You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
फुटबॉल वर्ल्ड कप 2022 : मोरोक्कोला नमवून फ्रान्स सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनानंतर आता फ्रान्सनेही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे अंतिम सामन्यात हे दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत.
काल (14 डिसेंबर) रात्री उशीरा झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात (सेमीफायनल) सामन्यात फ्रान्सने मोरोक्कोचा 2-0 ने पराभव केला.
अनेक बलाढ्य संघांना मात देत अनपेक्षितरित्या सेमीफायनल फेरी गाठणाऱ्या मोरोक्को संघाचं स्पर्धेतील आव्हान यामुळे संपुष्टात आलं आहे.
या निमित्ताने फ्रान्सने सलग दुसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच 18 डिसेंबर रोजी होईल.
अर्जेंटिना अंतिम फेरीत, मेस्सी, अल्वारेझची अफलातून कामगिरी
फुटबॉल वर्ल्ड कप 2022 च्या पहिल्या उपांत्य (सेमीफायनल) सामन्यात अर्जेंटिनाने क्रोएशियावर विजय मिळवला आहे. या विजयासह अर्जेंटिनाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
या सामन्यात अर्जेंटिनाने क्रोएशियाचा 3-0 अशा फरकाने दणदणीत पराभव केला. कर्णधार लिओनेल मेस्सी आणि तरुण खेळाडू अल्वारेझ हे अर्जेंटिनाच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पहिला सेमीफायनल सामना सुरू होण्यापूर्वी अर्जेंटिनाचा मेस्सी आणि क्रोएशियाचा लुका मॉडरिच यांचा नावांची जोरदार चर्चा होती.
अखेरीस सामना संपला तेव्हा मेस्सीसोबतच अर्जेंटिना संघातील आणखी एक नाव जोडलं गेलं ते म्हणजे ज्युलियन अल्वारेझ. अल्वारेझने या सामन्यात 2 तर मेस्सीने 1 गोल केला.
मेस्सी आणि अल्वारेझ यांच्या या अफलातून कामगिरीमुळे अर्जेंटिनाने एकूण सहाव्यांदा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
अर्जेंटिनाने आतापर्यंत दोनवेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरलं असून त्यांना शेवटचा वर्ल्डकप विजय 36 वर्षांपूर्वी मिळाला होता, हे विशेष.
आता 36 वर्षांनी पुन्हा एकदा अर्जेंटिनासमोर वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी म्हणजेच 18 डिसेंबर रोजी होणार आहे.
या सामन्यात अर्जेंटिनाची लढाई फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होईल.
मेस्सी-अल्वारेझ यांची कमाल
ब्राझीलला हरवून सेमीफायनलमध्ये पोहोचलेल्या क्रोएशिया संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात होती. सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांचा खेळ पाहून क्रोएशिया विशिष्ट रणनितीने मैदानात उतरल्याचं जाणवत होतं. ते सातत्याने चेंडू अर्जेंटिनाच्या गोलपोस्टजवळ ठेवण्यात यशस्वी ठरले होते.
क्रोएशियाच्या खेळाडूंनी मेस्सीच्या आजूबाजूला मजबूत तटबंदीही केली होती. त्यामुळे मेस्सीला आपला खेळ मनमोकळेपणाने दाखवता आला नाही.
दरम्यान, मेस्सी आपल्या स्नायूंच्या दुखापतीने त्रस्त असल्याचंही एका क्षणी वाटलं. यामुळे अर्जेंटिनाचे चाहते चिंताग्रस्त झाले. मात्र, ही चिंता काही क्षणात नाहीशी झाली. काही वेळातच अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी लय पकडली.
एकामागून एक गोल
सामन्याच्या 34व्या मिनिटाला क्रोएशियाचा गोलकिपर डोमिनिक लिव्हाकोव्हिच याने अल्वारेझला रोखण्याचा प्रयत्न करत असताना एक फाऊल केला. यामुळे अर्जेंटिनाला पेनल्टी किक मिळाला.
लिओनेल मेस्सीने ही संधी न गमावता गोल करून अर्जेंटिनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा मेस्सीचा वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवा गोल ठरला.
यानंतर पाच मिनिटांतच अल्वारेझने आणखी एक गोल करून आघाडी 2-0 वर नेली. मध्यांतरापर्यंत अर्जेंटिनाची ही आघाडी कायम होती.
अंतिम फेरी गाठली
सामन्याच्या दुसऱ्या सत्रातही अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी वर्चस्व राखलं. क्रोएशिया संघाला काही संधी मिळाल्या. मात्र ते त्यांचं रुपांतर गोलमध्ये करण्यात अपयशी ठरले.
69 व्या मिनिटाला अल्वारेझने पुन्हा आपली जादू दाखवत एक गोल केला. 22 वर्षीय अल्वारेझचा हा स्पर्धेतील चौथा गोल ठरला. या गोलमुळे अर्जेंटिनाची आघाडी आणखी मजबूत म्हणजेच 3-0 अशी झाली.
यानंतर, क्रोएशियाला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही. त्यामुळे अर्जेंटिनाने 3-0 असा दिमाखदार विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे.
यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत अर्जेंटिनाची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिल्याच सामन्यात सौदी अरेबिया संघाने अर्जेंटिनाला 2-1 ने हरवलं होतं. मात्र या पराभवानंतर खचून न जाता अर्जेंटिनाने पुनरागमन केलं.
1990 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही अर्जेंटिना संघ पहिल्याच सामन्यात कॅमेरून संघाविरुद्ध पराभूत झाला होता. मात्र, या स्पर्धेतही त्यांनी अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)