श्रीलंकेविरुद्धचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला, विजयानंतर सूर्यकुमार फायनलवर काय म्हणाला?

आशिया कप क्रिकेटच्या सुपर-4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सोपा वाटणारा सामना भारताला सुपर ओव्हरपर्यंत खेळावा लागला.

फायनलपूर्वी टीम इंडियाला श्रीलंका संघाने काट्याची टक्कर दिली. परंतु, सुपर ओव्हरमध्ये भारताने हा सामना जिंकला. दोन्ही संघांनी आपापल्या डावांमध्ये 202 धावा केल्या.

पण सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाचं पारडं जड ठरलं आणि फायनलपूर्वी त्यांनी हा कठीण सामना जिंकला.

भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये आपलं स्थान आधीच पक्कं केलं आहे. रविवारी (28 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना रंगणार आहे.

श्रीलंकेचा संघ आधीच स्पर्धेतून बाद झाला होता, त्यामुळे सुपर-4चा हा सामना फक्त औपचारिकता होता. पण हा सामना या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वात रोमहर्षक सामना ठरला.

श्रीलंका संघाने मैदानावर जबरदस्त कामगिरी करत भारताच्या 202 धावांची बरोबरी करून सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला.

श्रीलंका संघाने फंलदाज पथुम निसांकाच्या 107 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचून सुपर ओव्हरपर्यंत नेला.

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंका संघाला केवळ 2 धावाच करता आल्या. अर्शदीप सिंगने पाच चेंडूंमध्ये 2 विकेट घेतल्या.

तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वानिंदू हसरंगाच्या पहिल्याच चेंडूवर 3 धावा घेऊन अगदी सहजपणे टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

अभिषेक शर्माची वादळी खेळी

तत्पूर्वी, श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी दिली. सलामीवीर अभिषेक शर्माच्या सलग तिसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 202 धावांचा डोंगर उभा केला.

अभिषेक शर्माने आपला फॉर्म कायम ठेवत अवघ्या 31 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी केली.

दुसरा सलामीवीर शुभमन गिल केवळ 4 धावा करू शकला.

कर्णधार सूर्यकुमार यादवला या सामन्यातही सूर गवसला नाही. त्याने केवळ 12 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्माने 22 चेंडूवर आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.

श्रीलंकेचा कर्णधार असलंकाने अभिषेकची विकेट घेतली. पण तिलक वर्माच्या नाबाद 49 धावा आणि संजू सॅमसनच्या 39 धावांमुळे श्रीलंकेचे गोलंदाज दबावात राहिले.

निसांकाचं आक्रमक शतक आणि सुपर ओव्हरचा थरार

टीम इंडियाच्या 202 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेनं पहिल्याच षटकांत कुशल मेंडिसची शून्यावर विकेट गमावली.

परंतु, पॉवर प्लेची सहा षटकं संपेपर्यंत श्रीलंकेचा स्कोअर केवळ एक विकेट गमावत 72 धावांपर्यंत पोहोचला होता.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. हार्दिक पांड्यानेही केवळ एक षटकच टाकलं आणि नंतर तो मैदानातून बाहेर गेला.

श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका या सामन्यातील सर्वात लक्षवेधक खेळाडू ठरला. त्याने शानदार शतक झळकावलं. निसांकाने 25 चेंडूतच अर्धशतक केलं. कुशल परेरानेही 58 धावा केल्या.

परंतु, भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने परेराला बाद करत ही भागीदारी संपुष्टात आणली.

निसांकाने 52 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. पण शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेची धावसंख्याही 5 विकेटच्या बदल्यात 202 धावांवर रोखली गेली. हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सूर्यकुमार यादवने काय म्हटलं?

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने हा 'फायनलसारखा अनुभव देणारा सामना वाटला', असं म्हटलं.

या सामन्याचा संघावर मोठा परिणाम झाल्याचे त्याने सांगितलं.

पाकिस्तानविरुद्धच्या फायनलबद्दल विचारल्यावर तो म्हणाला की, ''आज रात्री आम्हाला रिकव्हरी करण्याची गरज आहे. आत्ताच फायनलबद्दल आम्हाला विचार करायला लावू नका. अनेक खेळाडूंच्या स्नायूंवर ताण आला आहे. शनिवारी चांगली रिकव्हरी होईल आणि आम्ही याच उत्साहात मैदानात उतरू, जसं आज उतरलो होतो.''

त्यानं म्हटलं की, ''पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही मुलांनी खूप धाडस दाखवलं. शेवटच्या चेंडूपर्यंत आम्ही आशा सोडली नाही. मी टीमला सांगितलं की एनर्जी टिकवून ठेवा आणि शेवटी आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे पाहू.''

तो म्हणाला, "मला माझ्या खेळाडूंकडून फक्त एवढंच अपेक्षित होतं की, त्यांनी आपल्या योजना प्रत्यक्षात कशा उतरतील याचा प्रयत्न करावा. हे खूप महत्वाचं होतं आणि मला खात्री आहे की, प्रत्येकाला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळालं आहे. फायनलमध्ये गेल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे."

दुबईतील उष्ण हवामानामुळे अनेक खेळाडूंना अडचणींना सामोरे जावं लागलं आहे, असंही सूर्यकुमारने सांगितलं.

यावेळी त्याने अभिषेक आणि संजूच्या खेळीचं कौतुक केलं. दोघांनी अप्रतिम फलंदाजी केल्याचं तो म्हणाला.

अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीबद्दल सूर्यकुमार यादव म्हणाला की, ''अर्शदीपने मागील 2-3 वर्षांपासून आमच्यासाठी चांगली कामगिरी केली आहे. मी त्याला सांगितलं की, प्लॅनवर विश्वास ठेव आणि त्याची अंमलबजावणी कर.''

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)