'मुस्लिमांशी बोलायचं नाही, पार्टीला जायचं नाही', कर्नाटकात का होतायत महिलांवर हल्ले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. कर्नाटकच्या किनारपट्टी भागातल्या मंगळुरू शहरात एक मुलगा एका मुलीसोबत चालला होता, तेवढ्यात काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांना धक्काबुक्की केली.
या कार्यकर्त्यांचं म्हणण होतं की हा मुस्लीम मुलगा हिंदू मुलीला फुस लावून ‘लव्ह जिहाद’ करत आहे. प्रत्यक्षात ते दोघे एकमेकांचे ऑफिसमधले सहकारी होते आणि तो त्या मुलीला आपल्या वरिष्ठांच्या सांगण्यावरून घरी सोडायला जात होता.
या घटनेचा इतका परिणाम त्या दोघांच्या मनावर झाला की त्यांनी बीबीसी प्रतिनिधीशी झालेल्या प्रकाराबद्दल काहीही बोलायला नकार दिला, ना या विरोधात पोलिसात तक्रार केली.
कर्नाटकमध्ये घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाहीये.
अगदी काही दिवसांपूर्वी कर्नाटकातल्या दक्षिण कन्नडा जिल्ह्यातल्या पुत्तुर गावात एका हिंदू मुलीशी बोलल्यावरून एका मुस्लीम मुलावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी चार जणांना अटकही झाली आहे.
मोहम्मद पारीस नावाचा 18 वर्षांचा तरूण त्याच्या घरच्यांनी चालवलेल्या ज्युस शॉपवर उभा होता, तेव्हा त्याच्या कॉलेजमधले काही सहकारी आले. त्यातल्याच एका मुलीशी बोलताना आरोपींनी त्याला बाजूला नेलं आणि त्याला मारहाण केली.
कर्नाटकमध्ये 10 मेला मतदान होणार आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लीम धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा अजेंड्यावर आहे. कर्नाटक काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलंय की जर ते सत्तेत आले तर धार्मिक तणाव पसरवणाऱ्या ‘बजरंग दलासारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल’.
काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या मुस्लीम संघटनेविरोधात कारवाई करू असंही म्हटलं आहे.

फोटो स्रोत, PFI
कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हिंदू-मुस्लीम तणाव पसरवण्याचं काम काही लोकांकडून होत असतं. पण धार्मिक ध्रुवीकरणाच्या पलीकडे जाऊन हा मुद्दा महिलांच्या हक्कांशी आणि स्वातंत्र्याशी संबधित आहे.
याचं एक ठसठशीत उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी मार्च महिन्यात कर्नाटकच्या किनारपट्टी भागातल्या शिवमोगा जिल्ह्यात एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये महिलांची पार्टी चालली होती. तिथे बजरंग दलाचे कार्यकर्ते जाऊन पोचले आणि त्या महिलांना तिथून निघून जायला सांगितलं.
या पार्टीत महिलांनी घातलेल्या कपड्यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता असंही माध्यमांनी म्हटलं होतं.
यानंतर माध्यमांशी बोलताना बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख राजेश गौडा म्हणाले होते, “अशा गोष्टी हिंदू संस्कृतीच्या विरोधात आहेत आणि अशा गोष्टी आम्ही शिवमोगामध्ये घडू देणार नाही.”
“महिलांनी कोणते कपडे घालावेत, कोणाशी बोलावं, कुठे जावं, कोणाबरोबर असावं या सगळ्या गोष्टींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आहे हा,” बंगळुरूमधल्या सामाजिक कार्यकर्त्या वृंदा अडिगे बीबीसीशी बोलताना म्हणतात.
“दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात तरूण पिढी एकाच विचारधारेच्या आहारी जाऊन दुसऱ्याचा आदर करणं विसरत आहे. मुस्लीम मुली हिजाब घालण्याच्या अधिकारावरून शिक्षण सोडतात, हिंदू मुली भगवी शाल घेऊन शाळा-कॉलेजात जातात. संस्कृतीच्या नावाखाली त्यांना बंधन मान्य असतात, अशाने फक्त महिला सशक्तीकरणाच्या धोरणाचं नुकसान होतं.”
त्या पुढे म्हणतात, “आमचा प्रयत्न आहे की महिलांनी – मग त्या कोणत्याही जाती-धर्माच्या असोत, स्वतंत्र व्हावं, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. पण अशा घटनांमुळे ही उदिष्ट बॅकफुटवर जातात. एकतर महिला अशा धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला घाबरून व्यक्त होत नाहीत, स्वतःवर बंधन घालून घेतात किंवा या विचारसरणीला बळी पडून ती अंगीकारतात. दोन्ही वाईटच.”
‘आम्ही जे करतो ते धर्मरक्षणासाठी’
हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे की त्यांना ‘हिंदू संस्कृती आणि परंपरांचं रक्षण करायचं आहे त्यामुळे ते अशी भूमिका घेतात.
कर्नाटकमधले विश्व हिंदू परिषदेचे नेते शरण पंपवेल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “हा देशाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तरूण-तरूणींनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना सभ्य असावं. तसंच वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र पार्टी करणं किंवा सोबत दारू पिणं हे धर्माच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. असं घडायला नको.”

फोटो स्रोत, Getty Images
पंपवेल यांचा असाही दावा आहे की सामान्य लोकांकडून तक्रारी आल्यानंतरच आम्ही अशा कारवाया करतो. त्यावेळी होणाऱ्या मारामारीचं, शिवीगाळीचंही ते समर्थन करतात.
माध्यमांशी बोलताना पंपवेल म्हणाले होते, “मॉरल पोलिसिंग हे मीडियाने दिलेलं नाव आहे, खरंतर आम्ही जे करतो ते धर्मरक्षणासाठीच करतो.”
दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की भाजपप्रणित सरकार आल्यानंतर अशा कार्यकर्त्यांना अभय मिळालं आहे.
कर्नाटकमधल्या वाढत्या मॉरल पोलिसिंगच्या घटनांनंतर 2021 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आधी म्हटलं की ते अशा घटनांविरोधात कडक कारवाई करतील. पण त्यानंतर काही दिवसातच त्यांनी आपलं वक्तव्य फिरवत मंगळूरूमध्ये म्हटलं की, “जर समाजात नैतिकता नसेल तर जिथे अॅक्शन असेल तिथे रिअॅक्शन येणारच.”
याच्या काही दिवस आधी एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची मॉरल पोलिसिंगच्या केसमध्ये जामिनीवर मुक्तता झाली तेव्हा भाजप आमदार उमानाथ कोटियन त्याला घ्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेले.
या घटनेनंतर खूप वाद झाला, विरोधी पक्षांनी भाजपवर अशा कार्यकर्त्यांना अभय दिल्याचा आरोप केला. त्यानंतर सारवासारव करताना कोटियन यांनी म्हटलं होतं की, “आरोपीची बायको-मुलं मला भेटायला आले आणि त्याची जेलमधून सुटका करावी अशी विनंती केली. मी फक्त एक आमदार म्हणून माझं कर्तव्य केलं.”
याच घटनेवर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी ‘अॅक्शन-रिअॅक्शन’ चं वक्तव्य केलं होतं.
“हा संवेदनशील मुद्दा आहे. लोकांच्या भावना दुखावल्या जातील असं काही करायला नको. जर भावना दुखावल्या गेल्या तर अॅक्शन-रिअॅक्शन घडणारच.”
कर्नाटकच्या किनारपट्टी भागातच का?
अशा प्रकारच्या ‘मॉरल पोलिसिंगच्या’ घटना कर्नाटकच्या किनारपट्टी भागात सतत घडताना दिसत आहेत. त्यांना इतिहासही आहे. त्याचं लोण आता राज्यात इतरत्र पसरत आहे, पण याच भागात असं काय आहे की इथे या घटना नित्यनियमाने घडतात?
या प्रश्नाचं उत्तर देताना मंगळुरूस्थित सामाजिक कार्यकर्त्या विद्या दिनकर म्हणतात, “कारण कोस्टल कर्नाटक ही हिंदुत्ववाद्यांची प्रयोगशाळा आहे. लव्ह जिहाद हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. हिंदू मुलींना मुस्लीम मुलं प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात हे नरॅटिव्ह इथेच सुरू झालं. ताज्या संदर्भात सांगायचं झालं तर हिजाब वाद इथूनच सुरू झाला.”

फोटो स्रोत, Getty Images
त्या पुढे म्हणतात, “दुसरं म्हणजे कर्नाटकचा किनारपट्टी भाग हिंदुत्ववाद्यांचा गड आहे, अगदी भाजप सत्तेत नव्हता तेव्हाही गड होता. त्यामुळे हिंदुत्वाचं राजकारण पुढे कसं न्यायचं, त्याला प्रतिसाद कसा मिळतोय, हे सगळं या भागात टेस्ट केलं जातं. गोरक्षा वादही इथे निर्माण झाला आणि मग पुढे देशभरात गेला. आता ते महिला हक्कांच्या बाबतीत होतंय. त्यांनी कोणाशी बोलायचं, कोणते कपडे घालायचे, कुठे जायचं, कोणाशी मैत्री करायची यासगळ्यावर बंधनं आणण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याला संस्कृतीरक्षण असं नाव दिलं जातंय.”
“धर्म तसंच समाजाशी बाई निगडीत असते आणि तिने पुराणतवाद्यांचे नियम मोडले तर गहजब होतो. हीच मानसिकता इथे दिसतेय. अशा वागण्याने पुन्हा एकदा महिलांचा स्वतःच्या शरीरावरचा, स्वातंत्र्यावरच्या हक्का नाकारला जातोय, आणि त्याला मुलामा दिला जातोय ‘भारतीय नारी’ चा. दुर्दैव असं की अनेक तरूण मुली या विचारसरणीला बळी पडत आहेत. आपण जणू भूतकाळात जात आहोत,” अशी खंत विद्या व्यक्त करतात.
मॉरल पोलिसिंगच्या घटनांचा इतिहास
विद्या म्हणतात त्याप्रमाणे महिलांवर हल्ले किंवा ‘मॉरल पोलिसिंगच्या’ घटना इथे नव्या नाहीयेत.
2009 साली मंगळुरूमधल्या एका पबमध्ये जाणाऱ्या काही मुलींवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हल्ले आणि त्यांचा विनयभंग केल्याची घटना खूप गाजली होती. हा हल्ला श्रीराम सेने नावाच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांचं म्हणणं होतं की पबमध्ये जाणाऱ्या महिला ‘भारतीय परंपरांचा अनादर’ करत आहेत. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी या हल्ल्याचा निषेध केला होता तसंच याविरोधात ‘पिंक चड्डी’ ही मोहीमही राबवली गेली होती ज्या अंतर्गत लोकांनी, महिलांनी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना गुलाबी रंगाची अंर्तवस्त्र पाठवली होती.
2018 साली या हल्ल्यातल्या सर्व आरोपींची कोर्टाने पुरेशा पुराव्यांअभावी मुक्तता केली होती. त्यावेळी तपास यंत्रणेवर कोर्टाने ताशेरेही ओढले होते. त्यांनी म्हटलं होतं की सरकारी पक्षाने हल्ल्याचा व्हीडिओ कोर्टात सादर केला नाही, जो व्हीडिओ सगळ्या टेलिव्हिजन चॅनल्सने दाखवला होता.
यावेळी आपलं मत नोंदवताना कोर्टाने असंही म्हटलं होतं की पोलिसांनी या हल्ल्यात गुंतलेल्या आरोपींना आडून आडून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता.
2008 साली मंगळुरूमध्ये एका हल्ल्यात बजरंग दलाचंही नाव आलं होतं. गोरक्षेच्या नावाखाली काही लोकांना धमकी दिल्याप्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








