रेचेप तैय्यप अर्दोआन : लहानपणी सरबत विकलं, पदवी वादात अन् दोन दशकांपासून तुर्कीवर सत्ता

फोटो स्रोत, Getty Images
( तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारा हा लेख पुन्हा प्रकाशित करत आहोत.)
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांचे प्रमुख विरोधक असलेल्या इकरेम इमामोगूल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनाचं लोण पेटलं आहे.
बऱ्याच ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा मारा केला. मागच्या अनेक वर्षांतील हे तुर्कीमधील सर्वात मोठं आंदोलन बनलं असून देशातील परिस्थिती असमान्य आणि अस्थिर बनत चालली आहे.
या आंदोलनाची सुरुवात इस्तांबूलमध्ये 19 मार्च रोजी झाली. त्या दिवशी देशातील प्रमुख विरोधी पक्षनेते आणि राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांचे कडवे टीकाकार इकरेम इमामोगूल यांना अटक झाल्यानंतर हे आंदोलन पेटायला सुरूवात झाली.
इकरेम इमामोगूल यांना पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्दोआन यांच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ही अटक झाली असल्यानं या आंदोलनानं राजकीय वळण घेतलं.
देशभरात पसरलेली आंदोलनाची लाट बघता सीएचपी पक्षाच्या या आवाहनाला तुर्कीच्या नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, रेचेप तैय्यप अर्दोआन यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली ते जाणून घेऊया.
अर्दोआन यांचं व्यक्तिमत्व
तुर्कस्तानचे रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी अगदी सामान्य परिस्थितीतून राजकारणात मोठी झेप घेतली. मागच्या 20 वर्षांपासून त्यांच्या हाती तुर्कस्तानच्या सत्तेची सूत्रं त्यांच्याच हाती आहेत. कमाल अतातुर्क यांच्यानंतर जर कोणी तुर्कीला पुढे आणलं असेल तर ते अर्दोआन आहेत.

फोटो स्रोत, EPA-EFE
अनेक संकटांना तोंड देत त्यांनी 2023 ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. देशातील जवळपास निम्म्या लोकांनी त्यांना मत दिलं नाही.
त्यांच्या टीकाकारांनी त्यांच्यावर चुकीची आर्थिक धोरणं राबवून लोकांचं दैनंदिन जीवन अडचणीत आणल्याचा आरोप केला आहे.
अर्दोआन यांनी तुर्कीच्या आधुनिकीकरणाचा आणि विकासाचा ऐतिहासिक रेकॉर्ड तयार केला आहे. पण फेब्रुवारीत आलेल्या दुहेरी भूकंपामुळे तुर्कीमध्ये बरंच नुकसान झालं. यातून बाहेर पडण्यात अर्दोआन यांना अपयश आलं.
या शक्तिशाली भूकंपातून देशाचं रक्षण करण्यात आलेलं अपयश आणि अर्थव्यवस्थेचं चुकीचं व्यवस्थापन केल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला आहे.
सत्तेची शिडी
रेचेप तैय्यप अर्दोआन यांचा जन्म फेब्रुवारी 1954 मध्ये झाला. त्यांचे वडील तुर्की तटरक्षक दलात कार्यरत होते.
अर्दोआन 13 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी आपल्या पाच मुलांसाठी इस्तंबूलमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

फोटो स्रोत, NECATI SAVAS/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK
अर्दोआन तरुण असताना पैसे कमवण्यासाठी लिंबू सरबत आणि एक प्रकारची डबलरोटी (सीमीट) विकायचे.
त्यांनी इस्लामिक शाळेत शिक्षण घेऊन पुढे इस्तंबूलमधील मरमरा विद्यापीठातून व्यवस्थापन विषयात पदवी घेतली.
त्यांनी केलेला डिप्लोमा अनेकदा वादात सापडलाय. त्यांचे विरोधक म्हणतात की, अर्दोआन यांनी कोणत्याही विद्यापीठातून पदवी घेतलेली नाहीये. त्यांची पदवी एका डिप्लोमाच्या बरोबरीची आहे. पण अर्दोआन यांनी हे आरोप फेटाळलेत.
अर्दोआन यांना फुटबॉलची आवड असल्याने त्यांनी 1980 च्या दशकापर्यंत सेमी-प्रोफेशनल स्पर्धांमध्ये भाग घेतला.
पण त्यांना राजकारणाची आवड होती.
1970 आणि 80 च्या दशकात ते इस्लामी वर्तुळात सक्रिय होते. याच दरम्यान ते नेमेटिन एरबाकानच्या इस्लाम समर्थक वेल्फेअर पार्टीत सामील झाले.
अर्दोआन यांनी 1994 मध्ये इस्तंबूलच्या महापौरपदाची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. यानंतर पुढचे चार वर्ष त्यांनी इस्तंबूलचं महापौरपद भूषवलं.
राजकारणाची सुरुवात
1997 मध्ये तुर्कस्तान मध्ये सत्तापालट होण्यापूर्वी पंतप्रधान नेमेटिन एरबाकन सत्तेवर होते.
त्याच वर्षी अर्दोआन यांनी राष्ट्रवादावरील एक कविता सार्वजनिक ठिकाणी वाचून दाखवली होती. यातून वांशिक द्वेष भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
या कवितेच्या ओळी होत्या, "मस्जिद हमारे बैरक हैं, गुंबद हमारे हेलमेट हैं, मीनारें हमारा भाला हैं और धर्म में आस्था रखने वाले हमारे सैनिक हैं."
चार महिने तुरुंगवास भोगून ते राजकारणात परतले.
पण 1998 मध्ये आधुनिक तुर्कीच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्या पक्षावर बंदी घालण्यात आली.
ऑगस्ट 2001 मध्ये त्यांनी अब्दुल्ला गुल यांच्यासोबत जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीची स्थापना केली. या पक्षाची विचारधारा इस्लामिक होती.
याच काळात अर्दोआन यांची दोन वर्गांमध्ये लोकप्रियता वाढू लागली.
एक वर्ग असा होता ज्यांच्यामध्ये देशाच्या धर्मनिरपेक्ष अभिजात वर्गामुळे उपेक्षित असल्याची भावना निर्माण झाली होती. आणि दुसरा वर्ग असा होता जो 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात आर्थिक मंदीमुळे त्रस्त होता.
2002 मध्ये एकेपी पक्षाने संसदीय निवडणुकीत बहुमत मिळवलं. त्याच्या पुढच्याच वर्षी अर्दोआन यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. ते आज अखेरपर्यंत पक्षाचे अध्यक्ष आहेत.
सत्तेचं पहिलं दशक
2003 नंतर ते 3 वेळा पंतप्रधान बनले आणि आपला कार्यकाळही पूर्ण केला. त्यांच्या कार्यकाळात स्थिर आर्थिक विकास झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची 'सुधारक' अशी प्रतिमा तयार झाली.
अर्दोआन यांच्या कार्यकाळात तुर्कीमध्ये मध्यमवर्गाची भरभराट झाली. लाखो लोक गरिबीच्या फेऱ्यातून बाहेर आले.

फोटो स्रोत, EPA
हे घडलं कारण अर्दोआन यांनी तुर्कीचं आधुनिकीकरण करण्यासाठी मोठ्या पायाभूत प्रकल्पांना मान्यता दिली.
सत्तेच्या सुरुवातीच्या वर्षात अर्दोआन यांनी तुर्कीच्या कुर्दिश अल्पसंख्याक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवलं.
पण 2013 पर्यंत अर्दोआन यांची सत्ता निरंकुशतेच्या दिशेने वाटचाल करू लागल्याचे आरोप विरोधकांनी केले होते.
2013 च्या उन्हाळ्यात इस्तंबूल शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रसिद्ध गीझी पार्कचा कायापालट होणार होता. याचा निषेध करण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले.
पण हे आंदोलन पार्कपेक्षा जास्त सरकारला आव्हान देण्यासाठी करण्यात आलं होतं.
यानंतर आंदोलकांना गीझी पार्कमधून बळजबरीने हुसकावून लावण्यात आलं. यावेळी पोलीस बळाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
अर्दोआन यांच्या राजवटीतला हा निर्णायक टप्पा होता. ते त्यांच्या विरोधकांशी लोकशाही पेक्षा हुकूमशहासारखे वागत होते.
अर्दोआनचे महिलांबद्दलचे विचार आणि कार्य
तुर्कीमध्ये विद्यापीठ आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना हिजाब घालणं सक्तीचं होतं. अर्दोआन यांच्या पक्षाने ती बंदी उठवली.
1980 च्या लष्करी उठावानंतर हे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण अर्दोआन यांनी पोलीस आणि लष्करात सामील असलेल्या महिलांवरील बंदीही उठवली.
स्वत: धार्मिक असूनही अर्दोआन यांनी देशहितासाठी इस्लामिक मूल्य लादली नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
पण महिलांनी त्यांच्या पूर्वापार भूमिका पार पाडल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. एक स्त्री ही "आदर्श आई आणि आदर्श पत्नी" असते असं त्यांनी वारंवार सांगितलं.
त्यांनी स्त्रीवाद्यांना कायम विरोध केला. स्त्री आणि पुरुष यांना समान वागणूक देता येणार नाही असं त्यांचं मत आहे.
अर्दोआन वैचारिकदृष्ट्या इस्लाम समर्थक असून त्यांनी इजिप्तमधील मुस्लिम ब्रदरहूड सारख्या राजकीयदृष्ट्या सक्रिय इस्लामिक संघटनांना जवळ केलंय.
त्यांनी अनेक प्रसंगी मुस्लिम ब्रदरहुडचा चार बोटांचा सलाम केलाय. याला सलामला रब्बा म्हणतात.
अर्दोआन यांनी जुलै 2020 मध्ये इस्तंबूलच्या ऐतिहासिक हाया सोफियाचं मशिदीत रूपांतर केलं. यामुळे अनेक ख्रिश्चन आणि धर्मनिरपेक्ष मुस्लिम तुर्क संतप्त झाले.
हाया सोफियाची निर्मिती 1,500 वर्षांपूर्वी झाली होती. कमाल अतातुर्क यांनी याचं नव्या धर्मनिरपेक्ष देशाचं प्रतीक म्हणून संग्रहालयात रूपांतर केलं होतं.
सत्तेवर मजबूत पकड
तीन वेळा पंतप्रधानपद भूषवल्यामुळे अर्दोआन यांना 2014 ची पंतप्रधानपदाची निवडणूक लढवता आली नाही. यानंतर ते राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
त्यांनी नव्या राज्यघटनेत राष्ट्रपती पदासाठी सुधारणा करण्याचा घाट घातला. पण या नव्या राज्यघटनेमुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेला आव्हान निर्माण होईल, असं टीकाकारांना वाटत होतं.
राष्ट्रपतीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या पुढ्यात दोन आव्हानं उभी राहिली.
त्यांच्या पक्षाने 2015 मध्ये संसदेतील आपलं बहुमत गमावलं. त्यानंतर 15 जुलै 2016 रोजी तुर्कस्तानात बंडाचा प्रयत्न झाला. कित्येक दशकानंतर तुर्कीने बंड पाहिलं.

फोटो स्रोत, AFP
सत्तापालट करू पाहणाऱ्यांना रोखल्यामुळे सुमारे 300 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
अमेरिकेतील इस्लामिक विद्वान फतुल्लाह गुलेन यांच्या नेतृत्वाखालील गुलेन चळवळीवर कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीमुळे अर्दोआन यांना सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळत गेला. पण हे दोन्ही गट वेगळे झाल्यावर मात्र तुर्कीवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला.
2016 च्या सत्तापालटाच्या प्रयत्नानंतर सुमारे 1,50,000 नागरी सेवकांना बडतर्फ करण्यात आलं. 50,000 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आलं. यात सैनिक, पत्रकार, वकील, पोलीस अधिकारी, शिक्षक आणि कुर्दिश राजकारण्यांचा समावेश होता.
तुर्की सरकारने टीकाकारांवर केलेल्या या कारवाईमुळे परदेशातही चिंता व्यक्त करण्यात आली. यात तुर्कस्तानचे युरोपीय संघाशी असलेले संबंध बिघडले.
याच कारणामुळे तुर्कस्तानचा युरोपियन युनियनमध्ये प्रवेश होऊ शकला नाही.
यादरम्यान तुर्कस्तानमधून ग्रीसमध्ये आलेल्या स्थलांतरितांचा मुद्दा आणखीनच चिघळला.
2017 साली जनतेने त्यांच्या बाजूचा कौल दिला. यामुळे त्यांना राष्ट्रपती पदासोबत आणीबाणी लादण्याचे, उच्च अधिकार्यांची नियुक्ती करण्याचे तसेच कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार व्यापक अधिकार मिळाले.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील योगदान
अर्दोआन यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणातही बोलबाला आहे.
त्यांनी तुर्कस्तानला प्रादेशिक शक्तीच्या स्वरूपात पुढे आणलं. त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीमुळे युरोप आणि मित्रपक्षांना विचार करायला प्रवृत्त केलं.
अर्दोआन यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चांगले संबंध आहेत. युक्रेन-रशिया युद्धात ते मध्यस्थ म्हणून पुढे आले.
काळ्या समुद्रातून धान्य निर्यातीसाठी सुरक्षित कॉरिडॉर व्हावा यासाठी त्यांनी मध्यस्थी केली. पण रशिया या करारातून बाहेर पडल्यावर त्यांनी होणाऱ्या नुकसानापासून तुर्कीचा बचाव केला.

फोटो स्रोत, Getty Images
2019 च्या स्थानिक निवडणुकांमध्ये अर्दोआन यांना बसलेला धक्का त्यांच्या दीर्घकालीन राजवटीला बसलेला पहिला धक्का असल्याचं विश्लेषक सांगतात. या निवडणुकांमध्ये त्यांचा इस्तंबूल, अंकारा आणि इजमीर या तीन मोठ्या शहरांमध्ये पराभव झाला होता.
पण त्यांना मोठा धक्का बसला तो, मुख्य विरोधी रिपब्लिकन पीपल्स पार्टीच्या एकरेम इमामोग्लू यांनी इस्तंबूलचं महापौरपद जिंकल्यावर.
1990 च्या दशकात अर्दोआन स्वतः या शहराचे महापौर होते.
अर्दोआन यांच्या विरोधात राष्ट्रपती पदाचे उमेदवार असलेल्या कमाल कलचदारलू यांनी एकरेम इमामोग्लू यांना मदत केली होती. त्यामुळे इमामोग्लू यांना आपल्या विजयाचा प्रचार संपूर्ण देशभरात करता आला.
इमामोग्लू यांच्या मे महिन्यातील निवडणुकीत सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली होती. पण ओपिनियन पोलमध्ये ते अर्दोआन यांच्या पुढे होते.
अर्दोआन आणि त्यांच्या साथीदारांनी न्यायालयाच्या मदतीने इमामोग्लू यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविल्याचा आरोप करण्यात आला होता.
तुर्कस्तानचा तिसरा सर्वांत मोठा पक्ष एचडीपी हा कुर्दिश अतिरेक्यांशी संबंधित असल्याचे आरोप होऊ लागले. त्यामुळे या पक्षावर बंदी येण्याची भीती होती.
पण तुर्कीच्या जुन्या नेत्यांप्रमाणेच राष्ट्रपती अर्दोआन यांनी बंदी घातलेल्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीला (पीकेके) फटकारले.
पण तुर्कीने सीरियाच्या गृहयुद्धातून पळून आलेल्या 35 लाख निर्वासितांना शरण दिली. यावेळी तुर्कीने कुर्दांना वेगळं करून सीमेपलीकडील कुर्दिश सैन्याविरुद्ध मोहीम सुरू केली.
नाटोचा भाग असताना देखील त्यांनी रशियाची क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली विकत घेतली. शिवाय तुर्कीची पहिली अणुभट्टी तयार करण्यासाठी रशियाची मदत घेतली.
2023 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी पाश्चात्य आपल्या विरोधात असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी आणि पुराणमतवादी मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
ते म्हणाले होते, "माझा देश हे षड्यंत्र हाणून पाडेल."
अर्दोआन यांनी अदनान मेंडेरेस यांच्या समाधीला भेट देऊन 2023 च्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता केली. अदनान मेंडेरेस हे तुर्कीचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडलेले पंतप्रधान होते. पण 1961 मध्ये झालेल्या लष्करी बंडात त्यांची हत्या करण्यात आली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








