आशिया कप : 'या' पाच गोष्टींची काळजी घेतली तर फायनलमध्ये जिंकू शकते टीम इंडिया

फोटो स्रोत, ani
- Author, संजय किशोर
- Role, ज्येष्ठ क्रीडापत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
आशिया कप क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यासाठी आज भारत आणि श्रीलंका झुंजणार आहेत. या निमित्ताने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर एक जबरदस्त अंतिम सामना पाहायला मिळू शकतो.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा नववा आशिया कप अंतिम सामना असेल. ही स्पर्धा जिंकणं भारतासाठी महत्त्वाचं आहे कारण तीनच आठवड्यात भारतात ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद भारताकडेच असल्यांनी सर्वांचं त्याकडे लक्ष आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या किमयेची पुनरावृत्ती करण्याचा दबाव कर्णधार रोहित शर्मावर नक्कीच असेल.
यंदाच्या आशिया कप स्पर्धेत भारताची कामगिरी ही चढ-उतारांनी भरलेली आहे. पण आशिया कप स्पर्धेत विजय मिळवल्यास भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास द्विगुणित होऊ शकतो. तसंच संघाच्या चाहत्यांच्या अपेक्षाही यामुळे उंचावतील.
आशिया कपमध्ये भारताची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने झाली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात भारताची कामगिरी विशेष काही झाली नव्हती. यानंतर नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला आणि सुपर फोर फेरीत प्रवेश केला.
सुपर फोरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. पण राखीव दिवस असल्यामुळे हा सामना पूर्ण झाला. यामध्ये भारताने मोठा विजय मिळवला. नंतर श्रीलंकेविरुद्धही रोमांचक विजय मिळवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
मात्र, सुपर फोर फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताचा मुकाबला बांगलादेशविरुद्ध झाला. या सामन्यात झालेल्या पराभवामुळे पुन्हा एकदा भारतीय संघावर टीका करण्यात येत आहे.
त्यातच, अंतिम फेरीत पोहोचलेला श्रीलंका संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे भारतीय संघासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
विशेषतः 35 हजार प्रेक्षक जेव्हा आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर असतील, अशा स्थितीत श्रीलंकेला हरवणं भारतासाठी सोपं नाही.
मात्र, आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी या पाच गोष्टी लक्षात ठेवून योग्य ती काळजी घेतल्यास हा विजय इतका अवघडही असणार नाही.
1. लंकेचे खेळाडू घरच्या मैदानावर
भारतीय संघाने आम्हाला हलक्यात घेऊ नये, याची जाणीव यजमान श्रीलंकेने गेल्याच आठवड्यात करून दिली होती.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताला 213 धावांवर सर्वबाद केलं. यामध्ये सर्वच विकेट श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी घेतले होते. त्यापैकी चार विकेट तर पार्ट टाईम गोलंदाज चरित असलंका याने घेतले होते.

फोटो स्रोत, Getty Images
प्रेमदासा स्टेडियमवरची खेळपट्टी ही मंद आणि फिरकीला साथ देणारी असण्याची शक्यता आहे. मधल्या ओव्हर्समध्ये फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. खरं तर श्रीलंकेचा प्रमुख फिरकी गोलंदाज तिक्ष्णा हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. यामुळे श्रीलंका संघाला मोठा धक्का बसलेला आहे.
तिक्ष्णाच्या जागी फिरकीपटू-ऑलराऊंडर सहान अराचिगे याला संघात सामील करून घेण्यात आलेलं आहे. पण त्याला संधी मिळेल का हा प्रश्न आहे. सध्या श्रीलंकेकडे दुनिथ वेल्लालागे आणि धनंजय डी सिल्व्हा हे गोलंदाज आहेत.
वेल्लालागेने सुपर फोर फेरीतील सामन्यात रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, के एल राहुल आणि हार्दिक पांड्या या दिग्गज फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. म्हणून भारतीय संघासमोर श्रीलंकेच्या फिरकीचं मोठं आव्हान असणार आहे.
2. कुशल-सदिरा यांना लवकर बाद करा
श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज कुशल मेंडीस सध्या जोरदार फॉर्मात आहे. अंतिम सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल.
मागच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मेंडीसने 91 धावांची खेळी केली होती. स्पर्धेत पाच सामन्यांत एकूण 253 धावा बनवून सर्वाधिक धावांच्या बाबत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर भारताचा फलंदाज शुभमन गिल आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानविरुद्धच्या 91 धावांव्यतिरिक्त कुशलने बांगलादेशविरुद्ध 50 आणि अफगाणिस्तानविरुद्ध 92 धावा केल्या होत्या.
भारतीय वेगवान गोलंदाज मेंडीसला शॉर्ट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू शकतात. शॉर्ट किंवा बॅक-ऑफ-द-लेंथ चेंडूंविरुद्ध खेळताना मेंडीस काहीसा अवघडल्यासारखा दिसतो. तसंच डाव्या हाताचे फिरकी गोलंदाजही त्याच्यासाठी आव्हानात्मक असतात. त्यामुळे रविंद्र जाडेजासोबत त्याचा सामना रंगू शकतो.
त्याशिवाय, श्रीलंकेच्या आणखी एका फलंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो म्हणजे सदिरा समरविक्रमा.
सदिराने गेल्या तीन सामन्यांमध्ये 158 धावा बनवल्या. स्पर्धेत त्याने आतापर्यंत 216 धावा बनवल्या आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात समरविक्रमाने 72 चेंडूंमध्ये 93 धावांची खेळी केल होती. त्याने स्पर्धेत आपल्या संघाकडून सर्वाधिक षटकार मारले आहेत.
3. खेळपट्टी आणि हवामानानुसार संघनिवड
सध्या भारतीय संघातील आघाडीच्या फळीतील फलंदाजांमध्ये बदल करण्याची गरज नाही. पण गोलंदाजीत बदलाला वाव आहे.
कारण बांगलादेशमध्ये आपल्या फलंदाजीदरम्यान अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर तो आता स्पर्धेबाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे.

फोटो स्रोत, ani
त्यामुळे, अंतिम सामन्यात पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर असेल की शार्दूल ठाकूर असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
पाच सामन्यात फिरकीपटूंनी 48.7 टक्के विकेट घेतले आहेत. तर प्रेमदासा स्टेडियमवर 18.5 टक्के विकेट फिरकीपटूंनी घेतले आहेत.
डाव्या हाताचे ऑर्थोडॉक्स फिरकीपटू स्पर्धेत सर्वाधिक यशस्वी ठरले आहेत. त्यांनी स्पर्धेत केवळ 4.3 धावगतीने धावा दिल्या. अशा स्थितीत ऑफ स्पिन गोलंदाजीसह फलंदाजीही करणारा वॉशिग्टन सुंदर हा चांगला पर्याय ठरू शकतो.
4. खालच्या फळीतील फलंदाजी
ऑलराऊंडर रविंद्र जडेजा हा गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात नाही. संपूर्ण स्पर्धेत जडेजा फलंदाजीदरम्यान संघर्ष करताना दिसला. तसंच, केवळ सहा विकेट घेण्यास त्याला यश आलं.
2021 नंतर जडेजाने आशिया कप स्पर्धेत नऊ एकदिवसीय सामने खेळले. त्यामध्ये त्याची सरासरी 37.3 तर स्ट्राईक रेट 59.8 इतका राहिला.
त्यामुळे सामना जिंकायचा असल्यास खालच्या फळीतील फलंदाजांची भूमिकाही भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरू शकते.
5. कुलदीप यादव असेल एक्स फॅक्टर
डावखुरा गोलंदाज कुलदीप यादवचा सध्या स्वप्नवत फॉर्म सुरू आहे. आशिया कप स्पर्धेत 4 सामन्यात 9 विकेट त्याने घेतले.

फोटो स्रोत, Ani
पाकिस्तानविरुद्ध 25 धावा देऊन 5 बळी घेतले. तर श्रीलंकेविरुद्ध त्याला 4 बळी मिळाले.
तर श्रीलंकेविरुद्धचा कुलदीचपा रेकॉर्ड पाहिला तर 10 सामन्यांमध्ये 18 बळी त्याने घेतले आहेत.
दोन्ही संघांचं उद्दिष्ट वेगळं
भारत आणि श्रीलंका हे दोन्ही संघ वेगवेगळं उद्दीष्ट घेऊन अंतिम सामन्यात उतरतील. 2018 पासून भारताने कोणतीही मल्टी-ट्रॉफी विजेतेपद मिळवलेलं नाही. हे दुष्टचक्र थांबवण्याचा विचार भारतीय संघ नक्कीच करत असणार.
तर, श्रीलंका संघाने वर्ल्ड-कप क्वालिफायर फेरी खेळून वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. त्यांच्यात मोठमोठ्या संघांना हरवण्याची क्षमता आहे.
शिवाय, सामना विनाअडथळा व्हावा, यासाठी हवामानाची साथ मिळणंही महत्त्वाचं आहे. गेल्या आठवड्यात बहुतांश काळ पावसातच गेला. हवामान विभागाने अंतिम सामन्याच्या दिवशीही दुपारी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली असली तरी सामना पूर्ण होण्यासाठी एक दिवस राखीवही ठेवण्यात आलेला आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








