AI आपल्या विचार करण्याच्या क्षमतेला आळा घालत आहे का?

क्रिटिकल थिंकिंगमुळे मेंदूवर ताण येतो, पण त्यामुळे मेंदू अधिक तीव्र आणि कार्यक्षम बनतो. (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्रिटिकल थिंकिंगमुळे मेंदू अधिक तीव्र आणि कार्यक्षम बनतो. (प्रातिनिधिक फोटो)
    • Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

आपल्या रोजच्या आयुष्यात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI चा अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर खूपच वाढलाय.

इंटरनेटवर काही शोधायचं असो, ईमेल लिहायचं असो किंवा गाणं ऐकायचं असो — सगळीकडे AI चा वापर होतो आहे.

त्यामुळे आपलं काम खरंच सोपं होतंय. पण आपण या तंत्रज्ञानावर जरा जास्तच विसंबून राहू लागलो आहोत का?

आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीवर नीट विचार करणं, एखाद्या मुद्द्याच्या मुळापाशी जाऊन समजून घेणं - हे कमी होतंय का? आपला आत्मविश्वासही कमी होतोय का?

अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलंय की तंत्रज्ञानामुळे आपलं क्रिटिकल थिंकिंगवर म्हणजे सखोल विचार करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतोय.

MIT या अमेरिकेतील संस्थेच्या मीडिया लॅबमध्ये एका अभ्यासात काही लोकांना निबंध लिहायला सांगितलं. त्यातल्या काहींनी AI चा वापर केला, तर काहींनी नाही.

जे लोक AI वापरत होते, ते पुढच्या निबंधात जास्त आळशी होत गेले. मग AI मुळे आपली क्रिटिकल थिंकिंगची क्षमता खरंच कमी होतेय का?

हे जाणून घेण्यासाठी आधी क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय असतं, ते जाणून घेऊयात.

क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय?

क्रिटिकल हा शब्द ग्रीक भाषेतल्या क्रिटिकॉसवरून आला आहे. त्याचा अर्थ होतो निर्णय घेण्याची किंवा अर्थ लावण्याची क्षमता.

म्हणजेच एखाद्या विषयाचे सर्व पैलू तपासून, निष्पक्षपणे सखोल विचार करून निर्णय घेणे किंवा एखादी गोष्ट डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी तिच्या प्रत्येक बाजूचा विचार करणे.

 तंत्रज्ञानामुळे आपलं क्रिटिकल थिंकिंगवर म्हणजे सखोल विचार करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होत असल्याचं संशोधन सांगतं. (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तंत्रज्ञानामुळे सखोल विचार करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होत असल्याचं संशोधन सांगतं. (प्रातिनिधिक फोटो)
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मराठीत याला चिकित्सक किंवा तर्कसंगत विचार करण्याची क्षमता असं म्हणता येईल. आपण ही क्षमता समस्यांचे निराकरण करण्यासाठी वापरतो.

पण आपण अनेकदा क्रिटिकल थिंगिंगचा वापर न करता आपल्या आठवणींच्या आधारावर निर्णय घेतो, असं डॉ. डॅनियल विलिंगहॅम सांगतात. ते अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

डॉ. विलिंगहॅम सांगतात, "आपण अनेकदा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपला पूर्वानुभव किंवा स्मृती म्हणजे मेमरीच्या आधारावर करतो. पण काही वेळा एखादी समस्या अगदीच नवीन असते, आणि मेमरीच्या आधारे ती सोडवता येत नाही.

"अशा वेळी क्रिटिकल थिंकिंगची गरज भासते. स्मृतीच्या मदतीनं अनेकदा समस्या सोडवता येतात. तर क्रिटिकल थिंकिंगद्वारे समस्या तशा सहज सुटत नाहीत."

आपण एखादी समस्या सोडवतो, तेव्हा ती आपल्या स्मृतीत नोंदवली जाते. मग पुढे कधी तशीच समस्या निर्माण झाली, तर त्यावर पूर्वानुभवाच्या म्हणजे स्मृतीच्या आधारे आपण निर्णय घेतो.

आपल्या मेंदूत स्मृती ही हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात साठवली जाते. तर क्रिटिकल थिंकिंगची क्षमता मेंदूच्या पुढच्या भागात म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये असते.

जास्त विचार करावा लागला, तर प्रीफ्रंटल कोर्टेक्सवर जास्त ताण येतो आणि त्यात टॉक्सिन्स जमा होतात, ज्यामुळे थकवा जाणवू लागतो.

BBC

"थकवा जाणवत असल्यामुळे आपण विचार करण्याऐवजी स्मृतीवर अधिक अवलंबून राहतो. कारण त्यामुळे काम सोपं होतं. पण दुसरीकडे समस्यांवर नवे उपाय शोधण्याची संधी मात्र आपण गमावतो," असं डॉ. विलिंगहॅम सांगतात.

एकाच पद्धतीने समस्या सोडवत राहिल्यामुळे आपण मेंदूवर ताण देणं कमी करतो. याउलट, क्रिटिकल थिंकिंगमुळे मेंदूवर ताण येतो, पण त्यामुळे मेंदू अधिक तीव्र आणि कार्यक्षम बनतो.

क्रिटिकल थिंकिंगचे दोन फायदे असल्याचं डॉ. विलिंगहॅम स्पष्ट करतात. "एक म्हणजे आपण नव्या आव्हानांना सामोरे जायला शिकतो आणि त्यामुळे मेंदू अधिक तल्लख बनतो.

"दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वय वाढल्यावर मेंदूच्या क्षमतेत घट होण्याची शक्यता असते, पण क्रिटिकल थिंकिंगमुळे वृद्धापकाळातही मेंदू तंदुरुस्त आणि सक्रिय राहतो."

मग AI मुळे क्रिटिकल थिंकिंगमध्ये नेमका अडथळा कसा येतो आणि मुळात एआय म्हणजे काय आहे?

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI कसं काम करते?

मायकल गेरलिक स्वित्झर्लंडच्या एसबीएस बिझनेस स्कूलमध्ये मॅनेजमेंटचे प्राध्यापक आहेत. आम्ही त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंसची व्याख्या विचारली.

ते माहिती देतात, "या संकल्पनेत दोन भाग आहेत — 'कृत्रिम' म्हणजे नैसर्गिक नसलेली किंवा मशीनद्वारा नियंत्रित केली जाणारी आणि 'बुद्धिमत्ता' म्हणजे विचार करण्याची क्षमता.

"कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI माणसाच्या मेंदूच्या कार्यपद्धतीचीचं नक्कल करते. आपण मुलांना शिकवतो, तसंच AI ला प्रशिक्षण दिले जाते.

"त्यामुळे एआय माणसासारखी तर्कशक्ती आणि समज विकसित करते. म्हणजेच उपलब्ध माहितीचे विश्लेषण करतं आणि अनेक कामांमध्ये आपली मदत करतं — इतकेच नव्हे तर काही वेळा आपल्यासाठी निर्णयही घेतं."

कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात माहितीचं वेगानं विश्लेषण करून उत्तरं शोधायला मदत कते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणात माहितीचं वेगानं विश्लेषण करून उत्तरं शोधायला मदत कते. (प्रातिनिधिक फोटो)

आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये अनेक प्रकारची माहिती म्हणजे डेटा साठवलेला असतो आणि त्याचं विश्लेषण करून AI आपल्याला उत्तर देते.

पूर्वीचे संगणक मर्यादित माहितीवर आधारित एकच उत्तर देत असत, पण कृत्रिम बुद्धिमत्ता या बाबतीत वेगळी ठरते.

AI वेगवेगळ्या संदर्भांनुसार आणि परिस्थितीनुसार एकाच प्रश्नाची विविध उत्तरं देऊ शकते. AI सतत नवीन माहिती गोळा करत असते, ज्याला लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) म्हणतात.

डॉ. गेरलिक सांगतात, "AI प्रत्येक शब्दाचे विश्लेषण करून अंदाज लावतं की तुम्हाला नेमकं काय जाणून घ्यायचं आहे. पण एआयला सगळे संदर्भ पूर्णपणे समजून घेता येत नाहीत.

"LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेलला प्रत्यक्षात इतिहास समजत नाही. पण LLM कडे इतिहासाची माहिती असते, ते शब्दांच्या आधारे तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे याचा अंदाज घेतं आणि त्यानुसार उत्तर देतं.

"जनरेटिव्ह इंटेलिजन्सला आता माहिती आणि प्रश्नांच्या गुंतागुंतीची अधिक चांगल्या प्रकारे जाणीव होऊ लागली आहे. आज हे तंत्र सर्च इंजिन्स, स्मार्टफोन आणि व्हॉट्सएप सारख्या प्लॅटफॉर्मवर वापरलं जातंय.

"भाषा आणि डेटाच्या आधारे AI योग्य उत्तराचा अंदाज घेतं, पण कधी कधी AIचाही गोंधळ उडू शकतो."

BBC

जनरेटिव्ह AI अनेकदा चापलूसीही करतं. म्हणजे आपली इच्छा काय आहे, आपल्याला जे उत्तर ऐकायला आवडेल आहे, त्यानुसार उत्तर तयार करतं.

डॉ. मायकेल गेरलिक यांच्या मते वापरकर्त्याला दिलासा देण्याच्या उद्देशानं AI रचना झाली होती, त्यामुळेच ते असं वागतं.

आपण प्रश्न कसे विचारतो, त्यावरून एआय अंदाज घेतं की आपल्याला सकारात्मक उत्तर हवंय की नकारात्मक, आणि त्यानुसार प्रतिसाद देतं.

यामुळे आपल्याला मदत होते, पण आपण एआयवर अधिक अवलंबून राहिलो, तर आपली विवेकबुद्धी आणि जाणीवेचा वापर करण्याची सवय कमी होते.

" जनरेटिव्ह AI अनेक कामं जलदगतीने करत असल्यामुळे वेळ आणि मेहनत वाचते. पण त्याचबरोबर आपण स्वतः विचार करण्याची सवय कमी होते," असं डॉ. गेरलिक सांगतात.

ते पुढे म्हणतात, "एआय आपल्यासाठी विचार करण्याचं आणि निर्णय घेण्याचं काम करू लागतं. मी एका अभ्यासात पाहिलं की AI वर अवलंबित्व वाढलं, तर आपलं क्रिटिकल थिंकिंग — म्हणजेच सखोल विचार करण्याची क्षमता — कमी होऊ लागते."

पण मग एआयच्या वापराची अशी काही पद्धत आहे का, ज्यामुळे आपल्याला मदतही होईल आणि आपली विचारक्षमताही कमी होणार नाही. पुढे ऐकत राहा.

AI चा शिक्षणात वापर

यवॉन सो सिंगापूरमध्ये नूडल फॅक्ट्री नामक एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या प्रमुख आणि संस्थापक आहेत.

नूडल फॅक्ट्री हा एक एआयवर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा प्लॅटफॉर्म आहे जो शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवतोय.

यात एआयचा वापर करताना त्यातून मदत तर मिळते, पण वापरणाऱ्याचं क्रिटिकल थिंकिंग म्हणजे सखोल विचार करण्याची क्षमता कमी होत नाही.

डिजिटल युगात विद्यार्थ्यांना शिक्षणात AI मुळे मदत होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डिजिटल युगात विद्यार्थ्यांना शिक्षणात AI मुळे मदत होऊ शकते.

यवॉन सांगतात, "हा प्लॅटफॉर्म अशा प्रश्नांवर उत्तर शोधतं, जे आपल्याला नेहमी भेडसावत असतात. हे एक प्रकारे आपलं डिजिटल क्लोन आहे.

"अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी एखादी गोष्ट नीट समजली नसेल तर पुन्हा प्रश्न विचारायला लाजतात. पण या प्लॅटफॉर्मवर एकाच प्रश्नाचं उत्तर अनेक वेळा विचारता येतं.

"आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना परदेशी भाषेत शिकवल्या जाणाऱ्या विषयांचं आकलन होण्यात अडचण येते. हा प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण देऊ शकतं."

अशा प्रकारचं डिजिटल शैक्षणिक साधन तयार करण्यासाठी लार्ज लँग्वेज मॉडेलचा वापर केला जातो.

या प्लॅटफॉर्ममध्ये संबंधित अभ्यासक्रमाचा संपूर्ण डेटा भरला जातो आणि विद्यार्थी गरजेनुसार ते वापरू शकतात, असं यवॉन सो सांगतात.

"अनेक शाळांमध्ये एकाच वर्गात वीस–तीसपेक्षा जास्त विद्यार्थी असतात. अशा मोठ्या वर्गांमध्ये काही विद्यार्थी एखादी अडचण आली तर स्पष्टीकरण किंवा प्रश्न विचारण्यास संकोच करतात.

"पण या प्लॅटफॉर्मवर ते सहजपणे उत्तर मिळवू शकतात. यामुळे शिक्षकांनाही मदत होते, कारण ते त्यांच्या अभ्यासक्रमातला विषय अधिक व्यापक दृष्टिकोनातून शिकवू शकतात."

BBC

त्यांच्या मते हे प्लॅटफॉर्म शिक्षकांसाठी एखाद्या सहाय्यकासारखं आहे, पण कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही.

"एआयची भूमिका मर्यादित असते आणि एआय शिक्षकांना तुलनेने कमी महत्त्वाच्या कामांमध्ये मदत करते. उदाहरणार्थ, एआय विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते. तसेच, ग्रेडिंग किंवा प्रश्नपत्र तपासण्यास मदत करून शिक्षकांचा वेळ वाचवते."

AI वर आधारीत डिजिटल प्लॅटफॉर्म वाचन आणि लेखनात मदत करतात, यात शंका नाही.

पण या प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मेंदूवर परिणाम होतोय का? त्यांचा विचारांचा वेग कमी होतोय का?

कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही, पण त्यांना शिकवण्यात मदत करू शकते. (प्रातिनिधिक फोटो)

फोटो स्रोत, BB

फोटो कॅप्शन, कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकांची जागा घेऊ शकत नाही, पण त्यांना शिकवण्यात मदत करू शकते. (प्रातिनिधिक फोटो)

यवॉन सो सांगतात की "अनेक विद्यार्थी शिक्षकांनी दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी AI चा वापर करतात. उदाहरणार्थ, ते निबंध लेखनासाठी AI ची मदत घेतात. मात्र त्यासाठी त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर भरपूर डेटा द्यावा लागतो, ज्यावर त्यांना विचार करावा लागतो.

"म्हणजेच त्यांच्या क्रिटिकल थिंकिंगचा वापर होतच असतो. आपण AI कडे दुर्लक्ष करू शकत नाही.

"पण आता शिक्षकांनी AI चा वापर लक्षात घेऊनच, शिकवण्याच्या आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्याच्या नव्या पद्धती स्वीकारायला हव्यात."

AI आणि मेंदूचा वापर

सना खरेनघानी लंडनच्या किंग्स कॉलेजात प्रॅक्टिस इन एआयच्या प्राध्यापक आहेत. त्या सांगतात, की एआयसोबत आपल्याला मेंदूचा वापरही करायला हवा.

"आपण एखाद्या समस्येचं निराकरण करताना आपल्या स्मरणशक्तीचा आणि आधीच्या अनुभवाचा आधार घेतो. पण एआय वापरताना, त्यातून मिळालेल्या उत्तरांचा सखोल विचार करण्याची गरज असते. विचारपूर्वकच त्या माहितीचा वापर किंवा मूल्यांकन करायला हवं."

 BBC

आपल्याला स्वतःला एआयचा योग्य पद्धतीने वापर करण्यासाठी तयार करावे लागेल, असं सना यांना वाटतं.

"आपल्याला मुलांना देखील एआयकडून मिळणाऱ्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी त्या माहितीवर प्रश्न विचारणे शिकवायला हवे, म्हणजे हे तंत्रज्ञान आपल्या नियंत्रणात राहील.

जाहिरात कंपन्याही एआयचा वापर करू शकतात आणि त्याद्वारा आपल्याला अनेक गोष्टी खरेदी करायचं प्रलोभन दाखवू शकतात. मग यावर नियंत्रण कसं मिळवायचं.

सना यांच्या मते या तंत्रज्ञानात पारदर्शकता राहील हे सरकारनं सुनिश्चित करायला हवं.

"एआय आपल्याला काही समजावून सांगतं किंवा एखादी गोष्ट करायची सूचना देतं, तेव्हा आधी एआयलाच त्या सूचनेवर किती विश्वास आहे, हे आपण तपासून पाहायला हवे.

"म्हणजे एआयलाच त्या सूचनेविषयी खात्री नसेल, तर त्यानं ही माहिती इतर स्रोतांद्वारे पडताळून पाहा असं आपल्याला सांगायला हवं.

"एखादी गोष्ट खरेदी करायला एआय सांगत असेल तर त्याने आपल्याला इतर पर्यायांची माहितीही द्यायला हवी."

'आपण एआयवर फार अवलंबून राहू नये आणि आपले सर्व काम एआयच करेल, असं समजू नये.'

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'आपण एआयवर फार अवलंबून राहू नये आणि आपले सर्व काम एआयच करेल, असं समजू नये.'

आपण एआयवर फार अवलंबून राहू नये आणि आपले सर्व काम एआयच करेल, असं समजू नये, असंही सना सांगतात. त्यांच्या मते एआयचा वापर आणि आपल्या स्वतःच्या विचारशक्तीचा वापर यात संतुलन राखणं गरजेचं आहे.

"एआयच्या प्रत्येक गोष्टीवर अविश्वासही ठेवू नये, कारण त्यामुळे आपली उत्पादकता कमी होऊ शकते.

"म्हणजेच, आपल्याला संतुलित पद्धतीने एआयचा वापर करायला हवा. पण त्याचबरोबर या तंत्रज्ञानामध्ये पारदर्शकता राखण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणंही गरजेचे आहे."

आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळुयात. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय आपली विचार करण्याची क्षमता नष्ट करतंय का?

एआय झपाट्याने आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत चाललं आहे आणि हळूहळू अनेक डिजिटल कामांसाठी आपण त्यावर अवलंबून राहात चाललो आहोत.

एआय मुळे आपली उत्पादकता वाढते आणि शिकणे-शिकवण्यासाठीही ते उपयुक्त ठरतं.

पण जसजशी कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक विकसित होतेय, आपलं तिच्यावर अवलंबून राहणं वाढतंय, तसतसे आपण अनेक समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्या मेंदूचा वापर कमी करतोय. यामुळे आपली विचारशक्ती मंदावू शकते.

आपण नेहमीच एआयनं दिलेल्या उत्तरांवर विश्वास ठेवू शकत नाही, तर त्यावर विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

एआय आपलं क्रिटिकल थिंकिंग तेव्हाच नष्ट करू शकेल, जेव्हा आपण एआयला तसं करण्याची संधी देऊ. म्हणूनच एआयचा वापर करताना आपल्या स्वतःच्या जाणीवेचा आणि बुद्धीचा वापर करणेही तितकेच गरजेचे आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)