या देशात सोडण्यात आलेत प्रयोगशाळेत बनवलेले लाखो डास

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डोरकास वांगीरा
- Role, बीबीसी न्यूज
आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असलेल्या जिबूती या देशात जनुकीय बदल केलेले म्हणजे जेनेटिकली मॉडीफाईड (जीएमओ) डासांना वातावरणात सोडण्यात आलं आहे.
असं करण्यामागचा उद्देश मलेरिया पसरवणाऱ्या डासांच्या एक जातीला प्रतिबंध करणं हा आहे.
वातावरणात सोडण्यात आलेल्या खास डासांना एनोफेलीज स्टीफेन्सी डास म्हणतात. हे डास चावत नाहीत. इंग्लंडच्या ऑक्सीटेक या बायो टेक्नॉलॉजी कंपनीनं हे डास विकसित केले आहेत.
या डासांमध्ये एक विशिष्ट जनुक (जीन) असतो. मादी डासांना प्रौढ होण्याआधीच हा जनुक संपवून टाकतो.
प्रत्यक्षात फक्त मादी डासच चावतात आणि विषाणूमुळे होणाऱ्या मरेलियासारख्या इतर आजारांचा फैलाव करतात.
प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डासांना मोकळ्या हवेत सोडण्याची ही पूर्व आफ्रिकेतील पहिलीच वेळ आहे. संपूर्ण आफ्रिका खंडात असं दुसऱ्यांदा करण्यात आलं आहे.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅंड प्रिव्हेन्श (सीडीसी) या संस्थेचं म्हणणं आहे की, या पद्धतीचा वापर ब्राझिल, केमेन बेटं, पनामा आणि भारतात करण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत खूपच यशस्वी ठरली होती.
सीडीसीचं म्हणणं आहे की, 2019 नंतर संपूर्ण जगभरात एक अब्जपेक्षा जास्त जेनेटिकली मॉडिफाईड डासांना खुल्या वातावरणात सोडण्यात आलं आहे.
या डासांची पहिली खेप गुरुवारी जिबूतीमधील अम्बोउली उपनगरांमध्ये खुल्या हवेत सोडण्यात आली होती.
ऑक्सिटेक लिमिटेड, जिबूती सरकार आणि असोसिएशन म्युचुआलिस या स्वयंसेवी संघटनेद्वारे संयुक्तरित्या ही योजना राबविण्यात येते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जीएमओ डास कशाप्रकारे काम करतात?
ऑक्सिटेकचे प्रमुख ग्रे फ्रेंडसेन यांनी बीबीसीला सांगितलं की, "आम्ही चांगले डास बनवले आहेत. ते चावत नाही. ते रोग पसरवत नाहीत. जेव्हा या डासांना खुल्या हवेत सोडलं जातं तेव्हा हे डास जंगली डासांच्या जातीतील मादी डासांशी प्रजनन करण्याचा प्रयत्न करतात."
प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या या डासांमध्ये लोकसंख्या नियंत्रित करणारा एक जनुक असतो. हा जनुक मादी डासांच्या पिल्लांची वाढ प्रजननाच्या वयापर्यत होऊ देत नाही.
या योजनेमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकाचं म्हणणं आहे की, जंगली डास आणि प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डासांच्या प्रजननातून जन्माला आलेल्या डासांमध्ये फक्त नर डासच जिवंत राहतात आणि शेवटी ते देखील मरतात.

फोटो स्रोत, Oxitec company
2018 मध्ये बर्किना फासोमध्ये नपुंसक एनोफेलीज कॉल्युजी डासांना खुल्या हवेत सोडण्यात आलं होतं. त्यांच्या उलट नवे एनोफेलीज स्टीफेन्सी डास नव्या पिढीला जन्म देऊ शकतात.
प्रयोगशाळेत तयार झालेल्या डासांना खुल्या हवेत सोडण्याची ही योजना जिबूती फ्रेंडली डास योजनेचा एक भाग आहे. याची सुरूवात दोन वर्षापूर्वी झाली होती.
एनोफेलीज स्टीफेन्सी डासांच्या जातीचा फैलाव थांबवणं हे या या योजनेचं उद्दिष्ट आहे. माणसांना चावणाऱ्या डासांच्या या जातीचा शोध 2012 मध्ये जिबूतीमध्ये लावण्यात आला होता. त्यावेळेस जिबूतीत मलेरिया मुळापासून संपण्याच्या मार्गावर होता. त्यावेळेस या देशात मलेरियाचे 30 रुग्ण आढळले होते.
तेव्हापासून जिबूतीमध्ये मलेरियाचा आजार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. 2020 पर्यत मलेरियाच्या रुग्णांची संख्या 73 हजारांवर पोचली होती.
डासांची ही जात आता आफ्रिका खंडातील इथिओपिया, सोमालिया, केनिया, सुदान, नायजेरिया आणि घाना या देशांमध्ये देखील आढळते.
या प्रयोगासाठी जिबूतीची निवड का करण्यात आली?
एनोफेलीज स्टीफेन्सी जातीचे डासांच मूळ आशिया खंडात आहे. या डासांवर नियंत्रण मिळवू खूप कठीण असतं.
या डासांना शहरी डास असंदेखील म्हटलं जातं. डासांवर नियंत्रण मिळवण्याच्या पारंपारिक पद्धतींवर मात करण्यात या डासांना यश आलं आहे.
या प्रकारचे डास दिवसा आणि रात्रीदेखील चावतात. या जातीवर रासायनिक किटनाशकांचादेखील परिणाम होत नाही.
जिबूतीच्या राष्ट्राध्यक्षांचे आरोग्य सल्लागार डॉक्टर अब्दुल्लाह अहमद आब्दी यांनी फायनान्शियल टाइम्सला सांगितलं की "जिबूती मध्ये मलेरियाच्या प्रसाराला तात्काळ आळा घालणं हे त्यांच्या सरकारचं उद्दिष्ट होतं. कारण मागील एक दशकाच्या कालावधीत या आजारात खूप वाढ झाली आहे."

फोटो स्रोत, Oxitec company
या योजनेशी संलग्नित असोसिएशन म्युचुआलिस या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉक्टर बोउह आब्दी खैरेह यांनी सांगितलं की, "आमच्या समाजात मलेरियाचा आजार होणं ही खूपच दुर्मिळ गोष्ट असायची ही बाब खूप जास्त जुनी नाही."
डॉक्टर खैरेह सांगतात की, "आता तर जिबूतीमध्ये दररोज मलेरियाच्या रुग्णांना या आजाराचा त्रास सहन करताना पाहावं लागतं. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे."
ही योजना राबविणाऱ्यांचं म्हणणं आहे की, जिबूती एक छोटासा देश आहे. दहा लाखांपेक्षा थोडी अधिक लोकसंख्या असणाऱ्या या देशातील बहुतांश लोक शहरांमध्ये राहतात. अशा परिस्थितीत तिथे मलेरियाविरुद्ध नवीन योजना सुरू करणं अतिशय सोपं आहे.
या योजनेसाठी समाजालादेखील सोबत घेण्यात आलं आहे. मलेरियाच्या आजाराला तोंड दिलेले सादा इस्माइल देखील या योजनेशी जोडलेले आहेत.
इस्माइल यांनी सांगितलं की, "आमच्या आरोग्यावर परिणाम करणारं मलेरिया हे खूप गंभीर आव्हान आहे. हे नवे मैत्रीपूर्ण डास मलेरियाविरुद्धची लढाई जिंकण्यास कशाप्रकारे मदत करतात, याची लोकं आता वाटत पाहत आहेत."
जीएमओ जीवांविषयीचा वाद
जेनेटिकली मॉडिफाईड जीवांबद्दल आफ्रिकेत नेहमीच वाद निर्माण होत आला आहे. पर्यावरणवादी संघटना आणि पर्यावरणाशी संबंधित योजना राबविणाऱ्या संस्था इशारा देतात की, या प्रकारच्या कामाचा सध्या अस्तित्वात असलेल्या अन्न साखळी आणि इकोसिस्टमवर खूप विपरित परिणाम होईल.
मात्र, ऑक्सिटेकचे प्रमुख फ्रेंडसेन म्हणतात की मागील दहा वर्षांच्या काळात या समस्येवर जैविक उपाययोजना विकसित करणाऱ्यांनी वातावरणात एक अब्ज पेक्षा अधिक मॉडिफाईड डास सोडले आहेत. आतापर्यत या डासांचा विपरित परिणाम झाल्याचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.
आपला युक्तिवाद मांडताना फ्रेंडसेन पुढे म्हणतात की, "आम्ही जे काही वातावरणात सोडू ते सुरक्षित असावं आणि खूपच प्रभावी असावं, यावर आमचा भर आहे. पर्यावरणावर याचा विपरित परिणाम होणार नाही. कारण हे डास विषारी किंवा अॅलर्जी पसरवणारे नाहीत. तर ते फक्त डासांचे एका विशिष्ट जातीशी संबंधित आहेत."

फोटो स्रोत, GETTY IMAGES
याबाबतीत ऑक्सिटेकचं म्हणणं आहे की, डासांच्या लाळेत जेनेटिकली मॉडिफाईड जनुकं आढळत नाहीत. त्यामुळे प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेले हे डास कोणाला चावले तरी त्यांच्यावर या जनुकीय बदलांचा कोणाताही दुष्परिणाम होणार नाही.
राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार डॉक्टर आब्दी म्हणतात, "समस्येवरील हा नवा उपाय वादग्रस्त असू शकतो, मात्र भवितव्य योग्य असेल."
ते म्हणतात की, जर हा प्रयोग यशस्वी झाला तर प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या डासांना जास्त मोठ्या परिसरात सोडून आणखी मोठे प्रयोग केले जातील. जिबूतीमध्ये या नव्या डासांना खुल्या हवेत सोडण्याचा प्रयोग पुढील एक वर्षभर सुरू राहील.
मलेरिया हा एक गंभीर आजार आहे. या आजारामुळे दरवर्षी जगभरात किमान सहा लाख लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मलेरियामुळे होणाऱ्या दहा मृत्यूंपैकी नऊ मृत्यू एकट्या आफ्रिका खंडाच्या सहारा विभागात होतात.











