रक्ताने माखलेल्या शर्टच्या मदतीने पोलिसांनी कसा लावला अभिनेत्रीच्या हत्येचा छडा

क्रितिका चौधरी

फोटो स्रोत, FACEBOOK

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबईत चित्रपटसृष्टीत नशीब आजमावण्यासाठी स्वप्नांच्या नगरीत दररोज अनेक तरुण तरुणी येतात. त्यापैकी एक होती अभिनेत्री क्रितिका चौधरी.

दीर्घ संघर्षानंतर टीव्ही इंडस्ट्रीत क्रितिका चौधरीला अनेक भूमिका मिळाल्या. मात्र, 2017 साली मुंबईत तिच्या राहत्या घरी तीची हत्या झाली. तिच्या हत्येने खळबळ उडाली होती.

एकेकाळी टेलिफोन नेटवर्क कंपनीत काम करणाऱ्या क्रितिकाने नायिका बनण्यासाठी मुंबई गाठली.

दीर्घ संघर्षानंतर, तिला स्टार प्लस वाहिनीचा लोकप्रिय शो 'परिचय'मध्ये एक छोटी भूमिका मिळाली. पुढे टीव्ही इंडस्ट्रीत असताना तिला 'सावधान इंडिया' आणि बालाजी प्रोडक्शनच्या अनेक शोमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या.

तिला अभिनेत्री कंगना राणावतच्या 'रज्जो' या चित्रपटात तिच्या बहिणीची भूमिका ही मिळाली होती. क्रितिकाच्या स्वप्नांना पंख फुटू लागले होते, पण एके दिवशी तिची हत्या झाली.

प्रतिकात्मक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

2017 मध्ये क्रितिकाचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडला. हा मृतदेह 4 दिवसांपासून बंद फ्लॅटमध्ये कुजत होता, दुर्गंधी लपविण्यासाठी घराचा एसी सुरू ठेवला होता. 2017 साली ही हत्या खूप गाजली. क्रितिकाची हत्या का आणि कशासाठी झाली याचा उलगडा हा चर्चेचा विषय होता.

क्रितिका ही ड्रग्ज व्यसनी होती, तिने हत्येपूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पुढे पोलीस तपासात समोर आले.

अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तिची वृत्ती बिघडली आणि मित्र ही दूर गेले. ती एकटी राहत असताना तीने अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते.

क्रितिकाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांना काही महिने लागले, पण हत्येचे प्रकरण उघडकीस आल्यावर त्याचे कारण जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

काय होती घटना ? अणि कशी घडली हत्या ?

तारीख 12 जून 2017...

पत्ता फ्लॅट क्र. 503, श्री भैरवनाथ एसआरए सोसायटी, अंधेरी (पश्चिम)...

दुपारचे 3.45 वाजले होते....

इमारतीच्या 5व्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना फ्लॅट क्रमांक 503 मधून विचित्र वास येत होता.

त्या फ्लॅटमध्ये अभिनेत्री क्रितिका चौधरी राहत होती, तिचा आजूबाजूच्या लोकांशी फारसा संवाद नव्हता.

शेजारचे लोक फक्त तिला येताना आणि जाताना पाहायचे. ती अनेकदा कामानिमित्त घराबाहेर असायची आणि बहुतेक शेजारच्या लोकांना तिच्या व्यवसायाची माहितीही नव्हती.

मात्र, त्यादिवशी घरात शेजारून येणाऱ्या अती दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी घरात काहीतरी असल्याचा संशय व्यक्त केला. सर्वांना शंका आल्यामुळे इमारतीतील लोक जमा होऊ लागले.

जसजसे लोक फ्लॅटच्या दिशेने सरकत होते तसतसा काहीतरी सडल्यासारख आधिक वास येत होता.

बारकाईने लक्ष दिल्यावर फ्लॅटमधून टीव्हीचा आवाज ऐकू येऊ लागला, पण दरवाजा बाहेरुन बंद होता. आजूबाजूच्या लोकांनी असेच घरात घुसणे, योग्य न वाटल्याने उपस्थितांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी त्यांच्या पथकासह दरवाजा उघडून घरात प्रवेश केला तेव्हाचे दृश्य हादरवणारे होते.

नाईट ड्रेस परिधान केलेल्या क्रितिका चौधरीचा रक्ताने माखलेला मृतदेह पलंगावर पडला होता आणि कुजला होता. मृतदेह कुजू नये म्हणून मारेकर्‍यांनी एसी सुरू ठेवला होता. तिच्या डोक्यावर खोल जखमा होत्या, त्यातून रक्तस्त्राव झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.

क्रितिकाचा फोन वाजत होता पण...

त्यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ बोटात घातलेला लोखंडी पंजा सापडला होता, त्यावर रक्त लागले होते. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला एक शर्टदेखील सापडला होता. तसेच पोलिसांना बेडजवळ कृतिकाचा मोबाईल सापडला, ज्यामध्ये तिच्या कुटुंबीयांकडून सतत कॉल होते.

पोलिसांनी या घटनेनंतर भावाचा येणारा कॉल उचलला, समोरून क्रितिकाच्या काळजीत भावाचा आवाज येत होता.

क्रितिका चौधरी

फोटो स्रोत, FACEBOOK

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तिच्या भावाने सांगितले की, तो अनेक दिवसांपासून क्रितिकाला फोन करत होता, पण प्रतिसाद मिळत नव्हता. पोलिसांनी उत्तर दिले आणि सांगितले की त्याची बहीण आता नाही. वाईट बातमी सांगण्याबरोबरच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर मुंबईला येण्यास सांगितले.

12 जून रोजी क्रितिका चौधरीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिचा भाऊ आणि आई मृतदेह घेण्यासाठी मुंबईत पोहोचले. मृतदेह इतका कुजला होता की कुटुंबीयांनी अंधेरीतील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले.

घराची तपासणी केली असता पोलिसांना 22 हजार रुपये रोख सापडले, ते त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, क्रितिकाचा मृत्यू डोक्याला खोलवर झालेल्या दुखापतीमुळे झाला. त्याच्या डोक्यावर धारदार वस्तूने तीन वार करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला.

मृतदेहाजवळ पोलिसांना लोखंडी पंजा सापडला ज्याने तिची हत्या करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला एक शर्ट देखील सापडला.

पोलिसांनी पंचनामा केला, अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला.

पोलीस आरोपीपर्यंत कसे पोहोचले?

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी क्रितिकाच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

याशिवाय इमारतीत असलेल्या किराणा दुकानदाराचीही चौकशी करण्यात आली. दुकान मालकाने पोलिसांना सांगितले की, क्रितिका 7 जून रोजी संध्याकाळी त्याच्या दुकानात आली होती. तिने दूध, ताक आणि सिगारेटचे पाकीट घेतले होते, पण तेव्हापासून ती दिसली नाही.

याप्रकरणी अनेक सीसीटीव्हीचे चित्रणदेखील तपासण्यात आले, त्यात इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन लोक इमारतीतून बाहेर पडताना दिसत होते. सीसीटीव्ही फुटेज हा या प्रकरणात महत्त्वाचा दुवा ठरला. पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या दोन अनोळखी तरुणांचा शोध सुरू केला.

तर दुसरीकडे क्रितिकाच्या फ्लॅटची झडती घेतल्यानंतर पोलिसांना एक रॉयल प्रीमियम कंपनीचा शर्ट सापडला ज्यावर क्रितिकाच्या रक्ताचे डाग होते.

पोलिसांनी शर्टच्या माध्यमातून मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा ही प्रयत्न सुरू केला. या शर्टच्या माध्यमातून डीएनए शोधण्यात आला आणि शर्टच्या मालकापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी अनेक किरकोळ विक्रेत्यांकडे चौकशी केली. मात्र ही शर्टची कंपनी दुबईतली होती, त्यामुळे अभिनेत्रीच्या मृत्यूचा परदेशाशी संबंध आहे का, असा प्रश्न ही यावेळी उपस्थित होऊ लागला.

पोलिसांनी हे परदेशी दुबईतलं शर्ट मुंबईत कोणी ऑनलाइन तर मागवलं नाही ना? या दृष्टीने ऑनलाइन कपडे खरेदी करणाऱ्या कंपन्यांची ग्राहकांची माहिती मागवली. मात्र त्यात देखील काही निष्पन्न झाले नाही. या तपासात देखील पोलिसांना काही निष्पन्न झालं नाही असे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितले होते. मात्र या शर्टाचा संदर्भ पुढे पोलीस तपासात फार उपयोगी ठरला, असा देखील पोलिसांनी सांगितलं.

सीडीआरमध्ये धक्कादायक माहिती समोर

मग मात्र पोलिसांनी या प्रकरणात कॉल हिस्ट्री देखील तपासली. तसेच क्रितिकाच्या मोबाईलचा दोन वर्षाचा सीडीआर शोधला.

यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात अधिक कॉल हे ड्रग्स पेडलर्सचे होते. यावरून आणि अधिक तपास केला असता, क्रितिका ही ड्रग्सच्या आहारी गेली होती आणि ती अनेक ड्रग्स पेडलर्सच्या संपर्कात होती हे तपासात निष्पन्न झालं.

पोलीस तपासात पुढे असंदेखील निष्पन्न झालं की एका पेडलरकडून दोन वर्षं सतत ती ड्रग्स घेत होती. त्याचं नाव आसिफ उर्फ सनी होतं, त्याला 2016 मध्ये घाटकोपर अमली पदार्थ विरोधी कारवाई करणाऱ्या घाटकोपरच्या युनिटने अटक केली होती.

मात्र आसिफची चौकशी केली असता, सहकारी शकील नसीम खान (33) क्रितिकाला ड्रग्ज पुरवतो, अशी माहिती समोर आली होती. मात्र पोलिस शकीलपर्यंत पोहोचण्याआधीच शकील खान गोवंडीतील घरातून फरार झाला.

क्रितिका चौधरी

फोटो स्रोत, FACEBOOK

सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसणारा एक व्यक्ती हा शकीलच होता. त्याने इमारतीत येण्यापूर्वी तपासा दरम्यान समोर आलेल्या शर्ट देखील घातला होता. काही दिवस पोलिसांना शकील इथून तिथून नाचवत होता.

अखेर शकीलला पनवेल परिसरातून पोलिसांनी सापळा रचून पकडले. शकीलने चौकशीत पोलिसांना एकेक गुपित सांगायला सुरुवात केली. शकीलच्या माहितीवरून पोलिसांनी नालासोपारा येथे राहणार त्याचा साथीदार वासुदास उर्फ बादशाह यालाही अटक केली.

पैसे न दिल्यामुळे शकील रागाने संतापला

क्रितिकाने वर्षभरापूर्वी शकीलकडून ड्रग्ज विकत घेतल्याचे दोघांनी पोलिसांना चौकशीत सांगितले. मात्र त्यावेळी तिने 6000 रुपये कमी दिले होते आणि नंतर ती रक्कम देण्यास टाळाटाळ करत होती.

क्रितिका अनेक दिवसांपासून त्याला पैसे टाळत होती आणि अनेक वेळा पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला होता. काही महिन्यांनंतर शकीलला ड्रग्ज पेडलिंग आणि कारचोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शकीलला पैशांची गरज होती, मात्र त्याच्याकडे क्रितिकाचा मोबाईल नंबर नव्हता.

अशा परिस्थितीत काही लोकांच्या मदतीने त्यांनी क्रितिकाचा घराचा पत्ता शोधून काढला. तो पहिल्यांदा पैसे मागण्यासाठी गेला असता क्रितिकाने त्याला काही दिवसांनी येण्यास सांगितले.

तो पुन्हा आल्यावर क्रितिकाने टाळले. क्रितिकाने सतत पैसे देण्यास नकार दिल्याने शकील रागाने संतापला होता.

एके दिवशी शकील क्रितिकाच्या घरी गेला, प्रथम घरी त्यांनी जेवण केलं आणि नंतर वाद झाला आणि त्यानंतर तो निघून गेला. यानंतर 8 जूनला शकील ने मित्र वासुदास याला फोन करून रूतिकासोबत हे प्रकरण मिटवणार असून तू सोबत चल असे सांगितले. वासुदासनेच क्रितिकाला शकीलच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवले होते.

सायंकाळी दोघेही तिच्या घरी पोहोचले. शकिलने पैसे मागितले असता, तिने पुन्हा टाळाटाळ केली. तिघांमध्ये बराच वेळ संवाद झाला, त्यानंतर त्यांनी घरी जेवण केले.

जेवणानंतर तिघांमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे रूपांतर वादात झाले. वाद सुरू असताना शकीलने क्रीतिकाच्या डोक्यावर लोखंडी पंजाने घाव केला.

पहिल्याच हल्ल्यात तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले, पण शकील थांबला नाही. त्याने तिच्या डोक्यावर तीनदा मारले, त्यामुळे तिचा मृत्यू झाला.

त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील क्रितिकाच्या घरी जाण्यापूर्वीच तिची हत्या करण्याचा कट रचला होता. आपण काही पैसे गोळा करणार आहोत, सोबत गेल्यास पैसेही मिळू शकतील, असे सांगून त्याने आपल्या मित्राला सोबत येण्यास सांगितले.

त्याने बरोबर दोन लोखंडी पंजे आणि दुबई स्थित मित्राकडून देण्यात आलेला शर्ट घेतला. स्वतःच्या शर्टाला रक्त लागल्याने त्याने पिशवीतून कपडे काढले आणि तो घाणेरडा शर्ट तिथेच टाकून, दुसरा शर्ट बदलला. मृतदेह सडू नये म्हणून दोघांनी एसी चालू केला आणि टीव्ही चालू केला आणि निघून गेले.

या तपासात आरोपीचा शर्ट फार महत्त्वाचा ठरला

आरोपीने घातलेला शर्ट हा दुबईतील स्थित एका कंपनीचा होता. हत्या झाली तेव्हा रक्ताने माखलेला हा शर्ट सापडला होता. आरोपीने हत्या केल्यानंतर हा शर्ट तिथेच सोडला होता.

आरोपीची पुसटशी माहिती मिळाली असता सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या शकील या आरोपीने घरी येताना हाच शर्ट घातला होता. तसेच या प्रकरणात एका पेडलरने पोलिसांच्या वर्णनानंतर दिलेल्या माहितीत, तो महागडे परदेशी कपडे घालायचा असं शर्टाचा उल्लेख केला असता,चौकशी दरम्यान हाच आरोपी आहे हे पोलिसांच्या लक्षात आले.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

त्यावेळी सहा हजार रुपयांसाठी क्रितिकाचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले. तेव्हा क्रितिकाच्या कुटुंबीयांचा त्यावर विश्वास बसला नाही.

तिचा भाऊ दीपकला विश्वास होता की क्रितिकाने सहज 6,000 रुपये परत केले असते. त्याच्या घरात 22 हजार रुपये सापडले.

जर तिला पैसे परत करायचे असतील तर ती ते पैसे वापरू शकते. क्रितिकाचे सोन्याचे दागिने आणि काही मौल्यवान वस्तूही गायब असल्याचे अभिनेत्रीचा भाऊ दीपक याने पोलिसांना सांगितले होते.

याप्रकरणी आंबोली पोलिसांनी आणि इतर पथकांनी शकील नसीम खान 33 वर्ष आणि बादशाह उर्फ बासुदास यांना हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अनेक पुरावे सादर करत, दिंडोशी न्यायालयात हे प्रकरण नेले.

पुढे प्रथमदर्शनी याप्रकरणी दोघांना दोषी ठरवण्यात आले. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. 14 डिसेंबर 2018 ला जामीन याचिका आरोपींची करण्यात आली होती मात्र तिही कोर्टाने फेटाळली. नुकतेच या डिसेंबर 2024 महिन्यामध्ये आरोपी बासुदास यांच्या वकीलामार्फत मुंबई हायकोर्टात करण्यात आलेली जामिनाची याचिका देखील फेटाळली.

वरील सर्व माहिती तत्कालीन पोलिस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI ) वृत्तसंस्थेला दिली होती. याप्रकरणी तपास करण्यासाठी तत्कालीन सहायक पुलिस आयुक्त अरुण चव्हाण, अंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड, निरीक्षक उदय राजेशिर्के, नंदकिशोर गोपाळे , सहायक निरीक्षक गजानन जोगदंडे, दया नायक आणि अन्य कर्मचारी सहभागी होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन