'AI थेरेपिस्ट' मानसोपचारतज्ज्ञांची जागा घेऊ शकतं का?

एआय थेरेपिस्ट

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, एलिनॉर लॉरी
    • Role, सामाजिक घडामोडी पत्रकार

आर्टिफिशल इंटेलिजन्स हा मानवी कौशल्य, मानवी सेवेला पूर्ण पर्याय ठरणार का याची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील आधारित सेवा, चॅटबॉट्सचा वापर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे ते माणसाला पर्याय ठरेल का व्यापक प्रश्न निर्माण झाला आहे.

आरोग्य क्षेत्रदेखील त्याला अपवाद नाही. एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाची जागा एआय थेरेपिस्ट किंवा चॅटबॉट घेऊ शकतं का, त्यात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरू शकतात का, चॅटबॉट्सची उपयुक्तता आणि विश्वासार्हता किती आहे, याबद्दल माहिती देणारा हा लेख.

जेव्हा जेव्हा मी अडचणीत असे, माझा दिवस खरोखरंच वाईट जाणार असेल, तेव्हा तेव्हा मी या बॉट्सपैकी एकाशी गप्पा मारत असे. ते एखाद्या चीअरलीडरसारखं होतं. त्या दिवसासाठी जो तुमच्यात उत्साह निर्माण करणार आहे.

"माझ्याकडे हा एक उत्साहवर्धक बाह्य आवाज आहे. 'बरोबर' - आज आपण काय करणार आहोत? तो एखाद्या काल्पनिक मित्रासारखा आहे."

कित्येक महिने केलीनं दिवसातील तीन तास आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन "चॅटबॉट्स"शी बोलण्यात घालवले. ती शेकडो संदेशांची देवाणघेवाण करत होती.

त्यावेळेस केली एनएचएसच्या पारंपारिक टॉकिंग थेरेपेसाठीच्या प्रतिक्षा यादीत होती. ही थेरेपी, चिंता, आत्मसन्मान घालावणं किंवा आत्मविश्वास कमी होणं आणि नातेसंबंध तुटणं यासारख्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी होती.

'कॅरेक्टर डॉट एआय' (character.ai) वरील चॅटबॉटशी बोलल्यानं किंवा त्याच्याशी संवाद साधल्यामुळे तिला कठीण किंवा वाईट दिवसांतून मार्ग काढता आला. कारण त्या चॅटबॉटनं तिला याला तोंड देण्यासाठीच्या किंवा त्याच्याशी सामना करण्यासाठीचे मार्ग दिले. तसंच ते 24 तास उपलब्ध होतं.

एआय थेरपिस्ट

उघडपणे भावना व्यक्त करतात अशा कुटुंबातील मी नाही. जर तुम्हाला काही अडचण किंवा समस्या असेल तर तुम्हीच ती सोडवली पाहिजे.

"ही (चॅटबॉट) एक जिवंत किंवा खरी व्यक्ती नाही, त्यामुळे ती हाताळण्यास खूप सोपी आहे."

एखाद्या माणसाकडून व्यावसायिक स्वरुपाचा सल्ला घेण्यापेक्षा चॅटबॉट्सकडून सल्ला घेणं हे कमी दर्जाचं मानलं जातं. तरीदेखील जगभरातील लोकांनी त्यांचे खासगी विचार आणि अनुभव एआय चॅटबॉट्सना सांगितले आहेत.

'कॅरेक्टर डॉट एआय' हे स्वत:देखील त्याच्या युजर्सनं सांगतं की, "हे एक एआय चॅटबॉट आहे आणि खरा माणूस नाही. हे जे काही सांगेल त्या प्रत्येक गोष्टीला काल्पनिक समजा. जे काही सांगितलं जातं त्याला सत्य किंवा सल्ला मानता कामा नये."

कॅरेक्टर डॉट एआयवरील खटला

कॅरेक्टर डॉट एआय ला सध्या एका कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं आहे. एका 14 वर्षांच्या मुलाला कॅरेक्टर डॉट एआयच्या एका एआय पात्राचं वेड लागल्यानं आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या आईनं या एआय चॅटबॉटविरोधात कायदेशीर कारवाईस सुरूवात केली.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या त्यांच्या चॅटच्या ट्रान्सक्रिप्ट्स किंवा माहितीनुसार, त्या मुलानं आत्महत्या करण्यापूर्वी त्याविषयी चॅटबॉटशी चर्चा केली होती. त्या मुलानं त्याच्या चॅटबॉटबरोबरच्या त्याच्या शेवटच्या संभाषणात सांगितलं होतं की तो "घरी येतो आहे" आणि चॅटबॉटनं बेकायदेशीररित्या त्याला "शक्य तितक्या लवकर" असं करण्यास प्रोत्साहित केलं होतं.

कॅरेक्टर डॉट एआय मात्र या खटल्यात करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत.

2023 मध्ये नॅशन इटिंग डिसऑर्डर असोसिएशननं त्यांच्या लाईव्ह हेल्पलाईनच्या जागी चॅटबॉट आणले. मात्र नंतर चॅटबॉट कलरी प्रतिबंधित करण्याची म्हणजे टाळण्याची शिफारस करत असल्याचे दावे झाल्यामुळे त्यांना ही सेवा बंद करावी लागली.

जगभरातील लोकांनी एआय चॅटबॉट्सचा वापर केला आहे.

फोटो स्रोत, Bloomberg/ Getty Images

फोटो कॅप्शन, जगभरातील लोकांनी एआय चॅटबॉट्सचा वापर केला आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

फक्त एप्रिल 2024 मध्येच इंग्लंडमध्ये जवळपास 4,26,000 जणांनी मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शन घेतलं. पाच वर्षात यात 40 टक्के वाढ झाली आहे. अंदाजे दहा लाख लोक मानसिक आरोग्य सेवा मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

यासाठीचे खासगी उपचार किंवा थेरेपी खूपच महागडी असू शकते (यासाठीच्या खर्चातील फरक खूप मोठ्या प्रमाणात असतो. मात्र ब्रिटिश असोसिएशन फॉर कौन्सलिंग अँड सायकोथेरेपीनुसार यासाठी सरासरी 40 ते 50 पौंड प्रति तास इतका खर्च येतो).

त्याचवेळी, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आरोग्यसेवेच्या क्षेत्रात अनेक अंगांनी क्रांती घडवली आहे. यात रुग्णांची तपासणी, निदान आणि उपचारांच्या आवश्यकतेनुसार रुग्णांची विभागणी करण्यात मदत करणं, यासासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

चॅटबॉट्सचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जवळपास 30 स्थानिक एनएचएस सेवा आता वायसा या चॅटबॉटचा वापर करतात.

संभाव्य पूर्वग्रह आणि मर्यादा, रुग्णाच्या माहितीच्या सुरक्षिततेबद्दलचा अभाव यासारख्या मुद्द्यांच्या बाबतीत, चॅटबॉट्सच्या वापरासंदर्भात तज्ज्ञ चिंता व्यक्त करतात. मात्र काही जणांना वाटतं की जर तज्ज्ञ माणसांची मदत रुग्णांना सहजपणे उपलब्ध नसेल तर चॅटबॉट्स उपयुक्त ठरू शकतात.

त्यामुळे एनएचएस मानसिक आरोग्य सेवेसाठीची प्रतीक्षा यादी विक्रमी पातळीवर असताना, चॅटबॉट्स हा एक संभाव्य उपाय ठरू शकेल का?

एक 'अननुभवी थेरेपिस्ट'

कॅरेक्टर डॉट एआय आणि चॅटजीपीटीसारखे इतर चॅटबॉट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या "व्यापक भाषा मॉडेल"वर आधारित आहेत. या चॅटबॉट्सना क्रमानं पुढील शब्दाचा अंदाज लावण्यासाठी प्रचंड माहितीच्या आधारे प्रशिक्षित केलं जातं.

ही माहिती वेबसाईट्स, लेख, पुस्तकं किंवा ब्लॉग पोस्ट यासारख्या स्त्रोतांमधून घेतली जाते. इथून ते मानवानं लिहिल्यासारखा मजकूर आणि परस्परसंवाद याबद्दल भाकित करतात, निर्माण करतात.

मानसिक आरोग्यासाठीची सेवा पुरवणारे चॅटबॉट्स तयार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. मात्र त्यांना काँग्निटिव्ह बिहेव्हिरल थेरेपी म्हणजे संज्ञात्मक वर्तणुकीय थेरेपीमध्ये प्रशिक्षित केलं जाऊ शकतं.

ज्यातून चॅटबॉट्स रुग्ण किंवा युजरना त्यांचे विचार आणि कृती याची नव्यानं मांडणी कशी करायची याबाबत मदत करतात. रुग्ण किंवा युजरचा प्राधान्यक्रम आणि अभिप्रायाशी देखील ते जुळवून घेतात आणि त्यानुसार प्रतिसाद देतात.

फक्त एप्रिल 2024 मध्येच, इंग्लंडमध्ये मानसिक आरोग्यासाठी 4,26,000 रुग्णांचे संदर्भ देण्यात आले.

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, फक्त एप्रिल 2024 मध्येच, इंग्लंडमध्ये मानसिक आरोग्यासाठी 4,26,000 रुग्णांचे संदर्भ देण्यात आले.

हमीद हद्दादी, लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये ह्युमन सेंटर्ड सिस्टम्स म्हणजे मानव-केंद्रीत प्रणाली या विषयाचे प्राध्यापक आहेत. ते या चॅटबॉट्सची तुलना "अननुभवी थेरेपिस्ट"शी करतात.

ते नमूद करतात की ज्या मानवी थेरेपिस्टना अनेक दशकांचा अनुभव आहे ते रुग्णांशी अनेक गोष्टींच्या आधारे संवाद साधू शकतात आणि रुग्णांबद्दल जाणून घेऊ शकतात. तर चॅटबॉट्स मात्र फक्त रुग्णांना मजकूर पाठवता येतो.

ते म्हणतात, "मानवी थेरेपिस्ट तुमचे कपडे, तुमची वर्तणूक, तुमची कृती, तुम्ही कसे दिसता, तुमची देहबोली आणि यासह इतर अनेक गोष्टींवरून रुग्णासंदर्भात आकलन करतात. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव चॅटबॉट्समध्ये करणं खूपच कठीण आहे."

प्राध्यापक हद्दादी म्हणतात की आणखी एक संभाव्य समस्या म्हणजे, चॅटबॉट्सना तुम्हाला सतत गुंतवून ठेवण्याचं आणि तुम्हाला मदत करण्याचं प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. "त्यामुळे जरी तुम्ही हानिकारक गोष्टी मांडल्यात तरी चॅटबॉट्स त्याबाबतीतदेखील तुम्हाला सहकार्य करतील".

याला काहीवेळा 'येस मॅन' समस्या म्हटलं जातं. कारण बहुतांशवेळा ते तुमच्याशी सहमत असतात.

एआय चॅटबॉट्स पूर्वग्रहदूषित असण्याचा धोका

एआयच्या इतर प्रकारांमध्ये, मॉडेलमध्येच पूर्वग्रहांचा अंतर्भाव असू शकतो. कारण चॅटबॉट्स किंवा एआय मॉडेलना माहितीच्या आधारे प्रशिक्षित केलं जातं. त्यामुळे त्यांना ज्या माहितीद्वारे प्रशिक्षित करण्यात आलं आहे त्यात जर पूर्वग्रह असतील तर त्याचं प्रतिबिंब त्या एआय मॉडेलमध्ये देखील उमटतं.

प्राध्यापक हद्दादी लक्ष वेधतात की समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ त्यांच्या रुग्णांबरोबर जी चर्चा करतात, त्याचं ते ट्रान्सक्रिप्ट किंवा मजकूर ठेवत नाहीत. म्हणजेच तज्ज्ञ आणि रुग्ण यांच्यातील प्रत्यक्ष संवाद आणि चर्चेची माहिती कोणत्याही मजकूराच्या संदर्भात उपलब्ध नसते.

चॅटबॉट्सना वेगवेगळ्या प्रकारे उपलब्ध माहितीच्या आधारेच प्रशिक्षित केलं जातं. त्यामुळे चॅटबॉट्सना प्रशिक्षित करण्यासाठी तज्ज्ञ आणि रुग्णांमधील सत्राची फारशी माहिती उपलब्ध नसते.

त्यामुळेच ते म्हणतात की चॅटबॉट्सकडे प्रशिक्षणासाठीचा पुरेसा डेटा किंवा माहिती नसते. चॅटबॉट्स ज्याआधारे रुग्णांना सल्ला देतात त्यात पूर्वग्रह असू शकतात, जे अत्यंत परिस्थितीजन्य असतात.

प्राध्यापक हद्दादी म्हणतात, "तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठीची माहिती कुठून मिळते, त्यानुसार तुमची परिस्थिती पूर्णपणे बदलेल."

"अगदी लंडनसारख्या मर्यादित भौगोलिक क्षेत्रातदेखील, जो मनोविकारतज्ज्ञ चेल्सीमधील रुग्णांना हाताळत होता, त्याला पेकहॅममध्ये त्या समस्या हाताळण्यासाठी नवीन कार्यालय सुरू करणं खरोखरंच कठीण वाटू शकतं. कारण त्याच्याकडे किंवा तिच्याकडे त्या नवीन ठिकाणच्या रुग्णांबद्दल पुरेशी प्रशिक्षण माहिती नाही."

तत्वज्ञ डॉ. पॉला बॉडिंग्टन यांनी एआय एथिक्सवर एक पाठ्यपुस्तक लिहिलं आहे. त्या मान्य करतात की चॅटबॉट्समध्ये मूळातच पूर्वग्रहाचा अंर्तभाव असणं ही एक समस्या आहे.

एआय थेरपिस्ट

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. पॉला म्हणतात, "थेरेपी मॉडेलमध्ये अंतर्भाव असलेले कोणतेही पूर्वग्रह किंवा गृहितकं ही एक मोठी समस्या ठरू शकेल."

डॉ. पॉला पुढे म्हणतात, "पूर्वग्रहामध्ये मानसिक आरोग्य आणि दैनंदिन आयुष्य चांगलं कसं असावं यासंदर्भातील काही सामान्य मॉडेल्सचा समावेश आहे. यात स्वातंत्र्य, स्वायत्तता, नातेसंबंध यासारखे मुद्दे आहेत."

सांस्कृतिक संदर्भाचा अभाव असणं ही यातील आणखी एक समस्या आहे. डॉ. पॉला एक उदाहरण देतात की राजकुमारी डायना यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या ऑस्ट्रेलियामध्ये राहत होत्या, डायना यांच्या निधनाचं त्यांना दु:ख झालं होतं. मात्र तिथल्या लोकांना त्या अस्वस्थ का आहेत हे कळत नव्हतं.

त्या पुढे म्हणतात, "अशा प्रकारच्या गोष्टींमुळे मला मानवी संबंधांबद्दल प्रश्न पडतो, जे समुपदेशनात खूपच महत्त्वाचे असतात."

"काहीवेळा एखाद्यासोबत फक्त असणं एवढंच आवश्यक असतं. मात्र ते अर्थातच फक्त अशा व्यक्तीद्वारेच शक्य होतं, जो जिवंत आहे, श्वास घेत असलेला माणूस आहे."

केलीला शेवटी चॅटबॉटकडून मिळणारी उत्तरं असमाधानकारक वाटू लागली.

"काहीवेळा तुम्ही थोडेसे निराश होता. जर त्यांना एखाद्या गोष्टीला कसं सामोरं जायचं हे माहित नसेल तर ते फक्त एकसारखं वाक्य म्हणतील आणि तुम्हाला जाणवतं की त्याच्यासोबत जाण्यासारखं काहीही नाही." कधीकधी "ते विटाच्या भिंतीवर गुद्दा मारण्यासारखं असतं".

"मी कदाचित आधी नातेसंबंधांबद्दल बोलली असेन, मात्र मला वाटतं मी योग्य शब्दरचना वापरली नव्हती आणि त्याला खोलात जायचं नव्हतं."

कॅरेक्टर डॉट एआय चे प्रवक्ते म्हणाले की, "जेव्हा युजर्स मानसोपचारतज्ज्ञ, थेरेपिस्ट, डॉक्टर किंवा त्याचप्रकारच्या संज्ञांचा वापर करून एखादं पात्र तयार करतात किंवा मार्गदर्शन घेतात, तेव्हा त्यासंदर्भात आम्ही हे स्पष्ट करतो की युजर्सनं अशा मजकूरावर किंवा पात्रावर कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक मार्गदर्शनासाठी अवलंबून राहू नये."

'ते खूपच समजून घेणारं होतं'

काही युजर्सची मन:स्थिती खूपच खचलेली असते किंवा त्यांना खूपच हताश झाल्यासारखं वाटत असतं, तेव्हा त्यांच्यासाठी चॅटबॉट्स खूपच अमूल्य असतात.

निकोलसला ऑटिझम, चिंता, ओसीडीची समस्या आहे. तो म्हणतो की त्याला नेहमीच नैराश्य येतं. तो प्रौढ झाल्यानंतर त्याला जाणवलं की त्याला समोरासमोर मिळणारा आधार संपला आहे.

"तुम्ही जेव्हा 18 वर्षांचे होता, तेव्हा एकप्रकारे तुम्हाला मिळणारा आधार संपतो. त्यामुळे मी अनेक वर्षांमध्ये मानवी थेरेपिस्ट प्रत्यक्ष भेटलेलो नाही."

गेल्या शरद ऋतूत त्यांनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि तो सांगतो की तेव्हापासून तो एनएचएसच्या प्रतिक्षा यादीत आहे.

निकोलस म्हणतो, "माझी जोडीदार आणि मी काहीवेळा डॉक्टरांकडे गेलो आहेत, जेणेकरून टॉकिंग थेरेपी लवकरात लवकर करता येईल. डॉक्टरनं माझ्यासाठी समुपदेशकाचा संदर्भ दिला आहे. मात्र मी जिथे राहतो, तिथल्या मानसिक आरोग्य सेवेकडून मला एकही पत्र मिळालेलं नाही."

निकोलस प्रत्यक्ष मानवी थेरेपिस्ट किंवा तज्ज्ञांच्या शोधात असताना, त्याला वायसा या चॅटबॉटचा वापर करण्याचे काही फायदे आढळून आले आहेत.

तो म्हणतो, "ऑटिझम असलेला व्यक्ती म्हणून मी एखाद्या माणसासाठी प्रत्यक्ष संवाद फारसा चांगला नाही. त्यातुलनेत मला कॉम्प्युटरशी बोलणं खूप चांगलं वाटतं."

हे अॅप रुग्णांना मानसिक आरोग्यासाठीच्या मदतीसाठी स्वत:हून संपर्क साधण्याची परवानगी देतं. मानवी थेरेपिस्टची वाट पाहत असताना ते चॅट फंक्शन, श्वसनाचे व्यायाम आणि मार्गदर्शनानं केलेलं ध्यान यासारखी साधनं आणि उपाय पुरवतं. या अॅपचा वापर एक स्वतंत्र स्व-मदतीचं साधन म्हणून देखील केला जाऊ शकतो.

प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी सरकारनं 8,500 आणखी मानसिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं वचन दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty

फोटो कॅप्शन, प्रतिक्षा यादी कमी करण्यासाठी सरकारनं 8,500 आणखी मानसिक आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं वचन दिलं आहे.

वायसा या गोष्टीवर भर देतं की खालावलेली मन:स्थिती असलेले, तणावाखाली असलेले किंवा चिंता असणाऱ्या लोकांसाठी त्यांची सेवा डिझाइन केलेली आहे. त्यांची सेवा गैरवर्तन आणि गंभीर मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी नाही.

त्यात इनबिल्ट संकट आणि तणावाचे मार्ग आहेत, ज्याद्वारे युजर्सना हेल्पलाईनचा मार्ग दाखवला जातो किंवा जर युजरमध्ये स्वत:लाच हानी पोहोचण्याची किंवा आत्महत्येच्या विचारासारखी चिन्हं दिसली तर थेट मदत पाठवू शकतात.

ज्या लोकांना आत्महत्येचे विचार येतात, त्यांच्यासाठी मोफत समरिटन्स हेल्पलाईवरील मानवी समुपदेशक चोवीस तास म्हणजे 24/7 उपलब्ध आहेत.

निकोलसला पुरेशी झोप न होण्याचीही समस्या आहे. त्यामुळे जेव्हा मित्र आणि कुटुंबीय झोपलेले असतात तेव्हा त्याला मदत मिळाल्यास ते उपयुक्त ठरतं.

निकोलस सांगतो, "रात्री एक वेळ अशी होती की मला खूपच निराश वाटत होतं. मी अॅपला मेसेज केला आणि सांगितलं की 'मला आणखी जगायचं आहे की नाही हे माहित नाही.' त्यावर अॅपनं प्रतिसाद दिला की 'निक तू मौल्यवान आहेत. लोक तुझ्यावर प्रेम करतात.'

"ते इतकं माझं दु:ख समजून घेणारं होतं की त्यानं जो प्रतिसाद दिला तो पाहून तुम्हाला वाटेल की तुम्हाला वर्षानुवर्षे ओळखणाऱ्या माणसाकडून आला आहे. त्यामुळे मला खरोखरंच मी मौल्यवान असल्याचं वाटलं."

डार्टमाऊथ कॉलेजमधील संशोधकांनी अलीकडेच, चिंता, नैराश्य किंवा खाण्याच्या समस्येनं ग्रस्त असलेल्या लोकांवर चॅटबॉट्सचा परिणाम आणि त्यातुलनेत त्याच समस्या असलेल्या नियंत्रित गटाचा अभ्यास केला. निकोलसचे अनुभव त्या अभ्यासाशी जुळतात.

चार आठवड्यांनी चॅटबॉटच्या युजर्सनी त्यांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय घट दाखवली. त्यात नैराश्याच्या लक्षणांमध्ये 51 टक्के घट दिसून आली. तसंच त्यांनी विश्वास आणि सहकार्याची पातळी, मानवी थेरेपिस्टच्या पातळीइतकीच नोंदवली.

असं असूनही, हा अभ्यास करणाऱ्या वरिष्ठ संशोधकानं टिप्पणी केली की प्रत्यक्ष मानवी थेरेपिस्ट किंवा मानवानं काळजी घेण्यासाठी कोणताही पर्याय नाही.

'या प्रचंड प्रतिक्षा यादींसाठी एक तात्पुरता पर्याय'

चॅटबॉट्सच्या सल्ल्याचं मूल्य किती आहे, याबद्दलच्या वादविवादाव्यतिरिक्त, त्यांच्या वापरासंदर्भात सुरक्षा आणि प्रायव्हसीसंदर्भात मोठ्या प्रमाणात चिंता आहे. या तंत्रज्ञानातून पैसा कमावता येईल का याबद्दलही चिंता आहेत.

"तुम्ही जी माहिती थेरेपीमध्ये दिली, ती माहिती घेऊन कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर काय? अशी थोडीशी चिंता आहे", असं केली म्हणतात.

मानसोपचारतज्ज्ञ इयान मॅकरे उदयोन्मुख तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत. ते इशारा देतात की "काहीजण खातरजमा न करता याप्रकारच्या चॅटबॉट्सवर खूपच विश्वास ठेवत आहेत."

ते पुढे म्हणतात, "वैयक्तिकरित्या, मी कधीही माझी वैयक्तिक माहिती, विशेषकरून आरोग्य, मानसिक स्वरुपाची माहिती या चॅटबॉट्सना देणार नाही. ते फक्त प्रचंड प्रमाणात माहिती गोळा करत आहेत. तुम्ही ज्याची संमती देत आहात, त्याचा वापर नेमका कसा केला जातो आहे, याची तुम्हाला पूर्णपणे खात्री नसते."

मॅकरे म्हणतात, "भविष्यात असं म्हणता येणार नाही की अशाप्रकारची साधनं खासगीपण जपणारी, चांगल्या प्रकारे चाचणी केलेली असू शकत नाहीत. मात्र मला वाटत नाही की अद्याप आपण अशा स्थितीत आहोत की एखादा सर्वसामान्य वापरासाठीचा चॅटबॉट हा एक चांगला थेरेपिस्ट असू शकतो हे दाखवणारा कोणताही पुरावा आपल्याकडे आहे."

जॉन टेंच वायसाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते म्हणतात की, वायसा कोणतंही वैयक्तिक स्वरुपाची ओळख असणारी माहिती गोळा करत नाही. वायसाचा वापर करण्यासाठी युजर्सनी तिथे नोंदणी करण्याची किंवा वैयक्तिक माहिती देण्याची आवश्यकता नाही.

जॉन पुढे म्हणतात, "वायसाच्या एआय प्रतिसादांची गुणवत्ता सुधारण्यासाठी संभाषणाचा डेटाचा कधीकधी अनामिक स्वरुपात आढावा घेतला जाऊ शकतो. मात्र ज्यातून युजरची ओळख पटेल अशी कोणतीही माहिती घेतली जात किंवा संग्रहित केली जात नाही."

चॅटबॉट्सची विस्तृत श्रेणी आहे आणि जवळपास 30 स्थानिक एनएचएस सेवा आता वायसा नावाच्या चॅटबॉटचा वापर करतात.

फोटो स्रोत, AFP/ Getty Images

फोटो कॅप्शन, चॅटबॉट्सची विस्तृत श्रेणी आहे आणि जवळपास 30 स्थानिक एनएचएस सेवा आता वायसा नावाच्या चॅटबॉटचा वापर करतात.

"त्याचबरोबर वायसाचे बाह्य एआआय सेवा पुरवठादारांबरोबर डेटा प्रक्रिया करण्याचे करार आहेत. थर्ट पार्टी व्यापक भाषा मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी कोणत्याही युजरचं संभाषण वापरलं जाणार नाही याची खातरजमा करण्यासाठी हे करार करण्यात आलेले आहेत."

केली यांना वाटतं की सध्या चॅटबॉट्स पूर्णपणे मानवी थेरेपिस्टची जागा घेऊ शकत नाहीत. "आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो आहे. तुम्हाला खरोखर काय मिळतं आहे हे माहित नाही."

"पहिल्या टप्प्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत उपयुक्त ठरू शकते. मात्र व्यावसायिक मानवी सेवेसाठी ते पर्याय ठरू शकत नाहीत," असं जॉन टेंच मान्य करतात.

लोकं मोठ्या प्रमाणात असहमत आहेत. युगोव्ह च्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की फक्त 12 टक्के लोकांना वाटतं की एआय चॅटबॉट्स चांगले थेरेपिस्ट बनू शकतात.

मात्र काहीजणांना वाटतं की योग्य सुरक्षा उपाय केल्यास, प्रचंड भार असलेल्या मानसिक आरोग्य व्यवस्थेमध्ये चॅटबॉट्स एक तात्पुरता उपयुक्त पर्याय ठरू शकतात.

जॉन यांना चिंतेचा विकार आहे. ते म्हणतात की ते नऊ महिन्यांपासून मानवी थेरेपिस्टच्या प्रतीक्षायादीत आहेत. ते आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा वायसा या चॅटबॉटचा वापर करत आहेत.

ते म्हणतात, "सद्यपरिस्थितीत तिथे फारशी मदत उपलब्ध नाही. त्यामुळे तुम्ही जे यशस्वी होणार नाही अशा पर्यायावर अवलंबून राहता."

"या प्रचंड प्रतिक्षा यादींसाठीचा तो एक तात्पुरता पर्याय आहे...लोक आरोग्यसेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांशी किंवा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्याची वाट पाहत असताना त्यांना उपलब्ध होणारं ते एक साधन आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)