खाकी- द बिहार चॅप्टर : 2 टोळ्या,1 IPS अधिकारी आणि शेखपुरातला रात्रीचा अघोषित कर्फ्यू

- Author, चंदनकुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, पाटणा, बिहारमधून
सध्या नेटप्लिक्सवरील खाकी द बिहार चॅप्टर या वेबसीरिजची चर्चा आहे. ही सीरिज एस. पी (पोलीस अधीक्षक) अमित लोढा यांच्या पुस्तकावर आधारीत आहे.
अमित लोढा यांच्याबरोबरच या सीरिजमध्ये महतो गँगची माहिती देण्यात आली आहे. ही टोळी बिहारमधल्या शेखपुरा इथं 2000 सालच्या आसपास सक्रीय होती.
2005 साली काँग्रेसचे खासदार राजो सिंह यांची हत्या केल्याचा आरोप या टोळीवर होता. पिंटू महतोसुद्धा या टोळीचा सदस्य होता. पिंटू महतोवर अपहरण आणि आत्महत्येचे अनेक आरोप होते. वेबसीरिजमध्ये पिंटूमहतोवरील आधारित पात्राला चंदन महतो असं नाव आहे.
अमित लोढा हे भारतीय पोलीस सेवेचे एक अधिकारी आहेत. त्यांनी गुन्हेगारी, राजकारण आणि आपल्या अनुभवांवर आधारित बिहार डायरिज नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. ही वेबसीरिज त्यावरच आधारित आहे.
अमित लोढा सध्या बिहार पोलीसमध्ये इन्स्पेक्टर जनरल (एससीआरबी) पदावर कार्यरत आहेत. या वेबसीरिजचं लेखन नीरज पांडे यांनी केलंय. तर भव धुलिया त्याचे दिग्दर्शक आहेत.
बिहारमध्ये महतो टोळीने एका प्रदेशात दहशतीचं साम्राज्य कसं तयार केलं आणि अमित लोढा यांनी लोकांना कसं भयमुक्त केलं हे या सीरिजमध्ये दाखवलं आहे.
सीरिजमध्ये लोढा यांच्याशिवाय महतो टोळीच्या आणि एका पात्राला दाखवलं आहे, त्याचं सीरिजमध्ये नाव चंदन महतो आहे.
चंदन महतोचा उदय कसा झाला आणि स्वतःच्या बळावर त्याने आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि त्याच्या आव्हानाचा लोढा यांनी सामना कसा केला हे यात दाखवलं आहे.
यात राज्यातील राजकारण, पोलीस प्रशासनावरही टीप्पणी केलेली आहे. वेबसीरिजमध्ये अमित लोढांची भूमिका किरण टॅकरने, चंदनची भूमिका अविनाश तिवारीने केली आहे.
याशिवाय सीरिजमध्ये आशुतोष राणा, रवी किशन, अनुप सोनी आणि विनय पाठक यांनीही भूमिका वठवल्या आहेत. ही वेबसीरिज ज्या महतो टोळी आणि अमित लोढा यांच्यावर आधारित आहे, त्यांची येथे माहिती घेऊ.
या सीरिजनधील घटना सुमारे 20 वर्षांपूर्वीच्या आहेत. एकेकाळी बिहारमधल्या शेखपुरा परिसातील प्रदेशात बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज अगदी सहजपणे कानावर येई.
अंधार पडल्यावर लोक घराबाहेर पडायलाही घाबरत.
इथं पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेल्या अमित लोढा यांनी ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगतात.
या वेबसीरिजमध्ये टाटी आणि माणिकपूर हत्याकांडांचाही उल्लेख आहे.
टाटी आणि मानिपूर हत्याकांड काय आहे?
ही घटना 26 डिसेंबर 2001 रोजीची आहे. बिहारमधील शेखपुरा आणि बरबिघाच्यामध्ये एक लहानसा पूल आहे. त्याला टाटी पूल म्हणून ओळखलं जातं.
या पुलावर राष्ट्रीय जनता दलाच्या निकटवर्तीय लोकांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. टाटी हत्याकांडात शेखपुराचे आरजेडी जिल्हाध्यक्ष काशीनाथ यादव यांच्यासह अनिल महतो, अबोध कुमार, सिकंदर यादव आणि विपिन कुमार यांच्यासह 8 लोकांना मारण्यात आले होते.
टाटी पूल हत्याकांडानंतरच शेखपुरामध्ये टोळीयुद्धाची सुरुवात झाली असं सांगितलं जातं. त्यानंतर इथं अनेक लोकांच्या हत्या झाल्या.

शेखपुराचे स्थानिक पत्रकार श्रीनिवास यांनी त्या काळातील घटना जवळून पाहिलेल्या आहेत.
त्यांच्या मते या हत्याकांडाचा आरोप खासदार राजोसिंह, त्यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री संजय सिंह आणि राजो सिंह यांच्या परिवारातील अनेक लोकांवर लावला होता.
श्रीनिवास बीबीसीला म्हणाले, "अर्थात नंतर राजोसिंह यांना दोषमुक्त करण्यात आलं. तर 2010मध्ये संजय सिंह यांना ज्या दिवशी शिक्षा ठोठावली, त्याच दिवशी त्यांचं हृद्यविकाराच्या झटका आल्याने निधन झालं."
या प्रदेशात तेव्हा 2 टोळ्या सक्रीय होत्या. एक होती अशोक महतो टोळी, तिला मागास जातींची टोळी म्हटलं जाई आणि दुसरी होती पुढारलेल्या जातींची टोळी, ती मूलतः भूमिहारांची टोळी होती.
महतो टोळी
नेटफ्लिक्सने प्रसिद्ध केलेल्या वेबसीरिजमध्ये ज्या चंदन महतोची चर्चा सुरू आहे, तो या महतो टोळीशी संबंधित असल्याचं सांगितलं गेलंय.
वास्तवात अमित लोढा ज्या महतो टोळीविरोधात लढत होते त्या टोळीचा नेता अशोक महतो होता. परंतु सीरिजमध्ये चंदन महतोचं पात्र अशोक महतो गँगच्या पिंटू महतोसारखं आहे.
टाटी हत्याकांडानंतर चार वर्षांनंतरच राजो सिंह यांची हत्या करण्यात आली होती. त्या काळातील घटना जाणून घेण्यासाठी संजय सिंह यांचे पुत्र आणि बरबिघाचे सध्याचे आमदार सुदर्शन यांच्याशीही संपर्क केला.
आपण या वेबसीरिजबद्दल आता फक्त ऐकलेलं आहे. ती पाहिल्याशिवाय कोणतीही प्रतिक्रिया देता येणार नाही असं सुदर्शन कुमार यांनीसांगितलं.
नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये मानिकपूर हत्याकांडाचाही समावेश आहे.

श्रीनिवास सांगतात, ही घटना 2006 ची आहे. यामध्ये सुरुवातीला महतो टोळीने झोपलेल्या लोकांची हत्या केली होती. त्यानंतर या टोळीने या हत्याकांडासाठी एका कुटुंबावर पोलिसांना माहिती पुरवल्याचा आरोप केला. त्याचा बदला घेण्यासाठी महतो टोळीने त्या कुटुंबाच्या घरातील उपस्थित सर्व लोकांची हत्या केली होती.
21 आणि 22 मे 2006 च्या इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीनुसार यात तीन मुलांसह 7 लोकांची हत्या झाली होती. याबाबतीत 21 मे 2006 रोजी हिंदुस्तान टाइम्सनेही बातमी प्रसिद्ध केली होती.
या हत्याकांडाच्या फक्त काही दिवस आधी नालंदा जिल्ह्यात अशोक महतो टोळीेच्या 9 लोकांची हत्या झाली होती. अशोक महतो टोळीने या हत्याकांडासाठी अखिलेश सिंह यांचे समर्थक दोषी असल्याचं मानलं. त्यामुळेच त्यांनी त्याचा बदला घेण्यासाठी मानिकपूरमध्ये अखिलेश सिंह यांच्या समर्थकांची हत्या केली, असं मानलं जातं.
शेखपुरा आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात अशा प्रकारच्या हत्या होणं एक सामान्य बाब झाली होती. मानिकपूर हत्याकांडाविरोधात मोठा जनआक्रोश उभा राहिला. त्यानंतरच अमित लोढा यांना इथं एसपी पदावर पाठवण्यात आलं.
हत्याकांडाच्या मालिका कशा थांबल्या?
शेखपुरा नगरपालिकेचे एकेकाळी अध्यक्ष असणारे गंगाकुमार यादव सांगतात, “अमितकुमार लोढा यांनी झारखंडच्या देवघरमधून महतो टोळीच्या काही सदस्यांना पकडलं, त्यानंतरच या शहरात शांतता प्रस्थापित झाली.”
गंगाकुमार यादव यांच्यामते, "त्या काळात अरियरी येथे सतत हिंसा होत असे, त्याचा परिणाम हळूहळू शेखपुरा शहरावरही होऊ लागला. इथं कधीही गोळ्या झाडल्या जात. यात अनेक व्यापारी, सरपंच, माजी खासदार असणाऱ्या लोकांची हत्या झाली होती. लोक संध्याकाळी सहानंतर घरातून बाहेर पडायला घाबरत असत."
पत्रकार श्रीनिवास सांगतात, "मानिकपूरच्या लोकांनी हत्याकांडात मेलेल्या लोकांची प्रेतं उचलायला नकार दिला होता. तेव्हा नितिशकुमारही तिथं आले होते, त्यांनी आश्वासन दिल्यावरच प्रेतांवर अंत्यसंस्कार केले गेले."

श्रीनिवास यांच्या माहितीनुसार या घटनेनंतर शेखपुरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमित लोढा यांना पाठवण्यात आलं होतं.
गंगाकुमार यादव सांगतात, "अमितकुमार लोढा साहेबांनी गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आणि जेलमध्ये टाकलं."
श्रीनिवास सांगतात, "इथं शांतता प्रस्थापित होण्यासाठी अमित लोढांचे आभार नक्कीच मानले पाहिजेत. त्यांचं पुस्तक आणि वेबसीरिजसुद्धा हिट झाली. मात्र त्यांनी ज्या लोकांना पकडलं त्यातले बहुतेक सगळे आज बाहेर आहेत हे सुद्धा सत्य आहे. कारण पोलीस नीट तपासही करू शकले नाहीत आणि न्यायालयात ठोस पुरावेही सादर करू शकले नाहीत."
शेखपुरात त्याकाळात काय होत होतं आणि नेटफ्लिक्सवरची वेबसीरिज अमित लोढा यांच्या पुस्तकावर कितपत आधारित आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही अमित लोढा यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र अनेकवेळा प्रयत्न करुनही त्यांच्याशी संपर्क झाला नाही.
अशोक महतो गँगचं काय झालं?
शेखपुरामधील माणिकपूर हत्याकांडानंतर एसपी अमित लोढा यांनी अनेक क्लृप्त्या लढवून पिंटू महतो आणि त्याच्या टोळीच्या सदस्यांना अटक केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावरचा खटला दीर्घकाळ चालला.
अशोक महतो आणि पिंटू महतो त्या गँगचे सदस्य होते.
पिंटूवर नवादा जेल तोडण्याचा आणि पोलिसांना ठार करण्याचा आरोप होता. अशोक महतोवर खासदार राजो सिंह यांच्या हत्येचा आरोप होता.
काही काळाने राजो सिंह यांच्या हत्येच्या आरोपातून अशोकची सुटका झाली.
महतो टोळीचा प्रमुख असणारा अशोक महतो आज नवादा जेलमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे.
तर पिंटू महतोला राजो सिंह यांच्या हत्येसाठी दोषी ठरवून त्याला तिहार जेलमध्ये ठेवलेलं आहे.
अमित लोढा
या वेबसीरिजमध्ये मुख्य पात्राचं नाव अमित लोढा आहे. हे ज्या पोलीस अधीक्षकांवर आधारित पात्र आहे, त्यांचं नावही अमित लोढाच आहे.
त्यांच्या पुस्तकावरच ही वेब सीरिज तयार करण्यात आली आहे, या सीरिजमध्ये अमित लोढा राजस्थानचे असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे.
वास्तवातही अमित लोढा यांचा राजस्थानशी संबंध आहे. ते 1997 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर ते सनदी सेवेत आले.

फोटो स्रोत, Getty Images
सुमारे 25 वर्षांपूर्वी ते बिहारमध्ये आले. त्या काळात बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उभे केले जात.
राज्यातील अनेक प्रदेशात हिंसा होत असे. काही ठिकाणी जातीय वर्चस्वांसाठी अपराध होत तर काही ठिकाणी टोळीयुद्धं होतं.
अमित लोढा यांनी बिहारच्या नालंदा, बेगूसराय, मुजफ्फरपूर, गया, शेखपूरा अशा जिल्ह्यांमध्ये काम केलं.
2006मध्ये त्यांना शेखपुरा जिल्ह्याचं एसपी (पोलीस अधीक्षक) पद मिळालं. त्या जिल्ह्यात महतो टोळी आणि भूमिहार टोळ्यामध्ये हिंसा सुरू होती.
महतो टोळीच्या गुन्हेगारांना अटक केल्यामुळे अमित लोढांना भरपूर लोकप्रियता मिळाली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








