You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राधिका मर्चंट : अंबानी कुटुंबीयांच्या होणाऱ्या सुनेबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?
“राधिकाला पाहिलं की माझ्या छातीत भूकंप आल्यासारखं होतं. तिला मी सात वर्षांपूर्वी भेटलो. पण मला अजूनही असं वाटतं की मी तिला कालच भेटलोय. राधिका मला भेटली यासाठी मी स्वत:ला 100 टक्के नशीबवान मानतो.”
गुजरातच्या जामनगर येथे राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम पार पडला. तेव्हा अनंत अंबानी यांनी राधिका यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं.
तीन दिवसांच्या या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग, रिहाना अशा अनेक दिग्गज लोकांनी उपस्थिती लावली.
लवकरच त्या भारतातील सर्वांत श्रीमंत कुटुंबाच्या सून होणार आहेत. अनंत अंबानी हे मुकेश अंबानींच्या तीन मुलांमध्ये सर्वांत लहान आहेत.
डिसेंबर 2022मध्ये राधिका या अरंगेत्रम समारंभानंतर प्रकाशझोतात आल्या होत्या.
शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर जो जाहीर कार्यक्रम केला जातो त्याला अरंगेत्रम म्हणतात.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर याठिकाणी हा कार्यक्रम पार पडला तेव्हा. अनेक सेलिब्रिंटींनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
कोण आहेत राधिका?
राधिका या भारतीय फार्मा कंपनी एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.
वीरेन मर्चंट हे एनकोर हेल्थकेअर फार्मा कंपनीचे सीईओ आहेत.
राधिका यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले.
त्यानंतर 2017मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठात राज्यशास्त्र या विषयात पदवी घेतली.
याशिवाय राधिका यांनी Isprava टीममध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले.
सध्या त्या एनकोर हेल्थकेअर या कंपनीच्या संचालक मंडळात आहे.
याशिवाय त्यांनी अनेक वर्षं भरतनाट्यम या भारतीय शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. 2022मध्ये याच कार्यक्रमाचं सादरीकरण झाल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या होत्या.
त्यांच्या LinkedIn प्रोफाईलनुसार, बिझनेस सोडून त्यांना अनेक गोष्टींमध्ये रस आहे. यामध्ये नागरी हक्क, आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य यांचा समावेश आहे.
तसंच आपल्याला प्राण्यांचीही आवड असल्याचं राधिका यांनी म्हटलं आहे.
‘राधिकाला पाहिलं की माझ्या छातीत भूकंप होतो’
डिसेंबर 2022मध्ये अनंत आणि राधिका यांचा राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरात साखरपुडा पार पडला.
पण अनंत आणि राधिका यांची शिक्षण घेत असताना ओळख झाल्याचं सांगितलं जातं.
अनंत अंबानी यांनी सांगितल्याप्रमाणे ते एकमेकांनी सात वर्षांपासून ओळखत आहेत.
ईशा अंबानीच्या लग्नाच्या काळापासून राधिका अंबानी कुटुंबासोबत दिसत आहे.
शनिवारी अनंत अंबानी यांनी राधिकाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं. तेव्हा ते म्हणाले, "राधिकाला पाहिलं की माझ्या छातीत भूकंप आल्यासारखं होतं. तिला मी सात वर्षांपूर्वी भेटलो. पण मला अजूनही असं वाटतं की मी तिला कालच भेटलोय.”
यावर्षी 12 जुलै रोजी राधिका आणि अनंत यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
'जामनगरमधून सुरू झाली आमची लव्ह स्टोरी'
जामनगर येथे झालेल्या प्री-वेडिंग कार्यक्रमात राधिका मर्चंट यांनी अनंत अंबानी यांच्यासोबत आपलं मनोगत व्यक्त केलं.
राधिका म्हणाल्या, "सर्व जगभरातून आलेल्या पाहुण्यांचे मी आभार मानते. आम्हाला या गोष्टीमुळे खूप आनंद होत आहे की तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलात. जेव्हा मी आणि अनंतने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा जामनगर याठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. कारण ही जागा आमच्या हृदयाच्या खूपच जवळ आहे. हे आमचे घर आहे."
राधिका यांनी सांगितल्याप्रमाणे अनंतसोबतची त्यांची लव्ह स्टोरी जामनगरमधून सुरू झाली.
त्या पुढे म्हणाल्या, "मार्च 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात आम्ही जामनगर येथे अडकून पडलो होतो. आमच्या कुटुंबीयांपासून आम्ही अनेक महिने दूर होतो. हा काळ कठीण होता पण एकमेकांच्या सोबतीने आम्ही जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलो."
अनंत यांचं प्राण्यांवर किती प्रेम आहे हे राधिका यांनी शनिवारी आवर्जून सांगितलं. त्यामुळेच मला त्याचा स्वभाव आवडतो असंही राधिका यांनी सांगितलं.
रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी परिसरात अंबानी कुटुंबियांनी 'वनतारा' प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
सुमारे तीन हजार एकरांवर पसरलेला हरित पट्टा आहे. या हरित पट्ट्यात वनतारा प्रकल्पांतर्गत जगभरातील प्राणी आणि वन्यजीवांच्या संवर्धनाचे काम केले जात आहे.
त्याठिकाणी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या देश-विदेशातील जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पुनर्वसनही केले जाते.
हा संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी अनंत अंबानी पार पाडत असल्याचं सांगण्यात येत आहे.