चिमुकल्यांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, भारतातल्या 'या' गावात एक हजारांहून अधिक युट्यूबर्स

    • Author, सकिब मुगलू

सप्टेंबरच्या एका सकाळी रायपूरजवळच्या तुलसी गावातले गावकरी शेतावर जायला निघाले. त्यातल्या महिलांच्या एका गटाला 32 वर्षांचे युट्यूबर जय वर्मा यांनी मध्येच थांबवलं. एका नव्या व्हीडिओचं शूट त्यांना करायचं होतं.

महिलाही त्यांच्याभोवती जमल्या. त्यांनी साड्यांचे पदर सावरले आणि छानसं हसून कॅमेरात पाहू लागल्या.

त्यातल्या एका वयस्कर महिलेला जय वर्मा यांनी प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसायला सांगितलं. दुसरीला तिच्या पाया पडायला आणि तिसरीला तिला पाणी द्यायला लावलं.

शहरात आणि हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या महानगरात राहणाऱ्यांना त्यांचा हा गावाकडचा सण दाखवणारा व्हीडिओ खूप आवडणार आहे, हे त्यांनी ओळखलं होतं. महिलांनाही शुटिंग करताना मजा येत होती. सगळं शुटिंग झालं आणि महिला पुन्हा शेतावर जायला निघाल्या.

तिथून काही अंतरावरच दुसरा एक गट त्यांचा वेगळा व्हीडिओ तयार करण्यात व्यस्त असलेला दिसला. त्यातला एकजण हातात मोबाईल धरून हिपहॉपच्या तालावर डोलणाऱ्या आणि एखाद्या सराईत कालाकारासारखे हातावरे करून अंग हलवणाऱ्या 26 वर्षांच्या राजेश दिवारचा व्हीडिओ काढत होता.

तसं पहायला गेलं तर तुलसी हे भारतातल्या इतर कोणत्याही गावासारखंच गाव. बसक्या कौलारू घरांचं आणि कच्च्या रस्त्यांचं. घरावरच्या पाण्याच्या टाकीवर उभं राहिलं तर सगळं गाव दिसेल एवढंसंच.

आजही वडाच्या झाडाच्या पारावर सगळा गाव जमतो. पण भारतातलं "युट्यूब गाव" ही तुलसीची जगावेगळी ओळख आहे.

गावाची लोकसंख्या जेमतेम चार हजार असेल. पण त्यातली हजारापेक्षा जास्त लोकं युट्यूबसाठी काम करतात. गावात चालताना युट्यूबच्या व्हीडिओत काम केलं नाही असा माणूस शोधणं अवघड असतं.

युट्यूबच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाने इथली स्थानिक अर्थव्यवस्था पार बदलून गेली आहे. पण आर्थिक फायद्यांच्या पलिकडे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने गावात भेदभाव कमी करायला आणि सामाजिक बदल घडवून आणायला मदत केली, असं गावकरी सांगतात.

स्वतःचं युट्यूब चॅनेल काढून त्यातून पैसे कमावणाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. या महिलांसाठी गावात कामाच्या फार कमी संधी उपलब्ध आहेत.

आता वडाच्या झाडाखाली रंगणाऱ्या गप्पांमध्येही तंत्रज्ञान आणि इंटरनेट हेच विषय असतात.

फेब्रुवारी 2025 ला युट्यूबला 20 वर्ष पूर्ण होतायत. स्टॅटिस्टा या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जगातली 2.5 अब्ज लोक दर महिन्याला युट्यूब वापरतात. भारत हा देश तर युट्यूबसाठी सर्वात मोठा बाजारपेठ उपलब्ध करून देतो.

गेल्या दशकभरात युट्यूबनं फक्त इंटरनेटच नाही तर मानवी संस्कृतीच्या उत्पादन आणि उपभोगाबद्दलचे आपले विचारही बदलून टाकलेत.

एका दृष्टीने तुलसी हे गाव म्हणजे युट्यूबचा जगावर कसा परिणाम झाला याचं मूर्तिमंत उदाहरण झालं आहे. तिथल्या अनेकांचं आयुष्यच या ऑनलाईन व्हीडिओच्या भोवती फिरतं.

"मुलांना वाईट सवयी आणि गुन्हेगारीपासून लांब ठेवण्यासाठीही त्याची मदत होते," तुलसी गावातले शेतकरी 49 वर्षांचे नेत्रम यादव सांगतात की, गावातल्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापराकडे पाहून त्यांना आनंद होतो. "या कंटेट क्रिएटर्सनं जे केलंय आणि मिळवलंय ते पाहून गावातल्या सगळ्यांनाच खूप अभिमान वाटतो," असं ते म्हणतात.

सोशल मीडियानं घडवली क्रांती

तुलसीचा कायापालट होण्याची सुरुवात झाली 2018 ला. जय वर्मा आणि त्यांचा मित्र ज्ञानेंद्र शुक्ला या दोघांनी मिळून 'बिईंग छत्तीसगढीया' नावाचं एक चॅनेल युट्यूबवर सुरू केलं.

"रोजच्या रहाटगाड्याचा फार कंटाळा आला होता. आमच्यातली क्रिएटीव्हिटी कायम ठेवण्यासाठी काहीतरी नवं करायचं होतं," असं वर्मा सांगतात.

त्यांनी बनवलेला तिसरा व्हीडिओ फारच व्हायरल झाला. एका तरूण जोडप्याला व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बजरंग दलाचे कार्यकर्ते त्रास देत आहेत, असं त्यात दाखवलं होतं. "व्हीडिओ खूप विनोदी होता. पण त्यातून एक संदेशही लोकांपर्यंत गेला. व्हीडिओच्या शेवटी कोणताही निष्कर्ष न दाखवता प्रेक्षकांनाच त्याचा अर्थ लावू दिला," असं वर्मा पुढे सांगत होते.

काही महिन्यातच त्यांच्या युट्यूब चॅनेलला हजारो लोकांनी फॉलो केलं. आज त्यांचे 1 लाख 25 हजार सबस्क्राईबर्स आहेत. तर, त्यांच्या व्हीडिओला एकूण 26 कोटी व्हूव्ज होते.

ते इतका वेळ सोशल मीडियावर घालवतात म्हणून काळजी करणारे घरातले, त्यातून इतके पैसे येऊ शकतात हे कळल्यापासून मात्र काही बोलत नाहीत. "आम्ही महिन्याला 30,000 रुपये कमावत होतो. शिवाय, व्हीडिओसाठी मदत करणाऱ्यांनाही काही मानधन देत होतो," शुक्ला म्हणाले. कालांतरानं दोघांनी नोकरीही सोडली आणि पूर्णवेळ युट्यूब व्हीडिओचं काम हाती घेतलं.

त्यांच्या यशानं तुलसीच्या इतर रहिवाशांनाही प्रेरणा मिळाली. व्हीडिओ करण्यासाठी मदत करणाऱ्यांना मानधनासोबतच ते एडिट करण्याचं आणि स्क्रिप्ट लिहिण्याचं प्रशिक्षणही दिलं जात असे, असं शुक्ला पुढं सांगत होते.

मग त्यातून काही गावकऱ्यांनी त्यांचे स्वतःचे चॅनल्सही सुरू केले. काहींनी इतरांना मदत करण्यातच समाधान मानलं.

या सगळ्यानं स्थानिक अधिकाऱ्यांचं लक्ष गावाकडं गेलं. गावकऱ्यांच्या यशानं प्रभावित झाल्यावर राज्य सरकारनं 2023 मध्ये गावात एक अनोखा स्टुडिओ उभारला.

गावाकऱ्यांचं युट्यूबवरचं काम पाहून आपल्या समाजातली तंत्रज्ञान दरी भरून काढण्याचा हा एक मार्ग असू शकतो असं रायपूरचे माजी जिल्हाधिकारी सर्वेश्वर भुरे यांना वाटू लागलं.

"शहरी आणि ग्रामीण भागातल्या जगण्यातली दरी भरून काढणं हा स्टूडिओमागचा उद्देश होता," असं ते सांगतात.

"त्यांचे व्हीडिओ प्रभाव पाडणारे होते. त्यातले विषय ताकदीचे होते. ते लाखो लोक ते पाहत होते. स्टूडिओ हा त्यांना प्रेरणा देण्याचा एक प्रयत्न होता."

हा खर्च सार्थकी ठरला. युट्यूबनं गावातल्या शेकडो तरुणांच्या उपजिविकेचा प्रश्न सोडवला.

त्याने स्थानिक मनोरंजन क्षेत्राला बढती मिळाली आणि अनेक तुलसी रहिवाश्यांना त्यांच्या छोट्या गावातून जगासमोर आणलं.

मोबईलमधून मोठ्या पडद्यावर

तुलसीच्या युट्यूब वेडातून उभारलेल्या सगळ्या सोशल मीडिया सेलिब्रेटींपैकी कुणीही 27 वर्षांच्या पिंकी साहू यांना मागे टाकू शकलेलं नाही. एका दुर्गम, शेतानं वेढलेल्या गावात वाढलेल्या साहू यांची अभिनेत्री आणि नृत्यांगना होण्याची इच्छा लोकांना दिवास्वप्न वाटायची.

त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी तर अभिनयाकडे तुच्छ नजरेने पहायचे.

त्यांचा विरोध पत्करून साहू इन्टाग्राम रिल्सवर आणि युट्यूब शॉर्ट्सवर त्यांच्या डान्सचे व्हीडिओ टाकू लागल्या. 'बीईंग छत्तीसगढीया'च्या संस्थापकांपर्यंत हे व्हीडिओ पोहोचले. त्यांनी साहू यांना त्यांच्या चॅनेलसाठी व्हीडिओ बनवायला सांगितलं.

"माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं," साहू म्हणतात. "त्यांनी माझी प्रतिभा ओळखली आणि माझी कौशल्य विकसित करायला मदत केली."

साहू यांचे 'बीईंग छत्तीसगढीया'वरचे व्हीडिओ सगळ्यांना आवडू लागले. छत्तीसगढच्या चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या एका स्थानिक निर्मात्याच्या नजरेत ते भरले तेव्हा मात्र साहू यांच्या प्रगतीचा आलेख एकदम उंचावला.

त्यातूनच साहू यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हापासून त्यांनी एकूण सात सिनेमात काम केलं आहे.

त्यांना संधी देणारे निर्माते -दिग्दर्शक होते बिल्सापूर या जवळच्याच शहरात काम करणारे आनंद मनिकपुरी.

"चांगलं काम करणारा एक नवा चेहरा मला हवा होता आणि साहू यांच्याकडे ते सगळं काही होतं," मनिकपुरी म्हणाले.

वर्मा आणि शुक्ला यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्वतःचं युट्यूब चॅनेल काढलं तेव्हा तुलसी गावचा आदित्य भागेल तर कॉलेजमध्येच शिकत होता. त्यांचं तंत्र शिकून त्याने एका वर्षांत 20 हजार फॉलोअर्स कमावले आणि युट्यूबवरून पैसे कमवायला सुरूवात केली.

मग वर्मा यांनीच त्याची 'बिईंग छत्तीसगढीया'च्या व्हीडिओचं लिखाण आणि दिग्दर्शन करण्यासाठी नेमणूक केली. "त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा सिलेब्रेटींना भेटल्यासारखं वाटत होतं," आदित्य सांगतो.

त्याचं युट्यूबवरचं काम पाहून त्याला रायपूरच्या एका प्रॉडक्शन कंपनीनं कामावर घेतलं. पुढं 'खरून पार' या बीग बजेट चित्रपटासाठी लिखाण आणि दिग्दर्शन करण्याची संधी त्याला मिळाली.

"त्या झगमगाटाच्या दुनियेत एकदा काम करता यावं एवढीच आशा मी करू शकतो," असं तो म्हणातो.

युट्यूबमधून सिनेमाच्या क्षेत्रात वळालेला असाच एक तरूण म्हणजे 38 वर्षांचे मनोज यादव. त्यांच्या गावात दरवर्षी होणाऱ्या नौटंकीमध्ये त्यांना लहानपणी छोट्या रामाची भुमिका करण्याची संधी मिळाली होती.

त्यावेळी त्यांना मिळालेल्या टाळ्यांचा आवाज छत्तीसगढच्या सगळ्या सिनेमा थेटरातही ऐकू येईल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं.

अनेक वर्ष युट्यूब व्हीडिओत काम केल्यानंतर यादव यांना एका चित्रपटात भुमिका करण्याची संधी मिळाली. त्यांच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याचं कौतूक सर्वत्र होऊ लागलं.

आज प्रसिद्धी, पैसा-अडका सगळं काही यादव यांच्या पायाशी लोळण घेत आहे. "युट्यूबशिवाय यातलं काहीही शक्य झालं नसतं," ते म्हणतात. "मला माझ्या भावना शब्दांत मांडता येत नाहीत."

महिलांचं सबलीकरण

या तंत्रज्ञान क्रांतीत युट्यूबनं तुलसी गावातल्या महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे.

द्रौपदी विष्णू या गावाच्या माजी सरपंच. घरगुती हिंसाचारासारख्या सामाजिक समस्या असणाऱ्या भारतासारख्या देशात भेदभाव कमी करण्यात आणि सामाजिक बदल घडवून आणण्यात युट्यूब महत्त्वाची भुमिका बजावतं, असं त्या सांगत होत्या

"भारतातल्या अनेक बायका आजही पितृसत्ताक पद्धती पाळतात. विशेषतः सुनांना त्या पद्धतीनं वागवतात. या व्हीडिओच्या माध्यमातून ते चक्र भेदायला मदत होते," असं द्रौपदीताई म्हणाल्या.

अशाच एका विषयावर अलिकडेच केलेल्या एका व्हीडिओत 61 वर्षांच्या आजींनी काम केलं. "महिलेला सन्मानानं आणि समतेनं वागवण्याचं महत्त्वं सांगणारा तो व्हीडिओ होता. गावप्रमुख होते तेव्हा मीही त्याचा समतेचा प्रचार करायचे. म्हणून त्यात काम करताना मला आनंद वाटत होता," असं आजी म्हणत होत्या.

28 वर्षांचा राहुल वर्मा हा गावातला आणखी एक व्यक्ती. लग्नाचे फोटो काढायचं काम तो करतो. गावकऱ्यांच्या मदतीनं त्यानंही युट्यूबची कला शिकून घेतली. हा प्लॅटफॉर्म आयुष्य बदलून टाकणारा आहे असं तो म्हणतो.

"आधी माझी आमच्या आया, बहिणी या कामात फक्त मदत करायच्या. आता त्या त्यांचं स्वतःचं चॅनल चालवतात. याची आम्ही कधी कल्पनाच केली नव्हती," असं तो म्हणतो.

त्याचा 15 वर्षांचा भाचाही गावातल्या लोकांना कंटेट क्रिएशनच्या कामात मदत करतो. "हा इथला महत्त्वाचा व्यवसाय झालाय. सगळे त्यात सहभागी होतात."

कोविड-19 साथरोगाच्या काळात भारतामध्ये ग्रामीण भागातल्या कटेंट क्रिएटर्सचा जणू स्फोट झाला होता. 2020 मध्ये भारतानं टिकटॉकवर बंदी आणायच्या आधी हे कंटेट क्रिएटर्स त्याला विशेष पसंती द्यायचे.

कंटेट बनवणाऱ्यांमध्ये सुरूवातीला पुरूष जास्त प्रमाणात असल्याचं श्रीराम व्यंकटरमन हे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेन्कोलॉजीमधले प्राध्यापक सांगतात.

पण साथरोगानंतर अनेक महिला सोशल मीडियावर यशस्वीपणे चॅनेल चालवू लागल्याचं ते पुढे सांगत होते. त्याने आर्थिक उत्पन्नाची नवी साधनं महिलांसाठी खुली झाली.

त्याने सगळ्यांसाठीच जागतिक पातळीवर अनेकांशी जोडण्याची संधीही उपलब्ध झाल्याचं व्यंकटरमन पुढे सांगतात. "अनेकांनी युट्यूब सबक्राईबर्सचा वापर करून केसांचं तेलं, घरगुती मसाले असे अनेक नवे व्यवसाय सुरू केले. त्यांचा कंटेट बघणारे प्रेक्षक हा त्यांचा प्राथमिक ग्राहक झाला."

पण काहींसाठी हे सारं पैशाच्या पलिकडचा आनंद देणारं होतं. "माझ्या गावाच्या चॅनेलकडून बनवल्या जाणाऱ्या व्हीडिओंमध्ये काम करायला मला खूप आवडतं. त्याच्या बदल्यात मी कशाचीही अपेक्षा ठेवत नाही," 56 वर्षांच्या रामकली वर्मा सांगतात.

त्या गृहिणी आहेत. पण आता व्हीडिओंमधे अभिनय करणारी प्रेमळ आई अशीही त्यांची ओळख झाली आहे. त्यांच्याकडे असणारं अभिनय कौशल्य शोधूनही सापडणार नाही.

रामकली काम करतात त्या व्हीडिओत नेहमी लिंगभाव भेदभावाबद्दल भाष्य केलेलं असतं. आपल्या सूनेला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन देणारी सासू ही त्यांची आवडती भुमिका असल्याचं त्या सांगतात.

"त्यातून महिलांच्या शिक्षणाचा आणि सबलीकरणाचा प्रचार मला करता आला. असा अभिनय करून मला समाधान आणि मनःशांती मिळते," त्या म्हणतात.

आपलं यश आणि स्वावलंबन पाहून इतर मुलींनीही पुढे यावं असं पिंकी साहू यांनाही वाटतं.

"मी माझी स्वप्न पूर्ण करू शकते, तर त्याही करू शकतात," त्या म्हणतात. आपल्या वडिलांंसोबत मोठ्या पडद्यावर आपलं काम पाहताचा आनंद कसा असतो याचं वर्णन त्या करतात.

आता मुलीही स्वतःचा सिनेमा बनवण्याची स्वप्न पहात आहेत. त्यांना अशी मोठी स्वप्न बाळगाताना पाहणं हाच माझ्या आयुष्यातला मोठा पुरस्कार असल्याचं साहू म्हणतात.

तुलसीमधला सूर्य मावळेपर्यंत राजेश दिवार आणि त्यांचा गट हिपहॉपच्या ताल अचूक असावा यासाठी काम करत राहतो. "कंटेट क्रिएशनपासून रॅप संगितावर उडी मारणं सोपं नव्हतं," राजेश सांगतो. त्याच्या चॅनेलचं नाव आहे लेथवा राजा.

युट्यूब त्यांच्या गावात आणखी नवा सांस्कृतिक बदल घडवून आणेल अशी राजेशला आशा आहे.

"आमच्या भाषेतून रॅप संगीत कुणी फार करत नाही. पण मी ते बदलून दाखवेन," तो विश्वासाने म्हणतो. "आमच्या भागात मला एक नवा आवाज निर्माण करायचा आहे. एक दिवस तुलसी व्हीडिओप्रमाणेच त्याच्या संगीतासाठीही ओळखलं जाईल."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.