You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शाहरुख, सलमान, अमिताभ आणि मुकेश अंबानींच्या शेजारी कोण राहतं माहितीये?
- Author, विकास त्रिवेदी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
शाहरुखचा बंगला मन्नत.. बंगल्याच्या बाहेर मोठी गर्दी जमलीय. शाहरुखचे चाहते 'शाहरुख, शाहरुख' असं ओरडतायत. पोलिस हातात काठ्या घेऊन गर्दी पांगवतायत.
अगदी काही क्षणापूर्वी शाहरुख मन्नतच्या बाहेर उंचावर तयार केलेल्या कठड्यावर उभा राहून चाहत्यांच्या दिशेने हातवारे करत होता. त्याच्या चाहत्यांना त्याची एक झलक मिळावी म्हणून तो तिथं उभा होता.
शाहरुख कधी त्याची आयकॉनिक पोज देताना दिसतोय तर कधी लोकांच्या दिशेने फ्लाईंग किस देतोय, तर कधी सलाम करून चाहत्यांना तुम्ही खास असल्याची जाणीव करून देतोय.
रस्त्यावर गर्दी जमलीय, फोनचे कॅमेरे त्याची एक झलक टिपण्याचा प्रयत्न करतायत, सगळीकडे चाहत्यांचा गोंगाट सुरू आहे.
काही मिनिटांनंतर शाहरुख चाहत्यांचा निरोप घेतो आणि मुंबईच्या बँड स्टँडवर स्थित शुभ्र अशा मन्नत बंगल्यात परततो.
आता शाहरुखची पाठमोरा होतो. त्याच्या पाठीमागे त्याचे चाहते आहेत. चाहत्यांच्या पाठीमागे शाहरुखचे शेजारी राहतात.. ही गोष्ट त्याच लोकांची आहे, ज्यांच्याकडे सगळ्यांनी पाठ फिरवली आहे.
शाहरुखचं घर बघण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येत असतात.
शाहरुख असो वा हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार असो, या कलाकारांची घरं बघणं म्हणजे चाहत्यांच्या दृष्टीने मोठी पर्वणी असते. पण या कलाकारांची घरं बघायला आलेल्यांच्या नजरा शेजारी असणाऱ्या घरांकडे वळतात का?
मुंबईच्या प्रत्येक भागात चित्रपटसृष्टीतील कोणता ना कोणता कलाकार राहतोच आहे.
मग तो अमिताभ बच्चन यांचा जुहूमधील बंगला असो की सांताक्रूझच्या अरुंद गल्ल्यांमध्ये राहणारे 500-1000 रुपयांत काम करणारे कलाकार असोत.
या लेखात आपण अशाच काही कलाकारांच्या घराभोवतीचं वातावरण आणि शेजारपाजार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जसं की शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि मुकेश अंबानी.
मन्नत : शाहरुख खानचे शेजारी
ईद असो शाहरुखचा वाढदिवस असो वा चित्रपटाचं प्रदर्शन असो... बहुतेक प्रसंगी संध्याकाळी चार वाजता तर कधी कधी रात्रीत देखील शाहरुखच्या घरासमोर चाहत्यांची गर्दी जमते.
शाहरुखच्या घरासमोर गणेश नगर नावाची वस्ती आहे. झगमगाटापासून दूर असलेल्या वस्तीत बरेच लोक त्यांचं आयुष्य अंधारात व्यतीत करतायत.
या वस्तीत जवळपास 100 घरं आहेत. ही घरं बघाल तर, इथल्या एका घरात जेमतेम गाडी पार्क करता येईल एवढी जागा आहे.
इथल्या गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की दोन व्यक्तींना एकत्र चालता देखील येणार नाही.
याच गल्ल्यांमध्ये राहणारे काही लोक शाहरुखचं घर पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना खाद्यपदार्थ विकून आपला उदरनिर्वाह करतात.
मन्नतच्या गेटसमोर समुद्र पसरलेला दिसतो. या गेटजवळच पार्वती नावाची 10 ते 12 वर्षांची मुलगी मक्याची कणसं विकताना दिसते.
तिच्या जवळच असणाऱ्या व्हीलचेअरवर तिचा भाऊ प्रेम बसलाय. प्रेमला ना चालता येतं ना बोलता येतं.
जेव्हा सूर्य मावळतीकडे झुकतो, चोहो बाजूंनी अंधार दाटून येतो तेव्हा व्हीलचेअरवर बसलेला प्रेम त्याच्या बहिणीला पार्वतीला मोबाईलच्या टॉर्चचा उजेड करून देतो.
पार्वतीचं कुटुंब 20-22 वर्षांपूर्वी झारखंडमधून मुंबईत आलं आणि गणेशनगरमध्ये स्थायिक झालं.
पार्वती जवळच्या शाळेत जाते आणि परतल्यावर मन्नतच्या बाहेर आलेल्या चाहत्यांना कणसं विकते.
प्रेमला काही विचारलं तर तो हसऱ्या डोळ्यांनी हातवारे करून उत्तर देतो. प्रेम जन्मापासूनच दिव्यांग होता का?
पार्वतीच्या आई नीरजा देवी सांगतात, "दिवाळी होती, म्हणून मी घरासाठी रंग खरेदी करायला गेले होते. मागून दोन्ही भाऊ येत होते. तितक्यात मागून एका चारचाकी गाडीने दोन्ही भावांना धडक दिली, यात एकाचा हात गेला, तर दुसऱ्याचा पाय गेला आणि कमरेपासूनचा भाग लुळा पडला. आज या गोष्टीला तीन वर्ष झाली. आज तो व्हीलचेअरवर बसलाय."
शाहरुख खान जर तुमचा आवाज ऐकत असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल? यावर पार्वतीच्या आई म्हणतात, "थोडीफार मदत मिळाली तर बरं होईल. मुलं घेऊन इकडे तिकडे फिरावं लागतंय, दुकान सुरू केलं तर लोकं त्रास देतात."
शाहरुख जिथे राहतो, त्याच रांगेत अनेक श्रीमंत लोक, मोठंमोठे कलाकार राहतात.
मी पार्वतीला विचारलं की, सणवार असला की, शाहरुखच्या घरातून काही दिलं जातं का? यावर पार्वती प्रश्नार्थक नजरेने पाहते.
इतक्यात पार्वतीची आई मन्नतच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या बंगल्याकडे बोट दाखवून सांगते की, "अपघात झाला तेव्हा या बंगल्यात राहणाऱ्या गृहस्थांनी खूप मदत केली होती."
महागडे हॉटेल आणि रूमचं भाडं
एका बाजूला उंचच उंच इमारती आणि दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी.
कोळी मच्छिमार, वारली लोकांची आता मुंबई झपाट्याने दुसऱ्यांची होऊ लागलीय
तुम्हाला मुंबईच्या बहुतांश ठिकाणी समाजातील समानतेचा, बरोबरीचा फज्जा उडालेला दिसून येईल.
मोठमोठ्या कलाकारांची घरं यापेक्षा काही वेगळी नाहीत. प्रियांका चोप्राने घेतलेला नवा महागडा बंगला असो की शाहरुख, सलमानचं घर असो.
एका हाऊसिंग प्रॉपर्टी वेबसाईटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शाहरुखच्या बंगल्याची किंमत सुमारे 200 कोटी रुपये असेल.
या रस्त्यावरून सरळ पुढं गेलं की एक महागडं पंचतारांकित हॉटेल दिसेल. इथे एका रात्रीच्या मुक्कामासाठी 25 हजार मोजावे लागतात.
रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घराचं भाडं सुमारे दोन लाख असेल, त्याच ठिकाणी तीन कुटुंबं महिन्याला चार ते पाच हजार रुपये भाडं देऊन राहतात.
काही लोकांची स्वतःचीही घरं आहेत. शाहरुख खान मुंबईत आलाही नव्हता तेव्हापासून हे लोक या ठिकाणी राहत आहेत.
1986 साली छत्तीसगडमधील दंतेवाडा सोडून गंगा आपल्या पतीसोबत गणेश नगरमध्ये राहायला आली.
गंगा सिंह सांगतात, "हा पूर्वी एका पारशाचा बंगला होता. सगळीकडून उघडा असलेला हा बंगला वारसा होता. त्यानंतर शाहरुखने हा बंगला खरेदी केला आणि या बंगल्याची दुरुस्ती सुरू सुरू झाली. बंगला दुरुस्तीचं काम ज्यांनी घेतलं होतं ते लोक आमच्याकडे जेवायला यायचे. तेव्हा आमचं वडा पाव, राईस प्लेटचं हॉटेल होतं."
गंगा सिंह सांगतात की "दर महिन्याला पैशांचा चेक यायचा. चेकवर शाहरुखची सही असायची. त्या पैशातून मी हे घर बांधले. पूर्वी प्लास्टिकच्या पिशवीत राहत होते. हे घर शाहरुखची देण आहे. शाहरुखने आपला बंगला बांधला, त्याचवेळी आम्ही देखील आमचं छोटसं घर बांधून घेतलं."
गणेश नगरमध्ये राहणारा इब्राहिम सांगतो, "समोर मन्नत आहे, त्याच्यापुढे गॅलेक्सी आहे. 24 तास लोकांची येजा सुरू असते. आमचं पण घर सी फेसिंग आहे, पण पाणी वाढलं की आम्हाला पाण्याचाही सामना करावा लागतो. सगळं सामान हलवावं लागतं, दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. पण ही जागा इतकी मोकळी आहे की, इथं राहणारा माणूस पुन्हा दुसरीकडे कधी जाणारच नाही. इथे राहताना श्रीमंत झाल्याची अनुभूती येते. इथे जे जाणवतं ते इमारतीत राहणाऱ्या लोकांनाही जाणवणार नाही."
शाहरुखचे शेजारी असल्याचा आनंद
शाहरुख शेजारी राहतोय म्हटल्यावर नातेवाईकांना पत्ता सांगणं सोपं झालंय का?
गणेशनगरातील बहुतांश रहिवासी यावर आपला होकार देतात आणि हा प्रश्न विचारल्यावर लगेच आनंदून जातात.
गणेश नगरमध्ये राहणारी प्रेमलता खोलीबाहेर बसलेल्या मुलीचे आयब्रो करते आहे.
प्रेमलता सांगते, "मी मोठ्या लोकांकडे काम करते. शिवाय मी आता मेकअप करायला ही शिकले आहे. कोणी विचारलं कुठे राहतेस तर शाहरुखच्या शेजारी राहते हे सांगायला बरं वाटतं. मला त्याचे चित्रपटही आवडतात."
मोहम्मद इब्राहिम सांगतो, मला चित्रपट फारसे आवडत नाहीत. पण जर आवडीचा विषय सांगायचं झालंच तर शाहरुख, सलमान मला आवडतात. ते आमचे आम्ही त्यांचे शेजारी आहेत. शेजाऱ्यांचं कर्तव्य असतं.
सलमान खान अनेकदा बँड स्टँडवर सायकल चालवताना दिसतो. शाहरुख खानचीही अशी भेट कधी होते का?
यावर इब्राहिम सांगू लागला की, "मतदानाच्या वेळी माझी मावशी शाहरुख आणि अबरामला भेटली होती. आंटीने अबरामला जबराम म्हटलं होतं, तेव्हा शाहरुखने अबरामला सांगितलं की बेटा, आंटीला सांग माझं नाव जबराम नाही, अबराम आहे."
गंगा सिंह सांगतात, "माझ्या मुलाचं गेल्या महिन्यात लग्न झालं. मी गावी गेले होते तेव्हा सांगितलं की शाहरुख खान माझा शेजारी आहे. लोक विचारतात की त्यांनी शाहरुखला पाहिलंय का? यावर आम्ही हो असंच उत्तर देतो. आम्हाला खूप अभिमान वाटतो."
असं म्हणतात की, अडचणीच्या वेळी सर्वात आधी शेजारीच धावून येतो. बँडस्टँडच्या बाबतीतही असंच आहे का?
गंगा सांगतात, "दोन वर्ष कोरोना असताना श्रीमंत लोकांनी खूप मदत केली. शाहरुख, सलमान स्वत: येऊन देणगी देत नाहीत. देणगी देताना हे लोक नाव सांगत नाहीत, काय सांगावं? यांनीच गाजावाजा न करता मदत पाठवून दिली असेल."
आर्यन खान तुरुंगात असतानाचा काळ शाहरुखसाठी खूप कठीण होता. त्यानंतर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकला असं म्हणत त्याला ट्रोलही करण्यात आलं.
गंगा सिंह सांगतात, "आर्यन सोबत जे झालं ते चुकीचं झालं. माझ्या घरीही माझा तरुण मुलगा आहे. शाहरुख स्वतः मोठं प्रस्थ असून देखील त्याला सोडलं नाही. जर एखाद्या गरिबाचा मुलगा अशा प्रकरणात अडकला तर तो सुटणार कसा? आर्यन सुटावा म्हणून मी आमच्या कुलदेवीला प्रार्थना केली होती. शाहरुख दिल्लीचा आहे. त्यामुळे तो भारतीयच झाला. पण लोक किती चुकीचं बोलतात. इथे आम्ही हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करत नाही. प्रत्येकजण एकमेकांसोबत प्रेमाने वागतो."
सलमान खानची गॅलेक्सी अपार्टमेंट
शाहरुखच्या घराजवळून काही अंतर चालून पुढे आलं की वाटेतच सलमानचं घर लागतं.
सलमान खानचं घर बाहेरून इतकं साधं दिसतं की अनेकवेळा तिथे येणाऱ्या चाहत्यांना विश्वासच बसत नाही की हे सलमान खानचं घर आहे.
अशा प्रसंगी सलमान खानचा एक डायलॉग सांगावासा वाटतो, ''मेरे बारे में इतना मत सोचना, मैं दिल में आता हूँ, समझ में नहीं.''
सलमान खानच्या घरासमोर सुमारे 10-12 कच्ची-पक्की घरं आहेत.
इथे राहणारे लोक कॅथलिक आहेत. घरांच्या बाहेर क्रॉस लावलेले आहेत. जवळच सेंट अँड्र्यू चर्च आहे.
तिथल्याच एका घराच्या बाल्कनीत वृद्ध स्त्री बसली होती.
जवळपास 80 वर्षांच्या या वृद्धेचं नाव रोझी आहे. त्या त्यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसल्या होत्या. या बाल्कनीतून सलमानच्या घराची खिडकी दिसते.
रोझी सांगतात, "सलमान लहान होता तेव्हा घरी यायचा. आता तो मोठा हिरो झालाय, त्यामुळे येत नाही. ही गॅलेक्सी इमारत खूप वर्षांनी बांधलीय. आम्ही त्याआधी पासून इथे राहतोय. आमच्या डोळ्यासमोरच या इमारतीचं बांधकाम झालं. यापूर्वी सलमानचे आई-वडील देखील भेटायचे."
सलमान खानचे शेजारी असल्याचा आनंद
सलमानच्या घराजवळ राहताय म्हटल्यावर आयुष्य थोडं वेगळं आहे का?
मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देणारे सॅबी इथेच भेटले.
सॅबी सांगतात, "मी इथे माझ्या मावशीच्या घरी राहतो. वाढदिवस असो ईद असो, इथे इतके लोक येतात की घराबाहेर पडणं अवघड होऊन बसतं."
तुम्हाला जेव्हा कोणी कुठे राहतोस असं विचारतं तेव्हा तुम्ही काय सांगता?
यावर सॅबी सांगतात, "सलमान सायकलवर वगैरे बाहेर पडतो तेव्हा दिसतो. आधी सलमान लहान होता तेव्हा इथल्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहायचा. पण आता तो मोठा स्टार झाला आहे, त्यामुळे भेट होत नाही. जेव्हा मी कोणाला सांगतो की, मी सलमानच्या घराजवळ राहतो तेव्हा भारी वाटतं."
सॅबीला आमिर खान आवडतो.
सॅबी सांगतात, "इथे कोणाला मदतीची गरज असेल तर ते मदत मागायला जातात. सलमानचं स्वतःचं फाऊंडेशन आहे, त्यामुळे लोक जात असतात."
सलमान शेजारी राहतो असं सांगता का?
रोझी यावर सांगतात, "आम्ही चर्चजवळ राहतो असं सांगतो. सलमान खूप नंतरच्या काळात इथे राहायला आलाय."
सेंट अँड्र्यू चर्चजवळ राहणाऱ्या या कॅथलिक लोकांना अनोळखी लोकांना पाहण्याची इतकी सवय झाली आहे की ते कोणाकडे ढुंकूनही बघत नाहीत.
सलमानच्या घरासमोर नारळ पाणी विकणारे गृहस्थ वैतागून म्हणतात, "दिवसभर लोक फक्त एकच प्रश्न विचारत असतात."
अमिताभ बच्चन यांचं घर आणि आजूबाजूचा परिसर
शेजाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं तर अमिताभ बच्चन अलिप्त असल्याचं दिसतं. अमिताभ यांच्या जुहूच्या जलसा या बंगल्याशेजारी बँक आहे. जलसाच्या भिंतींवर चित्रे आहेत.
बंगल्यासमोर पाण्याने भरलेलं एक मातीचं मडकं ठेवलं आहे. चाहते आले की, त्या मडक्यातील पाणी पितानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात. आणि सांगतात की, आम्ही अमिताभ यांच्या घरचं पाणी पितोय.
अमिताभ यांच्या बंगल्याबाहेरची गर्दीही 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन' प्रमाणे पाहायला मिळते.
तसं बघायला गेलं जशी गर्दी सलमान, शाहरुखच्या घराबाहेर दिसते तशी गर्दी अमिताभ यांच्या घराबाहेर दिसत नाही. यामागे अनेक कारणं आहेत.
अमिताभ यांचे जुहूमध्ये आणखी दोन बंगले आहेत. जनक आणि प्रतीक्षा.
सर्वात जास्त गर्दी जलसाच्या समोर होते. दर रविवारी संध्याकाळी अमिताभ आपल्या चाहत्यांसमोर येतात. त्यांना अभिवादन करून माघारी फिरतात.
याशिवाय जलसाच्या बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या बऱ्याच गाड्या थांबतात. लोक सुरक्षा रक्षकांना प्रश्न विचारतात, त्यांचे फोटो क्लिक करून घेतात आणि भांड्यातील पाणी पिऊन आपली तहान भागवतात.
अमिताभ यांच्या घराबाहेरील काही सुरक्षा रक्षकांशी बोलणं झालं.
ते हसत हसत सांगतात, "लोक येतात आणि म्हणतात, बच्चन साहेब झोपतात? समोर दिसणाऱ्या खोलीत झोपतात? की दुसरीकडे कुठे? आता मी जोरात ओरडलो तर बच्चन साहेबांपर्यंत माझा आवाज पोहोचेल का? संपूर्ण दिवस असले प्रश्न विचारून लोक भंडावून सोडतात."
कलाकारांच्या घराजवळ प्रश्न विचारण्याची सोय आहे, पण इतर ठिकाणी ही सोय आहे का?
अंबानींचं घर अँटिलिया
वाहनांची गर्दी आणि सिनेतारकांनी खचाखच भरलेल्या वांद्र्याहून हाजी अली मार्गे दक्षिण मुंबईकडे जाताना समुद्रमार्ग पार करावा लागतो. यासाठी सी लिंक आहे.
अशीच एक उंच इमारत गेल्या दशकभरापासून सतत चर्चेत आहे. जगातील बहुतांश श्रीमंत लोकांची या इमारतीत ये-जा असते.
या इमारतीत जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा कलाकार मंडळी हसत हसत पंगती वाढताना दिसतात.
हे घर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं आहे.
हे 27 मजली घर फक्त सहा लोकांसाठी बांधलं होतं. नव्याने वाढलेल्या सदस्यांचा विचार करता, आताही जास्तीत जास्त आठ लोक या घरात राहतात.
मात्र, शेकडो, हजारो लोकांसाठी हे घर त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे.
एखादा सामान्य माणसाने थांबून क्षणभर अँटिलियाकडे पाहिलं जरी तरी सुरक्षा रक्षक लगेचच येऊन त्याला हटकतात.
अँटिलियाबाहेर प्रचंड सुरक्षा तैनात असते.
इथे फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. काही प्रसंगी पापाराझी कॅमेरे गेट उघडल्यावर घरातून बाहेर पडणाऱ्या काही मोठ्या माणसांचे फोटो टिपताना दिसतात.
मुकेश अंबानींच्या घराभोवती इतर अनेक श्रीमंत लोक राहतात. सामान्य लोक या भागात नोकरीला येतील पण घर घेऊन राहणं त्यांच्या ऐपतीत नाही.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंबानींच्या गेटला लागूनच तीन छोटी दुकानं आहेत. एक दुकान भंगाराचं तर दुसरी दोन दुकानं खाण्यापिण्याची.
अंबानींच्या गेटला लागूनच असलेल्या या दुकानाचं नाव आहे लकी स्टोअर.
जगातील एका अत्यंत श्रीमंत व्यक्तीच्या घराबाहेर दुकान असणं नशीबवान असल्यासारखं आहे.
अंबानी आणि या दुकानाचे मालक नशीबवान असण्याव्यतिरिक्त त्या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे हे दोघेही गुजराती आहेत. लकी स्टोअरचे मालक गुजरातच्या कच्छचे आहेत.
या तिन्ही दुकानात काम करणारे लोक बोलायला टाळाटाळ करतात.
यातला एक व्यक्ती म्हणाला, अहो साहेब, इथे धंदा करायला आलोय. तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या शेठजीना विचारा.
अंबानींच्या घराजवळ असणाऱ्या भंगाराच्या दुकानात शेकडो वर्तमानपत्रे ठेवलेली आहेत.
हे अँटिलियाबाहेरचं वातावरण आहे. पण अँटिलियाच्या आत जाणाऱ्या लोकांना काय दिसतं?
मुकेश अंबानींच्या एका पार्टीत हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज आसामी गेली होती.
ते सांगतात, "आम्ही चित्रपटसृष्टीतले लोक कार्यक्रमांना जातो खरं आम्हाला तिथे एका कोपऱ्यात बसवलेलं असतं. आत गेल्यावर कोणी जास्त विचारत नाही. आत इतरही श्रीमंत लोक बसलेले असतात. तुम्ही विचार करा या लोकांकडे किती पैसा आहे, आम्ही त्यांच्यासमोर काहीच नाही."
हे अशा एका व्यक्तीने सांगितलंय ज्याचे चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत.
जिथे सलमान खान अंबानींच्या मागे उभा राहून बॅक डान्सर म्हणून काम करतो, तिथे करोडपती असणाऱ्या कलाकाराने असा विचार करणं साहजिक आहे.
मुंबई
एकेकाळी सात बेटांवर वसलेलं हे शहर, जिथे पाऊस पडायला सुरुवात झाली की पाऊस थांबतच नाही.
या शहरात येणाऱ्या हजारो-लाखो लोकांचे स्वप्नाळू डोळे आकाशाकडे आशेने पाहत असतात. अशात मुसळधार पाऊस पडला तर इथल्या लोकांना नवल वाटत नाही.
या शहरात असणारी प्रत्येक तिसरी गाडी महागड्या व्हीआयपी क्रमांकाची कार आहे.
मुंबईबाहेरचे लोक जेव्हा या काळ्या काचा लावलेल्या गाड्या पाहतात तेव्हा त्यांना वाटतं की, नक्कीच आत कोणीतरी मोठा स्टार असेल.
पण इथे इतके श्रीमंत लोक राहतात की, मुंबईची भूमीही अगणित ताऱ्यांनी भरलेल्या आकाशासारखी वाटते.
सी लिंक पार करताना टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो, "मुंबईचे मूळ लोकच सोन्याच्या साखळ्या घालतात आणि निवांत झोपतात. पण बाहेरून येणारे लोक इथे पैसे कमावतात, उंचच उंच इमारती बांधून निघून जातात."
टॅक्सी ड्रायव्हरने ज्या बाहेरून येणाऱ्या लोकांचा मुद्दा सांगितला तो मुंबईचा वेगळाच ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक प्रश्न आहे.
पण अंबानींसारखे काही बाहेरचे लोकही आहेत, ज्यांच्या घराबाहेर कोणी थांबू शकत नाही.
तर काही शाहरुखसारखे आहेत, ज्याच्या घराबाहेर समुद्रही काही क्षण थांबून लाटांचा आवाज करून निघून जातो.
या लाटा जेव्हा जोराने किनाऱ्याला आपटू लागतात तेव्हा पार्वती सारख्या लोकांना त्यांची दुकानं काढावी लागतात.
ईदच्या दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला बँड स्टँडवर जोरदार लाटा येत होत्या. पार्वती तिच्या आईसोबत उभी होती.
लाटांची भीती तर होतीच, पण नंतर बी.एम.सी. च्या भीतीने त्यांनी दुकान हलवलं.
पार्वतीचा भाऊ प्रेम घरी होता. पार्वतीला भावाबद्दल विचारल्यावर ती म्हणते, इतक्या पाण्यात तो कसा येईल?
बहिणीला केवळ मोबाईलचा टॉर्च दाखवू शकणारा प्रेम लाटांच्या भीतीने आलाच नाही.
प्रेम आणि पार्वतीच्या दुसऱ्या भावाला देखील त्याच एक हात कायमचा गमवावा लागलाय.
पार्वतीच्या या दोन्ही भावांची गोष्ट ऐकताना समोरच असलेल्या मन्नतकडे लक्ष जातं. इथे शाहरुख खानने आपले दोन्ही हात फैलावताच, चाहत्यांची गर्दी शाहरुखकडे बघून ओरडू लागते...
''बड़े-बड़े शहरों में... ऐसी छोटी बातें होती रहती हैं...''