लेबनॉन: 'तिला घेऊन पळणार एवढ्यात मिसाईल धडकलं', इस्रायलच्या हल्ल्यात चिमुकलीची कवटी फ्रॅक्चर

    • Author, ओरला गुएरिन
    • Role, वरिष्ठ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी

लेबनॉनच्या बेका खोऱ्यात सध्या स्थिती एवढी गंभीर बनली आहे की, कोणत्याही क्षणी मृत्यू आकाशातून येऊन साक्षात नागरिकांच्या समोर उभा राहतोय.

इस्रायलकडून या भागावर दिवसभर बॉम्बहल्ले केले जात आहेत. अवघ्या तासाभरात याठिकाणी 30 हून अधिक हवाई हल्ले होत आहेत.

या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू होत असून मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

या जखमींपैकीच एक आहे नूर मोसावी नावाची सहा वर्षांची चिमुकली.

रायाक हॉस्पिटलमध्ये बालरुग्ण दक्षता विभागात बेशुद्धावस्थेत असलेल्या नूरच्या संपूर्ण डोक्याभोवती पट्टी गुंडाळलेली आहे.

तिच्या घराजवळ झालेल्या हल्ल्यामध्ये नूरच्या कवटीला फ्रॅक्चर झाले आहेत.

तिची आई रिमा तिच्या बाजूला बसलेल्या होत्या. त्यांच्या हातात कुराणची प्रत होती आणि त्या प्रार्थना करत होत्या.

नूर अत्यंत हुशार आणि सर्वांनी मोकळेपणानं वागणारी असल्याचं त्यांनी सांगितलं.

"ती घरातलं वातावरण प्रचंड आनंदी आणि प्रसन्न ठेवते. त्यामुळं ती नसते तेव्हा घर हे रिकामं वाटायला लागतं. तिला नवीन लोकांना भेटायला प्रचंड आवडतं," असंही त्या म्हणाल्या.

पण गेल्या आठवड्यात झालेल्या इस्रायलच्या हल्ल्यानं अचानक सगळं काही बदलून गेलं.

त्यांनी त्यांच्या मुलीचा आणखी एक व्हीडिओ दाखवला. त्यात हल्ल्याच्या काही क्षणापूर्वी ती प्रार्थना करताना दिसत होती.

"मी तिचा व्हीडिओ तयार करत होते. तिला सांगत होते घाबरू नको, काहीही होणार नाही. ती मदतीसाठी सारखा ईश्वराचा धावा करत होती," असं रिमा म्हणाल्या.

घरात राहण्याचीही भीती

जसजसे बॉम्ब जवळपास पडू लागले तसं रिमा नूर आणि तिचा जुळा भाऊ असलेल्या मोहम्मदला दारातून घरात यायला सांगत होत्या.

त्या म्हणाल्या की," खरं तर आम्ही दारातून आत जाण्याएवढे धाडसी नव्हतो. कारण, जर इमारतीवर बॉम्ब पडला तर ती आमच्यावर कोसळेल अशी भीती आम्हाला वाटत होती."

"पण हल्ल्यांची तीव्रता खूपच वाढली. त्यावेळी मी नूरला आणि तिच्या भावाला आत नेण्यासाठी उचललं. पण मिसाईलचा वेग माझ्यापेक्षा खूप जास्त होता."

या हल्ल्यात मोहम्मद किरकोळ जखमी झाला, पण नूर एवढी जखमी झाली की सध्या ती मृत्यूशी संघर्ष करत आहे.

आम्ही बोलतच होतो त्याचवेळी आमच्या डोक्यावरही धोका घिरट्या घालत होता. आम्ही विमानाचा आवाज ऐकला आणि आणखी एक स्फोट झाला. त्या स्फोटाच्या तीव्रतेमुळे खिडक्या हादरल्या आणि काही क्षणासाठी वीजही गेली.

कसंबसं सावरत रिमा म्हणाल्या की, पाहा आणखी एक हल्ला झाला आहे.

त्याचवेळी नूरचे वडील अब्दल्लाह तिथं आले. ते प्रचंड संतापलेले होते.

"प्लीज, माझ्या मुलीचे शुटिंग (चित्रीकरण) करा," असं ते म्हणाले.

"शस्त्रं काय असतात हेही तिला माहिती नाही. तिला तर भांडायचंही कळत नाही. बॉम्बहल्ले सुरू झाले तेव्हा ती घरात खेळत होती. त्यांना (इस्रायल) दहशत पसरवून लोकांना इथून पळवून लावायचं आहे."

हल्ल्यांच्या माध्यमातून हिजबुल्लाहच्या तळांना आणि त्याचबरोबर शस्त्रसाठा, दारुगोळा असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

अब्दल्लाह यांना मात्र ते पटत नाही.

"आमचा शस्त्रांशी काही संबंध नाही. त्या बंडखोरांसोबत (हिजबुल्लाह) आमचा काहीही संबंध नाही. पण मला आता वाटतं की मी त्यांच्यासोबत असायला हवं होतं, म्हणजे मला माझ्या मुलांचं संरक्षण करता आलं असतं," असंही ते म्हणाला.

त्यानंतर काही मिनिटांनीच हॉस्पिटलच्या खालच्या मजल्यावर अ‍ॅम्ब्युलन्सचे सायरन ऐकू येऊ लागले. नुकत्याच झालेल्या हल्ल्यातील जखमींना घेऊन अ‍ॅम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचत होत्या.

इतर आंतरराष्ट्रीय बातम्या -

नर्स, डॉक्टरही नैराश्यात

हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली होती. आणीबाणीच्या विभागात एकच तणाव आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. लोक रागानं आरडा-ओरडा करत होते. मित्र, नातेवाईक धक्क्यांत होते. आम्हालाही चित्रिकरण करू नका असं सांगण्यात आलं.

गेल्या सोमवारपासून जवळपास 400 जण जखमी झाल्याचं रुग्णालयानं सांगितलं. ते सर्व सामान्य नागरिक होते, असं वैद्यकीय संचालक बासील अब्दल्लाह यांनी सांगितलं.

त्यापैकी सुमारे 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. काही कुटुंबांतील तर एकापेक्षा जास्त सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

डॉ. अब्दल्लाह यांनी आम्हाला सांगितलं की, रुग्णांबरोबरच कर्मचाऱ्यांमध्येही एक प्रकारचा तणाव निर्माण झाला आहे.

"लहान मुलं, वृद्ध, महिलांना बॉम्ब हल्ल्यात जखमी होताना पाहणं हे अत्यंत कठिण आहे," असंही ते म्हणाले.

"बहुतांश नर्स आणि डॉक्टरांनाही जणू नैराश्य आलं आहे. आम्हालाही भावना आहेत, कारण आम्हीही मानव आहोत."

घरी जाण्यासाठी प्रवास करणंही धोकादायक आहे. त्यामुळं रुग्णालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांना 24 तास रुग्णालयात राहावं लागत आहे.

इस्रायल लेबनॉनमध्ये सर्वदूर आणि प्रचंड प्रमाणावर हल्ले करत आहे. हे हल्ले थांबायचं नावच घेत नाहीयेत.

सध्या तरी, हिजबुल्लाह अत्यंत मर्यादित प्रतिकार करत आहे. ते सध्या सीमेवर रॉकेट हल्ले करत आहेत.

त्यांना पाठिंबा असलेला इराणनंही थेट पुढं आलेला नाही.

डॉ. अब्दल्लाह यांनी औषधं आणि गरजेच्या वस्तुंच्या तुटवड्याची चिंता सतावत आहे.

हे युद्ध खूप काळ चालेल अशी भीती त्यांच्या मनात आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.अ