पोलंडमधून जीव वाचवण्यासाठी मुंबईत आलेला चित्रकार, ज्यानं साकारली महाभारत-रामायणाची अजरामर चित्रं

नॉर्ब्लिन यांनी गुजरातमधील मोरबी येथील द न्यू पॅलेसमध्ये काढलेले भगवान शंकराचं चित्र

फोटो स्रोत, National Audiovisual Institute Poland and Embassy of Poland in New Delhi

फोटो कॅप्शन, नॉर्ब्लिन यांनी गुजरातमधील मोरबी येथील द न्यू पॅलेसमध्ये काढलेले भगवान शंकराचं चित्र
    • Author, शर्लिन मोलन
    • Role, बीबीसी न्यूज

कलाकारांच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं की कलाकार जन्मालाच यावा लागतो.

त्याचबरोबर अनेकदा कलाकारांचं आयुष्य चाकोरीबाहेरचं असतं. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पोलंडमध्ये एका धनाढ्य कुटुंबात जन्मलेला मुलगा चित्रकलेच्या वेडानं झपाटतो, शिक्षण सोडून याच कामासाठी आयुष्य वेचतो.

नंतरच्या काळात पोलंड सोडून भारतात येतो आणि तिथून अमेरिकेत जातो आणि तिथे त्याचा दुर्दैवी अंत होतो.

स्टिफन नॉर्ब्लिन या अफलातून कलाकाराची ही शोकांतिका.

ते 1939 चं वर्ष होतं. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. जर्मन सैन्यानं पोलंडवर आक्रमण केलं होतं. जर्मन रणगाडे आणि सैनिक पोलंडमध्ये शिरत होते.

अनेकजण जीव वाचवण्यासाठी मार्ग शोधत होते, पलायन करत होते. त्यावेळेस एक प्रसिद्ध पोलिश (पोलंडच्या नागरिकांना पोलिश म्हणतात) कलाकार आणि त्याची फिल्मस्टार पत्नी यांनी दागिन्यांसह पोलंडमधून पलायन केलं.

ते दाम्पत्य म्हणजे स्टिफन नॉर्ब्लिन आणि लीना. त्यावेळेस त्यांच्या घराचं बांधकाम सुरू होतं. मात्र त्यांनी त्यांचं स्वप्नपूर्ती करणारं घर तसंच सोडलं. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी, सुरक्षिततेसाठी त्यांनी त्यांचा कलेचा संपूर्ण वारसा पोलंडमध्ये तसाच सोडला आणि ते बाहेर पडले.

या दाम्पत्याला अमेरिकेत आश्रय घ्यायचा होता. मात्र तसं झालं नाही. रोमानिया, तुर्की आणि इराकमधून प्रवास करत अखेर ते ब्रिटिशांचं राज्य असलेल्या भारतात पोहोचले. भारतात त्यांनी सहा वर्षे वास्तव्य केलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

भारतातील वास्तव्य आणि कलाकृती

भारतातील त्यांच्या प्रदीर्घ वास्तव्यात त्यांच्यात आणि भारतातील संस्थानिकांमध्ये जवळचे संबंध निर्माण झाले. त्यातून त्यांनी भारताला काही अप्रतिम कलाकृती दिल्या. या कलाकृतींमध्ये पाश्चात्य सौंदर्यशास्त्र आणि भारतीय प्रतिमाशास्त्र यांचा मिलाफ सुंदर मिलाफ होता.

1941 आणि 1946 दरम्यान अनेक भारतीय राजे, संस्थानिकांनी त्यांचे राजवाडे, महाल यांची सजावट करण्यासाठी, पेंटिंग्स काढण्यासाठी नॉर्ब्लिन यांना नियुक्त केलं होतं.

इतकंच काय त्यांनी नॉर्ब्लिन यांना त्यांच्या राजवाड्यांची आर्ट डेको शैलीचा (art deco style) वापर करून अंतर्गत सजावट करण्याची जबाबदारी देखील नॉर्ब्लिन यांनाच दिली. आर्ट डेको शैली म्हणजे एक आधुनिक शैली ज्यात नावीन्य आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

स्टिफन नॉर्ब्लिन भारतात सहा वर्षे होते, या कालावधीत त्यांनी असंख्य भित्तीचित्रे काढली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टिफन नॉर्ब्लिन भारतात सहा वर्षे होते, या कालावधीत त्यांनी असंख्य भित्तीचित्रे काढली
लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

नॉर्ब्लिन यांनी देखील प्रचंड मेहनत घेत संस्थानिकांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मिश्र शैलीत अप्रतिम कलाकृती निर्माण केल्या.

यात हिंदू देवतांची सुंदर भित्तीचित्रे, महाभारत आणि रामायण या हिंदू महाकाव्यांमधील संपूर्ण दृश्ये आणि अगदी भारतातील प्रसिद्ध वाघ, बिबटे आणि हत्ती यांची सुंदर चित्रे त्यांनी काढली.

त्यांची चित्रं राजस्थानातील उमेद भवन पॅलेसमध्ये पाहायला मिळू शकतात. जोधपूर संस्थानाच्या राजाचा तो राजवाडा होता.

आता त्याचे रूपांतर एका आलिशान हॉटेलमध्ये झाले आहे. याशिवाय गुजरातमधील मोरबी संस्थानच्या राजवाड्यात देखील नॉर्ब्लिन यांची चित्रे पाहायला मिळू शकतात.

दुर्गा मातेच्या नॉर्ब्लिन यांनी काढलेल्या चित्रांपैकी एक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुर्गा मातेच्या नॉर्ब्लिन यांनी काढलेल्या चित्रांपैकी एक

त्याचबरोबर त्यांनी बिहारमधील रामगढच्या महाराजांची चित्रेही रेखाटली होती. मात्र काळाच्या ओघात या सुंदर कलाकृती लुप्त झाल्या, असं 'चित्रांजली', या भारतातील कलाकृतींचा इतिवृत्तांत सादर करणाऱ्या माहितीपटात क्लॉस-उलरिच सायमन म्हणतात.

त्यांची भित्तीचित्रे भव्य, उत्साहपूर्ण आणि जिवंत आहेत. त्यामधून पात्रांच्या हालचाली आणि भावना प्रकट होतात. मिनिमलिस्ट, लांबलचक मानवी आकृत्या, विविध भूमितीय आकार आणि भडक रंग सारख्या आर्ट डेको शैलीतील वैशिष्ट्यं त्यांच्या चित्रांमधून दिसतात.

मात्र त्यात हिंदू देवतांच्या मुद्रा आणि वैशिष्ट्यांसह पारंपारिक भारतीय प्रतिमांचं नावीन्यपूर्ण प्रकटीकरण करण्यात आलं आहे.

शिक्षण सोडून चित्रकलेला सुरूवात

नॉर्ब्लिन यांचा जन्म 1892 मध्ये वॉर्सा शहरात एका श्रीमंत उद्योगपतीच्या कुटुंबात झाला होता.

नॉर्ब्लिन यांच्या वडिलांना वाटत होतं की मुलानं व्यापारी व्हावं, व्यापार-धंद्यात नाव काढावं. त्यासाठी त्यांनी नॉर्ब्लिन यांना वाणिज्य विषयाचं शिक्षण घेण्यासाठी बेल्जियममधील अँटवर्प इथं पाठवलं.

मात्र नॉर्ब्लिन यांचा रस मात्र चित्रकलेत होता. हा गुण, वारसा त्यांना त्यांच्या महान काकांकडून मिळाला होता. त्यांच्या काकांनी ही कला एका फ्रेंच चित्रकाराकडून शिकली होती.

चित्रकलेची ओढ असल्यामुळे तरुण नॉर्ब्लिन यांनी त्यांचं शिक्षण सोडलं आणि युरोप पाहण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळेस त्यांनी युरोपातील असंख्य कलादालनांना भेट दिला.

बेल्जियम, फ्रान्स आणि इंग्लंडमधील असंख्य मासिकांसाठी चित्रे काढली, असं 'द अनप्लॅन्ड रिटर्न ऑफ स्टीफन नॉर्ब्लिन' या लेखात अ‍ॅग्नेस्का कास्प्रझॅक यांनी लिहिलं आहे.

उमेद भवन पॅलेसमधील महाराणीच्या कक्षातील नॉर्ब्लिन यांची कलाकृती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उमेद भवन पॅलेसमधील महाराणीच्या कक्षातील नॉर्ब्लिन यांची कलाकृती

त्यानंतर नॉर्ब्लिन वॉर्सा ला परतले. तिथे ते ग्राफिक आर्टिस्ट, स्टेज डिझायनर आणि पुस्तकांसाठीचा चित्रकार म्हणून काम करू लागले. त्यातून हळूहळू समाजातील उच्चभ्रू वर्गांमध्ये त्यांचा एक चाहता वर्ग तयार झाला. नॉर्ब्लिन यांची ख्याती त्यांच्या चित्रांसाठी होती.

1933 मध्ये लीना आणि नॉर्ब्लिन यांची भेट झाली आणि त्यांनी लग्न केलं. लीना ही नॉर्ब्लिन यांची दुसरी पत्नी होती. त्यानंतर हे प्रभावशाली दाम्पत्य वॉर्सामध्ये आरामदायी जीवन जगत होते.

मात्र दुसऱ्या महायुद्धानं त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांना मातृभूमीतून परागंदा व्हावं लागलं. वेगवेगळ्या देशांमधून प्रवास करत ते दूरवरच्या भारतात पोहोचले.

पोलंडमधून परागंदा झाल्यावर भारतातील नवं आयुष्य

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ब्रिटिशांचं भारतावर राज्य असताना हे दाम्पत्य पहिल्यांदा मुंबईत आलं. इथे त्यांना विविध संस्कृत, धर्म आणि भाषांच्या संगम पाहायला मिळाला, असं चित्रांजलीमध्ये वास्तुविशारद राहुल मेहरोत्रा सांगतात.

आता भारत हेच या जोडप्याचं घर झालं होतं. नॉर्ब्लिन यांनी त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन आघाडीच्या कलादालनांमध्ये करण्यास सुरूवात केली. यामुळे कला क्षेत्रात रस असणाऱ्या आणि कलाकारांना आश्रय देणाऱ्या भारतातील श्रीमंतांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं.

1930 आणि 1940 च्या दशकात आर्ट डेको शैलीचा युरोपमध्ये प्रचंड ट्रेंड होता. मात्र भारतात ही शैली अद्याप रुजलेली नव्हती. पण भारतातील अनेक राजे, संस्थानिक यांची मुलं शिक्षणासाठी परदेशात गेल्यामुळे त्यांचा या शैलीशी परिचय झाला होता.

आणि त्यामुळे जेव्हा महाराजा महेंद्रसिंहजींचे चिरंजीव मोरवी (आताचं मोरबी) इथं नवा राजवाडा बांधत होते तेव्हा त्यांना या राजवाड्याचं डिझाईन आणि सजावट आर्ट डेको शैलीत करून हवं होतं. या राजवाड्याला त्यांनी द न्यू पॅलेस असं नाव दिलं होतं.

त्यांनी नॉर्ब्लिन यांना राजवाड्याची अंतर्गत सजावट करताना आतील भाग त्यांच्या चित्रांनी सुशोभित करण्यास सांगितलं.

नॉर्ब्लिन यांनी राजवाड्यात शिकारीची दृश्ये, साधनेत लीन झालेला महादेव, त्या राजघराण्यातील पूर्वजांची चित्रे आणि त्या भागातील वनस्पती, प्राणीजीवन यांचं चित्रण करणारी भव्य भित्तीचित्रे तयार केली.

नॉर्ब्लिन यांनी काढलेल्या मानवी आकृत्यांमध्ये गडद आणि फिकट रंगांचा वापर होता, तसंच गूढ-अप्सरेसारख्या गुणांचं मिश्रण होतं.

नॉर्ब्लिन यांनी डिझाईन केलेले भित्तीचित्रे आणि मोझेक्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नॉर्ब्लिन यांनी डिझाईन केलेले भित्तीचित्रे आणि मोझेक्स

उमेद भवन, नॉर्ब्लिन यांच्या कलाकृतींचा खजिना

नॉर्ब्लिन यांची मोठी कलाकृती ठरली जोधपूरचा राजवाडा. उमेद सिंह यांनी नॉर्ब्लिन यांना जोधपूरमधील त्यांच्या शाही निवासस्थानाचं म्हणजे राजवाड्याचं डिझाईन करण्यासाठी आणि अंतर्गत सजावट करण्यासाठी आमंत्रित केलं.

नॉर्ब्लिन यांना हे काम सामानाची वाहतूक करताना झालेल्या अपघातामुळे मिळालं होतं. महाराजा उमेद सिंह यांनी लंडनहून काही फर्निचर मागवलं होतं. मात्र एका अपघातात ते नष्ट झालं होतं, असं पोलिश आर्टिस्ट अॅट द सर्व्हिस ऑफ महाराजाज या शोधनिंबंधात कास्प्रझॅक यांनी लिहिलं आहे.

विस्तीर्ण अशा उमेद भवन पॅलेसमध्ये नॉर्ब्लिन यांची अप्रतिम कलाकृती पाहता येते. त्यांच्या कलाकृतींमध्ये सर्वात मोहक, आकर्षून घेणारी गोष्ट म्हणजे देवी दुर्गेची भित्तीचित्रे.

दुर्गामातेला अनेकदा सिंहावर स्वार होऊन राक्षसाचा वध करताना दाखवलं जातं. या भित्तीचित्रात देवीला अनेक हात दाखवून प्रत्येक हातात एक प्राणघात शस्त्र असल्याचं चित्रित करण्यात आलं आहे.

नॉर्ब्लिन यांनी काढलेल्या दुर्गेच्या अनेक चित्रांपैकी एक चित्रात दुर्गा माता जवळपास एखाद्या इजिप्तशियन राजकन्येसारखीच दिसते.

तर आणखी एका चित्रात देवीचं चित्र काढताना काळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे एकप्रकारे देवी दुर्गा भिंतभर पसरलेल्या मोठ्या सावलीसारखी दिसते.

या राजवाड्यातील द ओरिएंटल रुम नावाच्या एका खोलीत नॉर्ब्लिन यांनी रामायणातील महत्त्वाची दृश्ये दाखवणाऱ्या सहा भित्तीचित्रांची मालिकाच रंगवली आहे.

यामध्ये सीतेचं रावणानं केलेलं अपहरण आणि रामाला स्वत:ची पवित्रता सिद्ध करून दाखवण्यासाठी अग्नीत चालणं या दृश्याचाही समावेश आहे.

नॉर्ब्लिन यांनी उमेद भवन या राजवाड्यातील सर्व खोल्यांचं डिझाइन केलं आहे. यामध्ये राजा आणि राणी यांच्या खास खोल्या, कक्ष, त्यांचा दिवाणखाना किंवा बैठकीची खोली आणि जेवणाच्या खोलीचा समावेश आहे.

कालांतरानं काळजी न घेतल्यामुळे, उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे नॉर्ब्लिन यांच्या असंख्य चित्रांचं नुकसान झालं होतं. मात्र आता पोलिश सरकारनं या चित्रांची व्यवस्थित काळजी घेत त्यांची जोपासना केली आहे.

त्यांच्या कलाकृती, चित्रांची मांडणी आता पोलंड आणि भारतातील कलादालनांमध्ये करण्यात आली आहे. मात्र अनेकांसाठी या कलाकृती अज्ञात आहेत.

अमेरिकेतील अपयश, नैराश्य आणि दुर्दैवी शेवट

नॉर्ब्लिन यांना तितकी प्रसिद्धी न मिळण्यामागे किंवा त्यांच्या कलाकृती परिचित न होण्यामागे बहुधा ते भारत सोडून अमेरिकेला गेल्यानंतर त्यांना तितक्या प्रमाणात यश मिळालं नाही हे कारण असावं.

अमेरिकेत गेल्यावर नॉर्ब्लिन यांच्या कुटुबांनं सॅन फ्रान्सिस्को इथं घर वसवलं. दुर्दैवानं सॅन फ्रान्सिस्कोमधील कलासक्त अभिजात वर्गानं एका पोलिश कलाकाराचं फारसं स्वागत केलं नाही. त्यामुळे त्यांना तिथे फार थोडं काम मिळालं.

त्यातच काही काळानंतर डोळ्यात काचबिंदू झाल्यामुळे नॉर्ब्लिन यांची दृष्टी अधू झाली आणि त्यामुळे त्यांनी चित्रे काढणं बंद केलं.

याचा परिणाम त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर देखील झाला.

त्यांची पत्नी कधीकाळी एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. मात्र कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्यासाठी त्यांना ब्युटी पार्लर किंवा सलूनमध्ये मॅनिक्युरिस्टचं (ग्राहकांची नखं साफ करण्याचं) काम करावं लागलं.

युरोप आणि भारतात प्रचंड कौतुक झालेल्या, सन्मानाची वागणूक मिळालेल्या या प्रसिद्ध चित्रकाराचा शेवट मात्र अत्यंत दुर्दैवी झाला.

नॉर्ब्लिन यांच्या कुटुंबाला मोठ्या आर्थिक ओढाताणीला सामोरं जावं लागलं. गरजा भागवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. परिणामी नॉर्ब्लिन यांना नैराश्य आलं.

त्यातून 1952 मध्ये या महान चित्रकारानं आत्महत्या केली. आपल्या कुटुंबाला आपलं ओझं होऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं होतं.

नॉर्ब्लिन यांच्या मृत्यूमुळे फक्त त्यांच्या कुटुंबाचीच हानी झाली नाही तर भारतातील त्यांच्या कलेचा, चित्रांचा वारसा देखील काही काळ विस्मृतीत गेला. पुढे 1980 मध्ये क्लॉस-उलरिच सायमन यांनी त्यांच्या कलाकृतींची जगाला नव्यानं ओळख करून दिली.

तेव्हापासून या महान कलाकाराचं काम पुन्हा प्रकाशात आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत. मात्र अजूनही खूप काही करणं बाकी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)