You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना काय करते? आजवर मोसादने कोणत्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत?
- Author, स्टाफ रायटर्स
- Role, बीबीसी न्यूज अरेबिक
हिजबुल्लाहच्या सदस्यांकडे असलेल्या पेजर आणि संवादाच्या इतर साधनांचा स्फोट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
इस्रायलच्या गुप्तहेर संघटनांना आपला ठावठिकाणा कळू नये, या उद्देशाने या उपकरणांचा वापर केला जात होता. मात्र, ते वापरणाऱ्या सदस्यांच्या हातातच त्याचा स्फोट झाला. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो लोक जखमी झाले.
लेबनॉन सरकारने हे हल्ले इस्रायलने केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्याकडून ‘इस्रायलचा क्रूर हल्ला’ असं या हल्ल्याचं वर्णन केलं आहे; तर या हल्ल्याला ‘योग्य प्रत्युत्तर देण्याची’ प्रतिज्ञा हिजबुल्लाहने केली आहे.
इस्रायलने यासंबंधी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, काही इस्रायली प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, कॅबिनेटने या प्रकरणावर सार्वजनिकरित्या भाष्य करण्यावर सर्व मंत्र्यांना बंदी घातली आहे.
इस्रायल हिजबुल्लाहच्या हालचालींवर कायम नजर ठेवून असते. त्यामुळे हे ऑपरेशन म्हणजे या दोघांमध्ये असलेल्या संघर्षाचाच एक भाग असू शकतो.
जर या हल्ल्याला इस्रायल जबाबदार असेल तर ही मोहीम इतिहासातील अतिशय धक्कादायक आणि परिणामकारक मोहीम म्हणून गणली जाईल. त्याचप्रमाणे इस्रायलने याआधी पार पाडलेल्या मोहिमांच्या आठवणीही ताज्या होतील. विशेषत: त्यांच्या राष्ट्रीय गुप्तचर संस्थेची आठवण या निमित्ताने पुन्हा होईल.
मोसादने काही मोहिमा अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यातल्या उल्लेखनीय मोहिमा खालीलप्रमाणे आहेत.
नाझी अधिकारी ॲडॉल्फ आइकमन यांचा लावलेला शोध
नाझी अधिकारी ॲडॉल्फ आइकमन यांचं 1960 मध्ये अर्जेंटिनाहून केलेलं अपहरण ही मोसादची सर्वात यशस्वी गुप्तचर मोहीम असल्याचं सांगितलं जातं.
आइकमन ज्यू नरसंहाराचे मुख्य सूत्रधार होते. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनीत साठ लाख ज्यूंची हत्या करण्यात आली होती.
अटक टाळण्यासाठी त्यांनी अनेक देशात पलायन केलं. शेवटी ते अर्जेंटिनात स्थायिक झाले.
मोसादच्या 14 गुप्तहेरांनी त्यांना शोधलं, त्यांचं अपहरण केलं, आणि त्यांना इस्रायलला आणलं. तिथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.
ऑपरेशन एन्टेबी
1976 मध्ये युगांडामध्ये ऑपरेशन एन्टेबी पार पडलं. ही मोहीम मोसादच्या सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक समजली जाते.
मोसादने यासंबंधी गुप्त माहिती दिली होती. इस्रायली सैन्याने या माहितीच्या आधारावर ही मोहीम फत्ते केली.
'पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन' आणि दोन जर्मन साथीदारांच्या मदतीने पॅरिसला जाणाऱ्या एका विमानाचं अपहरण केलं आणि ते युगांडाला वळवलं. त्यांनी विमानातील प्रवाशांना आणि क्रूला एन्टेबी विमानतळावर ओलीस ठेवलं.
इस्रायली कमांडो विमानतळावर गेले आणि त्यांनी 100 इस्रायली आणि ज्यू ओलिसांची सुटका केली.
या घटनेत तीन ओलीस, अपहरणकर्ते, युगांडाचे अनेक सैनिक आणि लीड कमांडो योनातन नेतन्याहू (इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा भाऊ) यांचा मृत्यू झाला.
ऑपरेशन ब्रदर्स
1980 च्या दशकात मोसादने अत्यंत चतुराईने एक मोहीम आखली होती. तत्कालीन पंतप्रधान मेनाखिम बेगिन यांच्या सूचनेनुसार त्यांना 7000 इथियोपियन ज्यू लोकांना सुदानमार्गे इस्रायलला आणलं. त्यासाठी त्यांनी एक डायव्हिंग रिसॉर्ट बांधलं.
सुदान हा अरब देशांचा शत्रू आहे. त्यामुळे मोसादच्या एका टीमने सुदानमधील तांबड्या समुद्राच्या किनार्यावर एका रिसॉर्ट उभं केलं. या रिसॉर्टचा मुख्य ठिकाण म्हणून ते वापर करत असत.
सकाळच्या वेळी ते हॉटेलचे कर्मचारी म्हणून काम करायचे. रात्री ते ज्यू लोकांना शेजारच्या इथिओपिया देशातून आणायचे आणि जल किंवा हवाईमार्गे देशाबाहेर पाठवायचे.
ही संपूर्ण मोहीम पाच वर्षं सुरू होती. जेव्हा हे सगळं उघडकीस आलं तेव्हापर्यंत मोसादचे गुप्तहेर तिथून निघून गेले होते.
म्युनिक ऑलिंपिक हत्याकांडांचा सूड
1972 मध्ये पॅलेस्टाईनचा कट्टरवादी गट ब्लॅक सप्टेंबरने इस्रायलच्या ऑलिंपिक संघातील दोन खेळाडूंची म्यूनिक ऑलिंपिक दरम्यान हत्या केली आणि इतर नऊ खेळाडूंचं अपहरण केलं.
त्यानंतर जर्मन पोलिसांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण ते सर्व खेळाडू मारले गेले.
त्यानंतर काही वर्षांनी मोसादने या हल्ल्यातील संशयितांची हत्या केली. त्यात मोहम्मद हमशारीचाही समावेश होता.
त्याच्या पॅरिसमधील घरात त्याच्या फोनमध्येच स्फोटकं ठेवण्यात आली होती. या हल्ल्यात हमशारीला पाय गमवावा लागला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
याह्या अय्याश आणि स्फोटक मोबाइल फोन
अशाच एका मोहिमेत 1996 मध्ये याह्या अय्याश या हमासच्या मुख्य बॉम्बमेकरची हत्या करण्यात आली होती. त्याच्या मोटोरोला अल्फा मोबाइलमध्ये 50 ग्रॅम स्फोटकं ठेवण्यात आली होती.
अय्याश हा हमासच्या सैन्यातील महत्त्वाचा अधिकारी होता. इस्रायली गुप्तहेरांविरुद्ध हल्ले करण्यासाठी प्रसिद्ध होता आणि बॉम्ब तयार करण्यात त्याचा हातखंडा होता.
त्यामुळे इस्रायलच्या लष्करासाठी तो मोस्ट वॉन्टेड लोकांपैकी एक होता.
2019 च्या शेवटी इस्रायलने त्याच्या हत्येबाबत काही माहिती उघड केली. इस्रायलच्या चॅनेल 13 टीव्हीने अय्याशचा त्यांच्या वडिलांबरोबर झालेल्या शेवटच्या फोन कॉलचं रेकॉर्डिंग दाखवलं होतं.
हमाशारी आणि अय्याश या दोघांच्या हत्येवरून एखाद्याला मारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फार पूर्वीपासून करण्यात येत असल्याचा इतिहास डोळ्यासमोर येतो.
महमूद अल-मबहूह : गळा घोटून हत्या
2010 मध्ये हमासचा ज्येष्ठ नेता मोहम्मद अल महबूह यांची दुबईच्या एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली.
सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटला. त्यानंतर दुबई पोलीस व्हीडिओ फुटेजवरून मारेकऱ्यांच्या टीमची ओळख पटवण्यात यशस्वी ठरले.
अल महबूह यांना आधी विजेचा धक्का दिला आणि त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी नंतर दिली.
या मोहिमेमागे मोसादचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यूएईकडून राजनैतिक पातळीवर संताप व्यक्त करण्यात आला.
मात्र, या हल्ल्यामागे मोसादचा हात नसल्याचं इस्रायलच्या राजदुतांनी स्पष्ट केलं.
मात्र सहभाग नसल्याचाही इन्कार त्यांनी केला नाही. अशा प्रकरणात एक प्रकाराची अनिश्चितता ठेवायची या इस्रायलच्या धोरणाशी ते सुसंगत होतं.
हत्येचे फसलेले प्रयत्न
यशस्वी मोहिमांबरोबरच मोसाद अनेक अयशस्वी मोहिमांसाठीही ओळखला जातो.
हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचे प्रमुख खलीद मेशाल यांना 1997 साली जॉर्डनमध्ये विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे मोठा राजनैतिक संघर्ष झाला होता.
इस्रायलच्या गुप्तहेरांना पकडल्यामुळे ही मोहीम अयशस्वी झाली. त्यामुळे इस्रायलला मेशाल यांचा जीव वाचवण्यासाठी विषाला उतारा द्यावा लागला होता.
त्यावेळी मोसादचे प्रमुख डॅनी यातोम जॉर्डनहून मिशाल यांच्यावर उपचार करण्यासाठी आले होते.
त्यामुळे इस्रायल आणि जॉर्डन यांच्यातले संबंध ताणले गेले होते. त्यांनी बराच काळ शांतता करारावर सह्या केल्या नाहीत.
हमास नेते मेहमूद अल झहर यांच्यावर हल्ला
2003 मध्ये इस्रायलने हमास नेते महमूद- अल- झहर यांची हत्या करण्यासाठी गाझा शहरातील त्यांच्या घरावर हवाई हल्ला केला होता.
अल झहर या हल्ल्यातून बचावले, मात्र या हल्ल्यात त्यांची बायको आणि मुलगा खलीद यांच्याबरोबर आणखी काही जणांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यामुळे त्यांचं घर उद्धवस्त झालं. त्यामुळे घनदाट लोकवस्तीवर अशी लष्करी मोहीम आखल्याचे काय परिणाम होतात ते दिसून आलं.
इतर काही महत्त्वाच्या बातम्या :
द लेवॉन अफेअर
1954 मध्ये इजिप्तच्या प्रशासनाला ऑपरेशन सुसानाहची कुणकूण लागली.
या मोहिमेअंतर्गत इजिप्तमधील अमेरिकन आणि ब्रिटिश असलेल्या ठिकाणी बॉम्ब पेरायची योजना होती. सुएझ कालव्याच्या आसपास यूकेने त्यांचं सैन्य ठेवावं यासाठी हा हल्ला नियोजित केला होता.
या घटनेला लेवॉन अफेअर असं नाव देण्यात आलं. इस्रायलचे तत्कालीन संरक्षण मंत्री पिनहास लेवॉन यांच्यावरून हे नाव देण्यात आलं होतं.
ही मोहीम आखण्यामागे त्यांचा हात होता असं सांगितलं जातं.
गुप्त माहिती देण्यातसुद्धा मोसाद अनेकदा अयशस्वी ठरला आहे.
6 ऑक्टोबर 1973 ला इजिप्त आणि सीरिया यांनी सिनाई द्वीपकल्प आणि गोलन हाईट्सवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी इस्रायलवर हल्ले केले.
हा हल्ला ज्यू लोकांच्या योम किप्पूर या सणाच्या दिवशी झाला. त्यामुळे इस्रायलला या हल्ल्याची कुणकुण लागली नाही. इस्रायल बेसावध असताना हा हल्ला झाला.
इजिप्त आणि सीरियाने इस्रायलवर दोन बाजूंनी हल्ले केले.
इजिप्तच्या सैन्याने सुएझ कालवा ओलांडला. तिथे फारशी जीवितहानी झाली नाही. तर सीरियाने इस्रायलच्या ठिकाणांवर हल्ला केला आणि गोलन हाईट्मधून प्रवेश केला.
या युद्धात सोव्हिएत युनियनने सीरिया आणि इजिप्तला तर अमेरिकेने इस्रायलला सहाय्य केलं.
इस्रायलने हे युद्ध जिंकलं आणि 25 ऑक्टोबरला हे युद्ध संपलं. त्याच्या चार दिवस आधी संयुक्त राष्ट्रांनी हे युद्ध संपवण्याबद्दल ठराव पास केला होता.
7 ऑक्टोबर 2023 चा हल्ला
जवळजवळ 50 वर्षानंतर इस्रायलवर अचानक हल्ला झाला. यावेळी हमासने इस्रायमधील गाझा पट्टी जवळ असलेल्या शहरांवर 7 ऑक्टोबर 2023 ला हल्ला केला.
या हल्ल्याची काहीच माहिती नसणं, हे मोसादचं मोठं अपयश मानलं जातं. या हल्ला म्हणजे हमासचा सामना करण्यासाठी इस्रायलच्या कमकुवत धोरणाचं द्योतक आहे, असं विश्लेषकांचं मत आहे.
या हल्ल्यात 1200 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यात बहुतांश सामान्य नागरिकांचा समावेश होता असं इस्रायलचं म्हणणं आहे. 251 लोकांना गाझामध्ये ओलीस ठेवण्यात आलं.
हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर युद्ध सुरू केलं. त्यामुळे आतापर्यंत 40,000 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी बहुसंख्य मृतांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश आहे, अशी माहिती गाझा आणि हमासतर्फे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)