युक्रेन : कानाचा पडदा फाडणारे सायरन, स्फोट आणि अंधारात प्रसुती; देशाचा घटता जन्मदर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झेना बेझपिटचुक
- Role, बीबीसी युक्रेनियन
युक्रेनची राजधानी किव्ह शेजारील बुचा नामक उपनगरात 38 वर्षीय युलिया राहते. येथील एका वैद्यकीय केंद्रात ती काही औषधोपचारासाठी आली होती.
युलिया आणि तिची मुलगी मिया यांना रोज मध्यरात्री हवाई हल्ल्याच्या सायरनच्या आवाजाने जाग येते. त्यानंतर थोडावेळ बाळाला दूध पाजून युलिया झोपी जाते. गेले काही दिवस तिचा दिनक्रम असाच आहे.
खरंतर, बुचा येथे प्रसूतीची सोय नसल्यामुळे युलियाला बाळाला जन्म घालण्यासाठी 30 किलोमीटरवरील किव्हचा प्रवास करावा लागला होता.
नेमका त्यादरम्यान, रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. जवळपास रोज रात्री क्षेपणास्त्रं आणि ड्रोनचे हल्ले सुरू असताना युलिया प्रसूत झाली.
प्रसूतीनंतर युलिया आणि तिची मुलगी मियाने पहिली रात्र हॉस्पिटलच्याच एका अंडरग्राउंड बॉम्ब शेल्टरमध्ये घालवली. यावेळी तिच्यासोबत प्रसूती झालेल्या इतर महिलाही होत्या.
कानाचा पडदा फाडणारे सायरन, स्फोट आणि अंधार यांचा युलियाला प्रचंड त्रास होऊ लागला होता. परंतु, हॉस्पिटलच्या परिचारिका आणि इतर महिलांनी तिला धीर दिला.
त्यावेळी, युद्धामुळे अनेकदा देशभरात वीज खंडित व्हायची. गरम पाण्याची सोयही व्हायची नाही. त्यामुळे बाळंतपणात युलियाची देखभाल घेणं अत्यंत कठीण बनलं होतं.
युलियाचं आधीच्या दोन मुलींनंतर तिसरं बाळंतपण आहे. दोन मुलींची आई असलेल्या युलियाला माहीत होतं की युद्धादरम्यान आपल्याला गर्भधारणा झाली, तर अधिक धोका उद्भवू शकतो. पण तिने त्याला सामोरं जायचं ठरवलं.

फोटो स्रोत, IVAN IERMAKOV/BBC
ती म्हणते, "मनाचा निर्धार केला की तुम्ही कठोर बनता. आता मला हल्ल्यांची सवय झाली आहे. त्यामुळे मी उलट मजबूत बनले आहे.”
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झालेलं रशिया-युक्रेन युद्ध अजूनही सुरूच आहे. किंबहुना नुकतेच वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही म्हटलं की युक्रेन येत्या काही महिन्यांत आणखी सैन्य तयार करेल. भविष्यात युलियाचे पती व्लादिस्लाव यांनाही लष्करी सेवेत बोलावलं जाऊ शकतं.
युक्रेनचा जन्मदर घटला
रशियाविरुद्ध संघर्ष सुरू झाल्यापासून युक्रेनचा जन्मदर जवळजवळ एक तृतीयांशने कमी झाल्याचं समोर आलं आहे.
युक्रेनमधील बाळंतपणासंदर्भात 2021 वर्षातील जून महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहिली तर यंदाच्या वर्षी (2023) पहिल्या सहा महिन्यात तुलनेने 38 हजार कमी बाळांनी जन्म घेतला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनियन विश्लेषक फर्म ओपनडेटाबॉटच्या म्हणण्यानुसार, ही आकडेवारी युक्रेनच्या न्याय मंत्रालयाने नोंदवलेल्या जन्मांवर आधारित आहे.
युद्धापूर्वीही युक्रेनचा जन्मदर घसरलेला होता, परंतु संघर्षानंतर त्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे.
युद्धामुळे अनेक कुटुंबं विभक्त झाली. त्यामुळे अनेक दांपत्यांना आपली मुलं जन्माला घालण्याची योजना पुढे ढकलण्यास भाग पडलं आहे.
देशात, युद्ध लढण्यासाठी इच्छुक असलेल्या हजारो पुरुषांनी त्यासाठी नावनोंदणी केलेली आहे. अनेकजण अज्ञात आहेत, तर देशातील तीन ते चार दशलक्ष नागरीकांनी पोलंड, जर्मनी आणि यूके यांसारख्या देशांमध्ये पलायन केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत बीबीसीने किव्ह येथील पोटौखा इन्स्टिट्यूटमधील डेमोग्राफी अँड सोशल स्टडीज विभागाचे उपसंचालक अलेक्झांडर हॅलाडून यांच्याशी चर्चा केली.
हॅलाडून सांगतात, “युक्रेनमधील काही स्त्रिया यावर्षी बाळांना जन्म देऊ शकल्या असत्या. पण त्यांनी तसा निर्णय घेतला नाही. कदाचित युद्ध संपल्यानंतर या आकडेवारीत बदल होऊ शकतो.”
युलियाची मुलगी मिया हिच्या डॉक्टर नतालिया स्टोलिनेट्स म्हणाल्या, “हल्ल्यापूर्वी बुचा येथे महिन्याला सरासरी 10 बाळांचा जन्म होत होता. रशियाच्या हल्ल्यानंतर पाच आठवड्यात येथील परिस्थिती बदलली. अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. आता महिन्याला एक-दोन बाळांचा जन्म झाला तरी आम्ही त्याकडे आशेचे किरण म्हणून पाहतो."

डॉक्टर नतालिया म्हणतात, "आता हे आयुष्य इथेच थांबू नये, आता आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे.”
युक्रेनची सध्याची परिस्थिती पाहता युद्धाच्या काळात मूल जन्माला घालणं म्हणजे बॉम्ब शेल्टरमध्ये रात्र घालवण्यासाठी तयार राहणं, याची येथील महिलांना कल्पना आहे.
पण युद्धाने आपलं आयुष्य थांबवू नये आणि आपली मातृत्वाची संधी हिरावून घेऊ नये, असंही काही महिलांना वाटतं.
जोडप्यांची संभ्रमावस्था
हलिया रुडिक आणि तिचा नवरा कोस्टिया नेचिपोरेन्को हे दोघेही पत्रकार म्हणून काम करतात. नुकतेच त्यांना अपत्यप्राप्ती झाली.
हलिया म्हणते, “आता नाही तर कधीच नाही. चांगल्या वेळेची वाट पाहत बसण्यात काहीच अर्थ नाही. युद्ध संपलं तरी देशाची स्थिती पूर्ववत होण्यास काही वेळ लागू शकतो. युद्धाचे परिणाम वर्षानुवर्षे टिकणार आहेत.”

फोटो स्रोत, IVAN IERMAKOV/BBC
हलिया पुढे म्हणते, "आम्हाला नोकर्या असतील किंवा भविष्यात त्या कशा असतील, याची आम्हाला कल्पना नाही. आमच्या आयुष्यातील चांगला वेळ रशियामुळे वाया जात आहे, याचा आम्हाला नक्कीच राग आहे.”
हलिया-कोस्टिया यांची मुलगी मारिया ही मियापेक्षा फक्त तीन दिवसांनी मोठी आहे. तिचाही जन्म युद्ध, हवाई हल्ले यांच्यादरम्यान किव्हमध्येच झाला.
कोस्टियानेही लष्कराच्या सेवेत जाण्यासाठी अर्ज केलेला आहे. त्याला युक्रेनियन सैन्याकडून कधीही बोलावलं जाऊ शकतं. पण त्याची प्रतीक्षा करण्याऐवजी आपलं कुटुंब सुरू करण्याचा विचार त्याने केला.
कोस्टिया म्हणतो, “मी काय कायमचा तरूण राहणार नाही. पुढील पाच किंवा सहा वर्षांमध्ये मुलांचं संगोपन करण्यासाठी आमच्याकडे वेळ नसेल.”
पण याबाबत सर्वांचं मत सारखंच आहे, असं नाही.
किव्हमध्ये राहणारी 35 वर्षीय लेखिका इरीना मेल्निचेन्को आणि तिच्या पतीने मूल जन्माला घालण्याचा विचार किमान एक वर्ष पुढे ढकलला आहे.
युद्ध सुरू होण्यापूर्वी केवळ तीन आठवड्यांपूर्वी या जोडप्याचं लग्न झालं होतं. त्यांनीही लवकरात लवकर संसारीक आयुष्य सुरू करण्याचं स्वप्न पाहिलं होतं.
इरीना सांगते, “माझ्या पतीला लष्कराकडून बोलावणं आलं. पण पती युद्धात लढण्यासाठी गेलेला आहे आणि मी इथे गरोदर आहे, अशी परिस्थिती मला ओढावून घ्यायची नव्हती. या गरोदरपणाचा शेवट मी सिंगल मदर होण्यातही होऊ शकतो, याची भीती मला होती. म्हणून आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला.”
बुचामध्ये युलिया रोज आपल्या शेजाऱ्यांकडे गप्पा मारायला जाते. जाताना सोबत मधली मुलगी रिमा आणि मिया यांनाही ती घेऊन जाते. आपलं रोजचं जगणं सामान्यरित्या सुरू ठेवणं, हाच युद्धाला झुगारून टाकण्याचा एक मार्ग आहे, असं तिला वाटतं.
युद्ध लवकरच संपेल आणि या सगळ्या गोष्टी आठवणींचा एक भाग बनतील, असं युलियाला वाटतं. पण त्यासाठी कळत्या लोकांनी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असं तिचं ठाम मत आहे.
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








