तुर्की भूकंपातून भारतानं काय शिकायला हवं, महाराष्ट्राला मोठ्या भूकंपाचा किती धोका?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपामुळे हजारो इमारती कोसळल्या आहेत. आतापर्यंत 35 हजारांहून अधिक लोकांचे यात बळी गेले आहेत.
ती दृश्यं पाहून तुमच्याही मनात एक विचार आलाच असेल. भारतातही अनेक शहरांमध्येही अशी कित्येक अनधिकृत बांधकामं, तसंच जुन्या आणि धोकादायक झालेल्या इमारती आहेत, ज्या भूकंपाच्या एका मोठ्या धक्क्याने पडू शकतात.
अनेक भूवैज्ञानिक आणि नगररचनाकारांच्या मते, ही भीती खरी ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मग तुर्कीतल्या घटनेतून भारतानं काय शिकायला हवं?
महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना अशा भूकंपाचा खरंच किती धोका आहे? इथे मोठा भूकंप कधी झाला होता? बांधकामं करताना आणि अशा इमारतीत राहताना काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांत भारतीय उपखंडाच्या परिसरात 30 हून अधिक असे भूकंप झाले, ज्यांची तीव्रता 3 किंवा 3 पेक्षा जास्त आहे.
ही माहिती नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी या भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेल्या संस्थेनं गोळा केली आहे. या परिसरातील भूगर्भीय हालचालींची नोंद आणि अभ्यास करण्याचं काम ही संस्था करते आणि त्यांचा नकाशा वेळोवेळी अपडेट केला जातो.
नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी आणि अन्य भूगर्भवैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासांनुसार भारताचा 58 टक्के भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो.
महाराष्ट्रात भूकंप कशामुळे येतात?
इंडियन टेक्टॉनिक प्लेट म्हणजे भारतीय भूपट्ट आणि युरेशियन भूपट्ट यांच्यातल्या हालचालींमुळे आणि इतर काही कारणांनी भारतात भूकंप कसे होतात त्याविषयी तुम्ही इथे वाचू शकता.
थोडक्यात सांगायचं तर भूकंपाच्या तीव्रतेनुसार भारताची सेस्मिक झोन किंवा अर्थक्वेक झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सर्वांत विनाशकारी भूकंप म्हणजे झोन फाईव्ह मध्ये उत्तर भारत, हिमालयातला प्रदेश, कच्छ, अंदमान आणि ईशान्य भारताचा समावेश आहे, जिथे भूपट्टांच्या हालचालींमुळे भूकंपांचा धोका जास्त आहे. पण देशाच्या आतल्या भागात, विशेषतः महाराष्ट्रातही भूकंप येतात.
महाराष्ट्रात भूकंप येण्यामागचं मुख्य कारण आहे फॉल्ट लाईन (Fault Lines) म्हणजे शब्दशः खडकांमधल्या भेगा. पण या भेगा छोट्या नसतात तर कित्येक किलोमीटर लांबवर पसरलेल्या असतात.
अपर गोदावरी फॉल्ट, लातूर फॉल्ट, चिपळूण फॉल्ट आणि वेस्ट कोस्ट फॉल्ट ही महाराष्ट्रातल्या फॉल्टलाईन्सची काही उदाहरणं झाली.
महाराष्ट्रातला पश्चिमेकडेचा जवळपास अर्धा भाग सेस्मिक झोन चार आणि सेस्मिक झोन तीनमध्ये येतो. म्हणजे राज्याला मध्यम आणि थोड्या तीव्र भूकंपांचा धोका आहे.
महाराष्ट्राचा भूकंपांचा इतिहास
महाराष्ट्रात याआधी 1967 साली कोयनानगरमध्ये 6.6 तीव्रतेचा आणि 1993 साली किल्लारीत 6.2 तीव्रतेचा, असे दोन मोठे भूकंप येऊन गेल्याचं तुम्हाला माहिती असेल.
पण मुंबईतही विनाशकारी भूकंप येऊन गेला होता, हे तुम्हाला माहिती आहे का?
1618 साली म्हणजे मुंबईला भूकंपाचा मोठा धक्का बसला होता, ज्याची नोंद पोर्तुगीज रेकॉर्ड्समध्ये आहे आणि नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या अमेरिकन संस्थेच्या वेबसाईटवरही ती पाहायला मिळते.
मुंबईतल्या त्या भूकंपात किमान दोन हजार जण मारले गेल्याच्या नोंदी आहेत.
हा तो काळ होता जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्मही झाला नव्हता, मुंबईची सात बेटं पोर्तुगीजांकडेच होती आणि या शहराच्या आसपासची लोकसंख्या दोन लाखांपेक्षाही कमी होती.

फोटो स्रोत, Getty Images
आता मुंबईत दाटीवाटी वाढली आहे. त्यामुळे मोठा भूकंप आला तर काय होईल असा प्रश्न पडतो.
असा मोठा भूकंप येण्याची आणि त्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता कमी असली तरी ती तज्ज्ञ नाकारत नाहीत. मग प्रश्न उरतो, की मुंबई आणि भारतातली बाकीची शहरं भूकंपासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत का?
भारतानं तुर्कीपासून काय शिकायला हवं?
तुर्कीतल्या भूकंपात अगदी नव्या कोऱ्या इमारतीही पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. यातल्या अनेक इमारती उंच, बहुमजली होत्या आणि त्या उभारताना भूकंपरोधी नियमांचं काटेकोर पालन केलं गेलं नव्हतं, असं तज्ज्ञ सांगतायत.
भारतातही आलीकडच्या तीन-चार दशकांत काँक्रीट आणि स्टीलचा वापर करून मोठ्या प्रमाणात इमारती बांधण्यात आल्या आहेत.
पण अनेकदा त्यासाठी वापरलेल्या कच्च्या मालाच्या दर्जाकडे पाहिलं जात नाही, असं दिसून आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नगररचनाकार सुलक्षणा महाजन सांगतात की, “भूकंपात उंच इमारतींना सर्वाधिक धोका असतो. कारण इमारत जेवढी उंच तेवढा तिचा गुरुत्वमध्य उंचावर जातो. भूकंपादरम्यान या इमारती हेलकावे खातात, तेव्हा त्या कोसळण्याचा धोका जास्त असतो. तुलनेनं तीन ते चार मजल्यांच्या इमारतींना तेवढा धोका नसतो. इमारतीचा पाया जितका मजबूत तितकी ती भूकंपात वाचण्याची शक्यता जास्त.”
अर्थात परदेशातल्या अनेक गगनचुंबी इमारती डिझाईन करतानातच त्यांच्या भूंकंपरोधी तंत्रज्ञान वापरलं जातं, जरं की counterbalancing weights, ज्यामुळे इमारतींचे हेलकावे कमीत कमी होतील.
पण इमारतीच्या बांधकामाच्या प्रकारावर आणि रचनेवरही बरंच काही अवलंबून असतं, असंही महाजन नमूद करतात.
त्या म्हणतात, “भारतात असे रचनाकार आणि इंजिनियर्स आहेत जे भूकंपरोधक इमारतीचं डिझाईन करू शकतात. पण मोठे लक्झरी टॉवर्स बांधताना जी काळजी घेतली जाते, ती अन्य इमारतींच्या बाबतीत घेतली जातेच, असं नाही.
“कुठल्याही इमारतीचं वरचेवर ऑडिट म्हणजे पाहणी करणं गरजेचं आहे. हे केवळ रहिवासी करू शकत नाहीत, तर याबाबतीत महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरते कारण त्यांच्याकडे अशी पाहणी करणारे तज्ज्ञ असतात.”
बांधकामाविषयीच्या नियमांचं काटेकोर पालन, बांधकाम करताना चांगल्या दर्जाच्या काँक्रिट आणि स्टीलचा वापर, राहत्या इमारतीची पाहणी करून घेणं, ती जुनी झाली असेल तर बळकटी देण्यासाठी उपाययोजना म्हणजे स्ट्रक्चरल रिपेअर्स करणं हे म्हणूनच महत्त्वाचं ठरतं.
तुर्कीच्या भूकंपातून भारतानं हा धडा घेतला, तर भविष्यात एखाद्या आपत्तीत हजारोंचे प्राण वाचवणं शक्य होईल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








