गौतम अदानींनी मुकेश अंबानींना संपत्तीच्या शर्यतीत असं टाकलं मागे

    • Author, अभिनव गोयल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

वर्षं होतं 1978... कॉलेजात शिकणारा एक कोवळा तरूण एकीकडे अभ्यास करत असतानाच मोठी स्वप्नं पाहत होता. एक दिवस कॉलेजचं शिक्षण अचानक मध्येच सोडून दिलं.

आज तोच तरूण आशियातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

ही गोष्ट आहे गौतम अदानींची. 8 फेब्रुवारीपर्यंत त्यांची एकूण संपत्ती होती 88.5 अब्ज डॉलर्स.

ब्लूमबर्गच्या Billionaire Index म्हणजे अब्जाधीशांच्या यादीमध्ये 8 फेब्रुवारीला गौतम अदानींनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असणाऱ्या मुकेश अंबानींना मागे टाकलं.

त्यादिवशी अंबानींची एकूण संपत्ती होती 87.9 अब्ज डॉलर्स. पण याच्या एकाच दिवसानंतर अंबानींनी पुन्हा एकदा आघाडी घेतली.

घरातल्या वाणसामानापासून कोळशांच्या खाणींपर्यंत, रेल्वे, विमानतळ, बंदरांपासून ते ऊर्जा निर्मितीपर्यंतच्या डझनभर व्यवसायांमध्ये गौतम अदानींचं अस्तित्त्व आहे.

गौतम अदानींच्या या यशाचं रहस्य काय? त्यांच्या आयुष्याची आणि व्यवसायाच्या भरभराटीची कहाणी कशी आहे?

मुंबईतल्या हिरे बाजारापासून सुरुवात

1978मध्ये कॉलेज सोडल्यानंतर मुंबईतल्या हिरे बाजारात गौतम अदानींनी नशीब आजमावल्याचं मीडियामध्ये छापून आलेल्या बातम्यांमध्ये म्हटलंय.

1981मध्ये त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना अहमदाबादला बोलवून घेतलं आणि गोष्टी बदलू लागल्या. सामान गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकची एक कंपनी गौतम यांच्या भावाने विकत घेतली होती. पण ही कंपनी चालत नव्हती.

कंपनीला लागणारा कच्चा मालच मिळत नव्हता. या अडचणीचं रूपांतर संधीमध्ये करत अदानींनी कांडला बंदरावर प्लास्टिक ग्रॅन्युअल्स आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला.

1988मध्ये अदानी एंटरप्राईज लिमिटेडची स्थापना झाली. धातू, शेतीमाल आणि कापडासारख्या वस्तूंचा व्यापार ही कंपनी करत असे.

काहीवर्षांतच ही कंपनी आणि अदानी या उद्योगात नावारूपाला आले.

1994मध्ये या कंपनीची मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारात नोंदणी झाली. त्यावेळी या कंपनीच्या एका शेअरची किंमत होती 150 रुपये. पण ही तर फक्त सुरुवात होती.

मुंद्रा बंदर

1995मध्ये अदानी समूहाने मुंद्रा बंदराचं कामकाज पहायला सुरुवात केली. सुमारे 8 हजार हेक्टरमध्ये पसरलेलं अदानींचं मुंद्रा बंदर आज भारतातलं सगळ्यात मोठं खासगी बंदर आहे.

भारतामधल्या एकूण आयातीपैकी जवळपास एक चतुर्थांश मालाची आयात मुंद्रा बंदरात होते.

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासारख्या समुद्रकिनारा असलेल्या 7 राज्यांमधल्या 13 आंतरदेशीय बंदरांमध्ये अदानी समुहाचं अस्तित्त्वं आहे.

यामध्ये कोळशावर चालणारं मोठं वीज निर्मिती केंद्र आणि विशेष आर्थिक क्षेत्रही (SEZ) आहे.

जगातला सर्वाधिक कोळसा उतरवण्याची मुंद्रा बंदराची क्षमता आहे.

स्पेशल इकॉनॉमिक झोन - SEZ खाली या बंदराची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे प्रमोटर कंपनीला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही.

या झोनमध्ये वीज निर्मिती प्रकल्प, खासगी रेल्वे लाईन आणि एक खासगी विमानतळही आहे.

वाणसामानाचा उद्योग

जानेवारी 1999मध्ये अदानी समुहाने विल अॅग्री बिझनेस ग्रूप विल्मरसोबत खाद्यतेलाच्या उद्योगात पाऊल टाकलं.

आजा देशात सर्वाधिक विक्री होणारं फॉर्च्युन खाद्यतेल अदानी - विल्मर कंपनी तयार करते.

फॉर्च्युन तेलासोबतच अदानी समूह कणीक (आटा), तांदूळ, डाळी, साखरेसारख्या डझनभर ग्राहकोपयोगी वस्तूंचीही निर्मिती करतो.

2005मध्ये अदानी समूहाने भारतीय खाद्य महामंडळाच्यासोबत मिळून देशभरात प्रचंड मोठी गोदामं (Silos) म्हणजे कोठारं उभारायला सुरुवात केली. या कोठारांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ साठवले जातात.

सुरुवातीची 20 वर्षं अदानी समुहाने कंत्राटी पद्धतीवर देशातल्या विविधं राज्यांमध्ये ही गोदामं बांधली. या गोदामांपासून भारतातल्या विविध वितरण केंद्रांमध्ये तांदूळ नेणं सोपं व्हावं म्हणून या गोदामांना जोडण्यासाठी अदानी समुहाने खासगी रेल्वे मार्गही तयार केले.

सध्याच्या घडीला अदानी अॅग्री लॉजिस्टिक्स लिमिटेड कंपनी देशातल्या भारतीय खाद्य महामंडळ आणि मध्य प्रदेश सरकारचा तांदूळ त्यांच्या गोदांमामध्ये साठवते. यामध्ये भारतीय खाद्य महामंडळाचा 5.75 लाख मेट्रिक टन तर मध्य प्रदेश सरकारचा 3 लाख मेट्रिक टन तांदूळ आहे.

कोळशाची खाण

फॉर्च्युन इंडिया मासिकातल्या माहितीनुसार अदानींनी ऑस्ट्रेलियातल्या लिंक एनर्जीकडून साल 2010मध्ये 12 हजार 147 कोटींना कोळशाची खाण विकत घेतली.

गेली बेस्ट क्वीन आयलंडमधल्या या खाणी 7.8 अब्ज टनांचं खनिज आहे आणि दरवर्षी इथे 6 कोटी टन कोळशाची निर्मिती होऊ शकते.

इंडोनेशियामध्ये तेल, गॅस आणि कोळशासारखी नैसर्गिक संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे. पण पायाभूत सुविधांच्या अभावामुळे या संपत्तीचा फायदा या देशाला घेता येत नव्हता.

इंडोनेशियाच्या दक्षिण सुमात्रामधून कोळसा काढण्यासाठी दीड अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा अदानी समूहाने 2010मध्ये केली होती. यासाठी दक्षिण सुमात्रामध्ये तयार करण्यात येणाऱ्या रेल्वे योजनेसाठी तिथल्या क्षेत्रातल्या सरकारसोबतच्या करारावर सह्यादेखील करण्यात आल्या.

अदानी समूह 5 कोटी टनांची क्षमता असणारं कोळसा हाताळणारं बंदर अदानी समूह तयार करणार असून दक्षिण सुमात्राच्या बेटांतल्या खाणींमधून कोळसा काढण्यासाठी 250 किलोमीटरची रेल्वे लाईन टाकण्यात येणार असल्याचं तेव्हा इंडोनेशिया गुंतवणूक मंडळाने सांगितलं होतं.

कारभाराचा विस्तार

2002मध्ये अदानी साम्राज्याची उलाढाल होती 76.5 कोटी डॉलर्स. 2014मध्ये ही उलाढाल वाढून 10 अब्ज डॉलर्स झाली.

2015 सालानंतर अदानी समुहाने सैन्यासाठी संरक्षण उपकरणांचा पुरवठा करण्याचं कामही सुरू केलं. काही काळानंतर त्यांनी नैसर्गिक वायू क्षेत्रातील उद्योगाचा विस्तार केला. 2017मध्ये अदानी समुहाने सोलर पीव्ही पॅनल बनवायला सुरुवात केली.

2019मध्ये अदानी समुहाने विमानतळ क्षेत्रात प्रवेश केला. अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरमसारख्या 6 विमानतळांचं आधुनिकीकरण आणि कामकाज यांची जबाबदारी अदानी समुहाकडे आहे. 50 वर्षं अदानी समूह या विमानतळांचं कामकाज, व्यवस्थापन आणि विकासकाम पाहील.

गौतम अदानींच्या नेतृत्त्वाखालच्या अदानी समुहाकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची 74 टक्के भागीदारी आहे. दिल्लीनंतरचा मुंबई हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे.

अदानी आणि वाद

भारतातलं सर्वात मोठं बंदर असणाऱ्या मुंद्रासाठी मोठी जमीन कवडीमोलानं अदानी समुहाला दिल्याचा गुजरात सरकारवर आरोप करण्यात आला आहे.

अदानींचा भाऊ राजेश अदानी यांना कथितरित्या कस्टम ड्यूटी चुकवल्या प्रकरणी 2010 फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. ते अदानी समुहाचे कार्यकारी संचालक आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या फेअरफॅक्स मीडियाने 2014मध्ये इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट केला होता. गुजरातमध्ये तयार होत असलेल्या सुखसोयीयुक्त गृहप्रकल्पामध्ये काम करणाऱ्या 6 हजार मजुरांच्या बिकट परिस्थितीविषयी फेअरफॅक्स मीडियाने बातमी दिली होती.

या मजूरांच्या कथित परिस्थितीसाठी अदानी समुहाला या रिपोर्टमध्ये जबाबदार ठरवण्यात आलं होतं.

अदानी समुहासाठी काम करणाऱ्या कंत्राटदारांनी नेमलेले हे मजूर होते. पण आपण कोणत्याही कायद्याचा भंग केला नसल्याचं अदानी समुहाचं म्हणणं होतं.

वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या आयात किंमती कथितरित्या सुमारे 1 अब्ज डॉलर्सनी वाढवून दाखवल्याबद्दल मे 2014मध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी अदानींना नोटीस दिली होती.

उत्तर ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड राज्यामध्ये कारमायकल कोळसा खाण आहे. इथे अदानींच्या कंपनीला कोळसा उत्खननाची परवानगी मिळालेली आहे. यावरून अदानी समुहाला मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं होतं.

मोदींसोबतचे संबंध

साधारण 2002 सालापासूनच गौतम अदानींची आता पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदींशी जवळीक होती. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.

गुजरातमध्ये जातीय दंगली झाल्यानंतर परिस्थितीवर काबू करण्यासाठी जलद कारवाई न केल्याबद्दल व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) शी संबंधित उद्योगपतींनी मोदींवर टीकाही केली होती.

गुंतवणूकदारांना गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी मोदी प्रयत्नशील असताना गौतम अदानींनी गुजरातमधल्या इतर उद्योगपतींना मोदींच्या बाजूने वळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी CII ला समांतर असणारी एक संघटना उभी करण्याची धमकीही दिली होती.

अमेरिकेच्या व्हॉर्टन स्कूल ऑफ बिझनेसमच्या एका कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदींना मार्च 2013मध्ये मुख्य वक्ते म्हणून बोलवण्यात आलं होतं. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केल्यानंतर मुख्य वक्ता म्हणून नरेंद्र मोदींचं नाव हटवण्यात आलं.

तेव्हा या कार्यक्रमाच्या मुख्य प्रायोजकांपैकी एक असणाऱ्या अदानी समुहाने देऊ केलेली आर्थिक मदत मागे घेतली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)