जपानमधील अणुबॉम्ब हल्ल्याचे बळी ठरलेले कोरियन नागरिक आणि जखमांचं ओझं घेऊन जगणारी त्यांची पिढी

88 वर्षीय ली जुंग-सून, या अणुबॉम्ब स्फोटातून बचावलेल्या अनेक व्यक्तींपैकी एक आहेत. त्या सध्या दक्षिण कोरियातील हॅपचिऑन येथे राहतात.

फोटो स्रोत, BBC/Hyojung Kim

फोटो कॅप्शन, 88 वर्षीय ली जुंग-सून, या अणुबॉम्ब स्फोटातून बचावलेल्या अनेक व्यक्तींपैकी एक आहेत. त्या सध्या दक्षिण कोरियातील हॅपचिऑन येथे राहतात.
    • Author, ह्योझुंग किम
    • Role, बीबीसी कोरियन, हॅपचिऑन

जपानच्या हिरोशिमा शहरावर 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब पडला, तेव्हा हजारो कोरियन नागरिकही त्यावेळी तिथे होते. काही कामगार म्हणून तर काही कैद्यांप्रमाणे आयुष्य जगणारे.

अणुबॉम्बनंतरचा तो काळ त्यांच्यासाठी अगदी नरकासारखा होता. मृतदेह गोळा करणं, किरणोत्सर्ग सहन करणं, आणि त्यानंतरही देशात परतल्यावर मिळालेली उपेक्षा, या सगळ्या वेदना त्यांच्या सोबत पिढ्यानपिढ्या राहिल्या.

आजही या लोकांना समाजात मान्यता मिळालेली नाही. ही गोष्ट आहे अशा लोकांच्या संघर्षाची ज्यांनी फक्त नुकसान भरपाईसाठी नाही, तर 'स्वतःचं अस्तित्व मान्य व्हावं' यासाठी लढा दिला.

6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी, हिरोशिमाच्या आकाशातून अणुबॉम्ब खाली पडत होता, त्याचवेळी ली जुंग-सून या आपल्या प्राथमिक शाळेत जात होत्या.

आता 88 वर्ष वय असलेल्या ली जुंग-सून त्या आठवणी दूर सारण्याचा प्रयत्न करतात.

रस्त्यावर फक्त मृतदेहांचा खच पडलेला...

त्या तो प्रसंग आठवत सांगतात, "माझे वडील त्यावेळी कामाला जाणार होते, पण ते अचानक परत आले आणि त्यांनी लगेचच आम्हाला घर सोडून जायचं असल्याचं सांगितलं.

"रस्ते मृतदेहांनी भरलेले होते. ते पाहून मला इतका धक्का बसला होता की, मी हादरून गेले होते. मला फक्त रडल्याचं आठवतं. त्यावेळी मी फक्त रडतच होते."

ली म्हणतात, "स्फोटात काही लोकांची शरीरं इतकी विरघळली होती की त्यांचे फक्त डोळेच दिसत होते." 4 लाख 20 हजार लोकांच्या शहरावर 15,000 टन टीएनटी एवढ्या शक्तीचा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर फक्त ओळखताही न येणारी मृतदेहं उरली होती.

"अणुबॉम्ब... हे एक खूपच भयानक शस्त्र आहे."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

80 वर्षांपूर्वी अमेरिकेनं 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब हिरोशिमावर टाकला. हा मानवाचा पहिला अणुबॉम्ब होता. या स्फोटात सुमारे 70,000 लोकांचा लगेचच मृत्यू झाला होता.

त्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये आणखी हजारो लोक किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिएशन, भाजणं आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे मरण पावले.

हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला. यामुळे दुसरे महायुद्ध आणि आशियातील अनेक भागांवरील जपानी सत्तेचा अंत झाला. गेल्या 80 वर्षांत या विध्वंसाबद्दल खूप सविस्तर माहिती नोंदवण्यात आली आहे.

परंतु, सर्वात धक्कादायक म्हणजे खूप लोकांना माहिती नाही, पण अणुबॉम्बमुळे बळी ठरलेल्या लोकांपैकी सुमारे 20 टक्के कोरियन लोक होते.

जेव्हा अणुबॉम्ब टाकला गेला, तेव्हा कोरिया 35 वर्षांपासून जपानच्या अधिपत्याखाली होता. त्या काळात सुमारे 1 लाख 40 हजार कोरियन लोक हिरोशिमामध्ये राहत होते.

त्यापैकी अनेकांना जबरदस्तीने मजुरीसाठी आणण्यात आले होते तर काहीजण कोरियात जपानी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अत्याचारांपासून वाचण्यासाठी तिथे राहायला गेले होते.

जे लोक अणुबॉम्बमधून वाचले आणि त्यांची पुढची पिढीही, अजूनही त्या भीषण घटनेचे परिणाम भोगत आहेत. त्यांची दुखापती, वेदना आणि अनेक वर्षांपासून सुरू असलेली न्यायासाठीची लढाई आजही पूर्णतः संपलेली नाही.

पुढच्या पिढ्यांना अजूनही होतोय त्रास

"कोणताही देश जबाबदारी घेत नाही," असं या स्फोटात बचावलेले 83 वर्षीय शिम जिन-ताए सांगतात. "ज्यांनी बॉम्ब टाकला त्यांनी नाही, ज्यांनी आमचं रक्षण करायला हवं होतं त्यांनीही नाही.

अमेरिकेनं कधी माफी मागितली नाही. जपान तर असं वागतो की, काही झालंच नाही. कोरियाही काही वेगळा नाही. सगळे एकमेकांवर जबाबदारी ढकलतात, दोष देतात आणि आम्ही मात्र एकटे राहतो," असं ते म्हणतात.

शिम सध्या हॅपचिऑन या दक्षिण कोरियातील एका छोट्या गावात राहतात. इथे ली यांच्यासारखे अणुबॉम्बमधून वाचलेले आणखी बरेच लोक राहतात. म्हणूनच या गावाला 'कोरियाचं हिरोशिमा' म्हणतात.

Photo Caption- हॅपचिऑन या गावाला 'कोरियाचं हिरोशिमा' म्हटलं जातं, कारण युद्धानंतर अणुबॉम्बमधून वाचलेले बरेच लोक तिथं राहायला गेले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हॅपचिऑन या गावाला 'कोरियाचं हिरोशिमा' म्हटलं जातं, कारण युद्धानंतर अणुबॉम्बमधून वाचलेले बरेच लोक तिथं राहायला गेले होते.

त्या दिवशीचा धक्का श्रीमती ली या अजूनही विसरू शकलेल्या नाहीत. तो त्यांच्या शरीरात आजारांच्या रूपाने कायम राहिला आहे. आज त्यांना त्वचेचा कर्करोग, पार्किन्सन्ससारखा आजार आणि एंजायना आहे, हा हृदयात रक्तपुरवठा नीट न झाल्यामुळे होणारा आजार असून त्यामुळे छातीत दुखतं.

पण त्यांच्या मनावर जास्त ओझं आहे, ते म्हणजे ही वेदना फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. त्यांचा मुलगा हो-चांग, जो त्यांची काळजी घेतो, त्याच्यावरही परिणाम झाला आहे.

त्याची किडनी फेल झाली असून सध्या त्याचं डायलिसिस सुरू आहे आणि तो ट्रान्सप्लांटची वाट पाहत आहे.

"मला विश्वास आहे की, हे सर्व किरणोत्सर्गामुळेच झालं आहे, पण याचे पुरावे कोण देणार?" हो-चांग ली म्हणतात.

"हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करणं खूप कठीण आहे. त्यासाठी जनुकीय चाचण्या कराव्या लागतात. महत्त्वाचं म्हणजे त्या खूप महागड्या आणि थकवणाऱ्या असतात."

आरोग्य आणि कल्याण मंत्रालयानं (एमओएचडब्ल्यू) 'बीबीसी'ला सांगितलं की, त्यांनी 2020 ते 2024 या काळात जनुकीय माहिती गोळा केली आहे आणि 2029 पर्यंत अभ्यास सुरू ठेवणार आहेत.

त्यांनी असंही सांगितलं की, दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील पीडितांनाही मदत द्यायची का हे निर्णय 'फक्त' अभ्यासात महत्त्वपूर्ण आकडेवारी मिळाल्यावरच घेतला जाईल.

कोरियन लोकांचं नुकसान

बॉम्बहल्ल्याच्या वेळी हिरोशिमामध्ये सुमारे 1,40,000 कोरियन लोक होते, त्यापैकी बरेच जण हॅपचिऑन गावातील होते.

हॅपचिऑन डोंगरांनी वेढलेलं आणि शेतीयोग्य कमी जमीन असलेलं ठिकाण होतं. तिथे जगणं कठीण होतं. जपानी लोकांनी तिथलं पीक जप्त केलं होतं, तर दुष्काळामुळे जमीन खराब झाली होती.

त्यामुळे हजारो लोक युद्धाच्या काळात जपानमध्ये गेले. काहींना जबरदस्तीने कामासाठी नेण्यात आलं, तर काही लोकांना "तुम्हाला तिथे दिवसातून तीन वेळा जेवायला मिळेल आणि मुलांना शाळेत पाठवता येईल" असं आमिष दाखवून बोलावलं होतं.

परंतु, जपानमध्ये कोरियन लोकांना दुय्यम नागरिक केलं जात होतं. त्यांना अवघड, घाण आणि धोकादायक कामं दिली जात. शिम सांगतात की, त्यांच्या वडिलांना जबरदस्तीने शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कारखान्यात कामाला लावलं होतं, तर आई लाकडी बॉक्समध्ये खिळे ठोकण्याचं काम करत होती.

अणुबॉम्बच्या स्फोटानंतर कोरियन लोकांना हिरोशिमामध्ये खूपच धोकादायक आणि जीवघेणी कामं करावी लागली.

Photo Caption- शिम जिन-ताए यांच्यासाठी फक्त नुकसानभरपाई मिळणं महत्त्वाचं नाही, तर त्यांना ओळख मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
फोटो कॅप्शन, शिम जिन-ताए यांच्यासाठी फक्त नुकसानभरपाई मिळणं महत्त्वाचं नाही, तर त्यांना ओळख मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

"कोरियन कामगारांना मृतदेह स्वच्छ करायचं काम दिलं गेलं होतं," असं शिम सांगतात, ते कोरियन अणुबॉम्ब पीडित संघटनेच्या हॅपचिऑन शाखेचे संचालक आहेत.

ते पुढं म्हणाले, "सुरुवातीला स्ट्रेचरनं मृतदेह हलवले जात होते, परंतु मृतांची संख्या खूप होती. नंतर त्यांनी डस्टपॅनसारख्या वस्तूंच्या मदतीने मृतदेह गोळा करून शाळांच्या पटांगणात जाळले."

"ही कामं बहुतेक कोरियन लोकांनीच केली. युद्धानंतर साफसफाईचं आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित कामही मुख्यतः आम्हीच केलं."

ग्योंगी वेल्फेअर फाउंडेशनच्या अभ्यासानुसार, काही वाचलेल्या लोकांना ढिगाऱ्यांची साफसफाई करावी लागली आणि मृतदेह बाहेर काढावे लागले. जपानी लोक नातेवाइकांकडे पळून गेले, परंतु कोरियन लोकांचे तिथे कोणीच नसल्यामुळे त्यांना शहरातच थांबावं लागलं.

त्यामुळे त्यांना रेडिएशनचा जास्त त्रास झाला आणि त्यांना योग्य वैद्यकीय मदतही मिळू शकली नाही.

वाईट वागणूक, धोकादायक काम आणि व्यवस्थेतील भेदभाव या सर्वांमुळे कोरियन लोकांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात झाला.

कोरियन अ‍ॅटॉमिक बॉम्ब व्हिक्टिम्स असोसिएशननुसार, कोरियन लोकांचा मृत्यू दर सुमारे 57.1 टक्के होता, तर एकूण मृत्यू दर 33.7 टक्केच्या आसपास होता.

सुमारे 70,000 कोरियन लोक अणुबॉम्बच्या स्फोटात सापडले होते. त्या वर्षाच्या शेवटीपर्यंत त्यापैकी सुमारे 40,000 लोकांचा मृत्यू झाला होता.

आपल्याच देशात उपेक्षित

अणुबॉम्बहल्ल्यांनंतर जपाननं शरणागती पत्करली आणि कोरियाला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर सुमारे 23,000 कोरियन लोक आपल्या देशात परत आले. पण त्यांचं स्वागत झालं नाही.

त्यांच्या शरीरावर जखमा होत्या, म्हणून त्यांना 'शापित' समजलं गेलं आणि त्यांना आपल्या देशातसुद्धा भेदभावाचा सामना करावा लागला.

"हॅपचिऑनमध्ये आधीच कुष्ठरोग्यांची वसाहत होती," शिम सांगतात. "त्यामुळे लोकांना वाटायचं की, बॉम्बहल्ल्यातून वाचलेल्यांना देखील त्वचेचे आजार आहेत."

अशी बदनामी झाल्यामुळे बरेच पीडित आपली कहाणी कुणालाच सांगू शकले नाहीत, असं ते म्हणतात. "जिवंत राहणं महत्त्वाचं होतं, अभिमान नाही," असं ते पुढे सांगतात.

ली म्हणतात, "हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे."

ली आठवून सांगतात की, "जे लोक फार भाजले गेले होते किंवा खूप गरीब होते, त्यांच्याशी लोक खूप वाईट वागायचे. आमच्या गावात काही लोकांच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर इतक्या जखमा होत्या की, त्यांचे फक्त डोळे दिसायचे. अशा लोकांना लग्नात नाकारलं जायचं आणि समाजाने त्यांच्यापासून अंतर राखलं होतं."

लोकांनी दूर ठेवलं म्हणून गरिबी आली, आणि त्यातून खूप त्रास सुरू झाला. त्यानंतर अशा अनेक आजारांचा सामना करावा लागला, ज्यांचं नेमकं कारणच समजत नव्हतं, त्वचेचे आजार, हृदयाचे त्रास, मूत्रपिंड निकामी होणे, कॅन्सर. या सगळ्यांची लक्षणं सगळीकडे दिसायची, पण कोणीच हे का होतं आहे हे सांगू शकत नव्हतं.

हळूहळू लक्ष दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीकडे वळलं.

हान जियोंग-सून या दुसऱ्या पिढीतील पीडित आहेत. त्यांच्या कंबरेतील हाडं खराब झाली आहेत, त्यामुळे त्यांना चालताना स्वतःचं अंग ओढत किंवा घसरत चालावं लागतं. त्यांचा पहिला मुलगा मेंदूविकार (सेरेब्रल पाल्सी) घेऊन जन्माला आला होता.

Photo Caption- दुसऱ्या पिढीतील पीडित हान जियोंग-सून यांना चालताना त्रास होतो, त्यांना आपल्या कुटुंबाकडूनही वेगळं वागणं सहन करावं लागलं.

फोटो स्रोत, BBC/Hyojung Kim

फोटो कॅप्शन, दुसऱ्या पिढीतील पीडित हान जियोंग-सून यांना चालताना त्रास होतो, त्यांना आपल्या कुटुंबाकडूनही वेगळं वागणं सहन करावं लागलं.

"माझ्या मुलाने कधीच एक पाऊलही चाललेलं नाही," हान जियोंग-सून म्हणतात.

"माझ्या सासरच्यांनी मला फारच वाईट वागणूक दिली. ते म्हणाले, 'तू अपंग मुलाला जन्म दिलास आणि तूही अपंगच आहेस. आमचं कुटूंब उद्धवस्त करायला आली आहेस का?" हान जियोंग-सून म्हणतात.

'तो काळ पूर्णपणे नरकासारखा होता'

अनेक दशके, कोरियन सरकारनेसुद्धा आपल्या लोकांच्या दुःखाकडे लक्ष दिलं नाही. उत्तर कोरियासोबतचा युद्धाचा धोका आणि आर्थिक अडचणी यांना त्यांनी जास्त महत्त्व दिलं.

1945 मध्ये बाँबस्फोट झाल्यानंतर तब्बल 70 वर्षांनी, 2019 मध्ये कोरियाच्या आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाने पहिला अहवाल जाहीर केला. तो अहवाल मुख्यतः प्रश्नावलीवर आधारित होता.

'बीबीसी'च्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्रालयानं सांगितले की, 2019 पूर्वी "सरकारी चौकशी किंवा निधी देण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नव्हता."

परंतु, दोन वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये असं दिसून आलं की, दुसऱ्या पिढीतल्या पीडितांना आजार होण्याची शक्यता जास्त असते. 2005 मधील एका अभ्यासात असं दिसलं की, दुसऱ्या पिढीतील लोकांना सामान्य लोकांच्या तुलनेत मानसिक नैराश्य, हृदयविकार आणि अ‍ॅनिमियाची समस्या जास्त होते.

2013 मधील दुसऱ्या अभ्यासात असे दिसले की या पिढीतील लोकांची अपंगत्व नोंदणी दर सरासरीच्या जवळपास दुप्पट होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, हान यांना आश्चर्य वाटतं की अजूनही सरकारी अधिकारी त्यांना आणि त्यांच्या मुलाला हिरोशिमा बॉम्बस्फोटाचे बळी म्हणून ओळखण्यासाठी पुरावे मागतात.

त्या म्हणतात, "माझा आजारच पुरावा आहे. माझ्या मुलाचं अपंगत्वही पुरावा आहे. ही वेदना पिढ्यानपिढ्या चालत आली आहे आणि ती दिसतेसुद्धा. परंतु, तरीही सरकार ते मान्य करत नाही. मग आम्ही करायचं काय? ओळख न मिळवता मरायचं का?"

'शांतता मिळाली... परंतु, माफी नाही'

गेल्या महिन्यात पहिल्यांदाच असं झालं की 12 जुलैला, हिरोशिमाच्या अधिकाऱ्यांनी हॅपचिऑनला भेट दिली आणि तिथल्या स्मारकावर फुले वाहिली. याआधी माजी पंतप्रधान युकिओ हातोयामा आणि काही खासगी व्यक्ती आले होते, पण हा सध्याच्या जपानी अधिकाऱ्यांचा पहिला अधिकृत दौरा होता.

"आता 2025 मध्ये जपान शांततेबद्दल बोलत आहे. पण माफी मागितल्याशिवाय शांततेला काही अर्थ नाही," असं जुनको इचिबा म्हणतात. त्या एक जपानी शांतता कार्यकर्त्या आहेत, ज्या आयुष्यभर कोरियन हिरोशिमा पीडितांसाठी लढत आहेत.

त्या सांगतात की, भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आणि दरम्यान जपानने कोरियन लोकांबरोबर केलेल्या वागणुकीबद्दल कोणताही उल्लेख केला नाही, की माफीही मागितली नाही.

जपानच्या अनेक माजी नेत्यांनी त्यांची माफी मागितली आणि दु:ख व्यक्त केलं असलं तरीही अनेक दक्षिण कोरियन लोकांना वाटतं की ही माफी मनापासून नाही, किंवा अधिकृत मान्यतेशिवाय ती अपुरीच आहे.

Photo Caption- हॅपचिऑनमधील मेमोरियल हॉलमध्ये 1,160 लाकडी फळ्या ठेवलेल्या आहेत. त्या प्रत्येकावर अणुबॉम्बमुळे मृत्यू झालेल्या कोरियन व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत.

फोटो स्रोत, BBC/Hyojung Kim

फोटो कॅप्शन, हॅपचिऑनमधील मेमोरियल हॉलमध्ये 1,160 लाकडी फळ्या ठेवलेल्या आहेत. त्या प्रत्येकावर अणुबॉम्बमुळे मृत्यू झालेल्या कोरियन व्यक्तींची नावं लिहिलेली आहेत.

इचिबा सांगतात की, जपानी शालेय पुस्तकांमध्ये अजूनही कोरियावरील वसाहती राजवटीचा इतिहास आणि अणुबॉम्बग्रस्त कोरियन लोकांचा उल्लेख केला जात नाही. त्या म्हणतात, "ही गोष्ट लपवली जाते, म्हणून हा अन्याय अजूनही सलतो."

जपानने आपल्या वसाहतवादी काळातील जुन्या चुकीबद्दल अजूनही जबाबदारी घेतलेली नाही, असं अनेकांचं मत आहे.

रेड क्रॉसच्या सर्पोट डिव्हिजनचे संचालक हिओ जिओंग-गु म्हणाले, "हे प्रश्न अजून वाचलेले पीडित जिवंत असतानाच सोडवले पाहिजेत. खूप उशीर होण्यापूर्वी दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीसाठी पुरावे आणि जबाबदारीच्या गोष्टी जमवणं फार आवश्यक आहे."

शिमसारख्या बचावलेल्या लोकांसाठी फक्त नुकसान भरपाई मिळवणं महत्त्वाचं नाही, तर त्यांनी जे सहन केलं त्याला मान्यता मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

ते म्हणतात, "नुकसान भरपाईपेक्षा आठवण महत्त्वाची आहे. आपलं शरीरच सगळं आठवतं. आपण जर विसरलो, तर ते पुन्हा होईल. आणि एक दिवस असा येईल की हे सांगायलाही कुणीच उरणार नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.