You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘आम्हाला पळून जायचंय,’ इस्रायलच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये भीतीचं वातावरण
- Author, ओरला गुरीन, नफीश कोह्नवार्ड आणि कॅरिन टोरबे
- Role, बीबीसी न्यूज
इस्रायलनं लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लेबनॉनमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
लेबनॉनच्या दक्षिण भागात काही कुटुंब आपलं साहित्य गोळा करून ते उत्तेरकडे कार, ट्रक, मोटरसायकल अशा मिळेल त्या वाहनांनी जाताना दिसत आहेत. सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.
ज्या भागात हिजबुल्लाहचं प्राबल्य आहे, त्या भागावर इस्रायल हल्ले करतंय. त्यामुळे इस्रायली लष्कराने काही नागरिकांना टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉइस रेकॉर्डिंगच्या माध्यमातून इशारा दिला आहे आणि तो भाग सोडून जाण्यास सांगितलं आहे.
नबातिहा हे दक्षिण भागातलं एक शहर आहे. तिथली एक विद्यार्थिनी झाहरा सावलीने बीबीसीच्या न्यूज अवर या कार्यक्रमात तीव्र बॉम्बहल्ला होत असल्याचं सांगितलं.
“मी सकाळी सहा वाजता बॉम्बच्या आवाजाने उठले. दुपारपर्यंत हे हल्ले आणखी तीव्र झाले आणि मी राहत असलेल्या भागावर प्रचंड हल्ले झाले. काचा फुटण्याचा आवाज ऐकू येत होता.”
ती आणि तिच्यासारख्या अनेकांनी घरातून बाहेर पडण्याचं धाडस केलं नाही, असं तिने सांगितलं.
“आम्ही कुठे जाऊ? अनेक लोक अजूनही रस्त्यावर अडकले आहेत. माझे अनेक मित्रमैत्रिणी ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. कारण अनेक लोक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत,” ती पुढे म्हणाली.
उत्तेकडील बैरुतला जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सागरी किनाऱ्यावर असलेल्या सहापदरी महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनं होती. सर्व वाहनं बैरुतकडे जाणारी होती.
काही ठिकाणी लोक दक्षिणेकडे असलेल्या टायर नावाच्या शहरात समुद्रकिनाऱ्यावरून चालत होते. कारण गावाच्या बाहेरच्या भागातून हवाई हल्ल्यामुळे धूर येताना दिसत होता.
एका बाईकवर बसून बैरुत शहरात आलेल्या पाच जणांच्या कुटुंबाशी बीबीसीने संवाद साधला.
दक्षिणेतील एका गावातून उत्तरेकडे असलेल्या त्रिपोलीला ते जात होते. हे संपूर्ण कुटुंब अतिशय थकलेले होते.
“आम्ही अशा परिस्थितीत काय बोलायला हवं? आम्हाला फक्त पळून जायचं आहे,” कुटुंबातील वडील म्हणाले.
सोमवारी (23 सप्टेंबर) संध्याकाळी लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 492 लोकांचा या बॉम्बहल्ल्यात मृत्यू झाला असून 1600 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये किमान 35 बालकांचा समावेश आहे.
इस्रायली डिफेन्स फोर्सेस (IDF) ने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गेल्या 24 तासात 1100 हल्ले केले आहेत.
बैरुतच्या दक्षिण भागातही एक हल्ला करण्यात आला. हिजबुल्लाहचा वरिष्ठ कमांडर या हल्ल्याचं लक्ष्य होता.
बैरुतमध्येही प्रचंड अस्वस्थतेचं वातावरण आहे. दक्षिणेकडून लोक त्यांच्या कारच्या छतावर सुटकेस बांधून शहरात आले आहेत, तर शहरातील काही नागरिकसुद्धा शहर सोडून जात आहेत.
हिजबुल्लाहने ज्या भागात शस्त्रं लपवून ठेवली आहेत, असा इस्रायलचा दावा आहे तो भाग लोकांनी सोडावा असं आवाहन इस्रायलने केलं आहे. मात्र, हमारासारखा काही भाग आहे, जिथे खरंतर हिजबुल्लाहचं वर्चस्व नाही तरीसुद्धा हा भाग सोडून जाण्यासाठी इस्रायलने रेकॉर्डेड मेसेजच्या माध्यमातून सांगितलं आहे. हमारा भागात अनेक मंत्र्यांची घरं आहेत, तसंच बँका आणि विद्यापीठे आहेत.
जेव्हा हा भाग सोडण्याचा इशारा देण्यात आला, तेव्हा पालक त्यांच्या मुलांना शाळेतून परत आणण्यासाठी धावले.
इसा नावाची एक व्यक्ती आपल्या मुलाला शाळेतून घेऊन निघाली होती. आम्हाला फोन आल्यामुळे आम्ही मुलांना घ्यायला आलो असं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.
“ते (इस्रायल) प्रत्येकाला फोन करून इशारा देत आहेत. म्हणून मी माझ्या मुलाला शाळेतून घ्यायला आलो आहे. ही परिस्थिती अजिबात दिलासादायक नाही,” असं ते पुढे म्हणाले.
बैरुतजवळ एका रस्त्यावर मोहम्मद नावाचे एक पॅलेस्टिनी नागरिक त्यांच्या बायकोबरोबर जात होते. त्यांनी बीबीसीशी संवाद साधला.
तुम्ही राजधानी बैरुतमध्ये राहाल का, असा प्रश्न आम्ही विचारला. त्याच्या उत्तरादाखल ते म्हणाले, “लेबनॉनमध्ये कोणतीही जागा सुरक्षित नाही. इस्रायल म्हणतंय की, ते सगळीकडे हल्ला करतील. त्यांनी या भागात राहणाऱ्या लोकांना धमकावलं आहे. मग आम्ही कुठे जायचं?”
“हे अतिशय भीतीदायक आहे. काय करायचं मला कळत नाही, कामावर जावं की घरी जावं काहीच कळत नाहीये,” ते पुढे म्हणाले.
बीबीसीची टीम रस्त्याच्या एका बाजूला त्यांचं काम करत होती. ती सगळी व्यवस्था पाहून एका टॅक्सी ड्रायव्हरने इंधन वगैरे मिळतंय का, असा प्रश्न विचारला.
“खूप लोक बैरुतला येत आहेत,” असं ते म्हणाले.
दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांना आश्रय मिळावा, यासाठी शाळांनी आता छावण्यांचं रुप घेतलं आहे.
सरकारच्या आदेशानुसार बैरुत, त्रिपोली तसंच पूर्व लेबनॉनमधील शाळांचा आता छावणी म्हणून वापर करण्यात येणार आहे.
सोमवारी बैरुत येथील पश्चिम बैरुतमधील बिर हसन भागात असलेल्या एका शाळेला बीबीसीने भेट दिली. बेका व्हॅलीमधून येणाऱ्या लोकांना आसरा देण्यासाठी या शाळेत तयारी सुरू होती. बेका व्हॅली लेबनॉनच्या ईशान्य दिशेचा एक भाग असून तिथे हिजबुल्लाहचं वर्चस्व आहे आणि या भागालाही लक्ष्य करणार आहे असं इस्रायलचं म्हणणं आहे.
या शाळेतील वर्गात गाद्या रचून ठेवण्यात आल्या आहेत. दिवस संपेपर्यंत ही शाळा पूर्ण भरून जाणार आहे असं तिथे काम करणाऱ्या एका कामगाराने सांगितलं.
दरम्यान, सोमवारी लेबनॉनमधील रुग्णालयात तातडीच्या नसलेल्या सर्व शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. सर्व डॉक्टर जखमी लोकांवर उपचार करण्यासाठी आणि इतर जीवितहानीशी दोन हात करण्यासाठी तयारी करत होते.
बैरुतमध्ये इतकं तणावाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण असताना काही लोक बेफिकीर होते.
एक व्यक्ती बीबीसीशी बोलताना म्हणाला, “जर युद्ध झालं तर लेबनॉनच्या सर्व लोकांनी आपली राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. कारण हल्ला शेवटी देशावर होणार आहे.”
“आता जर या लोकांना युद्ध हवंच असेल तर आम्ही काय करणार? हे आमच्यावर लादलं आहे. आम्ही काहीही करू शकत नाही,” असं तेथील एक दुकानदार मोहम्मद सिबई रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
57 वर्षीय मोहम्मद बैरुतच्या दक्षिण भागात असलेल्या दहिया या भागात राहतात. या भागात हिजबुल्लाहचं वर्चस्व आहे. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांनी 1975 पासून अनेक युद्धं पचवली आहेत. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं नेहमीचं आहे. मी कुठेही जाणार नाही, मी माझ्या घरात राहणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)