कतार फुटबॉल वर्ल्ड कप : पेले यांचं नाव अखेर पेले कसं पडलं?

यंदाची फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा कतारमध्ये सुरू आहे. या स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ म्हणून ब्राझीलला ओळखलं जातं.

ब्राझीलने आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे. त्यातही ब्राझीलच्या या यशात फुटबॉलपटू पेले यांचाच सिंहाचा वाटा आहे.

पेले हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे जगभरातील क्रीडाप्रेमी त्यांच्यासाठी प्रार्थना करत असल्याचं दिसून येतं.

पेलेंचा करिष्मा

फुटबॉलचे जादूगार म्हटल्या जाणार्‍या पेले यांचा करिष्मा अतुलनीय असाच आहे. त्याच्यासारखी कामगिरी करणं आजपर्यंत इतर कोणत्याही फुटबॉलपटूला जमलेलं नाही.

 पेले यांच्या उपस्थितीत ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 असे एकूण 3 फुटबॉल विश्वचषक जिंकले होते. 3 फुटबॉल विश्वविजेत्या संघात असणारे पेले हे जगातील एकमेव फुटबॉलपटू आहेत.

 याशिवाय, सर्वांत कमी वयात गोल करण्याचा, हॅट्ट्रिक करण्याचा आणि विश्वचषकात फायनल खेळण्याचा विक्रमही त्यांच्याच नावे आहे. या विक्रमांची नोंद होऊन 60 वर्षे उलटूनसुद्धा हा विक्रम अद्याप पेले यांच्याच नावावर आहे.

पण पेले यांनी ज्या नावाने फुटबॉलमध्ये प्रसिद्धी प्राप्त केली, ते नाव त्यांचं खरं नाव नव्हतं असं तुम्हाला सांगितलं तर?

होय, त्यांच्या कामगिरीप्रमाणेच त्यांच्या नावाची कहाणीही तितकीच रंजक आहे. पेले यांचं पेले हे मूळ नाव तर नव्हतंच, शिवाय त्यांचं ते टोपण नावही नव्हतं.

ब्राझीलमध्ये प्रत्येकालाच टोपण नाव

पेले यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलमधील मिनास गेराईज या छोट्याशा गावात झाला.

त्यांचे वडील क्लब स्तरावरील फुटबॉलपटू आणि आई गृहिणी होती. दोघांनीही आपल्या मुलाचं नाव एडसन असं ठेवलं.

एडसन नाव ठेवण्याचंही एक कारण होतं. या कारणाबाबत पेले यांनी त्यांच्या 'व्हाय सॉकर मॅटर्स' या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलं आहे.

ते लिहितात, "माझा जन्म झाला तेव्हा आमच्या गावात प्रथमच इलेक्ट्रिक बल्ब आला होता. बल्बच्या शोधामुळे माझे आई-वडील भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनी बल्बचे संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांच्या सन्मानार्थ मला नाव दिलं. पण त्यांनी नाव देताना एडिसनचा उच्चार चुकीच्या पद्धतीने केला.”

याच कारणामुळे पेले यांना जन्मावेळी एडसन असं नाव पडलं. पूर्ण नाव होतं, ‘एडसन अरांतेस डो नॅसिमेंटो.’

ब्राझीलमध्ये अशीच नावे लांब आणि रुंद ठेवली जातात. त्यामुळे प्रत्येकाला टोपण नाव ठेवण्याचंही प्रचलन मोठ्या प्रमाणावर आहे.

एडसन म्हणजेच पेले यांना त्यामुळे डिको हे टोपणनाव देण्यात आलं. पेले यांचे आई-वडील, भावंडं किंवा त्यांची मित्रमंडळी त्यांना डिको नावानेच हाक मारत असत.

मुलाला फुटबॉलपटू बनवण्याचे स्वप्न

डिकोचे वडील देखील स्वतः फुटबॉल खेळत होते. परंतु वयाच्या 25 व्या वर्षी दुखापतीमुळे त्यांची फुटबॉल कारकीर्द क्लब पातळीच्या पुढे सरकू शकली नाही. त्यामुळे आपल्या मुलाला फुटबॉलपटू बनवण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं.

पुढे डिको अर्थात पेले यांचं कुटुंब ब्राझीलमधील साओ पावलो प्रांतातील बौरू शहरात वास्तव्याला आले.

लहानपणापासून घरातूनच मिळत असलेल्या प्रशिक्षणामुळे पेले फुटबॉलमध्ये चांगलेच पारंगत झाले होते. त्यामुळे त्यांच्या खेळाची चर्चा सर्वत्र केली जाऊ लागली. मात्र पेले यांच्याकडे खेळासाठीच्या साधनांचा, सोयीसुविधांचा अभाव होता.

पेले कधी फाटलेल्या जुन्या कपड्यांचा बॉल बनवून फुटबॉल खेळायचे तर कधी जवळच्या एका रेल्वे स्टेशनमध्ये उभ्या मालगाडीतील सामान लंपास करून पैसे गोळा करायचे.

वयाच्या 9-10 व्या वर्षी डिको यांनी आपल्या सहकारी खेळाडूंना मागे टाकलं. खेळात पेले यांच्या वेगाची कुणीच बरोबरी करू शकत नसे. त्यामुळे त्यांचं नाव पडलं गॅसोलिना.

पेले त्यावेळी वायूवेगाने धावायचे. त्यामुळेच असं नाव ठेवलं गेलं. गॅसोलिना हे नाव पेले यांना स्वतःलाही खूप आवडलं होतं.

तर मग त्यांना पेले हे नाव कसं पडलं?

याबाबत अनेक प्रकारचे दावे केले जातात. गेलिक भाषेत पेले शब्दाचा अर्थ फुटबॉल असा होतो. त्यामुळेच कदाचित त्यांना हे नाव दिलं गेलं, असं म्हटलं जातं.

मात्र, हा दावा खराही मानता येणार नाही. कारण, गेलिक ही भाषा युरोपातील आयर्लंडच्या जवळपास बोलली जाणारी भाषा आहे.

आयर्लंडपासून हजारो किलोमीटर दूर ब्राझीलमध्ये हा शब्द कसा पोहोचला, हे सांगणारा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

त्याशिवाय, हिब्रू भाषेतही हा शब्द सापडतो. या भाषेत त्याचा अर्थ चमत्कार असा होतो. मात्र जिथे ही भाषा बोलली जायची, त्या पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल परिसरातील हा शब्द तिथे पोहोचणं त्यावेळी शक्य नव्हतं.

अशा स्थितीत डिको किंवा एडसन यांना पेले हे नाव कसं प्राप्त झालं, याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात.

त्यावेळी ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषा प्रचलित होती. या भाषेत पेले या शब्दाचा कोणताही अर्थ उपलब्ध नाही.

पुढे, वयाच्या 15 व्या वर्षी डिको यांनी ब्राझीलच्या सुप्रसिद्ध क्लब सँटेसमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिथे त्यांचं नाव पेले असं ठेवल्याचं आढळून येतं.

पेले यांनी 'व्हाय सॉकर मॅटर्स'मध्ये पेले नावामागची कहाणी सांगितली आहे.

ते म्हणतात, “पेले हे नाव नेमकं कुठून आलं, हे कुणीही सांगू शकत नाही. पण माझे मामा जॉर्ज यांनी याविषयी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवता येईल.”

पेले यांचे मामा जॉर्ज हे त्यांच्यासोबत राहत होते. त्यांच्या नोकरीच्या भरवशावरच पेले यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अनेक वर्षे सुरू होता.

जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, “बौरूच्या स्थानिक फुटबॉल क्लब संघातील गोलरक्षकाचं नाव हे ‘बिले’ असं होतं. बिले हे त्यांच्या उत्कृष्ट गोलकीपिंगमुळे खूप लोकप्रिय होते.

"डिको यांनी या क्लबमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांना काही सामन्यांमध्ये गोलरक्षकाची भूमिका बजावावी लागली. डिको त्यावेळी अत्यंत चांगल्या पद्धतीने बचाव करायचे. तेव्हा लोक म्हणायचे, ‘हा तर दुसरा बिले आहे,’ किंवा ‘बघा, तो स्वतःला बिले समजू लागला आहे."

“हे ‘बिले’ पुढे जाऊन कधी ‘पेले’ बनलं, कुणालाच समजलं नाही. या काळात डिको आपल्या सहकाऱ्यांशी भांडत असत. मला कधी कुणी पेले म्हणतो, कधी कुणी डिको म्हणतं, निदान माझं एक नाव तरी घ्या.

तेव्हापासून मात्र डिको यांना पेले या नावानेच सर्वजण ओळखू लागले. पुढे सँटेस क्लबमध्येही त्यांना याच नावाने अधिकृतपणे ओळखलं जाऊ लागलं.

क्लब सँटेसच्या व्यवस्थापनाने पुढे जाऊन पेले यांच्यासारखा खेळाडू घडवला. पेले यांना ब्रँड बनवण्यात त्यांची ही भूमिका कुणीच नाकारू शकणार नाही.

 याचा संदर्भ देताना पेले यांनी 'व्हाय सॉकर मॅटर्स'मध्ये लिहिलं आहे, “पेले यांना एक वेगळी ओळख प्राप्त झाली होती. सुरुवातीला एडसन हा कुटुंबाच्या आठवणीत रमणारा बौरूचा एक गरीब मुलगा होता. दुसरीकडे, एक पेले होतो, जो किशोरवयातच उगवता तारा होता. त्याच्याकडून भविष्यात एक मोठा खेळाडू बनण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.”

 "एकीकडे एडसन मितभाषी, अंतर्मुख आणि लाजाळू मुलगा होता. तर पेले हजारोंच्या गर्दीत कॅमेऱ्यासमोर सहजतेने हसू शकायचा. एकाच माणसाचे दोन चेहरे. दोन भिन्न वास्तव. एक मला माहीत होता. दुसरा नवीन होता, बदलत होता. तो मलाही घाबरवत होता."

वयाच्या 16 व्या वर्षी क्लब सँटेसने पेले ब्रँड निर्माण केलं. त्याची चमक 60 वर्षांनंतरही कायम आहे. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांना फुटबॉलचा ब्रँड अम्बेसिडर मानलं जातं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)