पुण्यात न्यूड फोटोग्राफीचं प्रदर्शन का आणि कोणी थांबवलं?

फोटो स्रोत, Akshay Mali Studio
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात अक्षय माळी नावाच्या तरुण कलाकाराने न्यूड फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवलं होतं.
पहिल्या दिवशी प्रदर्शन सुरु राहिलं परंतु दुसऱ्या दिवशी काही लोकांनी या प्रदर्शनावर आक्षेप घेतला. त्याचबरोबर अक्षयला प्रदर्शन बंद करण्याबाबत धमकीचे फोन देखील आले. शिवाय बालंगंधर्वच्या व्यवस्थापनानेदेखील या प्रदर्शनावर आक्षेप घेतला. त्यामुळे नाईलाजाने हे प्रदर्शन थांबविण्यात आलं.
या प्रकारानंतर आता दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया उमटत आहेत. अक्षय माळीला न्यूड फोटोचं प्रदर्शन का भरवावं वाटलं? त्याला का विरोध झाला? या सगळ्याविषयी बीबीसी मराठीने अक्षयकडून जाणून घेतलं.
अक्षयनं सांगितलं, "7 ते 9 जानेवारीपर्यंत मी प्रदर्शन भरवलं होतं. 7 तारखेला मला चांगला प्रतिसाद मिळाला.
8 तारखेला मला तातडीने प्रदर्शन बंद करायला सांगितलं. तरी मी प्रदर्शन बंद केलं नव्हतं. त्यानंतर आर्टगॅलरीकडे येणाऱ्या लोकांना थांबविण्यात आलं. त्यानंतर मला प्रदर्शन बंद करावं लागलं."
"मी भरवलेल्या प्रदर्शनामध्ये असे फोटो होते, ज्यात स्वातंत्र्य दिसत होतं. आपण काहीही करु शकतो, काहीचं अशक्य नाही अशी प्रेरणा लोक या फोटोंमधून घेऊ शकतील असे फोटो होते. बरेच फोटो हे निसर्गात न्यूड होते. हे फोटो कुठे ना कुठे कलेच्या सीमा विस्तारतायेत असं मला वाटतं. समाजाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल असं मला वाटत होतं."

फोटो स्रोत, Akshay Mali Studio
अक्षय माळी हा मूळचा साताऱ्याचा आहे. त्याने सिंबायोसिस स्कूल ऑफ फोटोग्राफीमधून प्रशिक्षण घेतलंय. त्याचं हे पहिलंच प्रदर्शन होतं. न्यूड फोटोग्राफीला समाज स्वीकारेल असं त्याला वाटत होतं. या प्रदर्शनामुळे वाद होईल असं त्याला वाटत नव्हतं. प्रदर्शन बंद पाडण्यात आल्यामुळे समाजाच्या कलेविषयीच्या भावना समजल्याचं अक्षय सांगतो.
प्रदर्शन बंद पाडण्यापेक्षा आर्टिस्टचं म्हणणं जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता, असं अक्षयला वाटतं.
"लोकांचे विचारच नागडे असतील तर मी काही करु शकत नाही. मी चांगल्यापद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी वेगळ्या विचारांनी घेतलं ते. मी फक्त नग्नता मांडली होती असं नाही, मी माझ्या फोनमधलं सत्य, मी काय करतो कुठे असतो हे देखील मांडलं होतं. जेंडरलेस फॅशन देखील मांडली होती," असं देखील अक्षय म्हणतो.
'इट्स मी' अशी या प्रदर्शनाची थीम होती.
"अक्षयने तो न्यूड फोटोंच प्रदर्शन भरवणार आहे याची कल्पना आम्हाला दिली नव्हती. तशी कल्पना आधी द्यायला हवी होती," असं बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
मते म्हणाले, "अनेक लोकांनी सांगितलं अशा प्रकारचं प्रदर्शन यापूर्वी लागलेलं नाही. आमचे लोकसुद्धा वर जाऊन पाहून आले. त्याचं न्यूड फोटोंच प्रदर्शन होतं. त्याने आधी याबाबत कल्पना दिली नव्हती. आधी कल्पना दिली असती तर याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि पोलिसांची परवानगी घेता आली असती. आक्षेप नोंदवला जातो त्यावेळी या सगळ्याचा विचार करावा लागतो."

फोटो स्रोत, Akshay Mali Studio
प्रदर्शन बंद पडल्यानंतर अनेक कलाकारांनी, छायाचित्रकारांनी अक्षयला पाठिंबा दिला. प्रख्यात छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी देखील अक्षया पाठिंबा दिला.
अक्षयचं प्रदर्शन बंद पाडलं याविषयी बोलताना भंडारे म्हणाले, "असं होऊ नये असं मला वाटतं. चित्रकारासाठी सरकारने किंवा समाजाने स्पेस दिली आहे. चित्रकाराचं महत्त्व जाणून आपल्या टाऊन प्लॅनिंगमध्ये देखील गॅलरी निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे या गॅलरींमध्ये हे प्रदर्शन करायला हरकत नाही. तो काय रस्त्यावर प्रदर्शन भरवत नाहीये."

फोटो स्रोत, Akshay Mali Studio
"नग्नता लोकांच्या डोक्यात आहे. हे फोटो न्यूड वाटत असतील तर शंकराच्या मंदिरामध्ये, खजुराहोमध्ये खूप मोठ्याप्रमाणावर नग्नतेचं चित्रण आहे. त्यात लोकांच्या रोजच्या जगण्यातील गोष्टी आहेत. त्यामुळे नग्नतेचा मुद्दा राजकारणासाठी करु नये. महाराष्ट्राची, पुण्याची सांस्कृतिक उंची ही अशा कलांना प्रोत्साहन देणारी आहे. आमच्या सारखे छोटे कलाकार ती जगवण्याचा प्रयत्न करत आहेत."
इथे जरी हे प्रदर्शन बंद पाडण्यात आलं असलं तरी यापुढे वेगवेगळ्या मंचावर हे प्रदर्शन भरविणार असल्याचा विचार देखील अक्षयने बोलून दाखवला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








