कतारमधला असा 'मोती' जो जगभरातील लोकांसाठी आकर्षण ठरतोय...

    • Author, जोस कार्लोस क्यूटो
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'कतार हा जर एका बुडबुड्यासारखा असेल, तर 'पर्ल' कतारमध्ये वसलेला एक बुडबुडा आहे.'

कतारमध्ये पर्यटकांसाठी बनविण्यात आलेल्या आलिशान कृत्रिम बेटावर राहणारे ब्रिटीश नागरिक सिवोभान टली या म्हणीचा उल्लेख करतात.

जर खास पद्धतीने बनवलेली ही स्थळं पाहिली, तर तुम्हाला देखील ही म्हण खरी वाटेल. इथल्या रस्त्यांवरून फिरताना तुम्हाला भूमध्य प्रदेशातील युरोपियन देशातून फिरत असल्याचा भास होईल.

इथे कतारमधील अन्य भागांच्या तुलनेत जास्त परदेशी लोक दिसतील. संध्याकाळी पाश्चात्य पद्धतीचे पोशाख केलेले अनेक लोक इथल्या स्ट्रीट कॅफे आणि विस्ट्रो शैलीच्या रेस्तराँमध्ये निवांतपणे बसलेले दिसतात.

स्पॅनिश पद्धतीचे चौक, व्हेनिसच्या धर्तीवर बनवलेले कालवे आणि इमारती पाहायला मिळतात. चौकात कारंजी आहेत. रुंद रस्ते आणि त्यावरून धावणाऱ्या लाखो डॉलर किमतीच्या स्पोर्ट्स कारही दिसतील.

इथे लोक लग्झरी व्हिला किंवा अपार्टमेंट ब्लॉकमध्ये राहतात. 20-20 मजली इमारतीमध्ये स्वीमिंग पूल, जिम आणि खासगी बीचसारख्या सुविधा आहेत.

दोहामधल्या इतर ठिकाणी असं दृश्य दिसत नाही.

'ला पर्ला'चं सुंदर विश्व

'ला पर्ला' युनायटेड डेव्हलपमेंट कंपनीचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. ही कतारमधली प्रमुख कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. ला पर्ला हे एक मनुष्यनिर्मित कृत्रिम बेट आहे. त्यासाठी समुद्रातल्या चाळीस लाख स्क्वेअर मीटरचा पट्टा वापरण्यात आला आहे.

हा कतारमधला पहिला असा नागरी प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये कतारच्या बाहेरचे लोकही प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. इथे 25 हजार रहिवासी युनिट आहेत. सध्या इथं 33 हजार लोक राहतात.

इथल्या एका स्टुडिओ अपार्टमेंटची किंमत 3 लाख डॉलर एवढी आहे. समुद्र किनाऱ्याला लागून असलेला पाच बेड-रुमच्या व्हिलाची किंमत आहे 1 कोटी 20 लाख डॉलर्स.

आकाशातून पाहिलं तर या सगळ्या भागाचा आकार एखाद्या मोत्यासारखा दिसतो. इथे अनेक रेस्तराँ आणि लग्झरी हॉटेल, शॉपिंग मॉल, बार, थिएटर आणि इतर आलिशान ठिकाणं आहेत.

यांपैकीच एका लग्झरी हॉटेलमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी आलेली अमेरिकेची टीम थांबली आहे.

सिवोभान आणि इयान टली हे एक ब्रिटीश दांपत्य आहे. ते कतारमध्ये गेल्या सात वर्षांपासून राहात आहेत. यापैकी साडे सहा वर्षांपासून ते 'ला पर्ला'मध्येच राहात आहेत. पत्नी ब्रिटीश आहे आणि पती स्कॉटिश. दोघेही आरोग्य क्षेत्रात काम करतात.

त्यांनी आम्हाला व्हिवा बाहरियामधली आपली बिल्डिंग दाखवली. बीचवर बांधण्यात आलेल्या 30 टॉवरचा हा एक समूह आहे, जो समुद्र किनाऱ्यावर अर्धवर्तुळाकार पद्धतीने बांधला आहे.

सिवोभान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "सुरूवातीला आम्ही जेव्हा इथे आलो, तेव्हा फारशा सेवा-सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र अतिशय कमी काळात इथे रेस्तराँ, कॅफे आणि इतर बिझनेस उभे राहिले. या भागात पायी चालणं अतिशय आनंददायी आहे. वाहनांचा कमी वापर करणं इथे जास्त सोयीचं आहे."

दोहा हे एक असं आधुनिक शहर आहे, जे अनेक पदरी मार्गांनी जोडलेलं आहे. काही ठराविक गल्ल्या, चौक आणि शॉपिंग सेंटर सोडले तर इथल्या रस्त्यांची बांधणी ही पादचाऱ्यांच्या सोयीने केलेली नाहीये.

त्यामुळे इथे हिरवाई, बगीचे दिसत नाहीत. वर्षभर तापमान जास्त असतं, त्यामुळेही पायी चालणं अवघड होतं. अशावेळी भूमध्य सागरी भागातील देशांपासून प्रेरणा घेऊन विकसित केलेलं 'ला पर्ला' अनेकांना अधिक सोयीचं वाटतं.

सिओभान सांगतात, " सुरुवातीला इथे तीन वर्षं राहायचं असा विचार आम्ही केला होता. पण आता आम्हाला इथे येऊन सात वर्षं झाली आहेत. आम्ही इथे अतिशय खूश आहोत आणि आम्हाला या ठिकाणी सुरक्षितही वाटतं."

कतार तसा सुरक्षित देश आहे, मात्र इथल्या नागरिकांना परदेशी लोकांच्या कपडे घालण्याचा ढंग तसंच इतर सवयी पसंत नाहीत. पण पर्लमधलं वातावरण थोडं वेगळं आहे.

सुरुवातीला इथे केवळ परदेशी लोक राहायचे, जे केवळ कतारमध्ये मिळणाऱ्या सुविधांमुळेच इथे आले होते.

मात्र, आता इथे कतारचे लोकही आहेत. इथल्या अनेक प्रॉपर्टी शाही परिवाराच्या नावावर आहेत.

व्हेनिससारख्या गल्ल्या आणि छोटी खासगी बेटं

इथे एक भाग असा आहे, जो इटलीतल्या व्हेनिसप्रमाणे विकसित केला आहे. त्याचं नाव आहे- क्वेनेट क्वार्टियर.

मूळचे व्हेनेझुएलाचे असलेले गुस्तावो जारामिलो सांगतात, "हा भाग अगदी व्हेनिससारखा आहे, फक्त कालव्यात तरंगणाऱ्या छोट्या नावा नाहीयेत."

गुस्तावो इंजिनिअर आहेत आणि 'ला पर्ला'मध्ये राहतात. ते आणि त्यांची पार्टनर सबरिना मासियोविचो एका उंच टॉवरमध्ये राहतात. या टॉवरमध्ये पूल आहे आणि हा पूल अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे.

या दोघांनी आम्हाला कारमध्ये बसवून संपूर्ण पर्ल दाखवलं आणि इथे राहण्याबद्दलही गप्पा मारल्या.

सबरिना सांगतात, "व्हेनेझुएलामध्ये ज्या समस्या आहेत, त्यांच्या तुलनेत कोणतीही जागा चांगलीच म्हणायला हवी. पण तरीही दोह्यामध्ये राहणं आणि ला पर्लामध्ये राहणं यामध्ये बराच फरक आहे."

आम्ही आयोला डाना भागातून जात होतो, तेव्हा गुस्तावो यांनी सांगितलं, "इथे व्हीडिओ करताना थोडं सावध राहा. कारण इथे शूटिंगला मनाई आहे. हा भाग इथल्या नवीन योजनांपैकी एक आहे. इथे लोक खासगी बेटं खरेदी करू शकतात, स्वतःची मोठी घरं बांधू शकतात."

गुस्तावो इथे एनर्जी सेक्टरमध्ये काम करतात. अपार्टमेंटमधल्या सोयीसुविधांसाठी त्यांना शुल्क द्यावं लागतं. ट्रान्सपोर्ट आणि टेलिफोनसाठी त्यांना शुल्क द्यावं लागतं. त्यांच्या पगाराचा 25 टक्के हिस्सा हा त्यावरच खर्च होतो. पण बाकी बचतीवर कोणताही टॅक्स लागत नाही.

ते इथं राहण्याचे फायदे सांगत असतात तेव्हाच आम्हाला एक मोठी आणि चौकोनी बिल्डिंग दिसते. ती रेनेसाँ प्लेससारखी होती.

गुस्तावो सांगतात की, हा एक सुपर कंडिशनिंग प्लांट आहे. इथे बर्फाच्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि पाइपलाइनच्या माध्यमातून ला पर्ला आणि इथल्या प्रत्येक इमारतीत ते पाणी पोहोचवलं जातं.

बुडबुड्यामध्ये अजून एक बुडबुडा

आयोला डाना आणि वेनेटियन क्वार्टरशिवाय या बेटावरच्या उंच इमारतींमध्ये अनेक कार्यालयं, स्पोर्ट्स मरीना, रेसिडेन्शियल टॉवर आणि सिंगल फॅमिली व्हिलासुद्धा आहेत.

त्यांना पाहूनच सिवोभान सांगतात, "कतार हा जर एका बुडबुड्यासारखा असेल, तर 'पर्ल' कतारमध्ये वसलेला एक बुडबुडा आहे.'

कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या अडचणी आणि युक्रेन युद्धासारख्या विषयांवर आमच्या गप्पा सुरू होत्या. पण इथलं आयुष्य खूप वेगळं असल्याचं टली दांपत्य सांगत होतं.

पर्लमधील गल्लीबोळांत पाश्चिमात्य देशांतील महिला कमी कपड्यांत दिसतात. समुद्र किनाऱ्यावर त्या बिकिनीमध्येही जातात आणि कोणी त्यांच्याकडे लक्षही देत नाही.

पत्रकार तसंच स्थानिकांमध्ये कतारमधील पर्लसारख्या स्वतंत्र बबलप्रमाणे असलेल्या जागांची चर्चा वेगळ्या संदर्भानेही होते.

इथल्या झगमगाटाच्या संदर्भाने त्या रिसेप्शन कँपबद्दलही बोललं जातं, जिथे आग्नेय आशिया, आफ्रिका, पूर्व आफ्रिका यांसारख्या भागातून आलेल्या श्रमिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. ते दोह्याला लागून असलेल्या भागात राहतात. त्यांना 'ला पर्ला'सारख्या ठिकाणी येण्याची परवानगी नाहीये.

त्यांना वेगळं ठेवलं जातं, जेणेकरून कतारमधील झगमगाटावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये. पण कतारनं हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे त्या लोकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आल्याचं कतार सरकारचं म्हणणं आहे.

जारामिलो म्हणतात, "आम्ही सगळ्यांना भेटतो. पण आमच्या इथलं वातावरण हे बरंचसं लॅटिन आणि स्पॅनिश आहे. आम्ही कतारमधील किंवा स्थानिक अरब नागरिकांसोबत अधिक मिसळत नाही."

सिवोभान सांगतात, "इथली एकच गोष्ट आम्हाला खटकते, ती म्हणजे सतत सुरू असलेलं ड्रिलिंग. सगळीकडे बांधकाम सुरू आहे. समोरची इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे. तिचं बांधकाम सप्टेंबरमध्ये सुरू झालं होतं." जारामिलो आणि मासियोविचियो यांनी इथे हॉस्पिटल आणि चांगल्या शाळांची कमतरता असल्याचीही तक्रार केली. इथे आता एक मोठं हॉस्पिटल उभं राहात आहे, ज्यामुळे आम्हाला मदत होईल, असंही ते सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)