकिपर डॉमिनिक लिवाकोकविचला चकवून गोल केला. 

क्रोएशियाचे मॅनेजर ज्लात्को दालिचसुद्धा मेस्सीची प्रशंसा करत आहेत असं दिसलं.

वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यावर दालिच म्हणाले, “मेस्सीबद्दल अधिक काही बोलण्याची गरज नाही. तो जगातला सर्वश्रेष्ठ खेळाडू आहे. आजचा दिवस एकदम थरारक होता. ज्या मेस्सीला पाहाण्यासाठी आम्ही वाट पाहात होतो तोच आज दिसला.” 

सेमीफायनलमध्ये मेस्सीचा प्रभाव अगदी शिखरावर पोहोचला होता, अर्थात तो काही या एकाच मॅचचा हिरो नाहीये.

आजवर त्याने केलेल्या चमकदार कामगिरीकडे पाहाता लोकांवर त्याचं इतकं गारुड का आहे ते समजतं. 

  • मेस्सीने आजवर वर्ल्डकपच्या 25 मॅचेस खेळल्या आहेत.
  • मेस्सीने सर्वात जास्त मॅचेस खेळणाऱ्या जर्मन खेळाडू लोथार मॅथायसशी बरोबरी केली आहे. 
  • वर्ल्ड कपमध्ये त्याने 11 गोल केले आहेत, अर्जेंटिनाकडून सर्वांत गोल करणारा तोच आहे. 
  • वर्ल्ड कपच्या चार सामन्यांमध्ये त्याने गोल केले आहेत तसेच सहकारी खेळाडूंना गोल करण्याची संधीही तयार करुन देत आला आहे.
  •  2022मध्ये अर्जेंटिनाकडून झालेल्या 22 गोलमध्ये त्याचं योगदान आहे. त्यात त्याचे 16 गोल आहेत. 
  • या वर्ल्ड कपमध्ये चारवेळा त्याची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड झाली आहे.

विजय मिळाल्यावर मेस्सी काय म्हणाला?

 विजय मिळाल्यावर मेस्सीच्या चेहऱ्यावरही आनंद दिसतो, आनंदाने भारलेल्या शब्दांतून तो दिसतो ही. 

मेस्सी म्हणाला, मला फार आनंद होतोय, मी आपल्या टीमला मदत करू शकतोय हे पाहून आनंद वाटतोय. 

आनंदाचे असे क्षण मेस्सीने आधीही अनुभवले आहेत. 2014 साली त्याची टीम फायनलला पोहोचली होती मात्र तिथं त्यांना जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 

पोर्तुगालसाठी ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि ब्राझीलासाठी नेमार जे करू शकले नाहीत ते अर्जेंटिनासाठी मेस्सी करू शकेल काय? हा प्रश्नही आता विचारला जात आहे. 

कारण आता फायनलमध्ये फ्रान्स आणि मोरक्को यांच्यात जिंकणाऱ्या टीमशी अर्जेंटिनाचा सामना असेल. 

सौदी अरेबियाने पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला 2-1 असं पराभूत केलं होतं, त्या पराभवाचं शल्य मेस्सीच्या मनातही आहे.

मेस्सी सांगतो, “पहिला सामना आमच्यासाठी मोठा धक्का होता. आम्ही सलग 16 सामने जिंकलो होतो. सौदीकडून पराभव होईल असा विचारही केला नव्हता.” या पराभवामुळे टीम अधिकच एकजूट झाली असं मेस्सी सांगतो. 

तो म्हणतो, सगळ्या टीमसाठी ही एक अॅसिड टेस्ट होती. आम्ही किती दमदार आहोत हे सिद्ध केलं आहे. प्रत्येक मॅच फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाची असते हे आम्हाला माहिती होतं. आम्ही पाच सामने जिंकले आहोत. रविवारी होणाऱ्या फायनलमध्येही आम्ही असेच खेळू.

 फायनल परीक्षा

फायनलमध्ये अर्जेंटिनासमोर कोणताही संघ आला तरी त्यांना मेस्सीच्या निश्चयाचा अंदाज असेल. मेस्सीला घेरुन कप जिंकता येईल हे त्यांच्या लक्षात असेल.

 सेमीफायनलमध्ये क्रोएशियानेही असंच काहीस केलं.

या सामन्यात 19 व्या मिनिटाला मेस्सी हॅमस्ट्रिंग चोळताना दिसला. त्याला दुखापत झाल्याच्या शंकेने चाहत्यांच्या मनात काळजीनं घर केलं होतं.

मेस्सी सलग खेळत आहे. त्याच्या वयाचाही खेळावर परिणाम होत असेल. त्याच्यावर गरजेपेक्षा जास्त टीमचा भार असणं समस्याही ठरू शकते.

अर्थात सेमीफानलमध्ये चमकदार कामगिरी करणारा ज्युलियन अल्वारेज हा 22 वर्षिय खेळाडू मेस्सीच्या आकांक्षांना बळ देणारा ठरेल असं दिसतंय. 

अल्वारेजने या सामन्यात दोन गोल केले. तसेच मेस्सी ने केलेल्या गोलमध्येही त्याचं योगदान होतं.

या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाने केलेल्या 12 गोलपैकी 11 गोल या दोघांनी केले आहेत.

आता या दोघांची अंतिम परीक्षा लवकरच आहे.

त्यातून मेस्सीला रोनाल्डो-नेमारसारखी निराशा वाट्याला येते की पेले-मॅराडोनांसारखा दबदबा हे समजेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)