Ind vs Pak : भारताचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय, कोलंबोत विराट आणि राहुलची शतकं, कुलदीप यादवला पाच विकेट्स

India

फोटो स्रोत, ANI

आशिया चषकातल्या सुपर फोरमधील सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 228 धावांनी विक्रमी विजय साजरा केला. वन डे क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवरचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

विराट कोहली, केएल राहुलची शतकं आणि कुलदीप यादवच्या फिरकीनं कोलंबोमध्ये भारताला हा विजय मिळवून दिला.

पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं दोन दिवस चाललेल्या या सामन्यात पाकिस्तानसमोर विजयासाठी 357 धावांचं लक्ष्‌य होतं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 32 षटकांत 128 धावांमध्येच आटोपला.

फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानं 20व्या षटकांत फखर झमानचा त्रिफळा उडवला. तसंच आगा सलमान, शादाब खान, इफ्तिखार अहमदलाही आऊट केलं.

कुलदीपनं फहीम अश्रफला बोल्ड करत सामन्यात पाच विकेट्सचा टप्पा साजरा केला आणि भारताला विजय मिळवून दिला.

त्याआधी आधी कोहली आणि राहुलनं शतकं साजरी केली. त्यामुळे भारताला निर्धारीत पन्नास षटकांत 2 बाद 356 धावांची मजल मारता आली.

याबरोबरच टीम इंडियानं पाकिस्तानविरोधात भारताच्या सर्वोत्तम वन डे स्कोरशी बरोबरी साधली. याआधी 2005 साली भारतानं पाकिस्तानविरोधात 356 धावा केल्या होत्या.

कुलदीप यादव

फोटो स्रोत, ANI

विराट आणि राहुलचा झंझावात

विराटनं आपल्या नाबाद खेळीदरम्यान 94 चेंडूंमध्ये 122 धावा केल्या. त्यानं 9 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

विराटचं हे वन डे कारकीर्दीतलं 47 वं शतक आहे. वन डे क्रिकेटमध्ये आता विराटच्या खात्यात 13 हजार धावा जमा झाल्या आहेत.

तर केएल राहुलनं 106 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 111 धावा केल्या आणि आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं. वन डे क्रिकेटमध्ये राहुलचं हे सहावं शतक ठरलं.

दुखापतीमुळे मे महिन्यापासून मैदानाबाहेर असलेल्या राहुलचा काही दिवसांपूर्वीच भारताच्या विश्वचषकासाठीच्या संघात समावेश झाला होता, ज्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.

त्यामुळे राहुलवर आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करण्याचा दबाव होता. पण राहुलनं विराटसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 233 धावांची भागीदारी रचून जणू सगळ्या शंका दूर केल्या आहेत.

राहूल

फोटो स्रोत, ANI

रविवारी सामना पावसामुळे थांबवला तेव्हा भारतानं 24.1 षटकांत दोन बाद 147 धावा केल्या होत्या. सोमवारीही पावसामुळे खेळ वेळेत सुरू झाला नाही. पण खेळ सुरू झाल्यावर कोहली आणि राहुलनं धावांची बरसात केली.

त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली की कोलंबोत मान्सूननं पाऊस जास्त पडला की विराट आणि राहुलच्या वादळी खेळीनं पाडलेला धावांचा पाऊस मोठा होता?

भारतीय फलंदाजीला साखळी फेरीच्या रद्द झालेल्या सामन्यात धक्के देणारा पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचाही विराट आणि राहुलनं समाचार घेतला.

भारत पाकिस्तान

फोटो स्रोत, ANI

रोहित आणि शुभमननं रचला पाया

त्याआधी रविवारी पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकं ठोकली.

रोहित शर्मानं 49 चेंडूंमध्ये 56 धावांची खेळी करत वन डे कारकीर्दीतलं 50 वं अर्धशतक साजरं केलं. तर शुभमन गिलनं 52 चेंडूंमध्ये 58 धावांची खेळी केली.

शुभमन गिलच्या फॉर्मवरही काहींनी टीका केली होती. पाकिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. पण सुपर फोरच्या लढतीत त्यानं सगळी कसर भरून काढली.

हा व्हीडिओ पाहिलात का?

व्हीडिओ कॅप्शन, सदर महल पॅलेस : तंजावरच्या मराठ्यांचा राजवाडा

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)