'पठाण' मधला 'तो' डायलॉग आणि या मसालापटात लपलेला संदेश

    • Author, नम्रता जोशी
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

शाहरुख खान पठाण रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. पाचव्या दिवशी या सिनेमाने कमाईचा विक्रम केला आहे.

यशराज फिल्म्सने दिलेल्या माहितीनुसार पठाणने पहिल्या पाच दिवसांत जगभरातून 543 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सिनेमाने भारतात 335 कोटी रुपये कमावले आहेत, तर भारताबाहेर 208 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भारतात पठाणने पहिल्याच दिवशी 57 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

प्रसिद्ध ट्रेड अनालिस्ट कोमल नाहटा यांनी तेव्हा ट्वीट केलं होतं, “ही कोणत्याही हिंदी सिनेमासाठी सर्वांत मोठी ओपनिंग आहे.”

काही लोकांनी चित्रपटाच्या कथानकावर टीका केली आहे. ते अनावश्यक आणि हास्यास्पद असल्याचं वर्णन त्यांनी केलं आहे. तरी काहीजण म्हणत आहेत की, शाहरुख खान पडद्यावर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, हा चित्रपट जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला, जी बॉलीवूड चित्रपटासाठी सर्वात मोठी ओपनिंग आहे.

त्यांनी ट्वीट केलं की, "कोणत्याही हिंदी चित्रपटाची ही सर्वात मोठी ओपनिंग आहे. ती देखील जेव्हा सुट्टी नव्हती आणि चित्रपटाचा सिक्वेल नव्हता."

पठाणमधील तो डायलॉग...

सिद्धार्थ आनंदच्या या नव्या अॅक्शनपटातील एका सीनमध्ये पाकिस्तानची आयएसआय एजंट रुबिना मोहसिन (दीपिका पदुकोण) आणि भारताचा रॉ एजंट पठाण (शाहरुख खान) आमनेसामने येतात. यात रुबिना पठाणला विचारते की, तू मुस्लीम आहेस का?

यावर पठाण म्हणतो की, त्याला हे माहिती नाहीये कारण तो अनाथ आहे. त्याचे आईवडील त्याला लहानपणी एका थिएटरच्या बाहेर सोडून गेले होते.

पठाणने दिलेलं उत्तर भले ही फिल्मी असेल पण यातून मोठा मतितार्थ सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

तसं बघायला गेलं तर बॉक्स ऑफिसवर धंदा करणं हाच बॉलिवूड चित्रपटांचा पहिला धर्म असतो. त्यामुळे धर्मनिरपेक्ष आणि सर्जनशील संस्थांचा विषय आला की यात भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा देखील समावेश करावा लागतो.

आता मागच्या काही वर्षात समाजात ज्या पद्धतीने बदल झालेत त्यांचा परिणाम चित्रपटांवरही झाल्याचं दिसून आलंय. थोडक्यात चित्रपटांचंही ध्रुवीकरण झालंय.

चित्रपटांना द्वेषपूर्ण मोहिमा असतील, बॉयकॉट ट्रेंड असतील या सर्वांचा सामना करावा लागतोय. या दुष्ट फेऱ्यातून पठाण सुद्धा सुटलेला नाहीये. चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वादंग माजला होता.

तब्बल चार वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन

पठाण चित्रपटातला हा छोटासा सीन आपल्याला फिल्म इंडस्ट्रीत असणाऱ्या सर्वधर्म समभावाची आठवण करून देतो आणि दस्तुरखुद्द रोमान्सचा किंग शाहरुख खान हे अपील करताना दिसून येतोय.

2022 मध्ये रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्रमधील कॅमिओ अपियरन्स सोडला तर शाहरुख खान मागच्या चार वर्षांपासून चित्रपटांपासून लांबच होता. 2018 मध्ये आनंद एल. रायच्या झिरो या चित्रपटात तो शेवटचं दिसला होता.

जसं आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात वेळ ही महत्वाची गोष्ट असते अगदी त्याचपद्धतीने चित्रपटांसाठी सुद्धा वेळ महत्त्वाचा असतो. मीडिया, फॅन्स आणि इंडस्ट्री असे सगळेच पठाण चित्रपटाला मेन्स्ट्रीम मुव्ही मानतात. शिवाय चित्रपट पैसा वसूल आहे की नाही हे देखील पाहिलं जातं.

पण सध्याच्या गढूळ झालेल्या राजकीय वातावरणात पठाण चित्रपट प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करतोय.

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स सीरिज मधला चौथा चित्रपट म्हणजे पठाण. यापूर्वी 2012 मध्ये टायगर, 2017 मध्ये टायगर जिंदा है आणि 2019 मध्ये वॉर हे चित्रपट आले होते.

तसं तर पठाणांमध्ये सुद्धा विशेष असं काही नाहीये. एका ओळीत चित्रपटाची कथा सांगायची झाल्यास, रॉचा एक एजंट जिम (जॉन अब्राहम) नावाच्या दुसर्‍या एका एजंटशी लढतोय. हा जिम कॉर्पोरेट क्षेत्रातली एक अतिरेकी संघटना चालवतो आणि रक्तबीज या जैविक हत्याराच्या मदतीने भारत संपवून टाकण्याच्या प्रयत्नात असतो.

दमदार डायलॉग आणि पटकथा

भलेही चित्रपटाची कथा एका ओळीत संपत असेल पण चित्रपटाची लेंथ बघता यात बरेच फ्लॅशबॅक सीन आहेत. भूतकाळ आणि वर्तमान जोडणारी दृश्य बघताना माणूस जागीच खिळतो. चित्रपट बघून क्लायमॅक्सचा अंदाज बांधता येऊ शकतो.

डोकं आणि तर्क या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवल्या तर पठाण हा एक मसालापट आहे. याला मनोरंजनाचा मस्त तडका मारण्यात आलाय. काही सीन्स खूपच सुंदर आहेत सोबत अॅक्शन सीक्वेन्सचा भरपूर मारा करण्यात आलाय.

श्रीधर राघवन यांनी लिहिलेली पटकथा तेवढीच दमदार आहे. तर अब्बास टायरवाला यांनी लिहिलेले डायलॉग शाहरुख खानच्या संवेदनशीलतेला आणि मिश्किलपणाला मॅच करणारे आहेत.

तसं तर हल्ली बॉलीवूडमध्ये देशभक्तीच्या नरेटिव्हचा ट्रेंड आहे. हाच ट्रेंड शाहरुखच्या पठाणने कसा पकडलाय हे बघणं तेवढंच रोमांचक आहे. आणि विशेष म्हणजे शाहरुखने यात स्वतःची छाप सोडलीय. अंधराष्ट्रवाद वेगळा करून त्याने या भूमिकेला मानवी स्पर्श दिलाय.

चित्रपटाची पटकथा भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 च्या वादग्रस्त मुद्द्याभोवती फिरते. यात असं दाखवलंय की, पाकिस्तान भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो ज्यातून समस्या निर्माण होत असतात. प्रादेशिक वर्चस्वाच्या या खेळात भारताचा वरचष्मा असल्याचं पठाणमध्ये दाखवण्यात आलंय.

दमदार खलनायक

भलेही पाकिस्तानमधील काही लोक भारताचे शत्रू असतील पण या चित्रपटातून शाहरुखने हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय की, मूठभर वाईट लोक संपूर्ण देश, सरकार आणि जनता बदलू शकत नाहीत.

अफगाणिस्तानातील एका मिशन दरम्यान पठाणचे तिथल्याच एका कुटुंबाशी स्नेहबंध तयार होतात. त्यामुळे तो दरवर्षी त्यांच्यासोबत ईद साजरी करत असतो. पण कितीही केलं तरी शाहरुख एक इंडियन एजंट असतो शिवाय जगातील सर्वात मोठ्या सॉफ्ट पॉवरचा देखील एजंट असतो.

शाहरुखने आजवर केलेल्या भूमिकांमुळे त्याची इमेज रोमँटिक हिरो किंवा रोमान्सचा बादशाह अशी झालीय. पण पठाणमध्येही त्याने मर्दानी भूमिका केलीय. निधड्या छातीने उन्हात वावरताना त्याने दाखवलेल्या बॉडी मसल्समुळे तो अॅक्शन हिरो वाटतो.

पठाणमधला खलनायक लता मंगेशकरांच्या 'ऐ मेरे वतन के लोगों' या गाण्यावर शिट्टी वाजवताना दिसतोय. चित्रपटाच्या हिरोपेक्षा अधिक दमदार अशी या व्हिलनची भूमिका दिसते. त्याच्या रागाला योग्य संदर्भ, तर्कसंगती आणि सहानुभूतीचा रंग देण्यात आलाय.

जॉन अब्राहमने देखील ही भूमिका लीलया पेलली आहे. आणि विशेष म्हणजे या जगात जरी पुरुषांचा बोलबाला असला तरी महिलांसाठी हे धोकादायक ठिकाण नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आलाय.

दीपिका पदुकोणची एन्ट्री बिकिनी घातलेल्या गाण्यातून होते, मात्र नंतर ती घातक अशा स्त्रीच्या भूमिकेत दिसते.

दुसरीकडे डिंपल कपाडिया पठाणच्या बॉसच्या भूमिकेत दिसते.

अॅक्शन सीन्सचा भडिमार

चित्रपटात मोठ्या प्रमाणावर अॅक्शन सीन्स आहेत. जमीन, हवा, पाणी आणि बर्फ अशा चारही ठिकाणांवर स्टंट सीक्वेन्स शूट करण्यात आलेत. या सीन्समध्ये कार, हेलिकॉप्टर आणि बाईकचा पुरेपूर वापर करण्यात आलाय. स्पेन, यूएई, तुर्कस्तान, रशिया, इटली, फ्रान्स, अफगाणिस्तान आणि सायबेरिया अशा अनेक लोकेशन्सवर हे सीन शूट करण्यात आलेत.

पठाण फक्त पोलादी ताकदीचाच नाही तर तो विनम्र आणि हुशार देखील आहे. हा एजंट रडणारा, प्रेमात पडणारा, मिश्किल असा आहे.

पठाणमध्ये लावरिस, खुदा गवाह आणि करण अर्जुन यांची झलकही पाहायला मिळते. मॉस्कोमधील चोरीचा सीन, 1993 मध्ये आलेल्या डर चित्रपटातील 'तू है मेरी किरण' शी जोडलाय. हे थोडं विचित्र वाटतं.

चित्रपटात रशियात चित्रित करण्यात आलेला ट्रेनचा जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्‍वेन्स आहे. तर सायबेरियातील बॅकाल लेकवर एक जबरदस्त फायटिंग सीन शूट केलाय.

शाहरुख आणि दीपिका हे दोघेही वेगवेगळ्या देशांचे एजंट असल्यामुळे त्यांच्यात भांडण सुरू होतं. हे भांडण सुद्धा मजेदार पद्धतीने दाखवण्यात आलंय. यात आयएसआयला डेटिंग वेबसाइट म्हटलंय.

चित्रपटात किंत्सुगी या जपानी कलेचा संदर्भ देण्यात आलाय. यात सोनं आणि तुटलेल्या मातीच्या भांड्याचे तुकडे जोडून सुंदर कलाकृती तयार केली जाऊ शकते हे सांगण्यात आलंय.

चित्रपटात या कलेचा संदर्भ नवीन संघटन तयार करण्यासाठी देण्यात आलाय. निवृत्त आणि जखमी एजंट्सना एकत्र करू

जॉइंट ऑपरेशन्स आणि कव्हर्ट रिसर्च नावाचं नवीन युनिट तयार करण्यात येतं. पण इथे शाहरुख बॉलीवूडबद्दल बोलतोय असं वाटतं.

याव्यतिरिक्त पठाणमध्ये दोन मेगा सीन्स आहेत. यातल्या एका सिनमध्ये सुपरस्टारचा कॅमिओ आहे. यातला एक सिन इंटर्व्हल नंतर आहे. एक था टायगर नंतर फॅशन ट्रेंड मध्ये आलेला स्कार्फ या ऍक्शन सीनमध्ये दिसतो.

चित्रपट संपताना एक विनोदी सीन आहे. त्यानंतर 'जब झूमे जो पठाण' हे गाणं सुरू होऊन स्क्रीनवर क्रेडिट्स यायला लागतात. या चित्रपटात शाहरुख स्वतःची खिल्ली उडवतोय आणि प्रेक्षकांचही त्याला भरभरून प्रेम मिळतंय.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)