‘विधवाही नाही, गंगा-भागिरथीही नाही; मी एकल स्त्री आहे’

    • Author, संध्या नरे-पवार
    • Role, ज्येष्ठ पत्रकार

“पतिराज एकदा स्वर्गवासी झाले म्हणजे या बाईसाहेबांचे हाल कुत्रे खात नाही. त्यांच्या कपाळी काय मग? माथ्यावरील एकदा सर्व कुरळे केसांवर नापिकाचा हात फिरला म्हणजे तुमचे डोळे थंड झाले. सर्व अलंकार गेले. सुंदरपण गेले. सारांश तिला सर्व तर्‍हेने उघडी करुन देशोधडी केल्याप्रमाणे नागवून सांदीचे खापर करावयाचे. तिला कोठे लग्नकार्यात, समारंभात, जेथे काही सौभाग्यकारक असेल तेथे जाण्याची बंदी. का? तर तिचा नवरा मेला.”

हे एवढे सारे प्रश्न तब्बल 140 वर्षांपूर्वी 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी आपल्या ‘स्त्रीपुरुषतुलना’ या ग्रंथांत उपस्थित केले आहेत.

आज 2023 मध्ये या प्रश्नांची आठवण येण्याची खरे तर काही आवश्यकता असायला नको. पण महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास खात्याने जाहीर केलेल्या नव्या प्रस्तावाने हे प्रश्न पुन्हा एकदा समकालीन झाले आहेत.

‘महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी विधवा ऐवजी गंगा भागिरथी (गं भा) हा शब्द वापरण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करुन चर्चा करावी’, असे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

इथे चर्चेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे, तेव्हा चर्चा करायला हवी.

पत्रकातल्या या विधानाचे दोन भाग होतात. ‘महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी’ हा पहिला भाग आहे. या विधानाचा अर्थ असा होतो की – आज महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळत नाहीय, तेव्हा तो मिळवून दिला पाहिजे.

आजही महाराष्ट्रातल्या विधवा महिलांना सन्मान मिळत नाहिय, हे शासनाचे आकलन योग्य असले तरी ते अपुरे आहे.

कारण त्यामागच्या कारणपरंपरांचा विचार करणे शासनाने टाळलेले आहे आणि एक वरकरणी सोपा पण वास्तवअर्थात अधिक अवमानकारक असा उपाय शोधला आहे.

140 वर्षांपूर्वी विधवा महिलांची स्थिती किती दयनीय होती, याचे वर्णन करताना ताराबाई शिंदे लिहितात, “ती अभागी, करंट्या कपाळाची. तिचे तोंड पाहू नये. अपशकून होतो. मग ही सारी विशेषणे तिला.’

या स्थितीत आजही बदल झालेला नाही. आजही विधवा स्त्रीला अशुभ मानली जाते, लग्न कार्यांमध्ये तिने कुठेतरी कोपऱ्यात बसायचे असते. हळदीकुंकू, ओटीभरण अशा समारंभात मूठभर अपवाद वगळता आजही तिला बोलावत नाहीत.

पतीच्या मृत्यूनंतर तिच्या हातातल्या बांगड्या फोडणं, कपाळीचं कुंकू पुसणं असे विधी केले जातात.

गेल्याच वर्षी पतीच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या या अशा विधींविरुद्ध प्रमोद झिंजाडे यांनी आवाज उठवला होता, त्यावेळी या विधींना रोखणारा आदेश तत्कालिन सरकारने काढला होता.

स्कंदपुराणात काय लिहिलंय?

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विधवा स्त्रियांच्या दुःस्थितीबाबत, त्यांच्या पुनर्विवाहाच्या हक्काबाबत मोठी चळवळ झाली होती. पण तरी आजही विधवा स्त्रियांच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

कारण विधवा स्त्रियांबाबत धर्मशास्त्रांनी जे काही म्हणून ठेवलं आहे, त्याचा पगडा समाजावर आजही कायम आहे.

स्कंदपुराण सांगतं, ‘अमंगल अशा सर्व गोष्टींपेक्षा विधवा ही अधिक अमंगल असते. विधवेचे दर्शन झाले तर कधीही कार्यसिद्धी होत नाही.एक आई सोडली तर बाकीच्या सर्व विधवा अमंगल होत. प्राज्ञाने एखाद्या सापाप्रमाणे त्यांचा आशिर्वाद देखील वर्ज्य मानावा. विधवेने कसे जगावे हे सांगताना स्कंदपुराण काही नियम घालून देते.

ते असे-

विधवेने दररोज एकदाच जेवण करावे.

विधवा स्त्री पलंगावर झोपली तर ती पतीला अधःपतित करते.

तिने कधीही अंगाला उटणे लावू नये.

कधीही सुगंधी द्रव्यांचा उपयोग करु नये.

रंगवलेले वस्त्र नेसू नये.’

स्कंदपुराणाने केशवपनालाही शास्त्राधार देत सांगितले होते की, ‘विधवेचा केशबंध पतीला बंधकारक होतो म्हणून विधवेने नेहमी केशवपन करावे. विधवा स्त्रीच्या संदर्भात मनुस्मृती सांगते, ‘विधवेने फुले, फळे वा मुळे खाऊन शरीर क्षीण करावे परंतु दुसऱ्या पुरुषाचे नावही घेऊ नये.’

धर्मशास्त्रांनी जे काही सांगितले ते शास्त्री भटजींच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचले आणि त्याच माध्यमातून पिढ्यान् पिढ्या संक्रमित होत आले.

मनुस्मृती आणि ‘वैधव्य’

आज मूळ धर्मशास्त्र कोणी वाचत नसले (बहुजनांना ते वाचण्याचा अधिकार कधी नव्हताच) तरी धर्मशास्त्रांनी सांगितलेले निर्बंध समाजात रुजून बसले आहेत. विधवांच्या संदर्भात धर्मशास्त्रांनी जे काही सांगितले ते मुळात उच्च जातीची वंशशुद्धी कायम ठेवण्यासाठी सांगितले.

विधवांनी अनार्षक रहावे आणि दुसऱ्या पुरुषाचा विचारही करु नये हे मुख्य सूत्र यामागे होते.

मनुस्मृती सांगते, ‘पतीचा मृत्यू झाल्यवर स्त्रीने दुसऱ्या पुरुषाचे नावही घेऊ नये. साध्वी स्त्रियांना कधीच दुसरा पती असू शकत नाही, विवाहाचे मंत्र फक्त कन्यांनाच उद्देशून असतात.’

धर्मशास्त्रांच्या या विधवाविवाह विरोधामुळेच एकोणिसाव्या शतकापर्यंत ब्राह्मणजातसमुहांमध्ये बालविधवांची संख्या मोठी होती. पण तत्कालिन समाजसुधारकांनी याविरोधात आवाज उठवला.

महात्मा जोतिबा फुलेंसारख्या कर्त्या समाजक्रांतिकारकाने ब्राह्मण विधवांचे केशवपन थांबविण्यासाठी न्हावी बांधवांचा संप घडवून आणला. समाजसुधारणेच्या या वारशामुळे आज उच्चजातीयांमधल्या विधवा स्त्रियांच्या स्थितीत लक्षणीय बदल झालेला आहे.

पण बहुजनांमधील, मधल्या मागास जातींमधील विधवा स्त्रियांची स्थिती आजही दयनीय आहे. तिथे आजही रुढी परंपरांचा पगडा कायम आहे.

गावागावांमध्ये आज अनेक तरुण मुली विधवा म्हणून सामाजिक-सांस्कृतिकद्दष्ट्या एक खडतर आयुष्य जगत आहेत. जोतिबांचा वारसा बहुजन समाज विसरत चालला आहे. त्याऐवजी शास्त्रांना मारलेली मिठी अधिक घट्ट होत आहे.

चि. सौ. कां. शब्दांमागची व्यवस्था

विधवा स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यमत्वाची दुसरी बाजू विवाहित स्त्रियांना मिळणाऱ्या प्रतिष्ठेत आहे. पती असलेली विवाहित स्त्री ही कायम सौभाग्यवती असते, सुवासिनी असते. पती असलेली सौभाग्यवती स्त्री अर्थातच शुभ मानली जाते. वेगवेगळ्या समारंभांमध्ये कोणाला ओवाळायचे असेल तर तो मान सुवासिनींना दिला जातो.

लग्नसमारंभांमधले अनेक विधी फक्त विवाहित स्त्रियांच्या म्हणजे सुवासिनींच्या हातानेच केले जातात. लग्न होण्याआधी स्त्री कुमारी असते, लग्नाच्या वेळी ती चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी होते, तर लग्नानंतर सौभाग्यवती होते.

सौभाग्याच्या या परिघाबाहेर ज्या स्त्रिया असतात त्या दुर्भाग्यवती असतात. मग ती विधवा असेल, घटस्फोटिता असेल किंवा परित्यक्ता असेल. ही पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने स्त्रियांवर लादलेली जातव्यवस्था आहे.

वेगवेगळ्या नात्यातला पुरुष स्त्रीच्या आयुष्यात आहे की नाही, यावरुन समाजातील तिचे स्थान ठरते. यात जी विवाहिता आहे आणि जिला पुत्र आहे ती पहिल्या स्थानावर असते. जी विवाहिता आहे पण जिला मुलगा नसून केवळ मुलीच आहेत ती दुसऱ्या स्थानावर असते. जी विवाहिता आहे पण जिला मुलं नाहीत ती तिसऱ्या स्थानावर असते.

मुलगे असलेल्या परित्यक्ता, घटस्फोटिता स्त्रिया तिला समकक्ष असतात पण विधवा स्त्री मात्र अशुभ म्हणून या सगळ्यांपेक्षा खालच्या दर्जाची मानली जाते. त्यातही जिला मुली आहेत अशा विधवा स्त्रीचे स्थान मुलगा असलेल्या विधवा स्त्रीपेक्षा अधिक दयनीय असते.

श्रीमती आणि आयुष्यमती हे पर्याय

पुरुष एकटा असो वा दुकटा, विवाहित असो वा विधुर, तो कायम सन्मान्य असतो. पण स्त्रीचा मान मात्र तिच्या आयुष्यात नवरा आणि मुलगा नावाचा पुरुष आहे की नाही, यावर अवलंबून असतो. नवरा असेल तर ती सौभाग्यवती आणि नवरा नसेल तर ती दुर्भाग्यवती, असे ही पुरुषसत्ताक समाजव्यवस्था मानते.

स्त्रीवर पतिनिष्ठा व योनिशुचिता लादल्याखेरीज पुरुषसत्ताक, पितृवंशीय समाजव्यवस्था आणि या व्यवस्थेतील उच्चजातवर्णियांची वंशशुद्धी टिकू शकत नाही. ही पतिनिष्ठा काटेकोरपणे अंमलात यावी यासाठी पातिव्रत्याचे गारुड स्त्रीवर घालण्यात आले.

सत्यवान सावित्रीच्या, सतींच्या कथेतून पातिव्रत्याला वलयांकित करण्यात आले, पुण्यवान ठरवले गेले. वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक रचितांमधून पती ही एकमेव सौभाग्यकांक्षा स्त्रीसाठी ठरवण्यात आली.

म्हणजेच इथे मूळ पेच हा संबंधित स्त्री सौभाग्यवती आहे का नाही, हा आहे. विवाहित स्त्री सौभाग्यवती आहे म्हणून मग विधवा दुर्भाग्यवती होते.

विवाहित स्त्रीला सौभाग्यवती मानणे आपण सामाजिक-सांस्कृतिकद्दष्ट्या थांबवले आणि व्यक्तिगतद्द्ष्ट्या प्रत्येक स्त्रीने सौभाग्यकांक्षिणी होणे नाकारले तर मग केवळ विवाहित आणि एकल स्त्री एवढेच फरक उरतील. कोणाच्याच नावामागे कोणतीच उपाधी लावण्याची गरज असणार नाही. सौभाग्यवतीही नाही आणि गंगा भागिरथीही नाही.

कोणाला काही उपाधी लावण्याची व्यक्तिगत इच्छा असेल तर श्रीमती, आयुष्यमती लावावे. स्त्रीचा वैवाहिक दर्जा स्पष्ट करणारी कोणतीही उपाधी स्त्रीच्या नावामागे लावण्याची गरज नाही.

1882 मध्ये लिहिलेल्या ‘स्त्रीपुरुषतुलना’ या ग्रंथावर आपले नाव लिहिताना ‘ताराबाई शिंदे’ एवढेच ताराबाईंनी लिहिले आहे. आपल्या नावापुढे कोणतीही उपाधी लावलेली नाही. सावित्रीबाई फुलेंची जी पत्रे आज उपलब्ध आहेत त्याखाली ‘सावित्री जोतिबा’ अशी सही आहे. त्याआधी सौ. अशी उपाधी लावलेली नाही.

मुळात सौभाग्यकांक्षिणी, सौभाग्यवती हे संस्कृतप्रचूर शब्द बहुजन जातींमध्ये वापरात नव्हते. छपाईतंत्राच्या आगमनानंतर विवाहपत्रिकांच्या माध्यमातून ते बहुजन जातींमध्ये पसरले असावेत.

‘गंगा भागिरथी’ कशासाठी?

विधवा स्त्रियांसाठी वापरली जाणारी गंगा भागिरथी ही उपाधीही लग्नपत्रिकांमध्ये विशेषत्वाने पाहायला मिळते. आज ती सरकारला शासकीय कामकाजांच्या रकान्यांमध्ये वापरावी, असे वाटत आहे. फक्त ज्यांचा पती मृत पावलेला आहे, अशा स्त्रियांसाठी असलेल्या मदत योजनेमध्ये स्त्रीचा वैवाहिक दर्जाची माहिती हवी असेल तर तिथे स्पष्टपणे एकल स्त्री असे म्हणावे आणि कंसात (पती मृत) असे शब्द घालावेत. जे वास्तव आहे ते लिहावे. त्याला हीनही करु नये आणि एखादी परंपरागत उपाधी लावून पवित्र करण्याचा प्रयत्नही करु नये.

धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात पा.वा.काणे लिहितात,'गंगा-यमुना यांच्या संगमस्थळी प्रयाग इथे करावयाच्या निरनिराळ्या कृत्यांपैकी वपन हे एक असून शिष्ट आणि विद्वान लोक असे वपन आवश्यक असल्याचे मान्य करतात.’

त्रिस्थली सेतु या ग्रंथात असे सांगितले आहे की, ‘प्रयागाच्या एकाच तीर्थयात्रेत विधीपूर्वक वपन एकदाच होते. मनुष्याची सर्व पातके त्यांच्या केसांच्या मुळाशी असतात अशा अर्थाच्या शास्त्रवचनाच्या आधारावर विधवा स्त्रियांनी आपल्या मस्तकाचे वपन करावे, असे काही लोक म्हणतात.'

यावरुन गंगा किनारी वपन करुन आलेल्या विधवा स्त्रियांना गंगा भागीरथी म्हणण्याची चाल पडली असावी, असे दिसते.

मुळात नदीचे पाणी हे परंपरेमध्ये पापविमोचक मानले जाते. वेगवेगळ्या नदीमहात्म्यांमध्ये ही संकल्पना आहे. त्यातूनच विधवा मानल्या जाणाऱ्या एकल स्त्रियांसाठी गंगा भागिरथी हे नामाभिधान आले असावे. वैधव्य हे पापग्रस्त मानले जाते, संबंधित स्त्रीच्या पापाचे फळ म्हणून तिला ते लाभले, असे मानले जाते. म्हणून पापाविमोचक अशा गंगा नदीची उपाधी तिच्या नावापुढे लावली जाते.

त्याऐवजी सरकारने हे करावे...

शासनाला त्यांच्या प्रस्तावातील उर्वरित भागानुसार विधवा स्त्रियांच्या सन्मानासाठी काही करायचेच असेल तर सामाजिक प्रबोधनाच्या मोहिमेबरोबरच पती मृत पावल्यानंतर त्याच्या पत्नीला सासरच्या एकत्रित कुटुंबातील मालमत्तेतला हिस्सा तातडीने मिळेल, यासाठी कायदे राबवावेत.

पतीची मालमत्ता तिच्या नावावर होण्यातले अडथळे दूर करावेत.

वेगवेगळ्या अर्थ योजना सगळ्याच एकल स्त्रियांसाठी राबवाव्यात. कारण सन्मान केवळ उपाध्यांमधून मिळत नाही तर तो आर्थिक सक्षमतेतून आणि सांस्कृतिक-धार्मिक बदलातून मिळतो. या बदलांसाठी सरकारने जरुर प्रयत्न करावेत. नव्हे, ते सरकारचे कामच आहे. पण उपाध्या लावून स्त्रीच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावू नये

आज जोडीदाराच्या निधनानंतर समाज जरी माझ्याकडे विधवा म्हणून पाहत असला तरी मी स्वतःला एकल मानते. कारण मी कधीच स्वतःला सौभाग्यवती मानले नव्हते. लग्नानंतर माझ्या नावाआधी सौ किंवा मिसेस हे बिरुद लावले नव्हते. कोणत्या कामासाठी अर्ज भरताना वैवाहिक दर्जाचा रकाना असेल तर तिथे श्रीमती असेच लिहिले.

आज माझ्यासारख्या अनेक जणीं आहेत. पण आजही अनेकजणी अशा आहेत ज्यांना सौभाग्यवती हे पुरुषसत्तेने दिलेले पद महत्त्वाचे वाटते. आपल्या पूर्वपुण्याईचे फळ वाटते. त्यामुळे इथे मूळ प्रश्न स्त्रिया सौभाग्यवती या बिरुदाचा त्याग कधी करणार, हाच आहे. कोणी सौभाग्यवती नसेल तर मग कोणी दुर्भाग्यवती असण्याचा आणि म्हणून गंगा भागिरथी होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आणि स्त्री प्रश्न, जात-वर्ग-धर्म व्यवस्थेच्या अभ्यासक आहेत. लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत.)

सदर लेखासाठीचे संदर्भ :

  • हिंदू संस्कृती आणि स्त्री – आ.ह.साळुंखे
  • तिची भाकरी कोणी चोरली – संध्या नरे-पवार
  • नदी आणि स्त्रीत्व – अऍन फेल्डहाऊस
  • धर्मशास्त्राचा इतिहास - पा.वा.काणे
  • स्त्री पुरुष तुलना - ताराबाई शिंदे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)