You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IPL च्या लिलावात कोट्यधीश बनलेले 4 क्रिकेटर, जे ठरलेत आजवरचे सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL ने आजवर अनेकांना कोट्यधीश बनवलंय. या स्पर्धेला तर काहीजण 'कोट्यधीश बनवणारी मशीन' असंही म्हणतात. पण देशाच्या कानाकोपऱ्यात क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या स्पर्धेनं 'मैदान' मिळवून दिलंय, हे नाकारताही येणार नाही.
यंदाही आयपीएलने अनेकांना कोट्यधीश बनवलंय. पण यातली काही नावं अगदीच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहेत. याच नावांबद्दल, अर्थात खेळाडूंबद्दल आपण या बातमीतून सविस्तर जाणून घेणार आहोत.
यावर्षी कोट्यधीश झालेल्या खेळाडूंमध्ये जम्मू-काश्मीरचा आकिब नबी दार, अमेठीचा प्रशांत वीर त्रिपाठी आणि भरतपूरचा कार्तिक शर्मा यांचा समावेश आहे.
यापूर्वी त्यांची काही खास अशी ओळख नव्हती. त्यांना मिळालेला पैसा इतका जास्त आहे की, त्यांनी यापूर्वी कधी स्वप्नातही ते पाहिले नसतील.
याच श्रेणीत केकेआरने 3 कोटींमध्ये घेतलेला तेजस्वी सिंह आणि लखनौ सुपर जायंट्सने 2.6 कोटींमध्ये घेतलेल्या मुकुल चौधरीला देखील ठेवता येईल.
आकिब नबी दारला दिल्ली कॅपिटल्सने 8.4 कोटींमध्ये घेतले, तर प्रशांत वीर त्रिपाठी आणि कार्तिक शर्माला (प्रत्येकी) चेन्नई सुपरकिंग्सने 14 कोटी 20 लाख रुपयांमध्ये घेतले.
हे दोघेही आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत.
'जिगरबाज आकिब'
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे जन्मलेला आकिब नबी दार जिद्दी आणि जिगरबाज क्रिकेटपटू आहे.
त्याचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते, त्यामुळे घरात फारशा सोयीसुविधा नव्हत्या. इतकंच नाहीतर, त्याच्या घरापासून सर्वात जवळचं क्रिकेट मैदान हे 54 किलोमीटर दूर श्रीनगरमध्ये होतं.
एका स्थानिक वृत्तपत्राने त्याला सुरुवातीच्या अडचणींबाबत विचारलं असता आकिब म्हणाला, "जर तुमचं लक्ष्य भारतासाठी खेळणं असेल, तर या सर्व गोष्टींचा काही फरक पडत नाही. तुमच्याकडे साधनं कमी आहेत, याचाही काही फरक पडत नाही. पण तुम्ही कारणं सांगू शकत नाही. माझं ध्येय टीम इंडियाची जर्सी घालणं आहे."
परवेझ रसूल हा टीम इंडियाकडून खेळणारा जम्मू-काश्मीरचा पहिला खेळाडू ठरला हे आपल्याला माहीत आहे.
त्याला खेळताना पाहूनच आकिबच्या मनातही क्रिकेट खेळण्याची इच्छा जागी झाली. त्यानं राज्याच्या अंडर-19 संघासाठी अनेकदा ट्रायल दिल्या. खूप मेहनत केल्यानंतरच त्याला संघात जागा मिळू शकली.
आकिबने 2018 मध्ये 'लिस्ट ए' क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नाही. या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत वेगवान गोलंदाजीचा दबदबा प्रस्थापित करण्यात तो यशस्वी ठरला.
त्यानं 7.41च्या इकॉनॉमी रेटवर 15 विकेट्स घेतल्या. तसेच रणजी ट्रॉफीच्या 9 सामन्यांत 29 विकेट्स घेण्यातही तो यशस्वी ठरला.
दुलीप ट्रॉफीत उत्तर विभागाकडून पश्चिम विभागाविरुद्ध खेळताना आकिबने हॅटट्रिक घेतली होती. त्याने सलग चार चेंडूंमध्ये चार विकेट्स घेतल्या. याआधी भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी 1979 मध्ये आणि साईराजने 2001 मध्ये हॅटट्रिक घेतली होती.
आकिबच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर जम्मू-काश्मीर संघाला या वर्षी रणजी ट्रॉफीत पहिल्यांदाच दिल्लीचा पराभव करता आला. या ऐतिहासिक विजयात आकिबने पाच विकेट्स घेतल्या होत्या.
'धोनीच्या टीमकडून खेळणं प्रशांतसाठी स्वप्नपूर्ती'
या तरुण खेळाडूला चेन्नई सुपरकिंग्सने रवींद्र जडेजाच्या जागी विकत घेतलं आहे. त्यामुळेच त्याच्यावर इतकी मोठी रक्कम खर्च करण्यात आली.
युवराज सिंग प्रशांतचा आदर्श आहे. त्याला पाहूनच तो क्रिकेटपटू बनला.
मात्र, महेंद्रसिंह धोनीसोबत चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणं हे त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न तर आता पूर्ण झालं आहेच शिवाय तो श्रीमंतही झाला आहे.
अमेठीच्या संग्रामपूर ब्लॉकमध्ये राजेंद्र त्रिपाठी यांच्या घरी जन्मलेल्या प्रशांतला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड निर्माण झाली होती.
सुरुवातीला तो आपल्या ब्लॉकमधील आंबेडकर स्टेडियमवर खेळत असे.
तिथे त्याला प्रशिक्षक गालिब यांच्याकडून प्राथमिक प्रशिक्षण मिळालं. त्यानंतर लवकरच त्याची मैनपुरी स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये निवड झाली.
या 20 वर्षीय लेफ्ट-आर्म स्पिनरने यूपीकडून खेळलेले 2 प्रथम श्रेणी आणि 9 टी-20 सामन्यांत आपली छाप पाडली आहे.
मात्र, खऱ्या अर्थाने तो राज्याच्या अंडर-19 ट्रॉफीमध्ये चर्चेत आला. या स्पर्धेत त्याने 7 सामन्यांत 19 षटकारांच्या जोरावर 376 धावा केल्या.
एक वेळ अशीही आली होती की, प्रशांत वीरच्या कारकिर्दीवर मोठं संकट आलं होतं. दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये सामना खेळताना झेल घेताना चेंडू त्याच्या डोळ्याला लागला आणि सात टाके पडले होते.
मात्र तो त्यातून लवकर बरा झाला आणि आता पुन्हा एकदा तो जोरदार कामगिरी करत आहे.
कार्तिक शर्मा : 'षटकार मारणारा खेळाडू व्हायचंय'
राजस्थानच्या भरतपूरमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने क्रिकेटचं प्रशिक्षण आग्रा येथील लोकेंद्र सिंह यांच्या अकादमीत घेतलं आहे.
लोकेंद्र सिंह हे भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरचे वडील आहेत. याच अकादमीत त्यांचा पुतण्या राहुल चहरनेही क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं आहे.
लोकेंद्र सिंह यांनी एकदा सांगितलं होतं की, "मी पहिल्यांदा कार्तिकला त्याचे वडील मनोज शर्मा यांच्या खांद्यावर हातात प्लास्टिकची बॅट घेऊन बसलेलं पाहिलं होतं. तेव्हा कार्तिक मला षटकार मारणारा खेळाडू व्हायचं आहे," असं म्हणाला होता.
लोकेंद्र सिंह यांनी टाइम्स ऑफ इंडिया डॉट कॉमला सांगितलं की, "सीएसकेने 14.2 कोटी रुपयांत घेतल्याची बातमी समजल्यावर मी शांतच होतो.
माझ्या भावना दिसत नव्हत्या. पण घरातील सर्वजण आनंदाने उड्या मारत होते आणि घरात मिठाई वाटली जात होती."
कार्तिक आजही दीपक चहरने दिलेल्या बॅटनेच खेळतो. पाच वर्षांपूर्वी दीपकने त्याला विकेटकीपिंगचे ग्लोव्हज दिले आणि सांगितलं होतं की, विकेटकीपिंगही कर, नाहीतर एकाच प्रकारचा खेळाडू म्हणून राहशील.
कार्तिक आधीही विकेटकीपिंग करत होता, त्यामुळे त्याने हे गांभीर्याने घेतलं आणि त्याचा फायदा आता त्याला मिळताना दिसत आहे.
'मुकुल चौधरीला मिळाली एलएसजीची साथ'
मुकुल चौधरीला देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात करून दोनच वर्षे झाली आहेत, तरीही लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 2.6 कोटी रुपयांत विकत घेतलं आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये झारखंडविरुद्ध त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सलामीवीर म्हणून त्याने 35 धावा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये काही आक्रमक खेळी खेळल्याचं बक्षीस मुकुलला मिळालं आहे.
त्याने मुंबईविरुद्ध 28 चेंडूत 54 धावा आणि दिल्लीविरुद्ध 26 चेंडूत 62 धावा करत आपल्या आक्रमक खेळीचा नमुना दाखवून दिला होता.
'तेजस्वीची आक्रमक शैली'
तेजस्वीसिंह दहिया हा दिल्लीचा उदयोन्मुख विकेटकीपर फलंदाज आहेत. त्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे आक्रमक शैलीत फलंदाजी करणं.
आतापर्यंत त्यानं फक्त 6 टी-20 सामने खेळले आहेत आणि 168 च्या स्ट्राइक रेटने 113 धावा केल्या आहेत.
तेजस्वीला ही रक्कम दिल्लीसाठी फिनिशरची भूमिका यशस्वीपणे पार पाडल्यामुळे मिळाली आहे. सध्याच्या काळात प्रत्येक संघात फिनिशरला खूप महत्त्व आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)